दत्तोपंतांचा परीसस्पर्श

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Dec-2019
|

***श्रीनिवास जोशी***

Sri Dattopant Thengadi ce

श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1920 रोजी विदर्भातील आर्वी या गावी दीपावलीच्या पावन दिवशी (10 नोव्हेंबर 1920) झाला व 14 ऑक्टोबर 2004 या दिवशी पुणे येथे वयाच्या 84 वर्षी त्यांचे दु:खद निधन झाले. आर्वी येथील शिक्षण आटोपल्यानंतर ते नागपूर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्यावर प.पू. श्रीगुरुजींच्या घरीच त्यांचा मुक्काम असल्याने त्यांच्या आयुष्यावर जे संस्कार झाले, ते म्हणजे परीसस्पर्शाने लोखंडाचे जे होते असेच झाले व पुढच्या 60-62 वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात जगाने त्याची प्रचिती अनुभवली. परीस फक्त आपल्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करतो, पण त्या परावर्तित झालेल्या सोन्याला लोखंडातच काय, अन्य कोणत्याही धातूत आपल्या स्पर्शाने सोन्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही. दत्तोपंतांनी मात्र त्यांच्या सहवासात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनात जे परिवर्तन घडवून आणले, ते सोन्यासारखेच किमती/ मूल्यवान होते. माझ्यासारख्या अगदी सामान्य कार्यकर्त्याला अशा त्या महापुरुषाचा सहवास लाभला, हे मी माझे पूर्वजन्मीचे संचित फळास आले असेच समजतो. त्या सहवासातील काही प्रसंग त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाचकांबरोबर वाटून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच !

एके दिवशी ते मुंबईत स्व. मनोहरभाई मेहता यांच्या घरी मुक्कामाला होते. त्या मुक्कामात त्यांना त्यांच्या भाषणासाठी काही टिपण करावयाचे होते व त्यासाठी लेखनिकाची आवश्यकता होती. त्यासाठी माझी योजना झाली होती. रात्री 9च्या सुमारास ते जे सांगत गेले, ते मी लिहीत गेलो. रात्री बाराच्या पुढे मला झोप यायला लागली, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला झोपा असा आदेश दिला. मी झोपलो. पहाटे 5च्या सुमारास मला जाग आली व पाहतो, तो ते स्वत: लिहीत होते. मला त्यांनी झोपायला सांगून ते स्वत: आडवे झाले. मी 6च्या सुमारास उठून डोंबिवलीला जाण्याच्या तयारीला लागलो, तो तेही उठून वाचन करताना दिसले. मी त्यांच्याकडे पाहताच त्यांनी मला जायची अनुमती दिली. त्या रात्री ते जेमतेम एक तासभर झोपले असावे, पण सकाळी पूर्णपणे ताजेतवाने दिसत होते. अंगावर घेतलेली जबाबदारी हातचे राखून कधीच करू नये, हे बाळकडू त्यांना कोठून मिळाले माहीत नाही.

 

एकदा नागपूरला एका बैठकीसाठी गेलो होतो, त्या दिवशी कार्यक्रम आटोपल्यावर मी काही कामासाठी रेशमबागेतून बाहेर गेलो व परत आलो तो दत्तोपंत डॉक्टरांच्या समाधी मंदिरासमोर शतपावली करत होते. त्यांना चुकवून मी पुढे जाऊ लागलो. पण त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले व त्यांनी मला थांबवून विचारले, ''काय, झोप येत आहे का?'' मी हो म्हणणे शक्यच नव्हते. त्यावर ते म्हणाले, ''चला, आपण महालात (नागपूरचा एक भाग) जाऊन येऊ.'' मी अत्यंत आनंदाने त्यांच्याबरोबर पायीच निघालो. महालात एका आजारी कार्यकर्त्याला भेटण्यासाठी जायचे होते व एका परिचिताकडे तीर्थप्रसादासाठी जायचे होते. तेथून परत येताना (रात्रीचे 12 वाजून गेले होते) सायकलरिक्षाने हेडगेवार भवनापाशी आलो. रिक्षावाल्याला जे पैसे द्यायचे होते, ते मी देऊ लागताच मला थांबवून त्यांनीच दिले. पण लगेच न निघता थांबून त्या रिक्षावाल्याची चौकशी केली. त्याने दिलेल्या उत्तरात त्याचे नाव हमीद, त्याला पत्नी व दोन मुले असा परिवार झोपडपट्टीत राहत होता. मुले शाळेत जात नाहीत, शिकून काय करायचे? असा त्याचा उलटा प्रश्न. तो ऐकताच दत्तोपंत त्याच्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला शिक्षणाचे महत्त्व सांगून त्याच्याकडून मुलांना शाळेत पाठवीन असे कबूल करून घेतले. त्यांच्या त्या आत्मीयतेने भरलेल्या सल्ल्याने हमीद खूपच भारावून गेला. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावरचे प्रसन्नतेचे भाव विसरता येणे शक्य नाही. त्याने अत्यंत आदराने दत्तोपंतांना सलाम केला व तो निघून गेला, त्या हृद्य प्रसंगातून हेच लक्षात आले की समाजातील अगदी खालच्या थरातील लोकांसाठी त्यांच्या मनात टोकाची आत्मीयता होती व त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य होते, ते ते आयुष्यभर करत गेले.

नागपूरमध्येच एकदा त्यांच्याबरोबर एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा योग आला. त्या वेळी तो कार्यकर्ता घरी असण्याची शक्यता नव्हती. पण त्याच्या घरी सर्वांशी परिचय असल्याने जायचे ठरले. घरात प्रवेश करताच मनापासून स्वागत झाले. कार्यकर्त्याच्या आईने प्राथमिक चौकशी केली, प्रवास कसे चालू आहेत? आत्ता कोठून आलात? वगैरे विचारल्यावर त्या पुढे म्हणाल्या, ''तुमच्या कार्यकर्त्याचे (म्हणजेच त्यांच्या मुलाचे) घराकडे अजिबात लक्ष नाही, मुलांच्या अभ्यासाकडे एकटया सूनबाईने किती लक्ष द्यायचे? त्याला आपणच काही सांगू शकाल. माझेही तो ऐकत नाही.' आणखीही बरेच काही त्या बोलत राहिल्या. त्यांचे बोलणे पूर्ण ऐकून घेतल्यावर दत्तोपंत म्हणाले, ''वहिनी, कार्यकर्त्याची योग्यता ठरवण्याची आमची एक कसोटी आहे. ज्या कार्यकर्त्याच्या घरून जितकी गंभीर तक्रार येईल, त्यावरून त्या कार्यकर्त्याची श्रेणी आम्ही नक्की करतो. आता तुमच्या तक्रारीच्या स्वरूपावरून मला असे वाटते की तुमचा मुलगा आमचा फार मोठा कार्यकर्ता आहे.'' दत्तोपंतांनी त्यांच्या मुलाची केलेली तारीफ त्या माउलीच्या लक्षात आली व त्यांनी अत्यंत समाधानाने व हास्यवदनाने दाद दिली. नंतर अर्थातच त्यांच्या सुनेने समोर आणून ठेवलेल्या चहा-नाश्त्याचा समाचार घेऊन आम्ही तेथून बाहेर पडलो. कार्यकर्त्यांचा घरच्या मंडळीशी कसे संबंध ठेवावे, याचा वस्तुपाठ या प्रसंगातून मिळाला.

ऑक्टोबर 2001मध्ये एकदा त्यांच्याबरोबर प्रयागराज येथून मुंबईपर्यंत प्रवास करण्याचा आदेश मला मिळाला. तो आदेश म्हणजे अत्यंत आनंदाचा प्रसंगच होता. प्रवासात त्यांच्याशी (आम्ही दोघे समोरासमोरच्या शायिकेवर होतो. गाडीला गर्दी नव्हती.) त्यामुळे मनसोक्त गप्पा, शंकानिरसन वगैरे झाले. रात्री झोपायची वेळ झाली. ते आडवे झाले व माझ्या डोक्यात एक स्वार्थी विचार आला. मी त्यांच्या पायाशी गेलो व त्यांचे पाय हातात घेऊन ते दाबून द्यावे म्हणून हातात घेण्याचा प्रयत्न करताच ते ताडकन उठून बसले व मला समोर जाऊन झोपण्याची आज्ञा सोडली. माझे मन खट्टू झाले, पण त्यांच्याविषयी असलेल्या श्रध्देत भरच पडली.

त्यांची स्मरणशक्ती म्हणजे अद्भुत प्रकरणच. एकदा आमचा एक शाखास्तरावरचा कार्यकर्ता दादर स्टेशनवर बोरीबंदरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता. त्याच वेळी पुण्याहून एक गाडी आली व तीमधून रमणभाई शहा आणि दत्तोपंत उतरले. आमचा तो कार्यकर्ता (त्याचे नाव दत्तात्रय हिरामण शिंपी) त्याने दत्तोपंतांना पाहिले व तो त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकला. दत्तोपंतांनी त्याला थांबवले, त्याच वेळी रमणभाई पुढे येऊन त्याचे नाव सांगणार, तोच दत्तोपंत म्हणाले, ''हे आपले रेल्वेतले कार्यकर्ते व त्यांचे नाव दत्तात्रय हिरामण शिंपी'' हे सांगून त्याची चौकशी केली. आमच्या त्या कार्यकर्त्याची अवस्था त्या वेळी काय झाली, तिचे वर्णन करताच येत नाही.

एकदा आम्ही रेल्वेतले काही कार्यकर्ते दत्तोपंतांना भेटण्यासाठी (ते मुंबईत आले होते) गेलो. त्या वेळच्या मद्रासमध्ये भारतीय रेल्वे मजदूर संघाचे अधिवेशन घायचे नक्की झाल होते. त्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे होते. तासभर झालेल्या चर्चेत आमच्यापैकी एकाच्या (दत्ताराव देव) तोंडून एक वाक्य बोलले गेले. ते वाक्य ''भारतीय मजदूर संघाचे भारतीय रेल्वे मजदूर संघाकडे लक्ष नाही.'' हे वाक्य ऐकताच ते आमच्यावर भडकले. त्यांनी आमची चांगलीच हजेरी घेतली. त्यांनी जे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे आमच्याजवळ नव्हती. 'कातो तो खून नाही' अशी आमची अवस्था झाली. पण त्याच कार्यकर्त्याच्या तोंडून ''आम्ही आमची व्यथा आईजवळ नाही, तर कोणाजवळ मांडायची?'' हे वाक्य निघून जाताच गंभीर झालेले वातावरण एकदम शांत झाले. त्यांचा चढलेला पारा खाली उतरला. नंतर त्यांनी आई जशी मुलाला थप्पड मारते पण नंतर जवळ घेऊन त्याला गोंजारते, तसे त्यांनी आम्हाला समजावून संगितले, त्यामुळे आमचे मद्रासचे अधिवेशन ऐतिहासिक अधिवेशन ठरले हे सांगणे न लागे.

 

असे हे विलोभनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे परीसाच्या स्पर्शाने झालेले सुवर्णच! त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन!

श्रीनिवास जोशी

(माजी महामंत्री, भा.रे. मजदूर संघ)

9870113250