अभाविप जगातील सर्वोत्तम विद्यापीठ -धर्मेंद्र प्रधान

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Dec-2019
|

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

पुणे : 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जगातील सर्वोत्तम विद्यापीठ आहे ज्याने आम्हाला जगाच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत, आत्मविश्वास दिला, असे उद्गार केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले. पुणे येथे आयोजित अभाविपच्या ५४ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात प्रधान बोलत होते.


Dharmendra Pradhan From A

पुण्यातील लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर, गुलटेकडी येथे होत असलेल्या या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात व्यासपीठावर एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या दिव्यांग गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. सारंग जोशी, प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे, पुणे महानगर अध्यक्ष डॉ. शरद गोस्वामी, महानगर मंत्री अनिल ठोंबरे, अधिवेशन स्वागताध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी, स्वागत सचिव राजेश पांडे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पुणे हे भारतीय संस्कृतीतील महत्वाचे स्थान आहे. ऐतिहासिक वारसा व परंपरा लाभलेल्या पुण्यात अभाविपने हे अधिवेशन पुण्यात आयोजित करत ही परंपरा पुढे नेली आहे. अभाविप २१ व्या शतकातील भारताच्या वाटचालीतील अग्रदूत बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १९८३ मध्ये मी इयत्ता ११ वीसाठी महाविद्यालयात दाखल झालो त्यावेळी अभाविपचे काम करण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी अभाविपच्या तत्कालीन संघटनमंत्र्यांनी मला १०० युवकांपुढे एकात्मता स्तोत्र म्हणण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे माझा आत्मविश्वास सर्वप्रथम वाढला. आज मी केंद्रात मंत्री झालो, त्यात अभाविपच्या संस्कारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रधान यांनी केले.

 

Dharmendra Pradhan From A 

धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, आज मी इथे आलो तेव्हा आपले काही युवा कार्यकर्ते हातात वॉकीटॉकी घेऊन फिरताना दिसले. आजकाल मोबाईलवरील सेल्फीदेखील लोकप्रिय आहे. आम्ही विद्यार्थीदशेत अभाविपचे काम करत असताना हे सर्व नव्हते. मोबाईल, वॉकीटॉकी हे केवळ एक यंत्र नसून ती २१ व्या शतकातील भारताची युवाशक्ती तंत्रज्ञानाच्या जोरावर पुढे जात असल्याचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे व त्या युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, या गोष्टीचे पेटंट अभाविपकडे असल्याची प्रशंसा त्यांनी केली. अभाविप हे सर्वोत्तम विद्यापीठ असून या विद्यापीठाने आम्हाला जगाच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत व आत्मविश्वास दिल्याचे उद्गार यावेळी प्रधान यांनी काढले.

तिरंग्याचे महत्त्व एव्हरेस्टवर जाणवले !

या उद्घाटन सत्रात एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या दिव्यांग गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा यांच्या मनोगताने उपस्थित युवकांची मने जिंकली. त्या म्हणाल्या की, एक विकलांग महिला एव्हरेस्ट कशी काय सर करणार, असा प्रश्न अनेकजण विचारत होते. परंतु, इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे करून दाखवले. जगातील सर्वोच्च शिखरावर गेल्यावर आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व जाणवते, असे सांगत एव्हरेस्टवर मला तिथे आलेल्या सर्व देशांच्या गिर्यारोहकांमध्ये आपला तिरंगा सर्वांत उंच उंचावून दाखवावासा वाटत होता, अशी आठवण सिन्हा यांनी सांगितली.

ज्याच्या मनात जिंकण्याची इच्छाशक्ती असते, त्यालाच नशीब वगैरे गोष्टी साथ देतात, असेही त्या म्हणाल्या. आपल्या मनाला 'चार्ज' करण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मी स्वामी विवेकानंद वाचते, असेही त्यांनी नमूद केले. तुम्ही विकसित व्हाल, तेव्हाच देश विकसित होईल. त्यामुळे स्वतःच्या मनात एक लक्ष्य निर्धारित करा आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला झोकून द्या, असा संदेशही अरूणिमा सिन्हा यांनी यावेळी दिला.