आशिया खंडात सहकारी तत्त्वावर चालणारी जी काही हातांच्या बोटांवर मोजता येण्याइतकी रुग्णालये आहेत, त्यांपैकी एक म्हणजे 'शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड'. नागरिकांच्या सहभागातून उभे राहिलेले हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे. सहकाराच्या विविध उपयुक्ततांसह 50 वर्षांहून अधिक काळ शुश्रुषा आरोग्य सेवा करत आहे.
आज जिथे वैद्यकीय क्षेत्राला व्यावहारिक आणि व्यावसायिक स्वरूप आले आहे, तिथे रुग्णसेवा प्राधान्यक्रमावर ठेवून केवळ रुग्णांच्या हिताचाच विचार करणारी सेवाभावी रुग्णालये, आरोग्य केंद्रे दुर्मीळ झाली आहेत. या दुर्मीळांच्या यादीत दादरच्या शुश्रुषा रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने येते. मुंबई आणि उपनगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला हे रुग्णालय माहीत नसण्याची शक्यता कमीच. शिवाजी पार्कनजीक रानडे रोडवरील हे रुग्णालय तेथील चांगल्या दर्जाच्या उपचारपध्दतीसाठी आणि लोकोपयोगी रुग्णसेवेसाठी सर्वश्रुत आहे. या रुग्णालयाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ते पूर्णपणे सहकारी तत्त्वावर चालते. आरोग्य सेवेत सहकाराचे फार कमी प्रयोग झाले. आशिया खंडात सहकारी तत्त्वावर चालणारी जी काही हातांच्या बोटांवर मोजता येण्याइतकी रुग्णालये आहेत, त्यांपैकी एक म्हणजे 'शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड'. विशेष म्हणजे 50 वर्षांहून अधिक काळ शुश्रुषाची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.
रुग्णानां व्याधिनाशाय । क्षिप्रंचारोग्य हेतवे ॥
शुश्रुषा सुश्रुता भूयात । स्वया निष्काम सेवया ॥
हा श्लोक हेच शुश्रुषा रुग्णालयाचे ब्रीद आहे. याचा अर्थ आहे, सर्व रुग्णांना सर्व प्रकारच्या व्याधीतून मुक्त करण्यासाठी सुश्रुताने सांगितल्याप्रमाणे शुश्रुषा करणारे रुग्णालय.
डॉ. रणदिवे आणि शुश्रुषाची निर्मिती
सत्तरीचे दशक हे महाराष्ट्रासाठी सहकार क्षेत्राच्या भरभराटीचे दशक होते. शासकीय योजनांमधून सहकाराला प्रोत्साहन मिळत होते. राज्यात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने, बँका, पतपेढया मोठया प्रमाणात उभारल्या गेल्या. काही शिक्षण संस्थांची स्थापनाही सहकाराच्या माध्यमातून करण्यात आली. याच काळात लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य संस्था ही शुश्रुषाची संकल्पना रुजली, वाढली आणि नंतर दीर्घकाळ फोफावत राहिली. समाजवादी नेते दिवंगत डॉ. वसंत श्रीपाद रणदिवे हे या संकल्पनेचे जनक.
डॉ. रणदिवे हे फॅमिली फिजिशियन होते. दादरमधील लोक त्यांच्याकडे तपासणीसाठी यायचे. उपचार घेण्यासाठी रुग्णांना केईएममध्ये जावे लागे. मात्र केईएममध्ये गर्दी असल्यामुळे त्यात वेळ जायचा. नोकरीधंद्याच्या लोकांची त्यात गैरसोय व्हायची. आरोग्य समस्येविषयीचे रणदिवेंचे विचार स्पष्ट होते. आरोग्याच्या प्रश्नांबाबत लोक परावलंबी असल्याची जाणीव त्यांना होत असे. या जाणिवेतूनच डॉ. रणदिवेंनी 1966 साली आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत या संस्थेची स्थापना केली. त्यापूर्वीच 1964मध्ये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, 1960अंतर्गत आणि महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 1949अंतर्गत संस्थेची नोंदणी करण्यात आली होती.
संस्थेच्या स्थापनेत डॉ. रणदिवेंसह त्याच्या पत्नी विद्याताई, डॉ. बोलेरिया नावाचे सर्जन, डॉ. वैद्य, रावेरचे शिक्षणतज्ज्ञ मधुकरराव चौधरी आदी मंडळी आघाडीवर होती. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते संस्थेच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. त्या वेळी फक्त 30 बेडचे हॉस्पिटल होते. 20 मे 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्धाटन झाले. त्यानंतर अल्पावधीतच रणदिवेंचे निधन झाले. ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने - विद्याताईंनी आणि अन्य सहकाऱ्यांनी ही संस्था चालवली.
1972पासून पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड यांनी रुग्णालयाची जबाबदारी घेतली आणि संस्थेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लि.चे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. ऑर्थोपेडिक सर्जन. 50 वर्षांहून अधिक काळ ते वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांचे स्वत:चे नर्सिंग होम होते. ब्रीच कॅण्डी रुग्णालयातही त्यांनी सेवा दिली होती. दीर्घकाळ ते सायनच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल ऍंड मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक होते.
आरोग्य सेवेत सहकारातून स्वावलंबन
डॉ. लाड सांगतात, ''सायन रुग्णालय हे सरकारी रुग्णालय. तिथे आम्ही रुग्णांना पूर्णपणे मोफत सेवा देण्याचे आश्वासन देत असू. पण ते करत असताना माझ्या लक्षात आले की आपण जे मोफत उपचार करतो, ते उपचार माफक दरात देत असलो, तरी योग्य आणि वेळेवर देत नाही. याचा अर्थ आपण लोकांना पूर्ण सत्य सांगत नाही. लोकांमध्ये फुकट मिळवण्याची भावना वाढीस लागते. त्या वेळी मी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. अनेक जणांचे म्हणणे होते की आम्हाला मोफत उपचार नको आहेत. तुम्ही योग्य आणि वेळेवर उपचार करणार असाल, तर मी खर्च करायला तयार आहे. एका अर्थाने आपण लोकांना सर्व गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करत नाही का?
जर एखाद्या व्यक्तीच्या छातीत अचानक दुखू लागले, तर त्याच्यासमोर तीन प्रश्न असतील. पहिला - कुठे जाऊ? दुसरा - माझ्यावर योग्य आणि माफक दरात उपचार होतील का? आणि उत्तरदायित्व कोणाचे असेल?
आज सरकारी रुग्णालयात तुम्ही कमी खर्चात उपचार घेण्यासाठी जाऊ शकता, पण तिथली उपचारांची उपलब्धता सांगता येत नाही. आणि उत्तरदायित्व नाही. मोठया रुग्णालयांमध्ये उपलब्धता आहे, पण खर्च खूप आणि उत्तरदायित्व नाही. जिथे तुम्हाला माफक दरात आरोग्य सेवा मिळेल आणि अन्याय झाला तर उत्तरदायित्व असेल, अशी ही सहकारी संस्था आहे. आरोग्य क्षेत्रात सहकारातून स्वावलंबन हीच शुश्रुषाची संकल्पना आहे.''
सुपरस्पेशालिटी रुग्णालय
शुश्रुषा हे सभासदांचे, म्हणजेच लोकांचे रुग्णालय आहे. लोकांच्या सहभागाने हे 129 खाटांचे सर्व सोयीसुविधांनी, आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असे हे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहिले. बाह्य आणि आंतररुग्ण विभागाबरोबरच शल्यविभाग, प्रसूतिगृह, बालविभाग, नवजात बालक दक्षता विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू) यांचाही त्यात समावेश आहे. येथील मूत्रपिंड शुध्दीकरण विभाग (आर्टिफिशिअल किडनी डायलेसिस डिपार्टमेंट) हे मूत्रपिंडविकारग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरले आहे. शुश्रुषाच्या शस्त्रक्रियागृहात न्यूरोसर्जरी, कॅन्सर, मूत्रपिंड प्रत्यारोपण, सांधेरोपण यांसारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने आणि कमीत कमी खर्चात केल्या जातात. येथील नेत्रविकार विभागात डोळयांवरील विविध शस्त्रक्रियाही केल्या जातात. शुश्रुषा आणि न्यूयॉर्कमधील 'स्माईल ट्रेन' ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 2007पासून गरीब बालकांवर दुभंगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचे कार्य केले जात आहे. या उपक्रमाद्वारे 600हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
2002पासून रुग्णालयाकडे स्वत:ची रक्तपेढी असून दिवसाचे 24 तास ती रुग्णांसाठी उपलब्ध असते. येथील पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या माफक दरात केल्या जातात. एका सामाजिक ट्रस्टच्या देणगीतून मल्टीस्लाइस सीटी स्कॅन मशीन घेण्यात आले असून शुश्रुषामध्ये 30 टक्के सवलतीच्या दरात ही महागडी तपासणी उपलब्ध करून दिली जाते. सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड कलर डॉपलर कार्डिऍक सेंटर, डिजिटल एक्स-रे आदी सुविधाही येथे आहेत.
शुश्रुषामध्ये कर्करोग, हृदयरोग, संधिवात, मधुमेह, श्वसनाचे आजार अशा कोणत्याही प्रकारच्या दुर्धर आजारांवर उपचार होतात. प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रुग्णालयाने लहान मुलांकरिता दर गुरुवारी 'श्वास क्लिनिक' सुरू केले. तसेच 'पल्मनरी फंक्शन टेस्टिंग लॅबोरॅटरी' आणि 'कार्डिओ फंक्शन टेस्टिंग लॅबोरेटरी' सुरू केली.
वेगवेगळया व्याधींवरील तज्ज्ञ मानसेवी डॉक्टर या रुग्णालयात सेवा देतात. खूप मोठा कर्मचारिवृंद दिवस-रात्र रुग्णालयातील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. नामांकित वैद्यकीय सल्लागार या रुग्णालयाशी कायम जोडलेले असून त्यांच्या मदतीने येथील तंत्रज्ञांना, परिचारिकांना व अन्य कुशल कामागारांना सतत प्रशिक्षण दिले जाते. या सगळयासाठी होणारा खर्च सभासदांच्या भागभांडवलातूनच होत असतो. तसेच संचालक आणि अधिकारिवर्ग रुग्णालयाच्या सर्व उपक्रमांवर देखरेख ठेवतात व सर्वांच्या सहभागाने रुग्णालयातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
भागधारकांना मिळणारे फायदे
आज या रुग्णालयाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला 100 रुपयांपासून भाग सुरू झाला, नंतर 500 रुपये, मग 1000 रुपये आणि आता 10,000 रुपये असा कालानुरूप वाढत गेला. अर्थात या शहरातील लोकांची क्रयशक्तीही त्याच प्रमाणात वाढली आहे. आज संस्थेचे 23 हजार भागधारक आहेत. त्या बदल्यात त्यांना काय मिळते? अन्य सहकारी संस्थांमध्ये जसा भागधारकांना लाभांश (डिव्हिडंट) देतात, तसा तो येथे मिळत नाही. त्याबदल्यात या सभासदांना रुग्णप्रवेशात, उपचारात प्राधान्य मिळते. पती, पत्नी आणि त्यांची 21 वर्षाखालील दोन मुले यांना माफक दरात आरोग्य सेवा मिळते. कोणत्याही वैद्यकीय तपासणीसाठी सवलत मिळते. 2 वर्षांहून अधिक काळ सभासद असलेल्या 65 वर्षांवरील नागरिकांना आंतररुग्ण विभागात 10 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळते, तर 70 वर्षांवरील सभासदांसाठी वर्षातून एकदा मोफत वैद्यकीय तपासणीची सोय मिळते. एकदाच सभासद झाले की आयुष्यभरासाठी या सर्व सवलती मिळतात. त्यामुळे हा खर्च नसून भविष्याची बेगमीच आहे. याच धर्तीवर विक्रोळी येथेही 'शुश्रुषा'चे मोठे सुसज्ज रुग्णालय साकार झाले आहे.
भागधारकांबरोबरच राज्यातील विविध भागांतून अनेक रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात. गरीब रुग्णांनाही सवलतीच्या दरात आरोग्यसेवा दिली जाते. हे सामाजिक कार्य भागधारकांच्याच योगदानातून होत असते. त्याचे मानसिक समाधान, आनंद भागधारकांना निश्चितच मिळत असतो. त्याशिवाय स्वत:साठी आणि कुटुंबासाठी उपचारांच्या, तपासण्यांच्या खर्चाचा भार भागधारकाच्या वाटेला कमी येतो. भागधारक होण्याचे फायदे सांगताना डॉ. लाड यांनी दोन उदाहरणे सांगितली. ''एक वृध्द दांपत्य होतं. मुलं देशाबाहेर होती. नवऱ्याला हार्टऍटॅक आला म्हणून ऍडमिट केलं. ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी करावी लागली. बरे झाल्यानंतर मला येऊन भेटले. त्याचं बील 1 लाख 30 हजार रुपये झालं होतं. त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं. सामाजिक संस्था असल्याने मी त्यांना 10 टक्के कमी करून दिले. त्यांनी आभार मानले. त्यांना विचारलं, ''तुम्ही मेंबर झालात का?'' ते म्हणाले, ''नाही हो. आमच्याकडे कधी कुणी आजारीच पडत नव्हतं.'' दुसरा अनुभव म्हणजे याच परिसरातील अन्य एक वृध्द गृहस्थ पडले. फॅक्चर झालं म्हणून शुश्रुषामध्ये ऍडमिट केलं. त्यांचं ऑपरेशन करावं लागलं. 2 लाख 30 हजार रुपये बील झालं. त्यांनाही मी विचारलं, ''तुम्ही मेंबर आहात का?'' ते म्हणाले, ''आठवत नाही. पण रणदिवेंनी मेंबर केलं होतं बहुधा.'' मी रुग्णालयात त्यांच्या मेंबरशिपचे तपशील शोधले आणि सर्टिफिकेट सापडलं. सभासद म्हणून त्यांचा हक्क असल्याने त्यांचं बील 25 टक्क्यांनी कमी केलं. याउलट आधीच्या उदाहरणातील रुग्ण सभासद नसल्याने त्यांना सवलतीसाठी आर्जव करावे लागले. सहकारात सभासदांना त्यांचा हक्क मिळतो.''
सभासदांना जसा सवलतीच्या दरात उपचार घेण्याचा हक्क मिळतो, त्याप्रमाणेच संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीत सहभागी होण्याचे आणि त्यात सूचना करण्याचे अधिकारही मिळतात. सहकारी संस्थांच्या रचनांप्रमाणे या रुग्णालयातही संचालक मंडळ आहे. त्यात 15 संचालक आहेत. 5 प्रकारांत त्यांची वर्गवारी केली आहे. अ वर्गात सगळे डॉक्टर्स आहेत, ब वर्गात फक्त नॉन डॉक्टर्स आहेत, क वर्गात डॉक्टर आणि नॉन डॉक्टर्स दोन्ही आहेत, ड वर्गात फक्त स्त्रिया आहेत, इ वर्गात अनुसूचित जाती, जमाती अशी रचना आहे. या संचालक मंडळावर सहकार विभागाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर पालिकेचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे शुश्रुषामध्ये कोणालाही मनमानी करण्याची संधी नाही. येथे फक्त संस्था मोठी आहे.
सहकारी संस्थांनी परस्परांना मदत करावी असा सहकाराचा नियम आहे. त्यानुसार, काही सहकारी बँका, सहकारी संस्था यांच्याशी करार करण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. या संस्था शुश्रुषामध्ये काही गुंतवणूक करतील आणि त्याबदल्यात या संस्थांचे सभासद, कर्मचारी यांना माफक दरात उपचार आणि तपासण्या उपलब्ध होतील.
आरोग्य क्षेत्रात लोकांना स्वावलंबी बनवण्याबरोबरच त्याविषयीचे शिक्षण देऊन त्यांना आरोग्य साक्षर केले पाहिजे, हे शुश्रुषाचे आणखी एक उद्दिष्ट आहे. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून काही आरोग्य शिबिरे, तपासण्या आयोजित केल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उपक्रमही आयोजित केले जातात. यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली जाते.
आरोग्य क्षेत्रात रुग्ण हाच सर्वक्षेष्ठ असतो. मात्र आज या क्षेत्रातून ही जाणीवच हरपत चालली आहे. आज रुग्णाकडे केवळ लुबाडण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच त्याला स्वावलंबी बनवण्याची गरज शुश्रुषा रुग्णालयाने ओळखली. केवळ सहकारामुळे हजारो सर्वसामान्य नागरिक कोटयवधी रुपये किंमत असलेले रुग्णालय उभारू शकतात. डॉ. लाड सांगतात, ''2008 साली ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी चांगल्या आरोग्य व्यवस्थेसाठी तीन समित्या स्थापन केल्या. 'ओबामाज् हेल्थ केअर' सुरू केल्या. ओबामांच्या मते, An ideal health promoter system will be one which is run by NGO by citizen's participation and run on co-operative basis. शुश्रुषा गेली 50 वषर्े याच पध्दतीने काम करत आहे.''
शुश्रुषाच्या धर्तीवर असे सहकारी तत्त्वावरील आरोग्य सेवेचे प्रयोग राज्यात आणि देशातही जास्तीत जास्त ठिकाणी चालले पाहिजेत. अर्थात त्यासाठी जनमानस जागृत करण्यापासून, शिक्षित करण्यापासून सुरुवात करावी लागेल. शुश्रुषाने त्यासाठी सुरुवात केली आहेच, सहकाराची कास धरणाऱ्या आणि सहकारातून स्वावलंबित्व घडवणाऱ्या अन्य संस्थांनाही त्यात आपले योगदान देता येईल. तसेच सरकारनेही अशा प्रयोगांना प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून लोकसहभागातून सुश्रुताचा मार्ग अवलंबणाऱ्या 'शुश्रुषा' शहरातच नव्हे, तर खेडयापाडयात निर्माण होऊन आरोग्य सेवा देतील.
संपर्क
शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड
022-24449161/62/63/64
www.shushrushahospital.org