संघर्षमय विकसशील प्रवास -रुषाताई रामसिंग वळवी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक07-Dec-2019
|

***कपिल सहस्रबुध्दे** 

 
रुषाताई रामसिंग वळवी यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा 'बाया कर्वे पुरस्कार' देण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत एका महिलेला दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सातपुडयाच्या दुर्गम पहाडी भागात गेली 20 वर्षे रुषाताई आणि रामसिंग वळवी हे दांपत्य गावातच राहून आपल्या भागासाठी कार्यरत आहे.


vrushatai ramsing walvi_1

कंजाल्यात रानभाज्यांची नोंदणी सुरू होती. स्थानिक महिलांच्या एका गटात कोणत्या महिन्यात कोणत्या भाज्या अशी संगत लावणे सुरू होते. पण काही केल्या ते नीटसे जमेना. चर्चा अडली होती. रुषाताई म्हणाल्या
, ''आमच्या महिन्यांची नावे घेतली तर सुटेल कदाचित, करायचा का प्रयत्न?'' आणि पुढील काही वेळातच भाज्या आणि महिने याचा तक्ता तयार झाला. स्थानिक ठिकाणी कामे करताना आपल्या लोकांची बलस्थाने आणि कमजोरी दोन्ही माहीत असावे लागते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक 

आज हे आठवायचे कारण म्हणजे नुकताच रुषाताईंना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा 'बाया कर्वे पुरस्कार' देण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत एका महिलेला दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सातपुडयाच्या दुर्गम पहाडी भागात गेली 20 वर्षे रुषाताई आणि रामसिंग वळवी हे दांपत्य गावातच राहून आपल्या भागासाठी कार्यरत आहे. कोणत्याही शहरी भागापासून किमान 200 कि.मी. अंतरावर हा भाग आहे. दुर्गमता काय, तर एका बाजूला सरदार धरणाचे अजस्र पाणी आणि अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत पक्का रस्ता आणि वीज नसलेले गाव. पण याही परिस्थितीत प्रत्येक चांगल्या बदलाची सुरुवात आपल्यापासून करत हे काम करत राहिले.

 

रुषाताईंचा जन्म सातपुडयाच्या दुर्गम भागात भगदारी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फत्तेसिंग निमजी पाडवी, तर आईचे नाव गिंबूबाई फत्तेसिंग पाडवी होते. त्या काळी वडिलांचे इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झाले होते, आईने मात्र शालेय शिक्षण कधी घेतले नाही. या दांपत्यास 7 मुली व 4 मुले झाली. त्यातील रूषाताई ह्या सगळयात धाकटया! परिस्थितीमुळे मोठया भाऊ-बहिणींपैकी कोणीही शालेय शिक्षण घेऊ शकले नाही. रुषाताईंनी मात्र शाळेची वाट धरली.

 

1989 साली रामसिंग वळवी या त्याच परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याशी त्यांचा त्यांचा विवाह झाला. त्या वेळी रुषाताईंचे आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. दोघांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, परंतु परिस्थितीमुळे पती रामसिंग वळवी पुढे शिक्षण घेऊ शकले नाही.


कंजाला हा संपूर्ण जंगलाने वेढलेला दुर्गम परिसर! येथे पावसाच्या पाण्यावर छोटी छोटी शेती करणारे अल्पभूधारक शेतकरीच अधिक प्रमाणात होते. जंगल हाच दैनंदिन गरजांकरिता कंजाला परिसराचा मोठा आधार होता. हा सगळा
90च्या दशकाचा काळ! तेव्हा या परिसरात ना वीज होती, ना रस्ता. बिकट डोंगरदऱ्या ओलांडून 15 कि.मी.वर दवाखाना, शाळा व बाजारात जावे लागत असे.


परिसर विकासातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षणाचा प्रसार व्हावा व आपला परिसरदेखील शिक्षणाच्या प्रवाहात जोडला जावा
, या विचाराने त्यांनी नर्मदेकाठी डेब्रामाळ ग्रामपंचायत अंतर्गत कंजाला या गावी अंगणवाडी सेविका म्हणून कार्य प्रारंभ केले. परिसरातील पहिली अंगणवाडी सुरू केली.

 
vrushatai ramsing walvi_1

विकासाच्या आधुनिक सुविधांपासून दूर असलेल्या या भागाचे चित्र बदलावे, म्हणून परिसरातील सर्व लोकांशी विचारविनिमय करून पंचायत समितीच्या निवडणुकीस उभे राहण्याचे ठरले. पिंपळखुटा गणातून पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या व अक्कलकुवा या दुर्गम तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती होण्याचा मान मिळाला. नंतरच्या काळात डेब्रामाळ ग्रामपंचायतच्या पहिल्या सरपंच झाल्या. दरम्यान काही काळ त्या जनशिक्षण संस्थानच्या संचालिकादेखील होत्या. सद्यःस्थितीत जिल्ह्याच्या भूजल सर्वेक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

परिसर विकासासाठी असे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असतानादेखील शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. परिसराच्या विकासासाठी त्यांनी आवश्यक ते शिक्षण, प्रशिक्षण पूर्ण करण्याची धडपड केली. त्यानुसार यशदा, पुणे येथून BRGF, तसेच दिल्ली मुक्त विद्यापीठातून फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठ येथून औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रशिक्षण पूर्ण केले. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार या केंद्राशी त्यांनी प्रशिक्षणाकरिता घट्ट संबंध जोडला व तेथून वेगवेगळे प्रशिक्षण सातत्याने पूर्ण केले.

 

या विकास कार्यातील एक टप्पा म्हणजे पती रामसिंग वळवी यांनी परिसराच्या विकासासाठी सन 1998 साली 'एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ, कंजाला' या संस्थेची स्थापना केली.

 

रुषाताई यांनी विकासकार्यात महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने 'शबरी महिला बचत गटाची' स्थापना केली. हळूहळू बचत गटाची संख्या वाढवत नेत 'शबरी महिला ग्राम सेवा संघाची' स्थापना केली. 250पेक्षा अधिक महिला या संघाच्या सदस्य झाल्या. परिसरातील नागरिक, शासन, प्रशासनातील अधिकारी विविध सेवाभावी संस्था यांच्याशी उत्तम संबंध व समन्वय स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून रुषाताईंनी आपल्या परिसरातील उद्योजक महिलांशी जोडून घेतले. परसबाग, कुक्कुटपालन, पळसाच्या चहा-आवळा कँडीची निर्मिती, अंगणवाडी व प्राथमिक शाळेचा पोषक आहार या सगळयाचा फायदा अनेक महिलांनी करून घेतला.

यातूनच अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरातील महिलांनी चालविलेला पहिला पोषण आहार तयार करणारा कारखाना सुरू केला. परिसरातील 100 अंगणवाडयांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा माता, कुपोषित बालके यांच्याकरिता शास्त्रशुध्द पोषण आहार निर्मिती व पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडली. कारखाना चालवीत असताना आर्थिक चणचण, बदलते शासकीय धोरण, बाजारातील स्पर्धा यावर अत्यंत कष्टाने मात करण्याचा प्रयत्न केला.

 
vrushatai ramsing walvi_1

कंजाला गाव आपले जंगल राखत होते. पण आजूबाजूचे जंगल तुटल्याने इतर गावातील लोक कंजाल्याचे जंगल तोडायला लागले. यातून संघर्ष निर्माण झाला. यावर रुषाताई व महिलांनी तोडगा काढला. त्यांनी महिलांचे एक दांडुका पथक तयार केले व वृक्षतोड करणाऱ्यांना रोखायला स्वत:च जाऊ लागल्या. महिला दिसल्यामुळे लोकसुध्दा वाद व संघर्ष टाळू लागले आणि निमूटपणे निघून जाऊ लागले. कंजालाचे जंगल सुरक्षित राहावे यासाठी हे 'दांडुका पथक' अजूनही कार्यरत आहे. पण आता आजूबाजूच्या गावांनासुध्दा जंगल रक्षणाचे महत्त्व समजले आहे. परिसरातील गावे जंगल रक्षण करू लागली आहेत.

एका बाजूला आधुनिक विकासाची कास धरीत असताना परिसरातील परंपरागत ज्ञानाच्या व मौखिक ज्ञानपरंपरेच्या प्रवाहाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. 'कृषी विज्ञान केंद्र', 'योजक' अशा विविध संस्थांसह त्यांनी एकलव्य ग्राामीण आदिवासी विकास मंडळाच्या कार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जंगलातील रानभाज्यांचे, त्यांच्या वापराचे, औषधी गुणधर्माचे मौखिक ज्ञान लिखित स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. परिसरातील सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीतून, तसेच विविध विषयतज्ज्ञांच्या मदतीतून कंजाला परिसरातील रानभाज्यांच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती झाली. कधीही शाळेत न गेलेल्या महिलांच्या ज्ञानावर आधारित या पुस्तकाचे प्रकाशन 2016मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महाराष्ट्राच्या राजभवनात मा. राज्यपाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रामसिंग वळवी व रुषाताई व परिसरातील नागरिक यांच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला.


संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प
, योजना आणण्यात यश आले. त्यातून परिसरातील आमचूर, मोह, सीताफळ अशा संपत्तीवर आधारित छोटे व्यवसाय सुरू झाले. तसेच कुपोषण कमी करण्यासाठी परसबागा व घरात पौष्टिक अन्नपदार्थ निर्मिती याची चळवळ उभारली गेली.

विकासाच्या खडतर वाटेवर वाटचाल करीत असताना त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. प्रत्येक वेळी बदलाच्या गोष्टी स्वत:पासून सुरू करण्याचा प्रयत्न हे दांपत्य करीत राहिले. या भावनेमुळे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या गावपरिसरातील त्या पहिल्या महिला होत्या.


परिसरातील इतरांप्रमाणे सर्वसामान्य राहणी ठेवत मनात शिक्षणावर
, प्रशिक्षणावर प्रगाढ निष्ठा ठेवत त्यांनी आजवरची वाटचाल केली आहे. सत्कारच्या भाषणातसुध्दा त्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत स्थानिक ज्ञान, परिसरात राहण्यासाठी उपयोगी शिक्षण असे मुद्दे सर्वांसमोर मांडले. त्यांनी कर्वे संस्थेतील मुलीना आवाहन केले की ''शिक्षण झाल्यावर काही काळ आमच्या भागात या, प्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायला आम्हाला मदत करा. आपण बरोबर काम करू.''

दुर्गम भागात काम करत स्थानिक समाजाच्या भल्याचा सतत विचार करणाऱ्या रुषाताईंना आणि अप्रकाशित कार्यकर्त्यांचे प्रयत्न समाजासमोर आणण्याचे काम करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला प्रणाम.


योजक,पुणे