आवळयाने दिला यशाचा मंत्र- सीताबाई मोहिते

विवेक मराठी    06-Mar-2019
Total Views |

 कधीकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या सीताबाई मोहिते आज एका छोटेखानी उद्योगाच्या मालकीण आहेत. आवळयावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळी उत्पादने बनवून त्यांची विक्री त्या करतात. शेतीला उद्योगाची जोड दिली तरच शेतकरी प्रगती करू शकतो या विश्वासातूनच त्यांच्या उद्योगाची निर्मिती झाली आहे.

मराठवाडयातील बहुतांश शेतकरी शेतीविषयक अनेक प्रश्नांचा सामना करताना दिसतात, तर त्याच वेळी काही प्रयोगशील शेतकरी शेतीत नवे प्रयोग करून आणि त्याला उद्योगाची जोड देऊन या प्रश्नांवर उत्तर शोधत आहेत. काही वर्षांपूर्वी आपल्या पतीसमवेत दुसऱ्याच्या शेतीत सालदार म्हणून काम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील निरक्षर सीताबाई मोहिते या उत्तर शोधणाऱ्यांपैकी बनल्या. आपल्या छोटेखानी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. स्वत:च्या प्रगतीबरोबरच अनेक शेतकरी बंधुभगिनींनाही प्रगतीचा मार्ग दाखवला. आज कृषिभूषण, उद्योजिका असे सन्मान त्यांच्या नावापुढे जोडले जातात. पण आवळयासारखे छोटेसे फळ आपल्याला एवढे मोठ यश देईल याची कल्पनाही कदाचित सीताबाईंनी 13-14 वर्षांपूर्वी केली नसेल.

वयाच्या तेराव्या वषी सीताबाई संसारात अडकल्या. पती रामभाऊ मोहिते शेतकरी. त्यांच्यासह त्या सालदारी करत असत. सालदारी म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात राहून त्यांची शेती सांभाळण्याचे काम. ते करताना हे जोडपे शेतीत वेगवेगळे प्रयोगही करीत असे. उत्पन्नाच्या इतर वाटांचा विचार करीत असे. त्यासाठी त्यांनी एक रोपवाटिकाही सुरू केली होती. दरम्यान 2003मध्ये सीताबाई परभणीनजीकच्या लिंबगावच्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कदम यांच्या संपर्कात आल्या. कदममामांनी शिकवलेल्या आवळा कँडीच्या पाककृतीत त्यांना व्यवसायाची संधी दिसू लागली. पहिला प्रयोग फसल्यानंतर हार न मानता पुन्हा प्रशिक्षण घेऊन त्यांनी नव्याने थोडया जास्त प्रमाणात आवळा कँडी बनवली. शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात या कँडीची यशस्वी विक्री केली. सोबत आवळा सरबत आणि अन्य रानमेवाही विकायला ठेवला. त्यालाही गिऱ्हाइकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. व्यवसायाच्या या पहिल्या पायरीवरची त्यांची गुंतवणूक फक्त 200 रुपये होती. त्यातून 1000 रुपयांचा नफा झाला. आवळयाने दिलेल्या या छोटयाशा यशानंतर सीताबाईंमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

मेहनत करण्याची आणि सतत नवीन काहीतरी शिकण्याची तयारी हा त्यांच्या स्वभावाचाच भाग होता. त्यात रामभाऊंसारख्या समविचारी जोडीदाराची साथ. आवळयापासून आणखी काय वेगळी उत्पादने बनवता येतील, याचा विचार दोघेही करू लागले. उत्पादने तयार करण्याबरोबरच त्यांनी विक्रीचेही वेगवेगळे फंडे शोधले. लग्समारंभ, जाहीर कार्यक्रम अशा गर्दीच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात किंवा प्रत्यक्ष दारोदारी जाऊन विक्री करण्यातही त्यांनी कमीपणा मानला नाही. आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी दोघेही सायकलवरून किंवा पायी वणवण भटकत. लोकांशी बोलून आवळयाचे गुणधर्म सांगणारी पत्रके वाटत, लोकांकडून ऑर्डर मिळवत. 3-4 वर्षे ते याच पध्दतीने विक्री करीत होते.

याच काळात सीताबाईंनी छोटया उद्योजकांसाठी असणाऱ्या सरकारी योजनांचा उपयोग व्यवसायवृध्दीसाठी करण्याचे ठरवले. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात नावनोंदणी केली. या योजनांचा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा केला. 2005मध्ये जिल्हा केंद्राच्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळाले आणि बीजभांडवलावर बँकेतून 16 लाखांचे कर्ज मिळवले. त्यातून सिंधी काळेगाव येथे जागा खरेदी करून फॅक्टरीची इमारत उभी केली. 2006-07पासून त्यांनी दुकानदारांमार्फत माल विक्री करण्यास सुरुवात केली. उत्पादनांमध्ये विविधता आणली. त्यासाठी नवनवीन यंत्रे खरेदी केली. या यंत्रांविषयीचेही जुजबी ज्ञान त्यांनी मिळवले. त्यामुळे एखाद्या यंत्रात काही बिघाड झाल्यास त्या स्वत: स्क्रू ड्रायव्हर, पाने घेऊन सज्ज होतात. आज सीताबाई आणि रामभाऊ यांच्या 'श्री भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योगा'द्वारे 14 प्रकारची प्रकिया उत्पादने तयार केली जातात. त्यात आवळा कँडी, आवळा सरबत, गुलकंद, आवळा सुपारी, मंजन, आवळा चूर्ण, आवळा चहा, आवळा-संत्री-मोसंबी यांच्या सालीपासून तयार केलेला फेसवॉश, केश संजीवनी आदींचा समावेश आहे. फॅक्टरीत होणाऱ्या या उत्पादनांबरोबरच रोपवाटिका, रसवंती, नाश्ता केंद्र यांचेही काम रोजच्या रोज चालते. या सगळया कामात 10 ते 12 लोकांचा सहभाग असतो. त्यापैकी 7 महिला आहेत. पती रामभाऊंसह त्यांचे पूर्ण कुटुंबच या व्यवसायात त्यांना सहकार्य करते. आजच्या घडीला सीताबाईंच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल 18 ते 19 लाखांपर्यंतची आहे. आता तर मोठमोठया मॉलमध्येही त्यांचा माल विक्रीस असतो.

स्वत: शेतकरी असलेल्या सीताबाईंना शेतकऱ्यांच्या वेदनांची, त्यांच्यासमोरच्या प्रश्नांची जाणीव आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा पर्याय न स्वीकारता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे त्या मानतात. त्यासाठी शेतमालावर प्रक्रिया करून त्याची साखळी पध्दतीने विक्री करण्याविषयी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना सीताबाईंनी आपल्या व्यवसायातही जोडून घेतले आहे. त्यांच्याकडे दर वर्षी सुमारे 25 टन कच्च्या मालावर प्रक्रियाकेली जाते. या कच्च्या मालाचा काही भाग त्यांच्याच रोपवाटिकेतून उत्पादित केला जातो. उरलेल्या कच्च्या मालासाठी या शेतकऱ्यांना सीताबाई त्यांच्या रोपवाटिकेतून आवळयाची रोपे देतात आणि त्यांची नोंद स्वत:कडे करतात. ही रोपे मोठी होऊन त्याला आवळे आले की तो माल सीताबाई स्वत:च खरेदी करतात. 

कृषी आणि उद्योग अशा दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक असे काम सीताबाई करत आहेत. विविध संस्थांनी आणि खुद्द राज्य सरकारनेही त्याची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार, सक्षमा पुरस्कार, कृषी गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2009मध्ये एका पुरस्काराचे बक्षीस म्हणून त्यांना एका ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे परदेशात टूरवर जाण्याची संधी मिळाली. केवळ थँक्यू, सॉरी, गुड मॉर्निंग या तीनच इंग्लिश शब्दांच्या मदतीने या टूरमध्ये सीताबाई आत्मविश्वासाने वावरल्या. नुसत्या वावरल्याच नाही, तर लोकांची मनेही जिंकली. या प्रवासात उद्योजकांच्या एका चर्चासत्रात त्यांनी तासाभराचे भाषणही दिले.

आता तर सीताबाईंना महाराष्ट्रभर ठिकठिकाणी व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले जाते. शेतकरी बंधुभगिनींचे आत्मबळ वाढवण्याचे काम त्यांच्या या व्याख्यानांतून त्या करत असतात. बचत गटाच्या महिलांनाही त्या विविध प्रकारे मार्गदर्शन करीत असतात. सावकारी पध्दतीने कर्ज न घेता व्यवसाय करा, व्यवसाय करताना सर्वसामान्य शेतकऱ्यालाही त्याचा कसा फायदा करून देता येईल याचा विचार करा, असा त्यांचा आग्रह असतो. तसेच सध्या मालाची मागणी किलोच्या पॅकिंगमध्ये असते, हे लक्षात घेऊन बचत गटांनी त्यांची उत्पादने तशा प्रकारचे पॅकिंग करून विकावे, असा सल्लाही त्या देतात. त्यांच्या उद्योगातही सीताबाई हा फंडा वापरतात. अगदी 5-10 रुपयांच्या छोटया पाकिटांपासून त्या त्यांची उत्पादने विक्रीस ठेवतात.

व्याख्याने, वेगवेगळे जाहीर कार्यक्रम, बचत गटांना मार्गदर्शन  हे सर्व करत असताना सीताबाई त्यांच्या व्यवसायाकडे मात्र दुर्लक्ष करत नाहीत. 'घार हिंडते अकाशी...' या उक्तीप्रमाणे त्यांच्या व्यवसायाकडे त्यांचे संपूर्ण लक्ष असते.

कधीकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या सीताबाई आज खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्रात सल्लागार म्हणून काम करत आहेत. तसेच व्यापारी संघाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे.

एखादी निरक्षर, अशिक्षित महिला केवळ मेहनतीच्या जोरावर आणि काहीतरी करून दाखवण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर इथपर्यंत मजल मारते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलावर्गासाठी सीताबाई प्रेरणास्रोतच ठरत आहेत. महिलांनी उद्योग-व्यवसायात आले पाहिजे, असे सीताबाईंना वाटते. त्या सांगतात, ''ज्यांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करायचा असेल, त्यांनी त्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण केले पाहिजे. अपयश आले तरी हार न मानता त्यात पुढेच जात राहिले पाहिजे.'' सीताबाई हे तत्त्व केवळ इतरांना सांगतच नाहीत, तर त्यांच्या जगण्याचे, त्यांच्या यशाचे ते सूत्रच झाले आहे.

संपर्क

सीताबाई मोहिते : 9404606383

श्री भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, सिंधी काळेगाव, जालना