एका दुर्गभ्रमंतीकाराची थरारक कहाणी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Dec-2019   
|

गड हे आपला ऐतिहासिक ठेवा आणि वारसा आहेत. या वारशाची ओळख करून घेण्याची आणि तो जपण्याची गरज आहे. दुर्गभ्रमंतीकार ऍड. मारुती गोळे यांनी महाराष्ट्रासह देशातील आणि परदेशातीलही तब्बल 814 गड आजपर्यंत प्रत्यक्ष पाहिले आहेत. शिवाय हजारो दुर्गांचे फोटो त्यांच्या संग्रहात आहेत. आज वयाच्या अवघ्या चाळिशीत असलेल्या या मनस्वी दुर्गभ्रमंतीकाराची कहाणी जितकी चित्तथरारक, तितकीच प्रेरक.


Durg Tourism_1  


सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या पिरंगुट गावात राहणाऱ्या मारुती गोळे यांचा
2012पासून सुरू झालेला दुर्गभ्रमंतीचा छंद आता विक्रमाच्या टप्प्यावर येऊन उभा राहिला आहे. या प्रवासात छंदासाठी आवश्यक असा कणखरपणा, चापल्य त्यांनी प्रयत्नपूर्वक कमावले आहे, टिकवले आहे. दुर्गभेटीच्या ध्यासापायी त्यांनी वकिली व्यवसायालाही रामराम ठोकला. पोटापाण्याची गरज म्हणून एक व्यवसाय सुरू केलाआहे. त्याचे चोख व्यवस्थापन करून ते दुर्गभ्रमंती करत असतात. त्यासाठी ते योग्य नियोजन करतात. भ्रमंती करत असताना त्यांना गडाची बांधणी, तट, बुरूज, स्थापत्यकला, त्याचे भौगोलिक महत्त्व जाणून घ्यायला, त्याचा अभ्यास करायला, त्याच्या नोंदी ठेवायला, छायाचित्रांचा संग्राह करायला आवडते. इतिहासाची साक्ष असलेल्या गडांची भ्रमंती करताना त्यांना अपूर्व आनंद मिळतो.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

या सर्व प्रवासाच्या रोमांचक आठवणी आणि अनुभव कथन करताना मारुती म्हणाले, ''गेल्या दहा वर्षांपासून मी गडांचा अभ्यास करतोय, याची प्रेरणा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण मी जरी सरदार घराण्यात जन्म घेतला असला, तरी गडांचा आणि माझा असा कधी संबंध आला नव्हता. घडले असे की, कंपनीतील काही वरिष्ठ अधिकारी मित्र माझ्या घरी आले होते. त्यांनी सिंहगड पाहायला जाण्याचा आग्राह धरला. आम्ही सर्व जण गड पाहण्यासाठी गेलो, तेव्हा माझे वजन 105 किलो होते. त्यामुळे गड चढताना मला इतका दम लागला की अर्ध्यावरून आम्ही सर्व परत आलो. खाली आल्यानंतर मित्रांनी माझी मस्करी केली. या मस्करीने मी अस्वस्थ झालो. दुसऱ्या दिवशी सिंहगड सर करण्याचा निश्चय केला आणि सलग 42 दिवस मी सिंहगड चढत होतो. ही माझ्या दुर्गप्रेमाची सुरुवात. सलग 42 दिवस गेल्याने माझे दुर्गभ्रमणाशी भावनिक बंध जुळले ते कायमचे. आतापर्यंत मी 354 वेळा सिंहगड चढून गेलो आहे. सुरुवातीला मला सिंहगड चढायला 3 तास लागले होते आणि आज मी 30 ते 37 मिनिटांमध्ये हाच गड चढतो. एकाच दिवशी पाच वेळा चढून गेलो आहे.

आग्रा ते राजगड फत्ते मोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होण्याच्या विलक्षण घटनेला 17 ऑगस्ट 2017 रोजी 351 वषर्े पूर्ण झाली होती. त्यानिमित्त आग्य्राहून ज्या मार्गे महाराज राजगडावर पोहोचले होते, त्याच मार्गे दुर्गप्रेमी मारुती गोळे
यांनी पदभ्रमण मोहीम हाती घेतली होती.


Durg Tourism_1  
या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा
, पराक्रमाचा जागर करावा हा उद्देशही होता. आग्राा ते राजगड या प्रवासात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतून सुमारे 1253 किलोमीटरचा पायी प्रवास केला. ग्वाल्हेर, धुळे आदी संस्थानांकडून मारुती यांचे अतिशय जोरदार स्वागत झाले.

35 दिवसांचा खडतर प्रवास करून मारुती जेव्हा राजगडला पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागताला 6 हजाराचा जनसमुदाय जमला होता. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मारुती यांचा सत्कार केला. मारुती यांच्या आयुष्यातला सर्वांत मोठा अविस्मरणीय क्षण होता.


 तेव्हापासून मी असंख्य दुर्ग आणि गड पाहिले. दुर्गभ्रमंती करणे हा माझा छंद माझं जीवनध्येय होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचे राज्य निर्माण केले, गडकोट उभे केले, रयतेसाठी लढा दिला, त्या लढाया कशा लढल्या ते आपण फक्त पुस्तकांतून वाचतो अन् अंगावर रोमांच उभे राहतात. या इतिहासाचं स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यापासून कालसुसंगत बोध घेण्यासाठी हे गड पाहिले पाहिजेत, तिथे उभारलेल्या वास्तूंमध्ये फिरलं पाहिजे.''


मारुती यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गड आणि दुर्ग पालथे घातले आहेत. राजगड 104 वेळा, तोरणागड 42 वेळा सर केला. सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाडा-रायगड असे 68 किलोमीटरचे अंतर कापून एकाच दिवशी पाच गड 16 तास 55 मिनिटांत सर करण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र, गोवा, जम्मू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांतील सर्व गड पाहून झाले आहेत. 2024पर्यंत भारतातील सर्व गड सर करण्याचा मारुती यांचा मानस आहे. त्याचबरोबर युरोप, इस्रायल, भूतान, श्रीलंका, तुर्कस्तान, व्हिएतनाम आदी 14 देशांतले मिळून तब्बल 814 गड पाहण्याचा भीमपराक्रम त्यांच्या नावावर नोंदलेला आहे.

Durg Tourism_1  

या दुर्गभ्रमंतीच्या प्रवासात गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागातला सुर्जागड पाहायचा राहिला होता. त्यासाठी मारुती यांनी स्थानिक गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी दोन वषर्े सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्याशी मैत्री करून, त्यांचा विश्वास संपादन करत सुर्जागडाचेही दर्शन घेतले.

या मोहिमेविषयी मारुती सांगतात, ''सुर्जागडचा ठाकूरदेव हे तिथल्या स्थानिकांचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत या गडावर जाताना अनवाणी पायांनी जावे लागले. गडावरचे घनदाट जंगल, टोकदार दगडांनी भरलेली वाट होती. तरीही मी गावकऱ्यांच्या बरोबर, त्यांच्यासारखा पोशाख करून गडावर पोहोचलो. यासाठी मी सतत दोन वर्षे स्थानिक गावकऱ्यांशी संपर्क ठेवला. यातून मिळालेला अनुभव, आनंद मला पुढील अनेक दुर्गभ्रमंतीसाठी ऊर्जा देऊन गेला.''

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसंतोषगड आणि मनोहरगड, हे दोन्ही गड एकमेकांना लागून आहेत. सह्याद्रीच्या रांगांवरती शेवटच्या टोकावर हे दोन्ही गड आहेत. मनोहरगड अतिकठीण समजला जातो, तर मनसंतोष गड तर त्याहून अधिक महाकठीण समजला जातो.

 

''किल्ला नव्हे, गड म्हणा'' - ऍड. मारुती गोळे

''आज किल्ला हा शब्द बराच प्रचलित झाला आहे. किल्ला हा शब्द माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. कारण किल्ला हा शब्द मुळातच फारसी शब्द आहे. औरंगजेबाने किल्ला हा शब्द वापरला. शिवाजी महाराजांच्या प्रकाशित झालेल्या पत्रांमध्ये गड हा शब्द वापरला आहे. महाराजांनी बोलीभाषेतील प्रचलित शब्दांना महत्त्व देऊन गड हा शब्द वापरला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गडाला दुर्ग, तर घाटमाथ्यावर असलेल्या गडांना गिरिदुर्ग म्हटले जाते.''
 

  मारुती म्हणाले, ''अनेक वर्षांपासून मनसंतोषगड मला खुणावत होता. आजपर्यंत या गडावर कोणी गेले नव्हते, अशी स्थानिक गावकऱ्यांनी माहिती दिली होती. हे आव्हान मी स्वीकारले, नव्या उमेदीने समानधर्मी मित्रांना सोबत घेऊन 2017 साली मनसंतोष गडावर जायचे ठरवले. गडावर पायऱ्या लागण्यापूर्वी एक पायवाट जाते. या पायवाटेवर काही नैसर्गिक गुहा दिसतात. या गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे. एका टप्प्यानंतर पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन पुढचा प्रवास करावा लागला. पहिल्या दिवशी गड चढून जाण्याची मोहीम अर्धवट सोडून खाली उतरावे लागले, तरी त्याने निराश न होता दुसऱ्या दिवशी मोठया जिद्दीने गडावर चढलो आणि गडावर भगवा फडकवला. हा अवघड गड सर केल्यानंतर आनंद गगनात मावेनसा झाला. मनसंतोषगडावर जाणारा पहिला दुर्ग अभ्यासक म्हणून लोक माझ्याकडे पाहू लागले.''

या भ्रमंतीमुळे अनेक गडांचा, दुर्गांचा अभ्यास झाला. गडभ्रमंती करत असताना गडाचा आकार, दरवाजे, पायवाटा किती आहेत, तटबंदी, पाण्याची व्यवस्था, तोफा, गडावरील देवी-देवतांचे ठिकाण, गडाची दिशा, गडाविषयीच्या दंतकथा, संग्रहित दस्तऐवज, आजूबाजूच्या मंदिरांचा-परिसराचा इतिहास, भौगोलिक माहिती अशा सर्व नोंदी मारुती टिपत असतात. त्यांनी आतापर्यंत असा 250 गडांचा अभ्यास केला आहे. त्या ठिकाणचे मानवी जीवन, समाजजीवन, संस्कृती याविषयी नोंदी करून ठेवल्या आहेत.

 

महाराष्ट्रातील व परदेशातील गडामधील फरक सांगताना ते म्हणतात, ''महाराष्ट्रातील गडकोट हे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. हे वेगळया पाषाणामध्ये बांधलेले आहेत आणि त्यातले बहुतेक गडकिल्ले छत्रपती शिवरायांनी त्यांच्या धावपळीच्या कालखंडामध्ये बांधलेले आहेत. राजगड आणि रायगड हे दोन गड तर जगाला प्रभावित करण्याइतके उत्कृष्ट आहेत. परदेशातील गडाची बांधणी वेगळी असते. दुबई, शारजा येथील गड आकाराने छोटे आहेत. इस्रायलमधील गडकोटात पाण्याची व्यवस्था असल्याचे दिसून आले. तुर्कस्तान आणि महाराष्ट्रातील गडकोटामध्ये साधर्म्य दिसून आले. पण भूतानमध्ये वेगळया धाटणीचे गड पाहायला मिळाले.''Durg Tourism_1  

आगामी काळात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण या राज्यांसह श्रीनगर परिसरातील गडांच्या भेटीचे मारुती यांचे नियोजन आहे.

''या मोहिमेत मला माझी पत्नी स्वाती ही सदैव प्रेरणा आणि साथ देत आली आहे. ती सरदार मारणे घराण्यातील लेक आहे. त्यामुळे तिलाही इतिहासाची आवड आहे. आजपर्यंत तिनेही 125हून अधिक गडांची भ्रमंती केलीआहे. माझा मुलगाही उत्तम ट्रेकर आहे'' असेही मारुती यांनी सांगितले.

मारुती यांच्या घराण्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाकडे कसे पाहता? याविषयी सांगताना ते म्हणाले, ''सरनौबत नरवीर पिलाजी गोळे घराण्यात माझा जन्म झाला, हे माझे भाग्य समजतो. आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील पायदळाचे प्रमुख होते. आमचे घराणे महाराजांशी सदैव एकनिष्ठ राहिलेले घराणे आहे. 1689 साली आमच्या घराण्याला पायदळ प्रमुख हा किताब मिळाला. आमच्याकडे वारशाने जी शस्त्रे आली आहेत, त्या शस्त्रांची वाढत्या कुटुंबाबरोबर वाटणी होत गेली. त्यामुळे आज आमच्या कुटुंबाकडे चार ऐतिहासिक तलवारी आहेत. जुन्या लाकडी वीरगळी आहेत. आता त्यांचे काळजीपूर्वक जतन केले आहे. जुन्या मूर्तींचे, जुन्या साहित्याचे जतन करून ठेवले आहे.

गोळे घराण्याचे इतिहासातील योगदान या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित करण्याचा मानस आहे. घराण्यातील अनेक दुर्मीळ वस्तूंचा, कागदपत्रांचा संग्राह माझ्याकडे आहे.''

महाराष्ट्रातील गडकोटांची स्थिती सुधारण्यासाठी मारुती यांनी काही उपाय-कल्पना बोलून दाखविल्या. ते म्हणतात, ''महाराष्ट्रातले अनेक अपरिचित गडकोट आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शासन केवळ परिचित गडाचे संवर्धन करते. मात्र या अलक्षित गडांचेही संवर्धन करायला हवे. गड संवर्धनाच्या कामात स्थानिक लोकांचा सहभागी करून घेतला पाहिजे. त्यामुळे ऐतिहासिक मोल असलेल्या या स्थळाविषयी स्थानिकांच्या मनात आदरभाव दृढ व्हायला मदत होईल. आज राज्यातील बहुतांश गड केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली आहेत. या गडांचा विकास करण्यासाठी असे गड राज्य शासनाकडे सुपुर्द करणे आवश्यक आहे.''Durg Tourism_1  

 

 

३५४  वेळा  सिंहगड  सर  करणारे  मारुती  गोळे
 
 

आजच्या तरुणाईने इतिहासाकडे कसे बघावे याविषयी मारुती म्हणाले, ''दुर्गभ्रमंती हा केवळ पर्यटनाचा विषय नाही, तर आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. शिवाय सदृढ, निरोगी शरीरासाठी दुर्गभ्रमंतीचा निश्चितच उपयोग होतो. ज्या मातीला, ज्या गडांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पावलांचा स्पर्श लाभला आहे अशा सर्व गडांना भेट दिली पाहिजे. त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. भ्रमंती करण्याआधी गडाशी संबंधित इतिहासाचे, महापुरुषांच्या चरित्राचे वाचन करावे. त्यांचा पराक्रम अभ्यासावा. या संदर्भात समाजमाध्यमात जे अभ्यासपूर्ण आणि संतुलित लेखन येते त्याचे वाचन करावे, त्याचा संग्रह करावा. त्याचबरोबर या विषयातल्या अभ्यासकांशी संवाद साधावा. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष गडभ्रमंती करताना, त्या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी.''

आपल्या या छंदोपासनेसाठी आजपर्यंत कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता या अवलियाची भटकंती चालू आहे, हे आवर्जून नमूद करण्याजोगे!

मारुती गोळे

९९७५४४५२६५