खान्देशाचं मंदिर वैभव

स्रोत: विवेक मराठी    दिनांक24-Dec-2019
|

***सुशील अ. अत्रे****

 

भारतासारख्या देशात, जिथे ऐतिहासिक घटनांच्या अधिकृत नोंदी फारच थोडया आणि अगदी अलीकडच्या आहेत, अशा ठिकाणी तर मंदिराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या प्राचीन मंदिराची रचना मन लावून बघितली की त्या काळच्या समाजाच्या रचनेचाही अंदाज बांधता येतो. खान्देशातील तीन प्राचीन देवळांची माहिती देणारा लेख...

Khandesh_1  H x

 

समाजाच्या सांस्कृतिक वाटचालीची सर्वोत्कृष्ट साक्षीदार म्हणजे मंदिरं! भारतासारख्या देशात, जिथे ऐतिहासिक घटनांच्या अधिकृत नोंदी फारच थोडया आणि अगदी अलीकडच्या आहेत, अशा ठिकाणी तर मंदिराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक एक मंदिर आपल्याला शेकडो वर्षांचा इतिहास सांगत असतं, फक्त ऐकण्याची तयारी हवी! एखाद्या प्राचीन मंदिराची रचना मन लावून बघितली की त्या काळच्या समाजाच्या रचनेचाही अंदाज बांधता येतो. मी ज्या गावी राहतो, त्या जळगाव परिसरातील काही निवडक प्राचीन देवळांना भेट देऊन त्यांची थोडक्यात माहिती देणारं एक पुस्तक मी लिहिलं - देवळे-रावळे या नावाचं. त्यातल्याही तीन निवडक आणि प्रसिध्द मंदिरांची माहिती इथे देतोय.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

श्रीक्षेत्र पद्मालय

सुप्रसिध्द अष्टविनायकांची सर्व ठिकाणं साधारणपणे पुण्याच्या आसपासचीच आहेत. पण त्याशिवाय अडीच 'गणेशपीठं'सुध्दा महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. ती आहेत मोरगाव, राजूर (जि. जालना) आणि पद्मालय या तीन ठिकाणी. यापैकी मोरगाव आणि राजूर ही पूर्णपीठं आहेत, तर पद्मालय हे अर्धपीठ मानलं जातं. श्रीगणेशाने कमलासूर या राक्षस सेनापतीचे तीन तुकडे केले. ते तुकडे ज्या तीन ठिकाणी पडले, ती ही गणेशपीठं!

Khandesh_1  H x

पद्मालयाच्या गणेश मंदिराचं सगळयात मोठं वैशिष्टय म्हणजे, इथली जुळी गणेशमूर्ती! एकाच देवळात, एकाच आसनावरती एक डाव्या सोंडेचा आणि एक उजव्या सोंडेचा, अशा प्रकारची मूर्ती असलेलं हे जगातील एकमेव गणेश मंदिर आहे, असं म्हणतात. या दोन्ही मूर्तींची स्थापना मात्र वेगवेगळया व्यक्तींकडून आणि वेगवेगळया काळात झाली, असं मानतात. यापैकी डाव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना शेषनागाने केली आणि उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना कार्तवीर्य सहस्रार्जुनाने केली. कथेनुसार या दोघांनाही श्रीगणेशाने त्या-त्या काळात स्वयंभू प्रवाळरूपात दर्शन दिलं आणि त्याच रूपात श्रीक्षेत्री वास्तव्य केलं. त्यामुळे प्रचलित कथेनुसार पद्मालयाचं गणेशपीठ हजारो वर्षं जुनं आहे. अर्थात या दोन्ही प्रवाळ गणेशमूर्तीसुध्दा अतिप्राचीन आहेत. तसंच देवळासमोरचं तळंही!

मात्र, पेशवाईच्या काळापर्यंत हे मंदिर अगदी दुर्लक्षित असावं. कारण शिवकाळातल्या विविध कागदपत्रांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांचा उल्लेख आढळतो, तसा पद्मालयाचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही. पुढे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला काही मदत केल्याचा उल्लेख आढळतो. नंतर थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सन 1768मध्ये पद्मालयच्या देखभालीसाठी आजूबाजूच्या गावांचा ठरावीक महसूल मंदिराला लावून दिला. तशी रीतसर सनदही लिहून दिली होती. पुढे इंग्राजांच्या राजवटीत त्यांनीही या मंदिरासाठी सनद लिहून दिली होती. पण या सनदा मिळूनसुध्दा पद्मालय तसं दुर्लक्षित होतं. ही परिस्थिती 1903 सालापर्यंत अशीच होती. सन 1902-03च्या सुमारास सद्गुरू श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी पुढाकार घेऊन पद्मालयाचा जीर्णोध्दार केला आणि आज दिसतं ते सुरेख मंदिर बांधून घेतलं. तलावाला नीट घाट बांधून घेतला. 1913पर्यंत गोविंद महाराजांचं वास्तव्य पद्मालयला होतं. पुढे ते उनपदेवला गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली.

 

पद्मालय आणखी एका आख्यायिकेसाठी प्रसिध्द आहे, ती म्हणजे बकासूर वध. पांडव अज्ञातवासात असताना 'एकचक्रा' नगरीत राहिले होते. ती एकचक्रा म्हणजे आजचं एरंडोल! ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारलं, ती जागा म्हणजे 'भीमकुंड'. हे पद्मालय मंदिरापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर आहे. भीमाने पायाचा आघात करून दगडामध्ये कुंड निर्माण केलं, तेच हे भीमकुंड. जुने लोक सांगतात की, या कुंडाचा तळ किती खोल आहे हे समजतच नाही. पण आज तरी परिस्थिती अशी आहे की, जेमतेम 3-4 फूट पाणी दिसतं.

आजचं मंदिर हे अशा प्रकारे 1903च्या सुमारास उभारलेलं आहे. आत गाभाऱ्यात डाव्या आणि उजव्या सोंडेची प्रवाळ मूर्ती एकाच आसनावर विराजमान आहे. गंमत अशी की गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपाल म्हणूनही गणेशमूर्तीच आहेत. त्यांची नावं आमोद आणि प्रमोद. एरव्ही आपल्या मंदिरांमध्ये द्वारपालपदी जय-विजय ही जोडी असते.

पद्मालयला चतुर्थीला अर्थातच भाविकांची प्रचंड गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेला पद्मालयला विशेष यात्रा भरते. त्या दिवशी कार्तिकस्वामी आपल्या धाकटया भावाला भेटायला इथे येतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. मंदिराबाहेर असलेली 11 मण वजनाची पंचधातूची प्रचंड घंटा, हेही इथलं एक मोठं आकर्षण आहे. ही घंटासुध्दा मंदिर जीर्णोध्दाराच्या वेळीच लावण्यात आली होती.

श्रीक्षेत्र पद्मालय हा खान्देशचा फार मोठा सांस्कृतिक ठेवा आहे.

चांगदेव मंदिर

हेमाडपंती मंदिरांमधील एक महत्त्वाचं आणि प्रसिध्द मंदिर मौजे चांगदेव (मुक्ताईनगर) येथे आहे. ते ऋषी चांगदेवांच्या वास्तव्यामुळे प्रसिध्द आहे. मंदिर सध्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी उत्खननाचं कामही सुरू आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (ASIच्या) ताब्यात असलेली जी काही अगदी मोजकी मंदिरं जळगाव जिल्ह्यात आहेत, त्यातील एक प्रमुख मंदिर म्हणजे चांगदेव मंदिर. ज्या गावाजवळ हे मंदिर आहे, त्या गावाचं नांवही तेच - चांगदेव. हे सांगायची गरजच नाही की ही दोन्ही नावं ज्यांच्यामुळे रूढ झाली, ते म्हणजे ऋषी चांगदेव. ते ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. पण त्यांना 'संत' म्हणून नव्हे, तर 'ऋषी' किंवा 'मुनी' म्हणून ओळखत असत. त्यांना 'योगी' चांगदेव असंही नाव होतं. कारण ते उच्च प्रतीचे योगी - म्हणजे सिध्दयोगी होते. असं म्हणतात की त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने चौदा वेळा मृत्यूला परत पाठवलं. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या काळीसुध्दा असा समज होता की चांगदेव चौदाशे वर्षांचे आहेत. आणि ही चौदाशे वर्षं ते तप करीत होते. त्यांची तपोभूमी म्हणजे तापी आणि पूर्णा नदीचा संगम - म्हणजेच आजचं चांगदेव. इथल्याच एका अतिप्राचीन मंदिरात त्यांनी तप केलं होतं. चांगदेवांचं आराध्य दैवत म्हणजे 'वटेश्वर' महादेव. त्यांची भक्ती एवढी की त्यांना स्वतःलाच 'वटेश्वर चांगा' म्हणत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर 'वटेश्वराचं मंदिर' म्हणून कधीच ओळखलं गेलं नाही. त्याला 'चांगदेव मंदिर' असंच म्हणतात.

Khandesh_1  H x

चांगदेव मंदिर सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचं आहे, असं म्हणतात. मूळ मंदिर कदाचित इतकं जुनं असेलही, पण सध्या दिसणारं मंदिर यादवकाळातील असल्याचं दिसतं. त्याच्या मूळ दगडी बांधकामावर नंतर कधीतरी डागडुजी करून विटांनी काही भाग बांधून काढलाय. स्वरूपावरून ते हेमाडपंती मंदिर असल्याचं जाणवतं. काळाच्या ओघात त्याची बरीच पडझड झाली. पण तरीही जो काही भाग शाबूत राहिला, त्यावरून एकेकाळी हे चांगलंच प्रशस्त आणि सुरेख मंदिर असणार, हे स्पष्ट दिसतं. मंदिराच्या गाभाऱ्यात देवाची शेंदूर लावलेली मूर्ती आहे. ती ओबडधोबड स्वरूपात असल्याने तिचं स्वरूप कळतच नाही. तो देव नक्की कोणता, हे तिथल्या पुजारी बुवांनाही नीट माहीत नसावं. वटेश्वर ही पदवी शंकराची. त्यामुळे चांगदेवांचं आराध्य दैवत म्हणून तो 'वटेश्वर' आहे असं म्हणावं, तर ती मूर्ती 'लिंग'रूपातील नाही. आणि शंकराच्या मूर्तीला शेंदूर माखलेला सहसा आढळून येत नाही. शिवाय, या शेंदरी मूर्तीच्या शेजारीच एक गणेशमूर्ती आणि शंकराची एक वेगळी पिंडसुध्दा आहे. मग हा मुख्य देव कोण? ते स्वतः योगी चांगदेवही नाहीत. कारण त्याच देवाची चांगदेव स्वतः पूजा करीत होते, असं सांगतात. मग ती मूर्ती चांगदेवांची कशी असेल? कदाचित ती मूर्ती शंकराच्याच 'भैरव' या रूपाची असू शकेल. भैरव हा अनेक ठिकाणी मूर्तिरूपात असतो. अर्थात हा माझा स्वतःचा आणि स्वतःपुरता अंदाज झाला. त्याला अनेक पर्यायी मतं असू शकतात. गाभाऱ्याच्या बाहेर, खुल्या चौकात वाघावर स्वार झालेल्या चांगदेवांची एक मूर्तीही ठेवलेली आहे. ती मात्र निश्चितपणे अगदीच अलीकडची आहे. शिवाय ती झकास, भडक ऑइलपेंटमध्ये रंगवलेली आहे. 'माझा या इतर प्राचीनपणाशी काही एक संबंध नाही' असं ती मूर्ती जणू आपल्याला बजावून सांगते.

संपूर्ण मंदिर आतून-बाहेरून बघताना त्यातील प्राचीन दगडी, कोरीव काम केलेले स्तंभ आणि त्यांच्या दरम्यान आणि आवतीभोवती विटांनी चुन्याने, सिमेंटने भरून काढलेलं बांधकाम यांची सरमिसळ स्पष्ट दिसते. काही वर्षांपूर्वी या परिसरात एएसआयने उत्खनन सुरू केलं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, जो भिंतीच्या पातळीवरच होता, तो खणला आणि जादू व्हावी तसं एक भव्य प्रांगण मंदिराच्या चहूबाजूंनी दिसून आलं. जमिनीची पातळी आता सुमारे तीन-साडेतीन फुटांनी खाली गेलीय, तसंच या मातीत दबलेले कितीतरी दगडी कोरीव खांब, मूर्ती उघडकीला आल्या. त्या (अर्थातच) सध्या नुसत्याच उघडयावर पडल्या आहेत. उत्खनन अजूनही सुरूच आहे. माझ्या मते जळगाव जिल्ह्यात इतक्या मोठया प्रमाणावर प्राचीन शिल्प आणि अवशेष एकाच ठिकाणी आढळून आलेलं अन्य कोणतंही ठिकाण नसावं.

आज प्राचीन मंदिरांच्या अभ्यासकांसाठी चांगदेव मंदिर परिसर ही अक्षरशः 'मेजवानी' आहे असं म्हटलं जातं.

चंडिकामाता - पाटणादेवी

तर, राजे हो - घडली गोष्ट अशी की, दक्षप्रजापती साऱ्या पृथ्वीचा राजा. त्याने एकदा पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू केला. तिन्ही लोकांत निमंत्रणं गेली. पण जावयाला - शंकराला मात्र निमंत्रण नव्हतं. चिडलेल्या सतीला नारदमुनींनी पटवून दिलं की 'होतं असं कधी कधी... बडे बडे यज्ञोमे छोटी छोटी बाते होती रहती है!' त्यामुळे सती तशीच, विनानिमंत्रणाची यज्ञासाठी वडिलांकडे गेली. शंकर 'नको' म्हणत असतानाही गेली. तिथे यज्ञस्थळावर प्रत्येक देवतेचा 'हवि' ठेवलेला होता. फक्त शंकराचा तेवढा नव्हता. ठरवून केलेला अपमान! झालं. सती संतापाने लाल झाली. तिने प्राणत्याग केला. शंकराला हे समजल्यावर त्याच्या क्रोधाला सीमाच उरल्या नाहीत. सतीचं शव हातावर घेऊन शंकर वणवण फिरू लागला. सगळे देव चिंताक्रांत झाले. साऱ्यांचं एकमत झालं की, जोपर्यंत सतीचं शव हातात आहे, तोपर्यंत शंकर भानावर येणारच नाही. त्यामुळे विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 108 भाग करून ते विखरून टाकले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, ती सर्व 'शक्तिपीठं' झाली. त्यापैकी सतीचा उजवा हात -वरदहस्त - जिथे पडला, ते ठिकाण म्हणजे आताचं पितळखोरं, म्हणजे पाटण्याजवळचं जंगल! त्या ठिकाणी पहाडावर सती माता अंशरूपाने अवतरली.

Khandesh_1  H x

पुढे कलियुगात मातेचे एक फार मोठे भक्त होऊन गेले. त्यांचं नाव गोविंदस्वामी. त्यांना उतारवयात डोंगर चढून जाणं जमेना. मग त्यांनी देवीलाच विनंती केली की 'तूच आता पायथ्याला ये'. त्यांच्या भक्तीपोटी देवी पहाडावरून खाली उतरली. 'पाटणा' या छोटयाशा गावाजवळ ती 'चंडिकामाता' म्हणून विराजमान झाली. हीच चंडिकामाता आता आपण 'पाटणादेवी' म्हणून ओळखतो. देवगिरीच्या यादवांचे मांडलिक असलेले राजे निकुंभ यांच्या आश्रयाने सध्याचं देवीचं मंदिर उभारलं गेलं. मूळ मंदिर तर इसवी सनाच्याही पूर्वीचं आहे, असं म्हणतात.

 

आजसुध्दा पाटणादेवी परिसर बऱ्यापैकी निसर्गरम्य आहे. पाटणादेवीच्या जवळच केदारकुंड आणि धवलतीर्थ असे दोन धबधबे आहेत. पावसाळा संपता संपता जर हा परिसर आपण बघितला, तर या धबधब्यांची खरी गंमत बघायला मिळते. तुमच्या-आमच्या सुदैवाने अजून पाटणादेवी परिसरात सिमेंट-काँक्रीटचं अतिक्रमण फारसं झालेलं नाही. मंदिर अजून तरी मोकळा श्वास घेऊ शकतंय.

 

पाटणादेवी परिसर तसा एरव्ही शांत असतो. मात्र नवरात्रीला आणि हनुमान जयंतीला मोठे उत्सव असतात. मातेच्या मंदिरासमोर असलेल्या दोन भव्य दीपमाळा ही पाटणादेवी मंदिराची जणू ओळख आहे.

भारताचे महान गणितज्ञ भास्कराचार्य यांची ही जन्मभूमी. सन 1114मध्ये इथे त्यांचा जन्म झाला. हे दुसरे भास्कराचार्य. बाराव्या शतकातले. त्यांच्या पूर्वी, सातव्या शतकातही एक भास्कराचार्य होऊन गेले. तेही गणितज्ञच होते, पण 'लीलावती' ग्रांथाचे कर्ते आणि शून्य व अनंत (इन्फिनिटी) या संकल्पनांचे जनक जे भास्कराचार्य (दुसरे), ते या पाटण्याचे! त्यांच्या ग्रांथात त्यांनीच स्वत:चं जन्मगाव 'विज्जलवीड' असल्याचं नोंदवून ठेवलं आहे. 'विज्जलवीड' म्हणजेच आजचं पाटणा असं मानलं जातं. अर्थात नेहमीप्रमाणे याबाबत विद्वानांमध्ये दुमत आहेच! काय असेल ते असो, पण आज आपल्याला याच परिसरात भास्कराचार्यांचा पुतळा उभारलेला दिसतो खरा. पाटणादेवीच्या मंदिरात बाराव्या शतकामधला एक शिलालेख आजही आहे. त्यावर भास्कराचार्यांची वंशावळ कोरलेली आहे. त्या काळच्या तिथल्या मठाला दिलेल्या सनदीचा तो शिलालेख आहे.

 

हा सर्व परिसर बघण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. चाळीसगावला रेल्वेने जाऊन पुढे खासगी गाडी केली किंवा अगदी जळगावहूनही खाजगी गाडीने गेलो, तरी सर्व परिसर बघता येईल.

 

या तीन मंदिरांशिवाय इतरही कित्येक प्राचीन मंदिरं खान्देशात, जळगाव परिसरात आहेत. ही तर फक्त नमुन्यादाखल तीन इथे वर्णिली आहेत. खरं तर पर्यटनाची आवड असणाऱ्या मंडळींनी आमच्या भागात आवर्जून यावं असा सांस्कृतिक वारसा इथे आहे. पाहा, करा विचार. शुभस्य शीघ्रम!