जोगी जबसे तू आया मेरे द्वारे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-May-2019   

  प्रेमाचा स्वीकार सहज करता येणे शक्य नसते. ते यशस्वी होईल का, त्याला मान्यता असेल का, ते निभावले जाईल का,  अशा अनेक प्रश्नांचा गुंता होतो मनात. प्रीतीचा हा अनोळखी आनंद, अनेक शक्यतांचे दु:ख घेऊनच जन्माला येतो.

 पहिल्या नजरभेटीत स्वत:ला हरवून जाणे ह्या गोष्टी वाचलेल्या असतात. सिनेमा, नाटकात पाहिलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव शोधण्याची सवय असणाऱ्या मनाला, त्या कथा-कादंबऱ्यांतच खऱ्या वाटतात. मग कुणीतरी भेटते आणि सगळेच बदलते. अनेक वेळा स्वत:लाही काय होते हे समजत नसताना, अल्लड वय प्रेमाला साद घालते. कुणीतरी नजरेतून थेट हृदयात उतरते. धोक्याचे संदेश चहू बाजूंनी ऐकू येत असतानासुध्दा तरुण वय मानत नाही. त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचे नाव ऐकू येत नाही. साऱ्या जगात, गर्दीतूनसुध्दा तिची नजर त्याला शोधते. स्वत:कडे पाहायची नजर बदलते. आयुष्य एका वेगळया दिशेला जाते आणि कितीही प्रयत्न केला तरी ते बदलणे कोणी थांबवू शकत नाही.

एका लहानशा गावात राहणारी, सज्जन पोस्टमास्टरची, सुसंस्कृत मुलगी कल्याणी. तिला आई नाही. बाप-लेक आपल्या छोटयाशा जगात खूश आहेत. अशा वेळी, तिच्या साध्या, संथ आयुष्यात बिकाशचा, एका क्रांतिकारकाचा प्रवेश होतो आणि कल्याणीचे साधे, सरळ जगच रंगीत होऊन जाते.

 जोगी जबसे तू आया मेरे द्वारे

मेरे रँग गए सांझ सकारे

तू तो ऍंखियों में जाने जी  की बतियाँ

तुझसे मिलना ही ज़ुल्म भया रे

 ही केवळ पहिल्या, नवथर  प्रीतीची अनुभूती नाही. हा प्रियकर सामान्य तरुण नाही. देशकार्याला वाहून घेतलेला एक क्रांतिकारक आहे. त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तो ब्रिटिशांच्या नजरकैदेत असताना, एक महत्त्वाचा निरोप पोहोचवण्याची जबाबदारी कल्याणीवर सोपविली जाते.

त्याचे निवासस्थान काटेरी तारांनी वेढलेले. खिडकीच्या गजांच्या साक्षीने त्यांची पहिली नजरभेट होते. प्रीतीचा हा मार्ग काटयांनी भरलेला आहे, हे जणू नियती सूचित करते.

वीर काय किंवा संन्यासी, ज्यांचे आयुष्यच समाजकार्यासाठी गहाण पडलेले असते, अशा जोगींवर जीव ओवाळून टाकणे म्हणजे सुखाच्या पांघरुणाखाली दडलेल्या दु:खाला कवटाळणे.

'तुझ्या नजरेला नजर काय दिली, आता माझ्या मनातले मला लपविताही येत नाही' ही गोड तक्रारसुध्दा तिच्यासारखी अबोध.

तिला माहीत नाही, 'तुझसे मिलना ही ज़ुल्म भया रे' ही ओळ म्हणजे पुढल्या भविष्याची नांदी. एका जोगीला परत मोहपाशात जखडणे हा समाजाच्या नजरेतून अपराधच.

कवी शैलेंद्र यांनी 'जोगी' हा शब्द हेतुपुरस्सर वापरला  आहे. तरुण स्त्री आणि संन्यासी यांचा बंध अनेक वेळा साहित्यात दिसतो. सतीच्या मृत्यनंतर कर्पूरगौर शंकर सर्वांगाला राख फासून स्मशानात जातो. या रूपावर भाळून हिमालयकन्या उमा त्याला परत संसारात आणते ती तपस्विनी बनून. भौतिक सुखांचा त्याग करणे तिला सहज शक्य होते. स्थैर्याचा मोह बाजूला सारणे ही सोपी गोष्ट नाही. तपस्याच ती. उमेसारखीच, विरक्तीची आसक्ती राधेने निभावली. कृष्णासारख्या कर्मयोग्याची प्रेयसी होऊन तिने विरहाशीच प्रेमाचे नाते जोडले.

कल्याणीचे पाऊलसुध्दा याच वाटेवर पडले आहे.

'बंदिनी' या सिनेमातील कल्याणीचे वडील वैष्णव कवितांचे अभ्यासक आहेत. ह्या गीतावरही त्यातील प्रतिमांचा प्रभाव जाणवतो.

 देखी साँवली सूरत, ये नैना जुडाए

तेरी छब देखी जब से रे

नैना जुडाए, भये बिन कजरा ये कजरारे

 कृष्ण सावळा. काळयाकभिन्न रात्री पावसाच्या साक्षीने जन्माला आलेल्या कृष्णाचे निळया-सावळया रंगाशी जन्माचे नाते आहे. हा रंग निववणारा, जीवनातील एकाकीपणा, कोरडेपणा, रखरखीतपणा मिटविण्याचे सामर्थ्य असलेला रंग. कल्याणीच्या जीवनात बिकाशच्या रूपाने, शांतता, तृप्ती घेऊन आला आहे. तिच्या डोळयात काजळासारखाच सामावला आहे.

 जाके पनघट पे बैठूँ, मैं राधा दीवानी

बिन जल लिये चली आऊँ, राधा दीवानी

मोहे अजब ये रोग लगा रे

 पहिल्या प्रेमाची असोशी वेगळीच. कुणावरतरी जीवन उधळून टाकावे अशी राधा प्रत्येकाच्या मनात असते. दुसऱ्यामध्ये स्वत:ला विलीन करण्याची तहान म्हणजे राधा. इथे तर प्रेमाची बाधा झाली आहे तिला. जिथे स्वत:लाच हरवून बसली आहे, तिथे पाणी भरून नेण्याची तरी आठवण कुठली असायला!

तुरुंगाच्या पार्श्वभूमीवर बंदिनी हा चित्रपट सुरू होतो. कल्याणीवर खुनाचा आरोप सिध्द झाला आहे. ती ही शिक्षा कसलीही तक्रार न करता भोगत आहे. तुरुंगातल्या एका आजारी स्त्रीची शुश्रुषा करण्याची जबाबदारी तिने स्वत:हून अंगावर घेतली आहे. तिची सेवावृत्ती, तिची मर्यादाशीलता त्या गुन्हेगारी जगाशी विसंगत. स्वत:चा भूतकाळ तिने अंत:करणात पुरून टाकला आहे.

जेलरच्या आग्रहाने ती आपले मन मोकळे करण्यासाठी स्वत:ची कहाणी कागदावर उमटवते, तेव्हा चित्रपटाच्या मध्यावर हे गीत फ्लॅशबॅकच्या रूपात येते. ह्या गीतातली कल्याणी वेगळी. परिस्थितीने तिला अकाली मोठे केले आहे. तरीही ती निरागस आहे. भाबडी आहे. व्यवहारी जगापासून लांब आहे. या गीतात ती पहिल्यांदा हसताना दिसते. प्रेमाचे हे पहिले दर्शन तिच्यातली अल्लड मुलगी जागी करते. बिकाशचे धैर्य, देशासाठी स्वत:चे सर्वस्व द्यायची तयारी, हालअपेष्टा सोसूनही न मावळलेले त्याचे हसू याची मोहिनी पडते तिच्या अनाघ्रात मनावर.

प्रेमाचा स्वीकार सहज करता येणे शक्य नसते. ते यशस्वी होईल का, त्याला मान्यता असेल का, ते निभावले जाईल का,  अशा अनेक प्रश्नांचा गुंता होतो मनात. प्रीतीचा हा अनोळखी आनंद, अनेक शक्यतांचे दु:ख घेऊनच जन्माला येतो.

ती साशंक आहे, गोंधळली आहे यात नवल नाही. तिला आई नाही, तसे या गोष्टी बोलायला जवळचे कुणी नाही. ही ओढ, कासाविशी, हा आवेग घाबरविणारा. ती त्यालाच विनविते,

 मीठी मीठी अगन ये सह न सकूँगी

मैं तो छुई-मुई अबला रे

सह न सकूँगी

मेरे और निकट मत आ रे,

 चित्रपटाच्या शेवटी सुस्थिर, सुखी जीवनाचा त्याग करून, कल्याणी जेव्हा आपल्या पहिल्या प्रेमाची साथ करते, तेव्हा समजते - वैराग्याला मिठीत घेणे ही सोपी गोष्ट नाही. ह्याकरिता, जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवहाराशीच, नाते तोडावे लागते. प्रेम का कर्तव्य हा झगडा नाहीच आहे इथे.  सुखी, समृध्द आयुष्य का प्रेम असा विषम सवाल आहे. एका जोगीवर प्रेम करणारी, कल्याणी शेवटी बैरागन बनून भोवतीच्या वास्तवाची हद्द सहज ओलांडून जाते.

या गाण्याची, चित्रपटापासून वेगळी अशी आठवण आहे.

या काळात एस.डी. आणि लताबाई यांच्यात वितुष्ट आले होते. एका गैरसमजाला बळी पडल्याने त्यांनी एकमेकांबरोबर काम करणे थांबविले होते. या गीतासाठी मात्र एस.डी.ना लताबाईंची आठवण झाली. 'जोगी कबसे तू आया मेरे द्वारे' या गीताने दोन दिग्गजांचा सांगीतिक प्रवास परत सुरू झाला.


प्रिया प्रभुदेसाई

9820067857