सद्विचार व सत्प्रेरणा सर्वांच्या मनात जाग्या राहण्यासाठी शिवरात्र व्रत करावे. भगवान शिव हे लयाची देवता आहेत. 'शिव होऊनी शिवाला भजावे' या न्यायाने ही उपासना व्हावी. 'तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु' असे म्हणत कायमच माझ्या मनात कल्याणकारी संकल्प उमटोत आणि ते आचरण्याची प्रेरणा भगवान शिव देवोत अशा विचारांनी आचरलेली शिवरात्र ही सार्थ ठरावी.
शिवशंकराचा महिमा भारतीय धर्मसंस्कृतीत मान्यता पावलेला आहे. शैव पंथीयांचे आदिदैवत असलेले भगवान शंकर लयाची देवता म्हणूनही ओळखले जातात.
वैदिक साहित्यात रुद्र या नावाने उल्लेखिलेल्या देवतेचा विकास होत होत पौराणिक काळात शंकर या नावाने ही देवता मान्यता पावली.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/
रुद्र म्हणजे रडत रडत धावणारा किंवा धावत धावत रडणारा. या रुद्रदेवाचे वर्णन करणारे रुद्रसूक्त यजुर्वेदात आले असून रुद्राच्या पठणाला वैदिक परंपरेत मानाचे स्थान आहे. रुद्राच्या या अश्रूंचे रूपांतर चांदीमध्ये झाल्याची आख्यायिकाही प्रचलित आहे. चोरांमध्येही असलेला, झाडांमध्येही असलेला रुद्र या सूक्तात वर्णिलेला आहे.
ओम् त्र्यंबकं यजामहे… असे म्हणत वैदिकांनी तीन डोळ्यांच्या रुद्रदेवाला आहुती अर्पण केली आणि दीर्घायुष्यासाठी त्याला प्रार्थना केली.
शिव म्हणजे कल्याणकारक. पौराणिक साहित्यात त्रिशूळधारी, भस्मविलेपित, कैलासावर साधना करणारा, स्मशानात राहणारा, कवटीत भिक्षा मागणारा, गळ्यात साप धारण करणारा विरागी शिवशंकर भक्ताला भेटतो. समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल प्राशन करणारा, पार्वतीने ज्याचा ध्यास घेऊन तपश्चर्येने त्याला वरले असा, कार्तिकेय आणि गणपती या दोघांचा पिता असा शंकरही भक्तांच्या हृदयात स्थित आहे. शिवाचे तांडव नृत्य हे शिल्पकारांना मोहिनी पाडणारे ठरले, तसेच नृत्यशास्त्राची प्रधान देवता म्हणूनही 'नटराज'पूजन नाट्यशास्त्रात प्रसिद्ध पावले. शिवाचे तांडव हे उत्पत्ती, स्थिती, लय, माया आणि अनुग्रह यांचे प्रतीक मानले जाते. मायेच्या विळख्यातून मानवाला मुक्त करणारे असे हे तांडव नृत्य!
अशा या भगवान शंकराच्या उपासनेचे विशेष महत्त्वाचे व्रत म्हणजे महाशिवरात्री.
माघ कृष्ण चतुर्दशीला “महाशिवरात्री” असे म्हटले जाते. उपवास, जागरण, पूजा असे या व्रताचे स्वरूप असून कोणत्याही जाति-वर्णातील स्त्री-पुरुषांनी हे व्रत करावे.
स्कंद पुराण, गरुड पुराण (१.१२३.११-२४), ईशान संहिता (कृत्यतत्त्व) अशा ग्रंथांमध्ये या व्रताचे वर्णन आढळते. शिव पुराण, लिंग पुराण ही पुराणेही शिवमहिमा कथन करतात. व्रतराज, धर्मसिंधू यामध्येही या व्रताचे वर्णन आहे.
त्रयोदशीला एका वेळेलाच भोजन करावे. चतुर्दशीला सकाळी नित्य आह्निके आटोपून शिव आराधना करावी. उपासकाने भस्म आणि रुद्राक्ष धारण करावा. प्रदोषकाळी शिवमंदिरात जाऊन पिंडीला स्नान घालावे. सोळा उपचारांनी पूजन करून शिवाला बेलाच्या एकशेआठ पानांचा अभिषेक करावा. स्तोत्रपठण करावे.
महाशिवरात्रीला रात्री केल्या जाणार्या पूजेला 'यामपूजा' असेही म्हटले जाते.
दक्षिण भारतात चार टप्प्यांमधे यामपूजा केली जाते. पहिल्या पूजेत ऋग्वेदसूक्ताचा पाठ व तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आणि कमळाच्या फुलांनी पूजन, दुसर्या पूजेत यजुर्वेदाचा पाठ आणि पायसाचा नैवेद्य आणि तुळशीच्या पानांनी पूजन, तिसरा टप्पा सामवेद पठण आणि तीळ घातलेल्या भाताचा नैवेद्य आणि बेलाच्या पानांनी पूजन आणि चौथ्या टप्प्यात निळी कमळे वाहून अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.
भारतीय धर्मपरंपरेतील व्रतविचाराला कोणत्या ना कोणत्या आख्यायिकेची जोड दिलेली आढळते. महाशिवरात्रीची आख्यायिका अशी -
एक व्याध होता. शिकारीवर त्याचे जीवन चाले. व्यापार्याचे कर्ज झाल्याने त्यांनी त्याला शिवमंदिरात बांधून ठेवले. सायंकाळी सुटका झाल्यावर तो शिकारीसाठी जंगलात गेला. ती रात्र शिवरात्रीची होती. पाण्यावर आलेले सावज नीट दिसण्यासाठी त्याने फांदीवरील काही पाने तोडून खाली टाकली. ते झाड योगायोगाने बेलाचे असून झाडाखाली शिवपिंडी होती. बेलाची पाने तोडून खाली टाकत तो रात्रभर जागा राहिला. सावज म्हणून सापडलेल्या हरणींनी त्याला विनंती केली की आमच्या पाडसांची भूक भागवून आम्ही परत येतो. तू आम्हाला जाऊ द्यावेस. नंतर मृगशावके आणि हरणी एकत्र परतून आल्यावर ते सर्व जण एकमेकांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःला मारण्याची विनंती व्याधाला करू लागले. हे पाहून व्याध सद्गदित झाला व त्याने शिकार करणे बंद केले. शिवरात्रीच्या पावन प्रसंगी त्याला सद्बुद्धी सुचली.
असे सद्विचार व सत्प्रेरणा सर्वांच्या मनात जाग्या राहण्यासाठी शिवरात्र व्रत करावे.
भगवान शिव हे लयाची देवता आहेत. 'शिव होऊनी शिवाला भजावे' या न्यायाने ही उपासना व्हावी. 'तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु' असे म्हणत कायमच माझ्या मनात कल्याणकारी संकल्प उमटोत आणि ते आचरण्याची प्रेरणा भगवान शिव देवोत अशा विचारांनी आचरलेली शिवरात्र ही सार्थ ठरावी.
डाॅ. आर्या जोशी
लेखिका धर्मशास्त्राच्या अभ्यासिका आहेत.