भीती... कशाकशाची?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Mar-2019   

एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल असलेली भीती किंवा चिंता मुलांच्या मनातून कायमची काढून कशी टाकायची? तर मुळात आधी ही भीती, चिंता त्यांच्या मनात कशी आणि कुठून निर्माण झाली आहे, हे शोधून काढणं गरजेचं आहे. काही वेळा काही गोष्टी बघून, ऐकून किंवा अनुभवून एखादी भीती मनात बसलेली असते. त्यामुळे तिचं मूळ शोधणं आवश्यक आहे. त्यानंतर मुलांशी त्याविषयी शांतपणे बोलणं गरजेचं आहे.

 भीती, चिंता, टेन्शन हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, वापरतो, वाचतो. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती, चिंता, टेन्शन असतंच. हे टेन्शन किंवा भीती वेगवेगळया कारणांमुळे निर्माण होत असते. कुमारवयीन मुला-मुलींच्या मन:स्थितीत सतत होत असणाऱ्या बदलांमुळे त्या अनुषंगाने त्यांच्या मनातदेखील विविध कारणांमुळे ताणतणाव, टेन्शन आणि भीती निर्माण होत असते.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....


https://www.facebook.com/VivekSaptahik/

 भीती वाटणं किंवा टेन्शन येणं ही एक नैसर्गिक भावना आहे आणि आपल्या रोजच्या आयुष्याचा एक घटकदेखील. बऱ्याचदा मुलं-मुली मला अमुक एका गोष्टीचं टेन्शन आलंय, भीती वाटते आहे असं म्हणताना दिसतात. आणि त्यांची ती भीती किंवा टेन्शन त्यांच्या वागण्यातून आपल्याला दिसत असतं. कुमारवयीन मुलामुलींना या वयात साधारण अभ्यास, परीक्षा, मार्क यामुळे आलेलं टेन्शन हे अगदी कॉमन आहे. परंतु त्याबरोबरच घरातील वातावरण, ताण, घरात होत असणारे वाद, मित्रमैत्रिणींबरोबर झालेली भांडणं या आणि अशा विविध गोष्टींचंसुध्दा मुलांना टेन्शन येऊ शकतं.

मुळात टेन्शन येतं म्हणजे नक्की काय होतं? तर ते आपल्याला वेगवेगळया गोष्टींमधून जाणवतं. उदा. डोकं दुखणं, डोकं सुन्न होणं, झोप न लागणं, भूक न लागणं, काही करावंसं न वाटणं, छातीत धडधड होणं, हातपाय थरथरणं, चिडचिड होणं, घाम येणं इत्यादी. टेन्शन आल्यानंतरचे हे परिणाम काही शारीरिक स्वरूपात दिसतात, तर काही मानसिक. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतिशय छान शब्दात टेन्शनबद्दल सांगितलंय. ते म्हणतात की ''टेन्शन म्हणजे जे मनात असतं, शरीरात दिसतं, नात्यातून बोलतं आणि कामातून कळतं.''

आता हे टेन्शन किंवा भीती मनात कशी निर्माण होते? तर विचारांमुळे निर्माण होते. एखादा प्रसंग घडल्यानंतर डोक्यात एखादा विचार येतो आणि मग त्या मागोमाग विचारांचं चक्र सुरू होतं. डोक्यात येणाऱ्या या सततच्या विचारांमुळे मनात भीती निर्माण होते. म्हणजे बऱ्याचदा अभ्यास करताना एखादं उत्तर पाठ होत नसेल, तर मनात विचार यायला सुरुवात होतात. माझं हे उत्तर पाठ नाही झालं तर? नेमका हाच प्रश्न परीक्षेत आला आणि मला लिहिता नाही आलं तर? माझा अभ्यास नीट झाला नाही तर? मला परीक्षेच्या वेळी काहीच आठवलं नाही तर? हे आणि असे अनेक विचार त्या वेळी डोक्यात सुरू होतात आणि मग त्यातून निर्माण झालेलं टेन्शन, भीती मुलांच्या वागण्यातून दिसते. काही मुलांची चिडचिड होते, घाबरून बरं वाटेनासं होतं, छातीत धडधड होते, झोप येत नाही. अशा प्रकारचं हे भीतीचं चक्र मुलांबरोबर सुरू राहतं.

रोजच्या रूटीनमध्ये हे असे ताणतणाव निर्माण होतच असतात, परंतु त्याचबरोबर काही मुलांना काही ठरावीक गोष्टींची भीती असते. उदा. पाण्याची भीती, अंधाराची भीती, औषधं, गोळया, इंजेक्शन, हॉस्पिटल या गोष्टींची भीती, पक्ष्यांच्या पिसांची भीती, उंच जागेची भीती, लोकांसमोर बोलण्याची भीती, अनोळखी लोकांची भीती, लोक आपल्यापासून दूर जातील, मित्रमैत्रिणी बोलायचे बंद होतील याची भीती, शाळेतल्या एखाद्या शिक्षकाची भीती, बंद जागांची भीती, प्रवासाची भीती अशा कितीतरी गोष्टींची मुलांना भीती असते. आणि त्या त्या परिस्थितीमध्ये जाण्याची वेळ आली की मग त्याचं रूपांतर भीतीमध्ये अथवा चिंतेमध्ये होतं.

वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मुलाला काही ना काही भीती असतेच. परंतु जर ही भीती त्याच्या रोजच्या दिनक्रमात काही ताण निर्माण करत असेल, तर त्यावर काम करणं, ती भीती मनातून काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा त्या  भीतीशी निगडित एखादा विचार मुलाला सतत भेडसावत राहू शकतो.

बऱ्याचदा मुलं शाळेत जायला नकार देतात. आजपासून मी शाळेत नाही जाणार असं अचानक सांगून टाकतात आणि रोज काही ना काही कारण काढून शाळेत जायचं टाळतात. ज्यांना बंद जागेची, प्रवासाची भीती वाटते, ती मुलं लिफ्टने, ट्रेनने जायला नकार देतात. एकटं राहत नाहीत. अनोळखी लोकांची भीती, लोकांसमोर बोलण्याची भीती असेल तर त्यासाठी टाळाटाळ करतात. इंजेक्शन, हॉस्पिटल, रक्त बघून काही मुलं अगदी बेशुध्ददेखील पडतात. याचाच अर्थ या भीतीमुळे बऱ्याचदा मुलांमध्ये avoidance behaviour तयार होतं. Avoidance behaviour म्हणजे काय, तर ज्या परिस्थितीमुळे, गोष्टीमुळे मनात भीती निर्माण होते आहे, त्यापासून दूर राहणं किंवा त्याच्याशी निगडित कोणतंही काम करायचं झाल्यास त्याची टाळाटाळ करणं.

या मनातल्या भीतीवर योग्य वेळी काम नाही केलं, तर हळूहळू चिंतेच्या विकारांमध्ये (Anxiety Disordersमध्ये) त्याचं रूपांतर व्हायला लागतं - ज्यामध्ये फोबिया, म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त भीती वाटणं, त्या गोष्टीचं नाव काढलं, इमॅजिन केलं तरी मनात भीती निर्माण होणं, तसंच पॅनिक अटॅक म्हणजे भीती निर्माण करण्याच्या परिस्थितीमध्ये गेल्यावर अतिशय पॅनिक होणं, प्रचंड घाबरून जाणं अशा काही आजारांचा समावेश असतो. तर काहींच्या मनात Seperation Anxiety असते, ज्यामध्ये आपल्या आवडती, जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर जाईल अशी भीती वाटत राहते. एखाद्या घरात सतत वाद होत असतील, तर मुलांना आई-बाबा आपल्यापासून दूर होतील याची भीती वाटू शकते. काही वेळा मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती नकळत पालकांमुळेसुध्दा झालेली असते. पालकांच्या मनात काही गोष्टींबद्दल भीती, चिंता असते आणि त्यांची भीती ते नकळत मुलांमध्ये निर्माण करत असतात. आपल्या बाबतीत झालेला प्रसंग मुलांच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्यांची अती काळजी घेणं, एखाद्या गोष्टीला मुलाला एक्स्पोजच होऊ न देणं अशा प्रकारे ती भीती पुढे मुलांमध्येसुध्दा निर्माण होते.

एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल असलेली ही भीती किंवा चिंता मुलांच्या मनातून कायमची काढून कशी टाकायची? तर मुळात आधी ही भीती, चिंता त्यांच्या मनात कशी आणि कुठून निर्माण झाली आहे, हे शोधून काढणं गरजेचं आहे. काही वेळा काही गोष्टी बघून, ऐकून किंवा अनुभवून एखादी भीती मनात बसलेली असते. त्यामुळे तिचं मूळ शोधणं आवश्यक आहे. त्यानंतर मुलांशी त्याविषयी शांतपणे बोलणं गरजेचं आहे. त्यांची भीती किंवा ते सतत करत असलेली चिंता अनाठायी आहे किंवा त्यात फार काही तथ्य नाहीये हे त्यांच्याशी बोलल्यानंतर जर लक्षात आलं, तर त्याप्रमाणे मुलांशी संवाद साधावा. त्यांना विवेकी विचार करण्यास शिकवावं. अमुक एक गोष्टी केल्याने काय होतं हे आपलं मन आधीच ठरवत असतं. परंतु प्रत्यक्षात तसं करताना लक्षात येऊ शकतं की मला वाटत होतं तेवढी ही गोष्ट कठीण नव्हती किंवा मी विचार केलेला तेवढी भीती मला वाटली नाही. मुलांना हे काही उदाहरणासहित  त्यांना समजेल असं समजावून सांगावं. जेव्हा मुलांना भीती वाटत असेल, तेव्हा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या वागण्यातून त्यांची भीती, टेन्शन दिसत असेल, तर त्या वेळी त्यांच्याबरोबर संवाद साधा. प्रत्येक गोष्ट करताना मनात थोडी तरी भीती असायलाच हवी. त्यामुळे आपण त्यासाठी अधिक मेहनत घेतो. परंतु जर ती भीती, चिंता गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असेल, तर तेच आपलं काम बिघडवू शकते हे मुलांना समजावून सांगायला हवं. मुलांच्या झोपेचं आणि जेवणाचं वेळापत्रक याकडे लक्ष द्यायला हवं.

सगळयात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे किंवा कोणत्या प्रसंगी आपल्या मुलाला भीती वाटते आहे, त्यांच्या मनात ताण निर्माण होतो आहे आणि कोणत्या गोष्टीची ते अती प्रमाणात चिंता करत आहेत, हे पालकांच्या योग्य वेळी लक्षात आल्यास त्यावर योग्य वेळी उपाय होणं गरजेचं आहे. एखादी भीती खूपच खोलवर मनात रुजलेली आहे असं लक्षात आल्यास योग्य वेळी तज्ज्ञांची मदत घेणंदेखील तितकंच आवश्यक आहे, जेणेकरून तीच भीती अथवा चिंता पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याचा भाग होणार नाही.

(लेखिका समुपदेशक आहेत.)

[email protected]