सफर हिमालयाची

विवेक मराठी    26-Dec-2019
Total Views |

***राजेश गाडगीळ***

 

 हिमालयाचं वैशिष्टय असं आहे की एका शिखराजवळ तुम्ही पोहोचलात की आपण क्षितिजाच्या जवळ आलोय, क्षितिजाला स्पर्श करू शकतोय असं वाटू लागतं. मात्र वर गेल्यानंतर काही हजार शिखरांचा समूह सामोरा येतो आणि लक्षात येतं की आपण जे केलंय ते, जे आहे त्याच्या मानाने काहीच नाही. आणखी खूप काही करायचं बाकी आहे, हीच भावना मनात बाकी राहते. तुम्ही एक दरी पार केली तर आणखी पुढची दुसरी दरी तयार असते. हा एका आयुष्यात संपणारा खेळ नाही. माझी अशी इच्छा आहे की, पुढच्याही आयुष्यात तो चालू राहिला तर कदाचित काही तरी बघितलं असं मला त्या आयुष्यात सांगता येईल. 


Rajesh Gadgil_1 &nbs

 

 

आमचं मूळ गाव कोकणात असल्यामुळे वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षांपासूनच डोंगर-दऱ्यांविषयी आकर्षण निर्माण झालं. माझं घर नदीच्या काठी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. त्यामुळे नद्या-नाले, डोंगर-दऱ्या लहानपणापासून आयुष्याचा भाग आहेत. अर्थात त्यावेळच्या हुंदडण्याला, भटकण्याला शिस्त नव्हती. मन मानेल तिथे आणि घरचे जाऊ देतील तिथपर्यंत जायचं. एवढंच त्या भटकंतीचं स्वरूप होतं. 1983 साली पहिल्यांदाच हिमालयात गेलो, ते खऱ्या अर्थाने शास्त्रशुध्द क्रीडाप्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रेकिंगसाठी गेलो. चिल्ड्रन रॅम्बलर्स नावाची ठाण्यातील एक संस्था होती, जी लहान मुलांसाठी ट्रेकिंग आणि साहस शिबिरांचं आयोजन करायची. त्यांच्यातर्फे पहिल्यांदा मी वयाच्या बाराव्या वर्षी हिमालयात गेलो. बियास कुंड ते रोहतांगल पास असा ट्रेक केला. जसं सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेड लावलं, तसं हिमालयानेही पहिल्याच दर्शनात जिंकून घेतलं. आज 35 वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतरही ते हिमालयाचं गारुड मनावरून उतरण्यास तयार नाही. जितकं पाहिलं आहे, त्याहून अधिक जास्त पाहण्याची ओढ अजूनही ताजी आहे. कदाचित हिमालयाचं हेच मोठेपण आहे. 

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

 

 

आतापर्यंत माझ्या 33-34 हिमालयीन मोहिमा झाल्या आहेत. सुमारे 10 अतिउंचावरील पदभ्रमंत्या झाल्या आहेत. त्याशिवाय कौटुंबिक सहलींकरतासुध्दा बहुतेकदा आम्ही हिमालयातच जातो. हिमालयाचं वैशिष्टय असं आहे की एका शिखराजवळ तुम्ही पोहोचलात की आपण क्षितिजाच्या जवळ आलोय, क्षितिजाला स्पर्श करू शकतोय असं वाटू लागतं. मात्र वर गेल्यानंतर काही हजार शिखरांचा समूह सामोरा येतो आणि लक्षात येतं की आपण जे केलंय ते, जे आहे त्याच्या मानाने काहीच नाही. आणखी खूप काही करायचं बाकी आहे, हीच भावना मनात बाकी राहते. तुम्ही एक दरी पार केली तर आणखी पुढची दुसरी दरी तयार असते. हा एका आयुष्यात संपणारा खेळ नाही. माझी अशी इच्छा आहे की, पुढच्याही आयुष्यात तो चालू राहिला तर कदाचित काही तरी बघितलं असं मला त्या आयुष्यात सांगता येईल. 

 

 

पहिल्यांदा हिमालयात जाताना जी उत्सुकता, कुतूहल होतं ते कमी होण्याऐवजी दर मोहिमेनंतर वाढत जातं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.हिमालयातून परतून साधारण 5-6 महिने झाले की इथे मुंबईत अस्वस्थ वाटू लागतं आणि पुन्हा कधी एकदा हिमालयात जातोय आणि नवीन काही बघतोय असं वाटू लागतं. 

 

गिर्यारोहणाचे धडे

 

ट्रेकिंग हा असा खेळ आहे, ज्याला विशेष प्रशिक्षण लागत नाही. थोडी फार शारीरिक क्षमता आणि चांगली मानसिक क्षमता या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि मुख्य म्हणजे डोंगरात फिरण्याची आवड असेल, तर ही पदभ्रमंती थोडयाशा प्रयत्नाने कोणालाही जमू शकेल. अर्थात सुरुवातीला तरी अनुभवी लोकांबरोबर ट्रेकिंगला जाणंच योग्य. कारण त्यातील जे धोके आहेत, ते पहिल्या फटक्यात आपल्याला कळत नाहीत आणि त्यातून दुर्घटना होण्याची शक्यता असते. आपल्याला सपाट, गुळगुळीत किंवा डांबरी रस्त्यांवरून चालायची सवय असते. डोंगरात चढउतार, खाचखएग्यांचे रस्ते असतात, त्यामुळे शारीरिक क्षमता चांगली असणं आवश्यक आहे. तुम्ही दमलात तर तुमच्याकडून चुका होण्याचा संभव असतो. पहिल्याच प्रयत्नात घसरण्याची, धडपडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षंआत्मविश्वास आणि ज्ञानाचा साठा तुमच्याकडे होईपर्यंत अनुभवी व्यक्तींसोबत गेलेलं चांगलं. 

 

 

प्रस्तरारोहण आणि गिर्यारोहण या ज्या दोन शास्त्रोक्त कला आहेत, त्याच्याकरिता मात्र प्रशिक्षणाशिवाय पहिलं पाऊलही उचलू नये. कारण यात धोक्याचं प्रमाण खूप जास्त असतं. प्रस्तरारोहणात उभे प्रस्तर/कडे तुम्हाला चढून जायचे असतात. त्यासाठी कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे, कोणत्या दगडाची कोणती खाच पकडली पाहिजे, इथपासून कुठच्या ठिकाणी कुठचा आधार लावला पाहिजे इथपर्यंत या सगळयाचं व्यवस्थित प्रशिक्षण असेल तरच तुम्ही सुखरूपरीत्या तुमची मोहीम यशस्वी करू शकाल. प्रस्तरारोहणाचं तंत्र पूर्ण आत्मसात केल्याशिवाय ते करणं हे शहाणपणाचं नाही. गिर्यारोहणाचंही तसंच आहे. आपण सह्याद्रीत असल्याने इथले डोंगर आपल्याला परिचित आहेत, पण महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहणाऱ्या माणसाला बर्फ फक्त फ्रीजमध्ये बघण्याची सवय असते. हिमालयात, त्या बर्फात 24 तास वावरणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि त्यासाठी वेगळी कौशल्यं अंगी बाणवावी लागतात. त्यातली काही तुमच्यात उपजत असतात, मात्र चढाई आणि बचावासाठी आवश्यक तंत्रं फक्त प्रशिक्षणानेच तुम्हाला आत्मसात करता येतात. आपल्याकडे प्राथमिक आणि प्रगत असे प्रत्येकी चार आठवडयाचे गिर्यारोहण प्रशिक्षणाचे दोन वर्ग चालवले जातात. दार्जिलिंग, मनाली, उत्तर काशी आदी ठिकाणी सरकारमान्य इन्स्टिटयूट आहेत. त्याद्वारे हे वर्ग चालवले जातात. या प्रशिक्षणांची प्रमाणपत्रं असल्याशिवाय सहसा तुम्हाला हिमालयीन मोहिमांमध्ये सहभागी होऊ दिलं जात नाही. आणि तुमच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी ते प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं असणं फायदेशीर ठरतं. 

 

 

हिमालयीन मोहीम म्हणजे नेमके काय

 

 

हिमालयीन मोहीम हा शब्द हिमालयातील गिर्यारोहण मोहिमांकरिता वापरला जातो. तुमचं लक्ष्य काय आहे, त्यावर तिचा कालावधी अवलंबून असतो. साधारण 5500 मीटर उंचीचं शिखर असेल तर ही मोहीम कदाचित 15 दिवसांचीही असू शकते. जर तुम्ही एखाद्या अज्ञात शिखराचा शोध घेण्यासाठी जात असाल, तर 45-50 दिवससुध्दा या मोहिमेसाठी तुम्हाला द्यावे लागतात. उंचीपेक्षाही त्या भागाची दुर्गमता किती आहे, त्या भागाविषयी किती माहिती उपलब्ध आहे, तुमचं लक्ष्य असणारं शिखर कितपत माहितीचं किंवा अनोळखी आहे, त्याच्या चढाईच्या मार्गातील तांत्रिक अडथळे काय आहेत, इतर नैसर्गिक अडचणी काय येतात, याच्यावर हा कालावधी अवलंबून असतो. भारतात चढाईकरता 8000 मीटर उंचीचं एकही शिखर नाही. भारतात तुम्ही चढाई करू शकता असं सर्वोच्च शिखर म्हणजे कामेट. ते आहे 7747 मीटरचं. ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. मात्र त्याच्याव्यतिरिक्त आव्हानात्मक म्हणावीत अशी 6000 मीटरपेक्षा अधिक उंचीची शिखरं मोजायला गेलात तर ती हजारोंच्या घरात आहेत. आणि त्यांपैकी आतापर्यंत काही शेकडाच शिखरं सर झालेली आहेत. त्यामुळे उरलेल्या शिखरांविषयी एक तर फारशी माहिती नाही किंवा तिथे कोणी गेलेलंही नाही. अशा परिस्थितीत त्या शिखराची माहिती घेऊन त्यावर चढायचा प्रयत्न करणं हे गिर्यारोहणातील पराकोटीचं आव्हान आहे. त्याच दृष्टीने आमचा सगळा प्रयत्न असतो. 


Rajesh Gadgil_1 &nbs

 

एक्स्प्लोरेटरी माउंटेनिअरिंग

 

एक्स्प्लोरेटरी माउंटेनिअरिंगचे दोन प्रकार असतात. एक तर माहितीच्या भागामध्ये अज्ञात किंवा अस्पर्श शिखरावर चढण्याचा प्रयत्न करणं, हा त्यातील एक छोटा भाग असू शकतो. तसंच ज्याला खऱ्या अर्थाने एक्स्प्लोरेटरी माउंटेनिअरिंग म्हणता येईल ते म्हणजे ज्या खोऱ्यात आतापर्यंत कोणी गेलेलंच नाहीत, ज्याची माहिती उपलब्ध नाही अशा एखाद्या नव्या खोऱ्यात जाऊन ते खोरं संपूर्ण फिरणं, त्याची सर्व माहिती संकलित करणं आणि त्यानंतर त्या खोऱ्यात असलेल्या शिखरांवर चढायचा प्रयत्न करणं याला मी एक्स्प्लोरेटरी माउंटेनिअरिंग अशी संज्ञा वापरतो. दुर्दैवाने त्याला मराठीत तितकासा चांगला प्रतिशब्द नाही. 

 

एकंदरीतच आपण जो मानवी उत्क्रांतीचा इतिहास वाचत आलो आहे, तो सगळा अज्ञाताचा शोध या मानवी जिज्ञासेतून घडलेला आहे आणि त्याचाच एक फॉर्म म्हणजे जिथे कोणी गेलेलं नाही, जे अजून कोणी केलेलं नाही, जिथे अजून मानवाची पावलं उमटलेली नाहीत अशा ठिकाणी जाऊन काही केलं तर त्यातून मिळणारा आनंद थोडा जास्त असतो, असं मला वाटतं. मळलेल्या पाऊलवाटेवरून जाण्यापेक्षा स्वत:ची वेगळी पाऊलवाट तयार करणं यातून एक वेगळाच आनंद मिळतो, हे नक्की.

 

 

अशा वेळी फार मोठा लवाजमा घेऊन जाता येत नाही. कारण तिथे असलेले सगळेच अडथळे अज्ञात असल्यामुळे तयारीची माणसं हवी असतात. तसंच त्यांच्या कौशल्यांइतकंच त्यांचा परस्पर समन्वय किती चांगला आहे, त्याच्यावर तुमच्या मोहिमेची आनंदप्राप्ती अवलंबून असते. मी यशापयश म्हणत नाही. कारण आम्ही मित्र म्हणून गेलो आणि मित्र म्हणून परत आलो, तर आमच्या दृष्टीने ती मोहीम यशस्वी असते. जो संघ मोहिमेवर जातो, तो तसाच एकसंघ परत येणं, कोणाला दुखापत न होणं, कोणताही अपघात न होणं हे अधिक महत्त्वाचं असतं. शिखरावर पोहोचणं हा माझ्या दृष्टीने बोनस असतो. हे 4-5 लोक एकमेकांना बरीच वर्षं ओळखतात, एकमेकांच्या क्षमतेविषयी ज्यांना संपूर्ण कल्पना असते आणि त्यामुळे परस्परांविषयी आदर असतो, एकमेकांच्या वैगुण्याविषयी त्यांना जाणीव असते. कारण एखादी किरकोळ वाटणारी गोष्टही तिथे गंभीर रूप धारण करू शकत असते. एखादी व्यक्ती घोरते हेसुध्दा भांडणाचं कारण होऊ शकतं. त्यामुळे परस्परांविषयीच्या छोटया-छोटया चांगल्या-वाईट गोष्टी मान्य करून पुढे जाणं यातूनच तुमचा समन्वय चांगला राहू शकतो. 

 

अशा मोहिमांमध्ये जितका पुरुषांचा सहभाग असतो, तितकाच स्त्रियांचाही असतो. अज्ञाताचा शोध घेण्याची इच्छा जेवढी एखाद्या पुरुषाला असते, तितकीच एखाद्या स्त्रीला असेल तर तीदेखील तितक्याच समर्थपणे या मोहिमेत सहभागी होऊ शकते. शारीरिक क्षमतेत पुरुष उजवे असण्याची शक्यता आहे, मात्र मानसिक क्षमतेचा विचार केला तर मुली कित्येक पट जास्त सक्षम आहेत. त्यामुळे तिथे तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता असते. कोणत्याही बाबतीत कोणाचेच लाड चालत नाहीत.

 

हिमालयीन मोहिमांची तयारी

 

तुमची मोहीम साधारण किती दिवसांची आहे, त्याच्यातील किती दिवस तुम्हाला तुमच्या बेस कॅम्पपर्यंत जायला लागतात त्यावर मोहिमेचा कालावधी अवलंबून असतो. यामध्ये बेस कॅम्प अशा ठिकाणी लावला जातो, जिथे पोहोचण्यासाठी फार तांत्रिक अडचणी नसतील, विश्रांतीसाठी आणि इतर कामासाठी भरपूर मोकळी जागा असेल. पाण्याची मुबलक उपलब्धता असेल. तुमची सपोर्ट सिस्टिम म्हणजे तुमचा बेस कॅम्प मॅनेजर, आचारी, अन्य साहाय्यक हे सगळे जिथे सुरक्षितपणे थांबू शकतील आणि रस्त्यापासून एका ठरावीक अंतरावर असेल, अशा ठिकाणी बेस कॅम्प लावला जातो. बेस कॅम्पपर्यंत आपलं नेहमीचं जेवण शिजवून खाता येतं. मात्र बेस कॅम्पपासून जसजसं वर जाऊ, तसतसं खाण्याचे पदार्थ बदलत जातात. कारण जसजसं वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी होऊ लागतो, जो अन्न शिजवण्यासाठीही आवश्यक असतो. अशा वेळी रेडी टू ईट किंवा इन्स्टन्ट कुक, किंवा प्री-कुक्ड पदार्थ, ज्यातून तुम्हाला योग्य प्रमाणात कर्बोदकांचा आणि अन्य पोषक घटकांचा पुरवठा होऊ शकेल असे पदार्थ खावे लागतात. 18 हजार फुटांनंनतर वाहतं पाणी बंद होतं. बर्फ वितळून पाणी करून घ्यायचं आणि त्या पाण्यात अन्न शिजवायचं या क्रियेत किती वेळ घालवायचा याला मर्यादा असतात आणि इंधनाच्या वापरावरही मर्यादा असते. तसंच एका वेळी 20-22 किलोपेक्षा जास्त वजन उचलून नेणं शक्य नसतं. त्यामुळे एका चढाईत साधारणपणे 20 किलो सामान न्यायचं असेल तर त्यात काय काय घ्यायचं याचा विचार केला पाहिजे. कपडयांचे जोड घ्यायचे तर दोनच घ्यावे लागतात. एक अंगावर आणि एक सोबत. अशा मोहिमा म्हणजे आपण किती कमीत कमी गरजांमध्ये राहू शकतो याच्या वस्तुपाठच असतात. तिथे 6#4च्या तंबूत गरजेच्या वेळी 6 जणही आरामात झोपतात. त्याच जागेत स्वयंपाक होतो, त्याच जागेत वाचन, संगीत ऐकणं यांसारखी करमणूकही होते. नैसर्गिक विधी सोडून अन्य कोणत्याही कारणासाठी तंबूच्या बाहेर जावं लागत नाही. 

 

वातावरणातील बदल आणि काळजी

 

मोाहिमेच्या वातावरणाला जुळवून घेण्याची पूर्वतयारी इथूनच करून जाण्यापेक्षा चढाईच्या वेळी आपण ज्या उंचीवर जाणार त्याचं गणित मांडून तयारी केली पाहिजे. गिर्यारोहणात एक नियम आहे की जर तुम्हाला 1000 फूट उंची गाठायची असेल तर त्याआधी दोन रात्री त्याखाली तुम्हाला मुक्काम करावा लागतो. उदा., आम्ही जेव्हा लेह-लडाखला जातो, तेव्हा मुंबईहून लेहला फ्लाइटने जातो. अचानक साडेअकरा हजार फूट उंचावर लँड झालो की तिथल्या विरळ वातावरणाचा आपल्याला त्रास होतो. तेथील वातावरणाशी समरस होण्यासाठी तिथे 3 रात्री विश्रांती घ्यावी लागते. जर कोणाला जास्त त्रास होत असेल तर आणखी एखादी रात्र तिथे थांबलं पाहिजे. त्यानंतर शिखराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यापर्यंत प्रवासाचा टप्पा गाठला की आणखी एक रात्र निवास करावा लागतो. तिथून बेस कॅम्पपर्यंतचा साधारण 4000 फुटांचा प्रवास करायचा असतो. चौथ्या किंवा पाचव्या रात्री बेस कॅम्पला पहिली झोप होते. या दरम्यान तेथील वातावरणाशी आम्ही समरस होत असतो. एकवीस हजार फुटांच्या चढाईत बेस कॅम्पनंतर 2-3 कॅम्प लागतात. त्या कॅम्पला थेट रहायला न जाता वेगवेगळया कामांसाठी तिथे जाऊन परत मागच्या कॅम्पवर येतो. अशा तऱ्हेने 4-5 रात्री आम्ही बेस कॅम्पला राहतो. तीच पध्दत पुढच्या कॅम्पला जायला वापरतो. शिखरावर आपण राहत नाही. त्यामुळे तिथली काही तयारी करायची गरज नसते. त्यामुळे आपण ज्या अल्टिटयूडला काम करतो, त्याच्यापेक्षा खालच्या अल्टिटयूडला आपली राहण्याची जागा असते. हे पथ्य पाळलं, तर त्या हवामानाचा फारसा त्रास होत नाही असा अनुभव आहे. सातत्याने गिर्यारोहण केलं तर आपण मानसिकदृष्टया त्या वातावरणाला सरावतो, मात्र शारीरिकदृष्टया प्रत्येक वेळी वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. आपल्याला मागच्या दहा वेळी काही त्रास झाला नाही म्हणजे या वेळी होणार नाहीच असं नाही. किंवा मागच्या वेळी त्रास झाला म्हणजे या वेळी होईलच हे गणितही चुकीचं आहे. आधीच्या अनुभवामुळे या वेळी त्याला तोंड देण्याची तयारी होते.

 

छंद, कुटुंब आणि व्यवसाय

 

कौटुंबिक बाबतीत मी खूप सुदैवी आहे असं मी म्हणेन. कारण लहानपणी माझ्या आईवडिलांनी मला माझा छंद जोपासण्यापासून कधी अडवलं नाही. माझी पत्नी आदिती ही स्वतः गिर्यारोहक आहे. त्यामुळे तिने मला अडवायचा प्रश्नच आला नाही. माझ्या दोन्ही मुलीही माझ्या या छंदाला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर मला यासाठी कधी अडथळा झाला नाही. उलट सतत प्रोत्साहनच मिळालं. जसं मी नसण्याचे ते 50 दिवस सहन केले जातात, तसे मी जायच्या आधीचे दोन महिने प्रचंड घाईगर्दीचे असतात. माझी घरची, व्यवसायाची कामं संपवायची असतात. दुसरीकडे माझी तयारी चालू असते. अशा प्रकारे माझ्या जायच्या दिवसापर्यंत प्रत्येक तयारीत घरचे पूर्ण मदत करतात. त्यांच्याशिवाय मी हे करूच शकलो नसतो. 


Rajesh Gadgil_1 &nbs

 

 

व्यवसायाचं म्हणाल तर किती मिळवायचं हे तुम्ही ठरवलेलं असलं की मग या सगळया गोष्टींचं प्लॅनिंग करणं सोपं जातं. कारण व्यवसाय म्हटलं की तो अमर्यादित असू शकतो. आपल्याला किती व्यवसाय वाढवायचा हे ठरवलेलं असलं म्हणजे त्यातून चाळीस दिवस कसे काढायचे हे तुम्हाला नक्की ठरवता येतं. माझ्या सुदैवाने माझे काका आणि माझी पत्नी हे माझ्या व्यवसायाचा भाग आहेत. माझे सहकारी खूप वर्षांपासून माझ्यासह काम करत आहेत. त्या सगळयांचा पाठिंबा मला सतत मिळत असतो. 

 

नवोदित गिर्यारोहकांसाठी सल्ला

नवोदित गिर्यारोहकांना मी सांगू इच्छितो की, सुयोग्य प्रशिक्षणाशिवाय कृपया यातील कोणत्याही गोष्टीला हात घालू नका. माझा बेसिक कोर्स किंवा ऍडव्हान्स कोर्स झाला म्हणजे मी गिर्यारोहक झालो असं समजायची चूक करू नका. सुरुवातीच्या मोहिमा सोप्या, आपल्या आवाक्यातील आणि अनुभवी व्यक्तींच्या सोबत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कराव्यात. गिर्यारोहणाच्या अभ्यासात केवळ तंत्र शिकवली जातात. मंत्र हे अनुभवातूनच तुम्हाला मिळतात. हे दोन्ही तुमच्याजवळ असल्याशिवाय अशा मोहिमांना जाऊ नये. 4-5 मोहिमा झाल्यानंतर आत्मविश्वास आणि ज्ञान दोन्हींचा साठा व्हायला लागतो. नंतरही आपल्या सोबतचे समविचारी आहेत का ते पाहावं. केवळ शिखराच्या कीर्तीच्या मागे न लागता, ते शिखर तुम्हाला का चढायचंय याचं कारण शोधा आणि ते तुमच्या मनाला पटलं तरच ते करा. अन्यथा करू नका. कारण अशा वेळी अपेक्षाभंगाचं दु:ख खूप मोठ असतं. आणि त्यामुळे चांगलं टॅलेंट वाया जाऊ शकतं. अतिशय आनंददायक अशी ही यात्रा आहे. तुम्ही याकडे जितक्या डोळसपणे पाहाल, तितकी ही यात्रा तुम्हाला आनंद देईल. तर कृपया डोळे उघडे ठेवून या छंदात उडी घ्या. अज्ञात भागातील बारकावे गूगल अर्थ किंवा कोणत्याच नकाशावरून कळत नाहीत. ते तुम्हाला तेथे जाऊनच उलगडतात.

 

समृध्द करणारा प्रवास

माणूस म्हणून समृध्द करणारा हा प्रवास आहे. गिर्यारोहणामुळे मला एक आत्मविश्वास मिळाला. हा आत्मविश्वास केवळ बोलता येण्यापुरता मर्यादित नाही, तर कोणतीही कृती करताना तो माझ्या मदतीला येतो. विशेषत: व्यवसायात जेव्हा धडाडीने काही निर्णय घ्यावे लागतात, ते घेताना गिर्यारोहणातील ऍनालिसिसची पध्दत आम्हाला खूप उपयोगी पडते. गिर्यारोहणामुळे निर्णयक्षमता वाढीला लागते. एकमेकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती तयार होते, त्याचा कुटुंबातही उपयोग होतो आणि व्यवसायातही फायदा होतो आणि त्याहीपेक्षा त्या बाहेरचा जो समाज आहे, त्यामध्ये वावरतानाही फायदा होतो.

 

चांगल्या प्रदूषणमुक्त भागात तुम्ही काही दिवस घालवता तेव्हा तुमची शारीरिक क्षमता वाढीस लागते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. असे दृश्य फायदे तर अनेक आहेत. शिवाय ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रण असू शकत नाही, त्या मान्य करण्याची तुमची स्वीकारशीलता वाढते. त्यामुळे मानसिकदृष्टया संतुलित होण्याचं सगळयात मोठं श्रेय मी गिर्याराहणाला देईन.

 

शब्दांकन : सपना कदम-आचरेकर

(आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरील मुलाखतीवर आधारित )