नीलम आणि राजीवप्रताप रुडी - खानदानी रुबाब आणि संवेदनशीलता यांचा संयोग

स्रोत: विवेक मराठी    दिनांक23-Dec-2019
|

***मेधा किरीट***

 इंडियन एअरलाइमध्ये पायलट म्हणून नोकरी करणाऱ्या राजीव प्रताप रुडी यांनी नीलमला मागणी घातली. नीलमने त्यांना सांगितलं की, हे सर्व माझे आईवडील ठरवतील. त्यांनी मग रीतसर नीलमच्या वडिलांकडे मागणी घातली. आईवडिलांचा पाठिंबा होता, पण नीलम तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या प्रभावाखाली असल्याने, 'कुंडली जुळली तरच लग्न करेन' असं तिने सांगितलं. दोघांची कुंडली जुळली आणि नीलम बिहारमधील राजघराण्याची सून झाली.


Personal Life of Rajiv Pr

बिहारच्या राजकारणात रुडीजींवर अनेकदा हल्ले झाले आहेत. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांना त्यांच्याच क्षेत्रात पराभूत करणं हे जिकिरीचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे अनेकदा हल्ले होऊनही रुडीजी तेथेच काम करत असतात. तशी नीलमही पहाडकन्या आहे
, त्याचा तिला अभिमान आहे. ती झटकन हार मानत नाही. पण रुडीजींच्या काळजीने तिचा जीव कासावीस होतो. वरून कणखर दिसणारी ही पहाडन कोमलहृदयी आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

भाजपामध्ये आलेल्या बहुतेक जणांना संघ आणि परिवाराची पार्श्वभूमी असते. त्यामुळे किंचित गबाळेपणाकडे झुकलेलं साधेपण, अशी काही वर्षापूर्वीपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांची ओळख होती. बहुतेकांच्या पत्नींचंही राहणीमान साधंच, विशेष तामझाम नसलेलं असे. या वातावणात एक जोडी मात्र वेगळी उठून दिसायची - नीलम आणि राजीवप्रताप रुडी यांची. पेशाने वैमानिक असलेले रुडीजी आणि इंडियन एयरलाइन्समध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत असलेली नीलम दोघंही, त्यांच्या पेशामुळे सवयीच्या झालेल्या टापटीप आणि रुबाबदार राहणीमानामुळे वेगळे उठून दिसत असत. मुळात नीलम हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरच्या डोग्रा राजपूत कुटुंबातील. पहाडातील खानदानी सौंदर्य लाभलेलं, निरागस पण आकर्षक व्यक्तिमत्त्व. श्रीमान रणवीर धतवालिया आणि राजकुमारीजी यांची ही ज्येष्ठ कन्या. वडील सैन्यदलात होते. नीलम चार वर्षांची असताना त्यांची बदली इराणमध्ये तेहरानला झाली. नीलम तेथील शाळेत जाऊ लागली. त्यामुळे पर्शियन भाषा तिला शिकता आली. तिथल्या नागरिकांना पर्शियन भाषेशिवाय दुसरी भाषा येत नसे. सर्व व्यवहार पूर्ण पर्शियन भाषेत होत. आईला पर्शियन शिकायला वेळ लागल्याने तिला खरेदी आणि बाकी सर्व व्यवहारात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी नीलमवर आली.

 

नीलम ही घरातली थोरली मुलगी असल्याने वडिलांची खूप लाडकी होती. लहानपणापासून अभ्यासात हुशार होती आणि खेळातही प्रवीण होती. वडील सैन्यदलात होणाऱ्या धावणे, पोलो आदी खेळात पारितोषिके मिळवीत असत. नीलम बालवर्गात असल्यापासून शाळेतल्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असे. याविषयी बोलताना नीलम म्हणत,''माझ्या वडिलांकडून 'थान लेना' या उक्तीचा पाठ वयाच्या पाचव्या वर्षीच मिळाला.'' शाळेत होणाऱ्या धावणे, रिले आदी खेळात नीलम नेहमीच उत्साहाने भाग घ्यायची. दोन-तीनदा असं झालं की ती दुसऱ्या क्रमांकावर आली. प्रयत्न करूनही पहिला नंबर काही मिळाला नाही. त्यामुळे आलेलं हिरमुसलेपण आणि त्यामागची समस्या वडिलांच्या लक्षात आली. पुढच्या स्पर्धेआधी त्यांनी तिला सांगितलं की, ''तू मनाशी नक्की कर की मी पहिलीच येणार आहे, तू येऊ शकतेस, तुझ्यात ती क्षमता नक्की आहे.'' आणि खरोखरच त्या दिवशीच्या स्पर्धेत नीलम पहिली आली. आपल्या मुलीच्या सर्वांगीण विकासाठी वडिलांचे सतत प्रयत्न असत. तिसरीपासून पाचवीपर्यंत रोज अभ्यासाला बसण्याआधी वडील तिच्याशी बुध्दिबळ खेळत, त्यामुळे अभ्यासातली एकाग्रता वाढण्यास मदत होत असे.

 

पुढे तेहरानहून परतल्यावर वडिलांच्या भारतात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्यामुळे देशाच्या वेगवेगळया शाळांत शिक्षण घेण्याची नीलमला संधी मिळाली. त्यातून अनुभवविश्व समृध्द झालं आणि विचारांच्या कक्षाही रुंदावायला मदत झाली. सर्वात रोमांचकारक अनुभव देहरादूनच्या केब्रीन हॉल शाळेचा (Cabrin Hall School) आहे. ही शाळा अमेरिकन इंग्लिश लोक चालवत असत. बॉक्सिंग, क्रिकेट, टेनिस इत्यादी खेळ शाळेतच शिकवले जात असत. त्यांचा स्पोर्ट्स डे म्हणजे मोठा सोहळा असे. आणि त्या वेळी नीलम अनेक खेळात प्रथम येत असे. ती अभ्यासातही खूप हुशार होती, त्यामुळे शाळेत तिला दोनदा double promotion मिळाले. त्यामुळे B.Sc. ही पदवी मिळाली, तेव्हा नीलम फक्त साडेअठरा वर्षांची होती.

 
Personal Life of Rajiv Pr

महाविद्यालयीन शिक्षणासाठी नीलम अजमेरच्या फक्त मुलींसाठी असलेल्या सोफिया महविद्यालयात गेली. तिथे राजघराण्यातल्या, तसंच राजदूत, नेते, श्रीमंतांघरच्या मुली असत. तिथेही नीलम खूप लोकप्रिय होती. राजस्थान राज्यातील महिला क्रिकेट टीममधून ती खेळत असे. तेव्हा तिला श्रीराम मिल्सच्या कपडयांच्या मॉडेलिंगसाठी विचारणा झाली होती. मात्र तिला त्यात रस नव्हता आणि आईला वाटत असे की तिने एकतर डॉक्टर व्हावे किंवा शिक्षिका. तिला दोन्ही व्हायचे नव्हते. तिला हॉटेल व्यवस्थापन करायचे होते. 'खानदानी कुटुंबातल्या मुलीने अशी नोकरी करायची?' हा आईचा प्रश्न. पारंपरिक विचारांच्या आईला करिअरची ही दिशा काही पसंत नव्हती. पण नीलम बंडखोर. तिला त्या काळी या क्षेत्रात महिलांना असलेल्या दुय्यम स्थानामुळे या क्षेत्रात जायचं होतं.

नीलमने एअर इंडियामध्ये 'एअर होस्टेस' पदासाठी अर्ज केला आणि तिथे तिची निवड झाली. तिच्या आईसाठी हा धक्काच होता. त्यानंतर सहा महिने तरी आईने तिच्याशी अबोला धरला होता. अशी कमी दर्जाची नोकरी करणं आईच्या विचारांमध्ये बसणारं नव्हतं. पण आई खूश होईल अशी एक घटना घडली. इंडियन एअरलाइमध्ये पायलट म्हणून नोकरी करणाऱ्या राजीव प्रताप रुडी यांनी नीलमला मागणी घातली. नीलमने त्यांना सांगितलं की, हे सर्व माझे आईवडील ठरवतील. त्यांनी मग रीतसर नीलमच्या वडिलांकडे मागणी घातली. आईवडिलांचा पाठिंबा होता, पण नीलम तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या प्रभावाखाली असल्याने, 'कुंडली जुळली तरच लग्न करेन' असं तिने सांगितलं. दोघांची कुंडली जुळली आणि नीलम बिहारमधील राजघराण्याची सून झाली.

 

राजीवप्रताप रुडी यांचं पूर्ण नाव राजीवप्रताप विश्वनाथ सिंग. आईचं नाव प्रभादेवी. राजीवजींचा जन्म आणि शालेय शिक्षणही पाटणा इथे झालं. परंतु त्यांचं मूळ गाव अमनौर, सारण. या भागातूनच ते खासदार म्हणून निवडून येतात आणि या भागाचा त्यांनी संपूर्ण कायापालट केला आहे. त्यांनी सिंग हे वाडवडिलांचं आडनाव लावलं नाही, याला कारण म्हणजे जेव्हा ते विद्यार्थी चळवळीत - पंजाब विश्व विद्यालयात विद्यार्थी नेता म्हणून पुढे आले, तेव्हा राजकारणात आर.पी. सिंग या नावाचे अन्य तीन विद्यार्थी नेतृत्वाच्या शर्यतीत होते. त्यामुळे त्यांचं घरगुती उपनाव 'रुडी' हेच आडनाव म्हणून लावायला त्यांनी सुरुवात केली आणि तेच रूढ झालं. राजीवप्रताप द्विपदवीधर तर आहेतच, तसंच यूएस फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या मियामी, फ्लोरिडा येथील सिमसेंटर (SimCenter)मधून ए-320 विमान उडविण्याचे विशेष प्रशिक्षण आणि परवाना घेतलेले ते व्यावसायिक पायलट आहेत. आजही ते विमान चालवतात. त्यांची मुलगी अतिशासुध्दा प्रशिक्षित पायलट आहे. नृत्यकलेतील विख्यात कलावंत पद्मभूषण राजा आणि राधा रेड्डी यांची ती शिष्या असून व्यावसायिक कुचिपुडी नृत्यांगनाही आहे. देशभरात तिचे नृत्याचे कार्यक्रम झाले असून सध्या ती परदेशात पदवीचं शिक्षण घेते आहे.

त्यांच्या मोठी मुलीने - अवश्रेयाने वडिलांसारखा कायद्याचा अभ्यास केला आहे आणि ती पेशाने वकील आहे. तसंच आईकडून आलेला खेळाचा वारसाही तिने जपला आहे. पोलो खेळामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांची ती मानकरी आहे.

 

नीलम आणि राजीवप्रतापजी यांचं 1991मध्ये लग्न झालं, तेव्हा नीलम हवाई सुंदरी म्हणून नोकरी करत होती. त्यानंतर पदोन्नती मिळून ती 'हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र प्रमुख' झाली. 1999च्या निवडणुकीत राजीवप्रतापजी छपरा लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले. मा. अटलजींच्या मंत्रीमंडळात ते वाणिज्य राज्यमंत्री झाले. काही काळानंतर ते नागरी उड्डयन मंत्री झाले. त्या वेळी नीलमने पती-पत्नीच्या समान क्षेत्रामुळे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर तिने मुलींच्या संगोपनाकडे, स्वत:च्या आवडीचा खेळ - गोल्फ खेळण्यात आणि सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिलं.

नीलम अत्यंत धार्मिक, कुणावरही पटकन विश्वास ठेवेल अशी सरळ स्वभावाची आहे. तिच्यात एक पहाडी नैसर्गिक मोकळेपणा आहे. कलात्मकता, अत्याधुनिक फॅशन, नृत्य-नाटय, चित्रपट याची तिला उपजत आवड आणि त्या विषयांमधलं परिपूर्ण ज्ञान आहे. उच्चभ्रू समाजातील अनेकांशी स्नेहसंबंध असल्यामुळे तिचा मित्रपरिवार मोठा आणि सर्व स्तरांतला आहे. ती कायमच सर्वांशी मिळून मिसळून असते. आपलं घर, कुटुंब, मुली, खेळ सांभाळून सामाजिक संबंध जपते. सातत्याने 'आपल्या संबधांचा उपयोग समाजातील गरजू लोकांसाठी व्हावा' यासाठी कोणताही गाजावाजा न करता प्रयत्नशील असते. हे तिचं मोठेपण आहे.

एकदा ती मुंबईला आली होती, तेव्हा आम्ही भेटायचं ठरवलं. नेमकं त्याच वेळी मला रुइया महाविद्यालयात झोपडपट्टी अभ्यास केंद्राचा तास होता. तिला तसं सांगितल्यावर ती उत्सुकतेने लगेचच त्या वर्गात यायला तयार झाली. तिथे तासभर बसली. खरं तर त्या तासानंतर ये, असं मी तिला सुचवलं होतं. पण या नवीन अभ्यासक्रमाविषयी जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी ती वर्गात येऊन बसली. तास संपल्यावर केंद्रातल्या विद्यार्थ्यांशी खूप गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्यांचं कौतुक केलं. तेव्हा रुडीजी भारत सरकारचे कौशल्य विकास मंत्री होते. त्यांच्या पत्नीने असं कौतुक केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआप प्रोत्साहन मिळालं. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत ती या केंद्राची आस्थेने विचारपूस करते. अनेकांना तिने ह्या प्रयत्नात सहभागी करून देण्याचा प्रयत्न केला. माझी ओळख करून देताना बडयाबडया व्यक्तींना ती आवर्जून या झोपडपट्टी अभ्यास केंद्राबाबत सांगते.

काश्मीरमधील माझ्या कामातही तिने नेहमीच मदत केली. तिथल्या पहिल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्धाटन डिसेंबरच्या ऐन कडाक्याच्या थंडीत रुडीजींच्या हस्ते झाले होते. तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्यात उघडलेले आणि आपले लक्ष्य पूर्ण केलेले ते पहिले केंद्र ठरले.

दिल्लीतील उद्योगपतींच्या PHD चेम्बर्समधून तिने अनेक कार्यक्रम केले. Sports For All खेळांचे आजोजन केले. त्यात दिव्यांगांसाठी खास खेळ ठेवण्यात आले होते. खेळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम केले. दर वर्षी सीमा सुरक्षा दलाचं उंटांचं पथक प्रजासत्ताक दिन संचालनात भाग घ्यायला येतं. त्यानंतर नीलम त्यांच्या प्रोत्साहनार्थ त्यांचे चित्तवेधक आणि थरारक खेळांचे प्रात्यक्षिक आयोजित करते.

बिहारच्या राजकारणात रुडीजींवर अनेकदा हल्ले झाले आहेत. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांना त्यांच्याच क्षेत्रात पराभूत करणं हे जिकिरीचं काम त्यांनी केलं आहे. त्यातून त्यांचा मतदार संघ म्हणजे सासण. पूर्वीचा छपरा. लोकनायक जयप्रकाशजी यांचं जन्मगाव याच मतदारसंघात. सीमेलगत नक्षलवादी भाग. त्यामुळे अनेकदा हल्ले होऊनही रुडीजी तेथेच काम करत असतात. तशी नीलमही पहाडकन्या आहे, त्याचा तिला अभिमान आहे. ती झटकन हार मानत नाही. पण रुडीजींच्या काळजीने तिचा जीव कासावीस होतो. वरून कणखर दिसणारी ही पहाडन कोमलहृदयी आहे. चेहरा अतिशय पारदर्शक आहे. कुणाचं जरासं दु:ख पाहिलं की डोळे पाणावतात.

 

नीलम आता 'USchapterIndia या संस्थेच्या Women in Aviation - VicePresident या पदावर कार्यरत आहे. राजकारणाच्या धबडग्यात, जीवनातल्या चढउताराला जिद्दीने सामोरी जाणारी, वरून सिंहीण पण आतून कोमल काळीज असलेली माझी ही सखी कधीही हाक मारली तरी कुणाच्याही मदतीसाठी उभी ठाकेल याबद्दल मला खात्री आहे. मी तिला म्हणेन - ''सखी सांगातिणी, तू हसत रहा. हसत रहा.''