धर्मांतर की धर्मच विसरलात?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-Dec-2019   
|

ज्या बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला स्वतः रस्त्यावर उतरून जोडे मारले, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला आज राहुल गांधींचा साधा निषेधही करता येऊ नये, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर लोकसभेत एक आणि काँग्रेसने डोळे वटारल्यावर राज्यसभेत भलतीच भूमिका घेऊन स्वतःचं पार हसू करून घ्यावं, या गोष्टी शिवसेनेची व या सरकारची पुढील वाटचाल स्पष्ट करतात. ‘काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणजे आम्ही काही धर्मांतर केलं नाही’, असं मुख्यमंत्री सांगत असले तरी, काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्ही धर्म विसरला तर नाहीत ना, असा सवाल मात्र जनता नक्कीच विचारते आहे.

udhav thakrye_1 &nbs

खेळाच्या मैदानात प्रत्यक्ष खेळणारे खेळाडू आणि मैदानाबाहेर बसून त्यांना प्रोत्साहन देणारे, डिवचणारे, चेतवणारे आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक या दोन्ही भूमिका स्वतंत्र असतात. प्रेक्षक त्या खेळातला कितीही मोठा तज्ज्ञ वगैरे जरी असला तरी स्वतः मैदानात उतरून खेळायचं झाल्यास त्याला ते जमतंच असं नाही. राजकारणदेखील यापेक्षा वेगळं नाही आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात या गोष्टीचा प्रत्यय वारंवार येताना दिसत आहे. आतापर्यंत नुसतंच ‘रिमोट कंट्रोल’
बनण्याची भाषा करत, शांतपणे घरात बसून इतरांना नाचवण्याची सवय असलेल्यांवर आता स्वतः सरकारमध्ये अग्रभागी येत सर्व वार आपल्या छातीवर झेलायची वेळ आली, की काय होतं हे सध्या आपण पाहतो आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्य विधीमंडळाचं पहिलं अधिवेशन नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या रूपाने पार पडलं. जेमतेम आठवडाभर चाललेल्या या अधिवेशनात या नव्या सरकारच्या मर्यादा आणि आगामी वाटचाल, दोन्ही स्पष्ट झाल्या.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

'मला काही माहित नाही', 'मी नवीन / नवखा आहे' हे मान्य करणं चांगली गोष्ट आहे. फार कमी व्यक्तींमध्ये हे मान्य करण्याचा मोठेपणा आढळतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर सुरूवातीलाच ही बाब मान्य केली, याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक करायला हवं. फक्त, आता एवढ्या दिवसांनंतरदेखील उद्धव ठाकरे तीच गोष्ट वारंवार सांगत आहेत. मी नवीन आहे, माझ्यापाशी अनुभव नाही, म्हणूनच विरोधक आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वगैरे. आता या तीन चाकांच्या सरकारच्या मधुचंद्राचा काळ संपलाय. आता प्रत्यक्ष दैनंदिन संसारातील अडीअडचणींना, संकटांना सामोरं जायचं आहे. बाकी कुणी नाही तरी किमान स्वतःला जाणते राजे म्हणवून घेणाऱ्यांनी तरी हे वास्तव मुख्यमंत्र्यांना समजावून सांगायला हवं. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या एका सभेत बोलताना ‘उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या’ अशा आशयाचं काहीतरी बोलले होते. हे सांभाळून घेणं वगैरे एका कुटुंबात आणि कुटुंबाने चालवलेल्या पक्षात चालून गेलं. म्हणून सरकारमध्येही असंच कसं चालेल? महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आणि एका प्रादेशिक कौटुंबिक पक्षाचा प्रमुख यामध्ये काहीतरी फरक आहेच ना? इथे मुख्यमंत्री सकाळी झोपून उठला की शेकडो समस्या आणि त्या समस्यांवर उत्तरं मागण्यासाठी आलेले शेकडो लोक, दोन्ही आ वासून उभे असतात. तेव्हा क्षणभर उसंत घ्यायलाही वेळ नसतो. त्यामुळे माझ्यापाशी अनुभव नाही हे कारण लोक पहिले दोन दिवस ऐकून घेतीलही, पण आता रोजरोज नाही. लोकांना आपली कामं झालेली हवी असतात, तुमच्या वैयक्तिक समस्या ऐकून घेण्यात त्यांना काडीमात्र रस आणि वेळ नसतो, हे नव्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊन आतातरी त्यादृष्टीने कामाला लागायला हवं.

मैदानात ठामपणे उभं राहणं, वार झेलणं जमत नसेल, तर खेळाडू कसे सैरभैर होतात, हेही या अधिवेशनात आपण पाहिलं. एव्हाना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून इतर अनेक मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसायला किंवा सोयीस्कररित्या भूमिका बदलायला सुरुवात केली आहेच. ज्या बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला स्वतः रस्त्यावर उतरून जोडे मारले, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला आज राहुल गांधींचा साधा निषेधही करता येऊ नये, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर लोकसभेत एक आणि काँग्रेसने डोळे वटारल्यावर राज्यसभेत भलतीच भूमिका घेऊन स्वतःचं पार हसू करून घ्यावं, या गोष्टी शिवसेनेची व या सरकारची पुढील वाटचाल स्पष्ट करतात. ‘काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणजे आम्ही काही धर्मांतर केलं नाही’, असं मुख्यमंत्री सांगत असले तरी, काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्ही धर्म विसरला तर नाहीत ना, असा सवाल मात्र जनता नक्कीच विचारते आहे. खासकरून अधिवेशन काळात जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना चक्क जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली, तेव्हा खरोखरच एकेकाळच्या कडवट हिंदुत्ववादी वगैरे म्हणवणाऱ्या शिवसेनेचा हा नेता खरोखरच धर्म विसरल्याची शंका येते.

सलग पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाचा कारभार करणारी व्यक्ती आज विरोधी पक्षनेतेपदी बसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप विरोधात असला तरी सर्वांत मोठा पक्ष आहे. फडणवीस व भाजपचे जोरदार हल्ले झेलताना व परतवताना उद्धव ठाकरे यांच्या मर्यादा या अधिवेशनात ठळकपणे दिसून आल्या. एकतर मूळ विषय सोडून भलत्याच काहीतरी गोष्टी बोलत बसणं किंवा इतर सहकाऱ्यांचा, विशेषतः काँग्रेस – राष्ट्रवादीतील ‘अनुभवी’ मंडळींचा आधार घेणं, अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. ‘हे स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे’ असं एक जाहीर सभेत टाळ्या मिळवायचं वाक्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत टाकलं खरं, परंतु त्यातून मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ‘कमी बोलून जास्त काम करण्याचा आमचा निर्धार आहे’ असं मुख्यमंत्री म्हणाले. तसं असेल तर आनंदच आहे, परंतु मूळ खातेवाटपासच दोन-दोन आठवडे लावणाऱ्या या नव्या मुख्यमंत्र्यांनी आपण बोललेलं खरोखरच ‘करून दाखवण्याच्या’ दिशेने पावलं उचलली तर राज्यातील जनतेस अधिक आनंद होईल.