तत्त्वचिंतक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक05-Dec-2019
|

***डॉ. रमा दत्तात्रय गर्गे***

बाबासाहेबांचे तत्त्वचिंतन हे लोकशाही आणि मानवतेचे प्रतिष्ठा वाढवणारे आणि त्याचबरोबर सामाजिक गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी मार्ग दाखवणारे आहे. तसेच संविधानाची संहिता ही बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असणाऱ्या तत्त्वचिंतकाची साक्ष देते.

dr. babasaheb ambedkar_1&

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे ज्ञानसाधनेमध्ये, समाजजागृतीसाठी आणि समाजसंघटनेमध्ये व्यतीत झाले. एकाच आयुष्यामध्ये अनेक शतकांच्या, असंख्य बाबींशी लढून आपल्या समाजाला दिशा देण्याचे काम या महामानवाला करायचे होते. आपल्या खांद्यावर असलेल्या या जबाबदारीची त्यांना पूर्ण जाणीव होती.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक


बाबासाहेबांना ते जिथे पोहोचले आहेत, तेथून विदारक जग दिसत होते आणि त्यांच्या डोळयांपुढे समतेचे जग उभे राहत होते. या दोन जगांतील सेतू आपण आहोत, हे ते पूर्णपणे जाणून होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक वास्तव, त्या काळातील राजकीय स्थिती, बाबासाहेबांची स्वत:ची होत असलेली घुसमट आणि त्याच वेळी आतून घडत असलेली ज्ञानक्रांती या सगळया गोष्टींना पेलून घेत, एकाच वेळी त्यांना आपल्या समाजाला जीवनाचा अर्थ समजून सांगायचा होता. जीवनामध्ये असलेल्या ज्ञान, कला आणि सौंदर्याची जाणीव करून द्यायची होती. दलित समाजामध्ये स्वत:विषयी असलेल्या हीन भावनेला नाहीसे करायचे होते.

सामर्थ्य आणि कारुण्य या दोन गोष्टी एकत्रितपणे आपल्या समाजाला द्यायच्या होत्या. पुढे अनेक वर्षे या समाजाला संघर्ष करायचा आहे याची बाबासाहेबांना जाणीव होती. या संघर्षामध्ये दलित, वंचित टिकून राहिले पाहिजेत आणि त्याचबरोबर माणूस म्हणून उत्तमरीत्या जगू शकले पाहिजेत, असे काही तत्त्वज्ञान त्यांना द्यायचे होते.

बरेचदा, जेव्हा सामाजिक कुरितींविरुध्द बंड पुकारले जाते, संघर्ष केला जातो, कशाच्या तरी विरोधामध्ये धारदारपणे उभे राहिले जाते, त्या वेळी तो लढा एकांगी होत जातो. तेवढयापुरता तो लढा चमकून उठतो, परंतु थोडया वेळाने ती चमकलेली वीज धरतीमध्ये गडप होते. घडून गेलेले असे प्रसंग काही काळ स्फूर्तिदायक असतात खरे, परंतु हे लढे चिरंतन राहत नाहीत. पिढयापिढयांना सातत्यपूर्ण प्रेरणा देऊ शकत नाहीत.

बाबासाहेबांनी हे नेहमी ध्यानात ठेवले. त्यांनी जो लढा उभारला, त्या लढयाला कधीही एकांगी होऊ दिले नाही. आपल्या बांधवांची हीनदीन स्थिती ते जाणत होते. त्यातून क्षणार्धात त्यांना वर काढता येणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हा लढा पुढच्या अनेक पिढयांपर्यंत शांततेने चालला पाहिजे, यासाठी त्यांना पक्का पाया रचून दिला पाहिजे याचा विचार त्यांनी केला होता. लढयातील संघर्षाची धग कमी न होता ती सतत पेटती राहिली पाहिजे, परंतु त्याचबरोबरीने संघर्ष करणारी व्यक्ती ही माणूस म्हणूनही उत्तम जगली पाहिजे, या सगळया गोष्टींचे चिंतन बाबासाहेबांनी केले.

 

मानवी मन प्रगल्भ झाल्यानंतर ते जीवनाचा शोध घेते. परस्पर संबंधांचा शोध घेते. अंतिम गंतव्याचा शोध घेते. अभिव्यक्तीचे निरनिराळे प्रकार शोधते. तर्क, सौंदर्य आणि कार्यकारणभाव या दिशेने जाते.

 

आपल्या समाजबांधवांनी शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा ते अशा प्रकारचे मन अनुभवतील, तेव्हा या प्रगल्भ मनाचा प्रवास कसा असावा, कोणत्या दिशेने व्हावा, त्यांना अंतिम गंतव्य कसे गवसावे यासाठी बाबासाहेबांनी तत्त्वचिंतन केले. त्यांनी घालून दिलेले स्वत:च्या जीवनातील आदर्श आणि लिहून ठेवलेले तत्त्वज्ञान हे हातात हात घालून चालतात.

 

हा लढा सामाजिक आणि धार्मिक असल्याने, बाबासाहेबांनी दलित समाजाला त्यांच्या जीवनामध्ये समतेचा आणि शांतीचा मार्ग देणारा बौध्दधर्म दिला. ज्या समाजासाठी बाबासाहेब काम करत होते, तो समाज त्या वेळी मृत जनावराचे मांस खात होता, स्वत:ला नीच समजत होता, त्याचा स्वाभिमान नाहीसा झालेला होता, उष्टे आणि शिळे खात होता, बाबासाहेबांच्या डोळयासमोर याच समाजातून शिकून पुढे येणारा आधुनिक मानव उभा असे, ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी आपले तत्त्वचिंतन लिहून ठेवले आहे.

 

बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वचिंतन किंवा दर्शन स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. परंतु अनेक विद्वानांचे असे मत आहे की त्यांनी त्यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालेल्या 'बुध्दा ऍंड हिज धम्मा' या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते म्हणजे बौध्द धर्माची एक नवीन तत्त्वचिंतनात्मक शाखाच आहे! बौध्द धर्माच्या झेन, महायान, हीनयान जशा शाखा आहेत, तशीच ही नवीन शाखा असल्याचे जाणवते. या ग्रंथाची मांडणी एखाद्या दर्शन ग्रंथासारखी आहे. बाबासाहेबांच्या दर्शनाला समता दर्शन म्हणणे अधिक योग्य ठरेल की उध्दार दर्शन म्हणावे, असा प्रश्न पडतो.

 

महाबोधी या संस्थेच्या मासिकात बाबासाहेबांनी तत्त्व, नीती याविषयीचे चिंतन मांडले होते. त्याचे सार असे - 'समाजाचे स्थैर्य टिकून राहायचे असेल, तर समाजाला कायदेशीर निर्बंध आवश्यक असतातच. परंतु केवळ कायद्याचे निर्बंध आणून समाज स्थिर राहू शकत नाही. कारण वेगवेगळया व्यक्तींची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. त्या त्या स्तरावरील अभिव्यक्तीची त्या त्या व्यक्तींना ओढ असते आणि त्या अभिव्यक्तीसाठी आपापले व्यासपीठ प्रत्येकालाच आवश्यक असते. हे व्यासपीठ मनुष्याला नीतीचा आधार देते नसेल, तर समाज स्थिर राहू शकत नाही. म्हणूनच मनुष्याला धर्माची गरज आहे. मात्र तो धर्म नीतीवर अधिष्ठित असला पाहिजे. या दृष्टीने नव्या युगाला अनुकूल असा बुध्दाचा धम्म आहे. बौध्द धर्मामध्ये देवाची जागा नीतीने घेतली आहे. कार्यकारणभाव हा विज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि बुध्दिप्रामाण्यवाद हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. या दोन्ही घटकांना तोलून धरणारा धर्म जर माणसाला मिळाला, तर तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांना तोलून धरू शकतो.'

बाबासाहेब म्हणत, 'धर्माने दारिद्रयाला कधी पवित्र मानू नये, उदात्त मानू नये, तर दारिद्रय नाहीसे करून ऐश्वर्यसंपन्न घेण्याकडेच धर्माचा कल असला पाहिजे. धर्म म्हणजे केवळ नीतीची संस्था असून चालणार नाही, तर धर्माच्या नीतीने मनुष्याच्या समानतेचे महत्त्व अधोरेखित करत राहिले पाहिजे.'

बाबासाहेबांचे धर्मविषयक विचार अत्यंत क्रांतिकारक होते. कायद्याचे निर्बंध हे बुध्दीशी निगडित असतात, तर धर्माचे आणि नीतीचे निर्बंध हे हृदयाशी निगडित असतात, असे बाबासाहेब म्हणतात. सामान्य मनुष्य त्याच्या अडचणीच्या काळामध्ये नीतीला धरून टिकून राहू शकतो, कारण त्याच्याकडे धर्म असतो म्हणून!! अन्यथा कोणतेही निर्बंध परिस्थितीवश झुगारले जाऊ शकतात. मनुष्याच्या जीवनाचे नियंत्रण करणारी अज्ञात अशी शक्ती अस्तित्वात आहे, असे ते अनेकदा बोलून दाखवत.

 

त्यांच्या आयुष्यात एक छोटासा प्रसंग घडला होता. एकदा त्यांची गाडी पुलावरून घसरून, एका मोठया दगडाच्या आधाराने नदीच्या पाण्यावर लोंबकळत राहिली. नंतर ड्रायव्हरने आणि त्यांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी मारली व ते दोघेही थोडक्यात बचावले. त्यानंतर त्या प्रसंगावर बोलताना बाबासाहेब म्हणाले, ''नियतीने आणि अदृश्य शक्तीनेच माझ्यावर कृपा केली.''

भारतीय समाजाचा अत्यंत निकृष्ट मानला गेलेला वर्ग जागा करायचा आणि या जनतेसमोर उध्दाराचा मार्ग ठेवायचा, हे त्यांचे जीवितकार्य होते. त्याचबरोबरीने जे लोक त्यांच्या समाजाला माणूस समजत नाहीत, त्यांच्याशी त्यांना विविध पातळयांवर लढायचे होते. पाताळयंत्री लोकांना उत्तरे द्यायची होती. कारस्थाने करणाऱ्यांना दूर करायचे होते. असे एकाच वेळी अनेक घटकांशी दोन हात करीत असताना बाबासाहेब भावुक होऊन म्हणत की, 'महात्मा बुध्दाचे जीवन, कबीराची शिकवण आणि जोतिरावांचे कार्य ह्या तीन गोष्टींनी मला आत्मिक शक्ती मिळालेली आहे.'

 

बाबासाहेबांची जातपात तोडक मंडळासाठी लिहिलेली अध्यक्षीय भाषणाची एक पुस्तिका आहे. काही अडचणीमुळे ते भाषण झाले नाही, पण तो प्रबंध प्रकाशित झाला. पुस्तिकेचे शीर्षक आहे 'जातीचे निर्मूलन.' हा प्रबंध अत्यंत तर्कनिष्ठ, सूक्ष्म विवेचन करणारा आणि व्यासंगी असा लिहिला गेला आहे. यामध्ये बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की, 'हिंदू समाज एकवर्ण झाला, तरच तो स्वत:चे संरक्षण करू शकतो. जातिव्यवस्था हा हिंदू समाजाला असलेला शाप आहे. या रचनेमध्ये मनुष्याची निष्ठा ही जातीपुरतीच मर्यादित राहते आणि दुसऱ्या जातीतील मनुष्याच्या गुणांची कौतुक करण्याइतकेदेखील त्या व्यक्तीचे मोठे मन राहत नाही. ही दुराग्रही व्यवस्था श्रमविभागणी करते आणि मनुष्याला ज्ञान संपादन करण्याची बंदी करते. त्याचप्रमाणे अपमान आणि अन्याय निमूटपणे सहन करत राहावे व दीनदुबळे राहावे म्हणून एका घटकावर चालीरिती आणि धर्मश्रध्दा थोपते. तीच हिंदूंच्या अवनतीचे कारण आहे. याने मनुष्याची सार्वजनिक हीतबुध्दी नष्ट केली आहे.'

 

बाबासाहेब स्वत:ला आपल्या अस्पृश्य बांधवांची आई म्हणवून घेत. एकदा जमनालाल बजाज आणि शेठ वालचंद हिराचंद हे दोघे लक्षाधीश बाबासाहेबांना म्हणाले, ''बाबासाहेब, आम्ही अस्पृश्यांसाठी इतके काही करतो, अमाप खर्च करतो, परंतु ते तुमच्यावरच अतोनात प्रेम करतात. हे असे का घडते?'' तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ''आई आणि दाई यात जो फरक असतो, तोच फरक माझ्यात आणि तुमच्या करण्यामध्ये आहे.'' त्यांच्या तत्त्वचिंतनातही सातत्याने हाच भाव प्रकट होताना दिसतो. त्यांचे तत्त्वज्ञान पददलितांना स्वावलंबन, स्वाभिमान आणि स्वसन्मान यांची शिकवण देते. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचे तत्त्वज्ञान युगानयुगे करीत राहणार आहे.

बाबासाहेब जेव्हा सभांमध्ये बोलत, तेव्हा ते आपल्या बांधवांना तळमळीने म्हणत, 'जन्माला येऊन जगातील दु:ख, दारिद्रय आणि दास्य यांनी वेढलेले, अवनत आणि अपमानित जीवन तुम्ही जगत आहात. हे ईश्वरी संकेतानुसार आहे असे तुम्ही समजत असाल, तर या जगातून नाहीसे होऊन जगाच्या दु:खाचे ओझे का कमी करत नाही? अरे, तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वत:च्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र आणि आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिध्द हक्क आहे. म्हणून स्वाभिमानपूर्ण जिणे जगायचे असेल, तर स्वावलंबन आणि शिक्षण हाच आत्मोन्नतीचा मार्ग आहे हे कायम लक्षात ठेवा.''

बाबासाहेबांच्या तत्त्वचिंतनाचा विचार करताना त्यांनी लिहिलेले संविधान हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. त्यांच्या तत्त्वचिंतनाचा ठसा संविधानात उमटलेला दिसतो. हे संविधान म्हणजे देशाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक घटकाच्या सहभागाची खात्री आहे. या संविधानाने भारताला एक मूलगामी, नैतिक असे चिंतन दिले.

 

हा देश म्हणजे अनेक राष्ट्रकांचे लहान लहान खंड आहे, असा एक विचार भारतात आढळतो. हा विचार राष्ट्रीय ऐक्याला धोकादायक आहे, असे बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात. त्यांचा या विचाराला विरोध होता. ते केंद्रीय सत्ता बळकट असावी या विचाराला पाठिंबा देणारे विचारवंत होते. म्हणूनच या देशाला बांधून ठेवणारे त्यांचे संविधान केंद्रीय राज्यसत्तेला बळकटी देते. सामाजिक-आर्थिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, संधीची समानता आणि एकता व बंधुतेचे आश्वासन देणारी ही संविधानाची संहिता बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असणाऱ्या तत्त्वचिंतकाची साक्ष देते.

 

बाबासाहेबांचे तत्त्वचिंतन हे लोकशाही आणि मानवतेचे प्रतिष्ठा वाढवणारे आणि त्याचबरोबर सामाजिक गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी मार्ग दाखवणारे आहे. एका गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मागणी केली होती की, दलित वर्गाला प्रॉटेस्टंट हिंदू म्हणावे.' या वाक्यातून त्यांच्या विचारांच्या उगमाची, स्रोताची कल्पना येते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांनी दलित वर्गाला बुध्दाचा धम्म नव्या युगाला अनुकूल करून दिला.

 

ज्ञानसागर बाबासाहेबांच्या लिखाणातील आणि बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दातील आणि जगलेल्या प्रत्येक कृतीमधील तत्त्वज्ञान एकच सांगते, ते म्हणजे 'व्यक्तिमत्त्व दडपणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करा. या समर्थ हातांबरोबर करुणामय हृदय आणि पुण्यवान शील असू द्या. माणूस म्हणून जगा. माणसासारखे जगा.'