द्विदशकाची वाटचाल भारतीय नववर्ष स्वागतयात्रा

विवेक मराठी    01-Apr-2019
Total Views |

 डोंबिवलीचे गणेश मंदिर, ठाण्याचा कौपिनेश्वर मंदिर न्यास अशा काही धार्मिक संस्थांबरोबरच अनेक ठिकाणी सामाजिक संस्था या भारतीय नववर्ष स्वागतयात्रेच्या आयोजनात पुढाकार घेतात. बऱ्याच ठिकाणी युवक-युवती या यात्रांच्या समन्वयाची आणि यात्रा प्रमुखाची जबाबदारी सांभाळतात, असे आढळून आले आहे. बहुतेक गावांचे एक ग्रामदैवत असते. अशा ग्रामदैवत संस्थेच्या पुढाकारामुळे सगळा समाज त्या ग्रामदैवतावरील श्रध्देमुळे सहज एकत्र येतो. कालानुरूप परिवर्तन हे आपल्या समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. स्वागतयात्रेस समाजाकडून योग्य प्रतिसाद मिळतो, धर्म किंवा उपासनापध्दती आड येत नाहीत, असा अनुभव आहे.

डिसेंबर आणि 1 जानेवारी साजरे करण्याच्या पध्दतीबाबत असंतोष सतत प्रकट होत असे. मोठया प्रमाणावर टीका करण्यापेक्षा आपण भारतीय नववर्षाचे स्वागत चांगल्या प्रकारे आणि सुजाण नागरिकांना सोबत घेऊन भव्य प्रमाणावर साजरे करण्याची संकल्पना. भारतीय नववर्ष गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा) या दिवसाला वेगळी चांगली पार्श्वभूमी आहे. एक तर वसंताचे आगमन म्हणजे निसर्गाचे वरदान. पर्यावरण आणि अल्हाददायक हवामान यामुळे लोकांच्या मनात उल्हास दाटलेला असतो. धार्मिकदृष्टया श्रीरामांनी विजय प्राप्त करून अयोध्येतील त्यांचे आगमन हे विजयाचे आणि आनंदाने पर्व मानले गेले आहे. भारतीयांच्या मनामनातील सुप्त इच्छा-आकांक्षाचे सामूहिक प्रकटीकरण या यात्रेच्या माध्यमातून केले गेले. धार्मिक पार्श्वभूमी असली, तरी मुख्यत: सामाजिक सौहार्दाचा आशय महत्त्वाचा होता. सगळया नगराने, गावाने एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव असल्यामुळे आबालवृध्द स्त्री-पुरुषांबरोबर सामाजिक संस्थांचा सहभाग लक्षणीय ठरला. सुरुवातीच्या वर्षी डोंबिवलीच्या श्रीगणेश मंदिराने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहराच्या स्वच्छतेत आणि शहर सजवण्यात सर्वांचा सहभाग लाभला. विशेषत: महिलांनी शहरभर रेखाटलेल्या रंगीबेरंगी नयनमनोहर भव्य रांगोळयांनी उत्तम वातावरणनिर्मिती झाली. पाडव्याच्या दिवशी सकाळी निघालेल्या नववर्ष स्वागतयात्रेत पन्नास हजारांवर नागरिकांचा आणि वस्त्रालंकारांनी नटलेल्या महिलावर्गाचा सहभाग होता. त्याचबरोबर सुमारे शंभर सामाजिक संस्थांच्या आकर्षक चित्ररथांमुळे ही यात्रा आपोआपच शोभायात्रा झाली. सहभागींनी उत्साहाबरोबरच स्वयंसामूहिक शिस्त जपल्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला. पोलीस यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. आवश्यक तेथे आनंदाने सहकार्य लाभले. डोंबिवलीत निघालेल्या पहिल्या नववर्ष स्वागतयात्रेला पत्रकारांनी आणि वाहिन्यांनी उत्तम प्रसिध्दी दिल्याने सगळया महाराष्ट्रभर योग्य संदेश गेला आणि पुढील वर्षी अनेक शहरांनी यात्रा आयोजित केल्या आणि त्या त्या ठिकाणच्या सुजाण नागरिकांनी या यात्रेअंतर्गत अनके उपक्रम राबवून आणि तरुण वर्गाने नव्या यंत्रज्ञानाचा अवलंब करून या यात्रांतील वैविध्य जपले. सुरुवातीपासून एक सूत्र सांभाळले, ते म्हणजे स्थानिक मंडळींनीच आपल्या संकल्पना राबवून वारकरी मंडळींप्रमाणे स्थानिक यात्रा स्वयंनियंत्रित आणि यशस्वी कराव्यात, अन्य कोणत्याही ठिकाणाहून त्यांना उपक्रमाबाबत निर्देश करू नयेत. अशा प्रकारची कोणतीही मध्यवर्ती संस्था नसावी. मागितल्यास आवश्यक तो सल्ला द्यावा. चर्चा करावी. राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आपल्या उपस्थितीने सहभाग द्यावा, पण यात्रेचे नेतृत्व शक्यतो समाजधुरीणांनी करावे. सर्व राजकीय पक्षांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे या यात्रांवर कोणत्याही राजकीय पक्षाचा ठसा नाही. स्पर्धा नाही. गावाच्या स्तरावर सामंजस्य आहे. आपआपल्या उपासना पंथांचा अवलंब असला, तरी अभिनिवेश नाही. आपल्या गावाला, नगराला केंद्रस्थानी मानून या स्वागतयात्रेच्या निमित्ताने गावकीच्या एकतेचे मनोहारी दर्शन घडते.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 या यात्रेच्या निमित्ताने कल्पकतेने आणि आवश्यकतेनुसार अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळग्रस्तांना मदत, समाजातील आर्थिक दुर्बलांना साहाय्य, कुठे पाणवठयांचे पाण्याच्या स्रोतांचे निर्माण, आनंदवनातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलणे अशी अनेक उदाहरणे देता येतील. आणखी एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे या यात्रेला कोणी गॉडफादर नाही. प्रायोजक नसावा. सामाजिक संस्था आपल्या खर्चाचा वाटा स्वयंस्फूर्तीने स्वत:च उचलतात. या यात्रांमुळे काही उद्योगांनाही चालना मिळाल्याची उदाहरणे आहेत.

डोंबिवलीचे गणेश मंदिर, ठाण्याचा कौपिनेश्वर मंदिर न्यास अशा काही धार्मिक संस्थांबरोबरच अनेक ठिकाणी सामाजिक संस्था या भारतीय नववर्ष स्वागतयात्रेच्या आयोजनात पुढाकार घेतात. बऱ्याच ठिकाणी युवक-युवती या यात्रांच्या समन्वयाची आणि यात्रा प्रमुखाची जबाबदारी सांभाळतात, असे आढळून आले आहे. बहुतेक गावांचे एक ग्रामदैवत असते. अशा ग्रामदैवत संस्थेच्या पुढाकारामुळे सगळा समाज त्या ग्रामदैवतावरील श्रध्देमुळे सहज एकत्र येतो. कालानुरूप परिवर्तन हे आपल्या समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. काळाच्या ओघात जुन्या प्रथा-परंपरांना मुरड घालून नव्या मानवी मूल्यांना प्रस्थापित करणाऱ्या परंपरा निर्माण कराव्या लागतात. त्या युगानुकूल आणि सामाजिक समरसता प्रस्थापित करणाऱ्या, सर्वसमावेशक असाव्यात; अशा असतील, तर समाजाकडून योग्य प्रतिसाद मिळतो, धर्म किंवा उपासनापध्दती आड येत नाहीत, असा अनुभव आहे.

भारतीय नववर्ष स्वागतयात्रा हे या दिशेने टाकलेले एक
स्वयंस्फूर्त सकारात्मक पाऊल ठरावे.

आबासाहेब पटवारी

 9869269127