PUBGच्या युध्दभूमीवर तरुणाईचं रणकंदन

स्रोत: विवेक मराठी    दिनांक18-Feb-2019   

घडता-घडविता

 मोबाईल गेमिंगच्या जगात सध्या PUBGची चर्चा जोरदार आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेक जणांच्या मोबाइलमध्ये या गेमने जागा मिळवली आहे. चौकाचौकात, कॉलेज कट्टयावर, रेल्वे स्थानकावर, बस स्थानकावर, हॉटेलमध्ये मुलं समूह करून बसतात. PUBG हा आता खेळ राहिलेला नाही, तर व्यसन झालं आहे. काय आहे हा गेम? त्याचे परिणाम-दुष्परिणाम काय? याविषयी जाणून घेऊ या या लेखात.


ध्या लहान मुलं आणि तरुण यांच्यामध्ये PUBGचं वेड आपल्याला मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. अलीकडे या गेमविषयी बऱ्याच बातम्यादेखील आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत आहेत. मागे एक लेख लिहिताना या गेमविषयी थोडी माहिती काढली होती. परंतु सध्या सतत ऐकायला येणाऱ्या बातम्यांमुळे हा गेम नक्की काय आहे, याची उत्सुकता वाटली. माझ्या ओळखीत काही जण PUBG खेळतात हे माहीत होतं.

  

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

गेल्या काही महिन्यांपासून मी राहते त्या परिसरात काही ठरावीक वेळेला मुलांचा ग्रूप एका ठिकाणी जमतो. प्रत्येक जण आपापल्या मोबाइलमध्ये काहीतरी करत असतो आणि थोडया वेळाने सगळे निघून जातात. आधी हे काय प्रकरण आहे हे कोणाच्या लक्षात यायचं नाही. पण हा गेम जसा लोकप्रिय झाला, त्या वेळी या मुलांच्या ग्रूपचं तिथे यायचं कारण कळलं. PUBGवर लेख लिहायचा, म्हणून विचार केला की या मुलांच्या कट्टयावर जाऊन त्यांच्याशी या गेमविषयी बोलू या. या ग्रूपची त्या कट्टयावर जमायची साधारण वेळ माहीत होती, त्यामुळे तेव्हा तिथे गेले आणि त्यांना सगळया शंका विचारल्या.

काही दिवसांपूर्वी माझा चुलत भाऊ घरी आला होता. तो अकरावीत शिकतो. त्याच्याकडून या गेमविषयी माहिती मिळेल म्हणून त्याला मी त्याच्या मोबाइलमध्ये गेम सुरू करायला सांगितला. त्याने मला गेमविषयी प्राथमिक सगळी माहिती दिली आणि मग तो गेम खेळायला लागला. त्याला जेव्हा मी म्हणाले की ''मला हवी होती ती माहिती मिळाली, आता गेम बंद केलास तरी चालेल.'' त्यावर त्याचं उत्तर होतं, ''छे, आता मी ते नाही करू शकत. हा गेम मला पूर्ण करावाच लागेल, नाहीतर माझी रँक मागे जाईल.'' असं म्हणून तो जवळजवळ पुढचा एक तास गेम खेळत बसला.

PUBG प्रकरण आहे काय?

मुळात हे PUBG प्रकरण आहे काय? तर PUBG म्हणजे Player'sUnknown Battleground असं या गेमचं पूर्ण नाव. 2017मध्ये लाँच झालेला हा गेम जपानच्या 'बॅटल रॉयल' या थ्रिलर चित्रपटावर आधारित आहे. PUBGमध्ये शंभर खेळाडू पॅराशूटद्वारे एका बेटावर उतरतात. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांसह ते एकमेकांशी युध्द करतात. जो खेळाडू या मारामारीत स्वत:चा जीव वाचवून तग धरतो, तो विजयी होतो. मुळात हा एक गेम 45 मिनिटांचा असतो. यामध्ये तुम्ही जिंकलात, तर तुम्हाला काही रिवॉर्ड्स मिळतात. या गेममध्ये जशी जशी रँक वाढत जाते, तसं वेगवेगळी शस्त्रं, बंदुका, कपडे असं मिळत जातं. हा गेम चार जणांचा ग्रूप करूनदेखील खेळता येतो. तसं केल्यास बाकीच्या लोकांना मारायला सोपं जातं. आणि म्हणून ही सगळी मंडळी एक वेळ ठरवून एकत्र येतात आणि ग्रूपमध्ये गेम खेळतात.

या गेममध्ये अशी काय आकर्षित करण्यासारखी गोष्ट आहे की मुलं त्याकडे इतकी ओढली जातायत? तर त्यांच्यापैकीच काही मुलांनी सांगितलं की ''गेममध्ये वापरली गेलेली प्रगत टेक्नॉलॉजी, गेमचे फीचर्स, आणि तुम्ही अगदी कुठेही - दुसऱ्या देशात असलेल्या व्यक्तीशीसुध्दा हा गेम खेळू शकता आणि त्यांच्याशी लाइव्ह संवाद साधू शकता, हे सगळं खूप भारी आहे. गेम खेळताना आम्ही स्वत: हातात बंदुका धरून युध्द करतोय असं वाटतं.''

एका बाजूला इतक्या आवडीने ही मुलं हा गेम खेळत असतानाच दुसरीकडे हा गेम खेळल्याने मानसिक संतुलन बिघडलेली मुलं, गेम खेळण्यासाठी ठरावीक मोबाइल न दिल्याने आत्महत्या करणारी मुलं या आणि अशा अनेक बातम्या ऐकायला येणं हे खूप भीषण आहे. याबरोबरच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणं, त्यांना आपली माहिती देणं हेही तितकंच धोकादायक आहे. आपण दिलेल्या माहितीचा कोण कसा उपयोग करेल हा विचार, भीती या मुलांच्या मनात येत असेल का?

या गेमविषयी सध्या येत असलेल्या बातम्यांवर सोशल मीडियावर आलेल्या काही कॉमेंट्स या त्याहून थक्क करणाऱ्या आहेत. कोणी म्हणतो, या गेमने एकाग्रता वाढते, स्वत:चा बचाव कसा करावा ते समजतं. तर एक कॉमेंट अशीही वाचण्यात आली की यामुळे भूशास्त्र, नकाशावाचन, समयसूचकता, तत्परता, युध्दभूमी कौशल्य या गोष्टी शिकायला मिळतात. अर्थात या शिकलेल्या गोष्टींचा रोजच्या जीवनात हे लोक किती आणि कसा उपयोग करतात हे माहीत नाही. नुकतंच एका अकरा वर्षांच्या मुलाने पंतप्रधानांना आवाहन केलं की PUBGमुळे मुलांमध्ये हिंसाचाराचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या गेमवर बंदी आणा. या बंदीच्या बातमीवरदेखील अनेक प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. PUBGप्रेमींच्या नकारात्मक प्रतिक्रिया वाचल्या. दारू, सिगारेटसुध्दा वाईट आहे, मग त्यावर बंदी का नाही? वगैरे.


 खेळाचं आकर्षण

मुळात हा गेम चांगला की वाईट हा मुद्दाच नाहीये, तर त्यावर किती वेळ खर्च करावा हा मुद्दा आहे. माझ्या माहितीत असेही काही जण आहेत जे हा गेम फक्त विरंगुळा म्हणून फावल्या वेळात खेळतात. त्याच्या लेव्हल, त्यातून मिळणारे रिवॉर्ड याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. परंतु दुर्दैवाने अशा मुलांची आणि तरुणांची संख्या कमी आहे. हा गेम खेळणारी बहुतांश मुलं आणि तरुण सर्वाधिक वेळ या गेमवर खर्च करतात, यात मुलींचंही प्रमाण उल्लेखनीय आहे. साधारण वय वर्ष अकरा ते पस्तीस या वयोगटातील मुलं, तरुण, तरुणी PUBG मोठया प्रमाणात खेळतात असे दिसून येते.

तसंच शाळा-कॉलेजच्या ग्रूपमध्ये या गेमवरून स्पर्धाही लागलेल्या दिसतात. कोणाची रँक जास्त, कोणाकडे रिवॉर्ड जास्त यावर मुलांचं त्यांच्या ग्रूपमध्ये स्टेटस ठरतं. ज्याची जास्त रँक, त्याचं स्टेटस जास्त. त्यामुळे ग्रूपमध्ये आपलं स्टेटस चांगलं असावं, आपला भाव वाढावा यासाठी मुलं तासनतास हा गेम खेळत राहतात. काही कॉलेजेसच्या फेस्टिवलमध्ये PUBGच्या टूर्नामेंट होतात. तसंच मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे या ठिकाणी मोठया प्रमाणावर या टूर्नामेंट होतात. यातून सिलेक्ट झालेले प्लेअर्स नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला जातात. यामध्ये जिंकलेल्या स्पर्धकांना काही लाखांची बक्षिसं मिळतात. ही अशी अल्पावधीत मिळणारी लोकप्रियता आणि मिळकत यामुळे तरुण PUBGकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

 PUBGच्या धोक्याबाबत शाळाही गंभीर

PUBG आणि तत्सम ऑनलाइन गेम्सच्या धोक्याकडे आता शाळाही गांभीर्याने पाहू लागल्या आहेत. पबजीसारख्या गेम्समुळे मुलांमध्ये हिंसक होण्याचं किंवा नैराश्याचं प्रमाण वाढत असल्याचं लक्षात आल्याने काही शाळांच्या शिक्षकांनी त्याविषयीचा अभ्यासच सुरू केला. या गेम्सविषयीची माहिती तर त्यांनी मिळवलीच, त्याशिवाय मुलांचा वैयक्तिक अभ्यास करून या गेम्समध्ये ती कितपत गुंतली आहेत, त्याचा त्यांच्या मनावर, वर्तनावर कशा प्रकारे परिणाम होत आहे याविषयीचा अंदाजही ते घेत आहेत. त्यासाठी काही शाळा समुपदेशकांचीही मदत घेत आहेत. पालकसभा घेऊन त्यात मुलांना असलेल्या PUBGच्या व्यसनाविषयी पालकांना सावध केलं जात आहे.

  

या आकर्षित करणाऱ्या गोष्टींकडे बघताना मुलं, तरुण-तरुणी यांनी हेही लक्षात घ्यायला हवं की मुळात या गेमच्या आभासी जगात रमून जाताना आपण आपला किती वेळ खर्च करतो आहोत याचं भान असणं आवश्यक आहे. या गेममुळे खरंच तुमची एकाग्रता वाढायला काही मदत होते आहे का? गेम खेळताना असलेली एकाग्रता इतकी असते की आजूबाजूला काय घडतंय याचं भान राहत नाही. परंतु इतर वेळी काम करताना, अभ्यास करताना जर याच गेमबद्दल विचार केला जात असेल, तर मग त्या गेममधली एकाग्रता तुम्हाला तुमच्या कामापासून, अभ्यासापासून मात्र विचलित करत आहे. आपला प्रचंड मोलाचा वेळ या गेमपायी खर्च होतो आहे, हे काही जणांना कळूनदेखील ते खेळणं थांबवू शकत नाहीत. आणि काही जणांना आपला वेळ खर्च होतो आहे ही जाणीवसुध्दा नसते. ऑॅफिसमधील कामाचा वेळ असो, अथवा लोकल ट्रेनसारखं गर्दीच ठिकाण असो... PUBG खेळणाऱ्यांना कसलंच भान नसतं. आपल्या  वागण्यामुळे एखाद्याला त्रास होऊ  शकतो, आपल्या कामावर परिणाम होऊ शकतो याची त्यांना अजिबातच चिंता असते असं वाटत नाही.

वेळेप्रमाणेच इतर अनेक गोष्टीदेखील या खेळणाऱ्यांमध्ये आढळून येतात. या गेमसाठी इंटरनेटची आवश्यकता असते. त्यामुळे इंटरनेट कनेक्शनमध्ये अडथळा आला किंवा गेम सुरू असताना कोणाचा फोन आला, तर चिडचिड होते. आलेला फोन कितीही महत्त्वाचा असला, तरी ही मुलं तो कट करतात. गेम खेळताना आईवडिलांनी अडवलं, तर त्यांच्यावर राग काढला जातो. घरी आईवडिलांशी, मित्रमैत्रिणींशी संवादाचं प्रमाणदेखील यामुळे खूप कमी होताना दिसतंय.

आरोग्यावर होणारा परिणाम

एखाद्या सवयीचं व्यसनामध्ये रूपांतर व्हायला फार वेळ लागत नाही. व्यसन म्हणजे काय? तर एखादी अशी सवय, जिच्यामुळे मोठया प्रमाणावर शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक नुकसान होत असूनही त्या सवयीत बदल करता न येणं. त्यासाठी मग PUBG असो किंवा आणखी कोणता गेम. गेम खेळण्यासाठी तासनतास एखाद्या ठिकाणी बसून राहण्यामुळे आळशीपणा वाढतो, शरीराची हालचाल न झाल्याने स्थूलता वाढू शकते. हे ग्रूप गेम्स खेळण्यासाठी बऱ्याचदा रात्री सगळे एकत्र ऑॅनलाइन येतात. त्यामुळे त्याचा साहजिकच झोपेवर परिणाम होतो. झोप अपूर्ण झाल्याने दुसऱ्या दिवशीच्या दिनक्रमावर त्याचा परिणाम होतो. कामामध्ये, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. चिडचिड होते, दिवसभर मरगळ येते, उत्साह वाटत नाही. एकदा गेम खेळायला घेतला की आणखी एक लेव्हल खेळू, असं करत कितीतरी तास त्यामध्ये निघून जातात. सतत स्क्रीनवर बघितल्याने डोळयांवर ताण येतो. डोकेदुखी होऊ शकते. या गेममध्ये सतत चित्र हलत असतात. यामुळे चंचलता वाढू शकते. बेचैनी वाढते. परिणामी आपल्या मनावर, विचारांवर आपला ताबा राहत नाही. सार्वजनिक ठिकाणी आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टींचं भान राहत नाही. शारीरिक व्याधी - उदा., मानदुखी, कंबरदुखी इ. जडण्याची शक्यता निर्माण होते. व्यसनाधीन झाल्याने, एकच गोष्ट सतत केल्याने तसंच मोबाइलमधील रेडिओ ऍक्टिव्ह किरणांचाही मेंदूवर नकळत परिणाम होत असतो.

 PUBGसाठी सोडलं गरोदर पत्नीला

PUBGच्या दुष्परिणामांची अनेक उदाहरणं पाहायला, ऐकायला मिळतात. नुकतीच याबाबतची एक धक्कादायक बातमी प्रसिध्द झाली, ती म्हणजे मलेशियातील एका माणसाने PUBGसाठी आपल्या गरोदर पत्नीला आणि कुटुंबाला सोडलं. मलेशियातील ही घटना असून PUBGचे सर्व टप्पे पार करताना कोणीही अडथळा आणू नये यासाठी या तरुणाने महिन्याभरापूर्वी कोणालाही न सांगता घर सोडलं आणि परत आलाच नाही. त्याची पत्नी चार महिन्यांची गरोदर आहे. तिने तिच्या फेसबुक वॉलवर मलाया भाषेत याबाबत पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या आधारे 'वर्ल्ड ऑफ बझ्झ' या वेबपोर्टलने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं होतं.

  खरंच, PUBG हे आजच्या समाजासमोर उभं टाकलेलं एक संकटच आहे, ज्यामध्ये आख्खी पिढी बरबाद करण्याची ताकद आहे.

पण PUBG हे फक्त एक माध्यम आहे. भविष्यातही असे अनेक गेम येतील आणि जातील. त्यामुळे फक्त या गेमवर बंदी घालणं हा उपाय ठरू शकत नाही. कारण तो फक्त तात्पुरता इलाज असेल. या सगळयामध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे 'स्व'नियंत्रण. पालकांनी हे स्वनियंत्रण मुलांना शिकवणं आवश्यक आहे आणि त्याआधी ते स्वत:मध्ये बिंबवणंही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. आपल्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर हा माहिती मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी, थोडा वेळ विरंगुळा यासाठी योग्य पध्दतीने करायला हवा. तसं न केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात, स्वनियंत्रण का महत्त्वाचं आहे, हे मुलांना पालकांनी समजावून सांगायला हवं. आपण या गेमच्या आहारी जातोय असं तरुणांच्या लक्षात आलं असेल, तर त्यावर योग्य त्या उपाययोजना करायला हव्या. पालकांनी एकदम टोकाची भूमिका - उदा., मोबाइलवर बंदी करणं असं न करता मुलांशी योग्य पध्दतीने संवाद साधायला हवा. या गेमच्या किंवा इंटरनेटच्या खूपच आहारी गेलेल्यांनी गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.

तरुणांमध्ये सुदृढ मन, निर्णयक्षमता व व्यसनापासून स्वत:चं रक्षण करण्याची विवेकबुध्दी जागृत होणं आवश्यक आहे. अन्यथा या व्यसनाधीनतेमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम फारच भयानक असतील, यात शंका नाही.

(लेखिका समुपदेशक आहेत.)

[email protected]