आबोदाना ढूँढते है, एक आशियाना ढूँढते हैं

विवेक मराठी    05-Apr-2019   
Total Views |

घर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या दगदगीच्या दिवसानंतर, हक्काचा निवांत विसावा मिळावा ही गरज मूलभूत आहे. तरीही, घर पाहावे बांधून असे उगाच म्हणत नाहीत. डोक्यावर छप्पर असावे ही साधी इच्छासुध्दा पूर्ण होण्यासाठी अनेकांचे आयुष्य गहाण पडते. माणसे स्वत:लाच हरवून बसतात. घराचे स्वप् पाहणाऱ्यांना आजही आपली जीवनकथा वाटू शकणारे हे गीत.

निवडणुका जवळ आल्या आहेत. आता पक्षीय जाहीरनाम्यांना सुरुवात होईल. नागरिकांच्या प्रश्नांचा विचार केला जाईल. मूलभूत प्रश्न चर्चेला येतील. हे प्रश्न सोडवण्याची आश्वासने दिली जातील. गेल्या कित्येक वर्षांसारखाच एक महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर येईल, तो म्हणजे महानगरात दर दिवशी येणाऱ्या लोकांचा लोंढा थांबवण्यासाठी उपाययोजना करणे. सुरुवातीला तरी ज्या गावांमध्ये उद्यमशीलता होती, नैसर्गिक साधनसंपत्ती होती, त्यांची वाढ नैसर्गिकरीत्या झाली. या गावांनी आजूबाजूच्या लोकांना आकर्षित केले. उच्च शिक्षणाच्या, कामाच्या, नोकरीच्या संधींमुळे लोक आपली गावे सोडून, इथे स्थलांतर करू लागली. या वसवलेल्या गावांचा पसारा वाढला.

त्यांनी आजूबाजूच्या गावांत आपले पाय पसरले. तिथली जमीन उद्योगधंद्यासाठी, वसाहतींसाठी गिळंकृत केली आणि मग याच गावांचे रूपांतर शहरांत, नंतर महानगरांत झाले.

वाढीव लोकसंख्येसाठी जमीन अपुरी पडू लागली. ही संधी साधून बिल्डर, राजकारणी आणि नोकरशहा या तिघांच्या युतीने येथील जमिनीचे मोल लावले गेले. घरे मोडली, वाडया गेल्या. त्याच्या जागी मोठया इमारती उभ्या राहिल्या.

खुराडयासारख्या घरांना फ्लॅटचे गोंडस नाव मिळाले. स्वप्ने दाखवणाऱ्या आणि ती पुरी करणाऱ्या या शहराचे आकर्षण असणाऱ्या लोकांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि इथल्या चिमूटभर मातीवर आपले नाव कोरले.

घर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या दगदगीच्या दिवसानंतर, हक्काचा निवांत विसावा मिळावा ही गरज मूलभूत आहे. तरीही, घर पाहावे बांधून असे उगाच म्हणत नाहीत. डोक्यावर छप्पर असावे ही साधी इच्छासुध्दा पूर्ण होण्यासाठी अनेकांचे आयुष्य गहाण पडते. माणसे स्वत:लाच हरवून बसतात.

मुंबई शहरात घर घेणे हेदेखील असंख्यांचे स्वप्न आहे.  येथील न परवडणारी भाडी, खिशाला न पेलवणाऱ्या घराच्या किमती, त्रास देणारे घरमालक, खोटा व्यवहार करून फसवणारे दलाल, बेकायदेशीर झोपडपट्टयांची अमर्याद वाढ, चिकटून असणारी खुराडयासारखी घरे, छोटयाशा घरात दाटीवाटीने राहणारी माणसे, एकांताचा अभाव अशा अनेक अडचणींना चित्रपटांनी वाचा फोडली आहे. असाच एक चित्रपट होता, 1977मध्ये प्रदर्शित झालेला भीमसेन दिग्दर्शित 'घरौंदा'.

अमोल पालेकर आणि झरीना वहाब हे चेहरे तेव्हा नवीन होते. मोठया शहरात, डोळयात स्वप्ने घेऊन आलेले जोडपे म्हणून ते शोभून दिसले. नायिका आणि नायक नोकरीच्या शोधात आहेत. एका ऑॅफिसात टायपिस्ट म्हणून नायिकेला, नोकरी मिळते. तिच्याच ऑॅफिसमध्ये काम करणारा एक साधा मुलगा तिला आवडतो. त्यांचे प्रेम जमते. आता पुढची पायरी असते लग्न करून आयुष्याला स्थिरता देणे, आपल्या स्वप्नांना आकार देईल अशा घरटयाचा शोध सुरू होतो.

दो दीवाने शहर में, रात में या दोपहर में

आबोदाना ढूँढते है, एक आशियाना ढूँढते हैं

आठवडयाचे सहाही दिवस मान मोडून काम केल्यानंतर येतो तो रविवार. खरे तर हा आरामाचा दिवस, पण घर शोधणे, आपले बजेट आणि गरज याचा मेळ घालणे काही सोपे काम नाही. ताण येतो, मते जुळत नाहीत, जुळली तर पैसे पुरत नाहीत.

प्रेमात पडलेल्यांना मात्र या अडचणी सुरुवातीला तरी खुपत नाहीत. दोनाचे एक होण्याची स्वप्ने पाहत असताना, येणाऱ्या अडचणींचा सामना, हातात हात घेऊन करण्याची ऊर्मी असते. केवळ एकत्र राहण्याची जागा नसते ती, एकत्र प्रवास करण्याचे वचन असते ते.

इन भूलभूलैय्या गलियों में

अपना भी कोई एक घर होगा

अंबर पे खुलेगी खिड़की,

या खिड़की पे खुला अंबर होगा

आसमानी रंग की ऑंखों में,

बसने का बहाना ढूँढते हैं

हे अस्ताव्यस्त वाढलेले शहर कुणालाही गिळून टाकेल हे माहीत आहे त्या दोघांना. पावलापावलांवर, चुकीच्या वाटांवर नेणारी प्रलोभने आहेत. ह्या सर्वापासून दडण्यासाठी त्यांना त्यांचा हक्काचा निवारा हवा आहे. छोटेसे घर, त्याला असणारी खिडकी, जिच्यातून त्यांच्या आकांक्षाचे प्रतीक असणारे आभाळ त्यांना खुणावेल.. अर्थात हा बहाणा आहे लोकांसाठी. त्याला फक्त तिच्या निळया डोळयात हरवून जायचे आहे. त्यांच्या सुखाला मात्र नजर लागते. बिल्डर, जागेत गुंतवलेले पैसे घेऊन पळून जातो. राहायला घर नाही, खिशात पैसे नाहीत अशा परिस्थितीत विवेक हरवतो आणि नायक-नायिकेच्या आयुष्यात वेगळेच वळण येते. पैशासाठी श्रीमंत पण वयस्कर बॉसशी लग्न करायचा सल्ला नायक नायिकेला देतो. ती दुखावते, पण परिस्थितीपुढे नमते घेते. एका वृध्द माणसाशी लग्न करते. तडजोड स्वीकारते. पण नायक मात्र सैरभैर होतो. आता आयुष्यासारखाच गीताचा सूर बदलतो.

एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में

आबोदाना ढूंढ़ता है, आशियाना ढूंढ़ता है

या चित्रपटाचा खलनायक आहे 'मुंबई शहर'. असे शहर, जे रहिवाशांना कठीण निर्णय घेण्यास मजबूर करते. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्याच स्वप्नाची बोली लावते. आताही गरजा आहेतच, पण साथीला मात्र ती नाही.

दिन खाली-खाली बर्तन है,

और रात है जैसे ऍंधा कुआं

इन सूनी ऍंधेरी ऑंखों में,

ऑंसू की जगह आता हैं धुंआ

जीने की वजह तो कोई नहीं,

मरने का बहाना ढूंढ़ता है

घर भरलेले असले की अडचणीचा सामना करायला सोपे जाते. एकटेपणा जीवनाची आसक्ती संपवतो. वाट पाहून पाहून थकलेल्या डोळयात आता अश्रूसुध्दा येत नाहीत. जगण्यासाठी काहीही उरलेले नाही, मरण्यासाठी मात्र कारणांची कमतरता नाही अशी अवस्था होते.

इन उम्र से लम्बी सड़कों को, मंजिल पे पहुँचते देखा नहीं

बस दौड़ती फिरती रहती हैं, हमने तो ठहरते देखा नहीं

इस अजनबी से शहर में, जाना पहचाना ढूंढ़ता है

शहरे क्रूर असतात.

अनोळखी रस्ते आणि त्यावर धावणारे अनोळखी चेहरे, त्यात स्वत:चा रस्ता दिसत नाही. दिसला तरी आपण आपल्या गंतव्याकडे पोहोचू याची खात्री नाही ही जाणीवच स्वत:ला क्षुल्लक ठरवते.

चित्रपटाचे संगीत जयदेव यांचे आहे. ह्या चित्रपटाने दोन गुणी गायकांना प्रकाशझोतात आणले - एक भूपिंदर आणि दुसरा आवाज होता बांगला देशची गायिका रुना लैला. रुनाचा अवखळ आवाज पहिल्या गीताचा टोन ठरवतो. भूपिंदरचा आवाज अमोल पालेकरच्या पात्राला आवश्यक असणारी खोली देतो.

त्याचा एकटेपणा, त्याची असाहाय्यता, वांझोटा संताप आणि पश्चात्ताप या गीताच्या शब्दाशब्दातून प्रत्ययास येतो.

बाहेरच्या लोकांना ही स्वप्ननगरी खुणावते, तिच्या ऐश्वर्याने मोहवते, पण इथले आयुष्य सोपे नाही हा प्रत्यय इथे पदोपदी येतो. ही कथा शिळी होत नाही. आजही ती अनेकांना त्यांची जीवनकथा
वाटू शकते, यातच या चित्रपटाचे यश आहे.

प्रिया प्रभुदेसाई

 9820067857