एकच प्रश्न - ''मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का?''

विवेक मराठी    28-Mar-2019   
Total Views |

मोदी हे मोदी आहेत आणि त्यांच्याशी तुलना करता येईल असा राजनेता विरोधी पक्षात कुणी नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांनी 'मी भारतीय आहे' याचा अभिमान वाटेल अशा असंख्य गोष्टी केल्या. 'मी हिंदू आहे' याचाही अभिमान वाटेल अशाही अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. देशाची आर्थिक गाडी त्यांनी गतिमान केली आहे. विकासाचा दर 8%वर आणलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे मनोमन वाटते....


लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर मला जे जे लोक भेटले, त्यांनी मला एकच प्रश्न केला, ''मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का?'' प्रश्न विचारणाऱ्यांत काही डॉक्टर होते, काही व्यावसायिक होते, काही गृहिणी होत्या आणि काही नातेवाईक होते. मुंबईत अनेक वेळेला उबर टॅक्सीने प्रवास करावा लागतो. आश्चर्य असे की, अनेक वेळा गाडीचालकच विषय सुरू करतो, ''साहब, मोदी फिरसे पीएम बनेंगे ना?''

अनेक प्रश्न असे असतात की, त्या प्रश्नांतच प्रश्न विचारणारा उत्तर देत असतो. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? या प्रश्नाचे उत्तर, प्रश्नकर्ताच देतो की मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्याच्या मनात असलेली तीव्र भावना तो प्रश्नाच्या रूपाने प्रकट करतो. त्याला सकारात्मक उत्तर हवे असते आणि ते उत्तर त्याच्या मनातच असते.

मोदी पंतप्रधान होतील का? असा प्रश्न, प्रश्नकर्त्याच्या मनात का निर्माण झाला? त्याचे एक कारण असे की 2014 साली त्याच्या मनात एकच विषय होता, तो म्हणजे मोदीच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. 2013/2014ला मी जिथे जिथे प्रवास केला - मग ते कोलकाता असो, बंगळुरू असो की जयपूर असो, मला अनेकांनी एकच प्रश्न विचारला. ''मोदींना आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार का घोषित करीत नाही?'' प्रश्न विचारणारे एकाच विचार परिवारातील होते. पण ते समाजात वावरणारे होते. समाजाची नाडी त्यांना समजत होती. समाजाची तेव्हा मागणी होती की, मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत.


आताही प्रश्न विचारणारे सगळेच विचार परिवारातील नाहीत, समाजातील विविध क्षेत्रांतील आहेत, समाजाशी जिवंत संबंध ठेवणारे आहेत. त्यांचा प्रश्न हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न नसतो, तो प्रश्न त्यांच्या समविचारी लोकांचा प्रश्न असतो. या सर्वांना मनापासून वाटते की, मोदींविरुध्द जी आघाडी उभारली आहे, तिला यश मिळता कामा नये आणि मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजेत.

लोकांच्या मनात, 'मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का?' हा प्रश्न निर्माण होण्याचे कारणही तसेच आहे. नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी सत्ता ग्रहण केली, त्या दिवसापासून मोदींना बदनाम करण्याची विषयसूची तयार झाली. ही विषयसूची चालविणाऱ्यांनी एकामागोमाग एक विषय पुढे अाणले. मोदी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणारे आहेत हा विषय लावून धरण्यात आला आणि मग पुरस्कारवापसीला उधाण आले. त्यानंतर मोदी सरकार अल्पसंख्याकांविरुध्द आहे, हा आरोप झाला. एक आखलाक मेला, त्याचा विषय सतत चालविण्यात आला. हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुलाने आत्महत्या केली, तो दलित नसतानादेखील त्याला दलित ठरविण्यात आले आणि त्याच्या आत्महत्येचे खापर मोदी सरकारवर फोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच राहिल्या. त्याला मोदींना जबाबदार धरण्यात येऊ लागले.

''मोदींनी नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत, त्यामुळे मी बेकार आहे'' असे हार्दिक पटेल म्हणू लागला. राज ठाकरे यांनी मोदींविरुध्द आघाडी उघडली. ''निवडणुकांचा संघर्ष मोदी विरुध्द देश असा आहे'' असे त्यांनी मुंबईत जाहीर सभेत भाषण करताना ठोकून दिले. राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर आहे' ही घोषणा दिली. अनेक वेळा मोदींच्या 56 इंच छातीचा उल्लेख केला. मोदी डरपोक आहेत, माझ्याशी जाहीर वादविवाद करायला ते घाबरतात, असे त्यांनी ठोकून दिले. शरद पवार, लालूप्रसाद यादव, मायावती, ममता बॅनर्जी असे सर्व जण काय काय बोलतात, हे जर मी देत बसलो तर लेखाची लांबी अकारण वाढेल.

 

वर्तमानपत्रांची भूमिका असते सत्तेवर असलेल्या नेत्यांबद्दल कुणी काहीही वेडेवाकडे बोलला की त्याला प्रसिध्दी द्यायची. चांगला कुणी बोलला तर ती बातमी होत नाही, वाईट बोलला तर ती बातमी होते आणि बातमीच्या शोधात असलेल्या माध्यमांना खुळचट विधानदेखील मसालेदार बातमीचे विधान वाटते. सामान्यपणे विचार केला तर राज ठाकरे जे बोलतात, त्याचे मूल्य कचऱ्याइतकेदेखील नाही. तीच गोष्ट राहुल गांधींविषयी आहे. एकाला ठाकरे नावाची परंपरा लाभली आहे आणि दुसऱ्याला गांधी नावाची परंपरा लाभली आहे. जीभ सैल सोडण्यात दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात.

याचे वाईट वाटण्याचे काही कारण नाही. आपण लोकशाहीत जगतो आणि लोकशाहीविषयी म्हटले जाते, ''लोकशाहीत आरडाओरड ठरलेली आहे आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप तिच्या पाचवीला पूजलेले आहेत. त्यामुळे मोदींविषयी वाईट शब्द वापरले जातात, त्याचे दुःख होण्याचे कारण नाही.'' जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन हे आजच्या अमेरिकेचे दोन महापुरुष आहेत. वॉशिंग्टन यांनी अमेरिका जन्मास घातली, लिंकनने ती एक ठेवली आणि महासत्ता बनण्याचा मार्ग प्रशस्त केला. वॉशिंग्टनविषयी कुणी फारसे वाईट बोलत नाही, पण लिंकन हयात असताना त्याच्याविषयी जे बोलले आणि लिहिले गेले, त्या तुलनेत मोदींविरुध्द जे बोलले आणि लिहिले जाते, ते फारच सौम्य आहे.

अब्राहम लिंकन 1861 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लिंकनविषयी वापरलेले शब्द असे आहेत - तो जंगली आहे, अफ्रिकेतील गोरिला आहे, उंटासारखा आहे, महामूर्ख आहे, ओरिजनल गोरिला व्हाइट हाउसमध्ये बसलेला असताना त्याला बघायला लोक अफ्रिकेत का जातात, तो अप्रमाणिक आहे, त्याच्यात कसलीही क्षमता नाही, तो अत्यंत जड आहे. ख्यातनाम लेखिका सुसान म्हणाली, ''तो जर दुसऱ्यांदा निवडून आला, तर मी अमेरिका सोडून फिजी बेटावर जाईन.'' असा लिंकन कोणत्या योग्यतेचा होता? या लिंकनची जेव्हा हत्या झाली, तेव्हा त्याच्या पार्थिवाकडे पाहून त्याचा सहकारी स्टॅन्टन म्हणाला, ''जगाने आजवर न अनुभवलेला एक महान शासक येथे चिरनिद्रा घेत आहे.'' लिंकन यांचे गेटिसबर्गचे भाषण अमेरिकेतील लहान मुलांचे तोंडपाठ असते. अडीचशे शब्दांच्या या भाषणात अमेरिकन राष्ट्र आणि त्याचा आत्मा लिंकन यांनी ज्या शब्दात पकडला आहे, त्याची तुलना करता येणार नाही.

मी मोदी यांना लिंकन यांच्या बरोबरीने बसवू इच्छित नाही, परंतु मोदी हे मोदी आहेत आणि त्यांच्याशी तुलना करता येईल असा राजनेता विरोधी पक्षात कुणी नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांनी 'मी भारतीय आहे' याचा अभिमान वाटेल अशा असंख्य गोष्टी केल्या. 'मी हिंदू आहे' याचाही अभिमान वाटेल अशाही अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. देशाची आर्थिक गाडी त्यांनी गतिमान केली आहे. विकासाचा दर 8%वर आणलेला आहे.

राजकारणाची सोन्याची भाकरी तोंडात ठेवलेल्या हार्दिक पटेलला नोकरी नाही; पण ज्यांना नोकरीची गरज आहे, अशा कोटयवधी तरुणांना रोजगार मिळालेला आहे. मुंबईत रोजगार नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. प्रत्येक मोठया शहराची हीच स्थिती आहे. कामाला माणसे मिळत नाहीत, ही तक्रार असते. पाच वर्षे फार नाहीत, आणखी किमान पाच वर्षे मिळायला पाहिजेत.

'भारत आपल्या खेडयातून आणि झोपडीतून उभा राहील' असे विवेकानंद सांगून गेले. आपल्या सर्व शक्तीनिशी हिंदू पुन्हा जागा होईल, असे महात्मा गांधी म्हणून गेले. भारताचे उत्थान कुणी रोखू शकणार नाही, असे योगी अरविंदांनी सांगितले. आपण सामाजिकदृष्टया जर एक झालो तर आपण जगात एक प्रबळ देश बनू, हे आंबेडकरांच्या विचारांचे सार आहे. भारतमाता पुन्हा तिच्या गतवैभवाने तेजस्वी होईल आणि विश्वगुरूच्या पदावर जाईल, असे श्रीगुरुजी सांगत असत.

या सर्वांची स्वप्ने साकार करण्याचे सामर्थ्य नरेंद्र मोदी यांच्यात आहे. लेखाच्या सुरुवातीला जो प्रश्न दिला आहे, त्या सर्व प्रश्नकर्त्यांच्या मनात या सर्व गोष्टी असतातच. या सर्वांना भारत सशक्त, समृध्द आणि शांततामय सहजीवन जगणारा झालेला पाहायचा आहे. ते त्यांचे स्वप्न आहे. मोदी त्याचे प्रतिनिधित्व करतात. हे स्वप्न, डॉ. अब्दुल कलाम म्हणतात त्याप्रमाणे जागे राहून बघायचे आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करायची आहे. स्वतः मतदान तर करायचेच, तसेच आपल्या परिवारातील सगळयांना आणि आपल्या प्रभावक्षेत्रातील सर्वांना मतदान करण्यास प्रवृत्त करायचे. प्रश्न जरी एक असला, तरी त्याचे उत्तर मात्र आपल्यासारख्या करोडो लोकांच्या हातात आहे.

रमेश पतंगे

 vivekedit@gmail.com