विजय राष्ट्रवादी विचारांचा

विवेक मराठी    24-May-2019   
Total Views |

 2019चा हा विजय विचारधारेचा विजय आहे. हा विजय राष्ट्रवादी विचारांचा विजय आहे. असा विचार जगणाऱ्या सर्व लोकांचा आहे. या राष्ट्रवादी विचाराचा विजय व्हावा, तिला जनमान्यता मिळावी, सामान्य जनतेच्या हृदयात तिला स्थान मिळावे म्हणून आतापर्यंत किती लाख भारतपुत्रांनी आपले बलिदान केले असेल, याची गणती नाही. हे सर्व अनाम वीर आहेत. या सर्वांच्या त्याग-तपस्येचा हा विजय आहे.

रालोआ म्हणजे भाजपा, म्हणजे नरेंद्र मोदी, यांचा 2019च्या निवडणुकीत विजय होणार, याविषयी आमच्यासारख्यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. याचा अर्थ आम्ही फाजील आत्मविश्वासात मग्न होतो, असे नाही.

लोकमत अनुकूल असेल तर निवडणुका जिंकल्या जातात. लोकमत प्रतिकूल असेल तर निवडणुका जिंकणे शक्य नाही. लोकमत प्रतिकूल केव्हा होते? जेव्हा लोकांच्या अपेक्षाभंग करणारी कामे सत्ताधारी पक्ष करू लागतो, त्यांचे नेते जेव्हा अपेक्षाभंग करणारे वर्तन करू लागतात, तेव्हा समजले पाहिजे की, निवडणुका जिंकणे शक्य नाही. 2004ची निवडणूक याच कारणासाठी आपण हरलो. 2014 आणि आता 2019 आणि असेच काम पुढील पाच वर्षांत झाल्यास 2024ची निवडणूक जिंकली जाणार आहे.

हा विजय एकटया नरेंद्र मोदी यांचा नाही, एकटया भाजपाचा नाही, भाजपाच्या मित्रपक्षांचा नाही. हा विजय विचारधारेचा विजय आहे. हा विजय राष्ट्रवादी विचारांचा विजय आहे. हा राष्ट्रवाद या देशात जिवंत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेरा वर्षे अंदमानात काढली. डॉ. हेडगेवारांनी शब्दशः रक्ताचे पाणी केले. श्रीगुरुजींनी चंदनाप्रमाणे आपला देह झिजविला. बाळासाहेब देवरसांनी ज्योतीतल्या शेवटच्या घटकेपर्यंत प्रकाश दिला. डॉ. शामाप्रसादांनी या विचारधारेसाठी बलिदान दिले आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना हत्येचा आघात सहन करावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू गर्जना महाराष्ट्रात निनादत ठेवली आणि भगवा झेंडा फडकविण्याचे स्वप्न सर्वांपुढे ठेवले.

या राष्ट्रवादी विचाराचा विजय व्हावा, तिला जनमान्यता मिळावी, सामान्य जनतेच्या हृदयात तिला स्थान मिळावे, म्हणून आतापर्यंत किती लाख भारतपुत्रांनी आपले बलिदान केले असेल, याची गणती नाही. हे सर्व अनाम वीर आहेत. 'असू आम्ही सुखाने पत्थर पायातील' असे म्हणून किती लाखांनी स्वतःला भारतमातेचे भव्य मंदिर उभे करण्यासाठी पायात गाडून घेतले असेल, सांगता येत नाही. या सर्वांच्या त्याग-तपस्येचा हा विजय आहे.

नरेंद्र मोदी या विचारधारेचे प्रतीक झाले आहेत, जिवंत उदाहरण आहेत, चालता-बोलता आदर्श आहेत. स्वतःसाठी काही करायचे नाही, जे काही करायचे ते देशासाठी. 'तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण' या गीतातील ही ओळ जगणारा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी. विचारधारा व्यक्तिरूपात दिसावी लागते. चालता-बोलता आदर्श समोर लागतो. नाही तर विचार केवळ भाषणात आणि पुस्तकात राहतात.

एक नरेंद्र मोदीच तसे आदर्श झाले असे नाही. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी बहुतेक जण आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल टाकणारे झाले. देशासाठी समर्पित, राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी सगळयात शेवटी, हा विचार जगणारी माणसे उभी राहिली. ती सत्तास्थानी राहिली. सत्तास्थानावरील माणूस चोवीस तास लोकांपुढे असतो. त्याचे चालणे, त्याचे वागणे, त्याचे बोलणे, सर्व काही लोकांपुढे घडत असते. हा विजय विचारांचा आणि विचार जगणाऱ्या सर्व लोकांचा आहे.

आपला भारत 1947 साली स्वतंत्र झाला. भारत नावाचे राज्य जन्माला आले. या राज्याचे राष्ट्रात रूपांतर करण्याचा प्रवास सुरू झाला. तसे आपले राष्ट्र प्राचीन आहे, पण राष्ट्रभावना क्षीण झाल्या. जात, पंथ, भाषा, याच्या अस्मिता मोठया झाल्या. त्या पुसून टाकून आपण सगळे भारतीय राष्ट्राचे अंग आहोत, हा भाव निर्माण करण्याचे काम सुरू झाले. आपल्या राज्यघटनेने सांगितले की, आम्हाला राष्ट्राचे ऐक्य आणि राष्ट्राची एकात्मता निर्माण करायची आहे.

हा प्रवास अडथळयाचा झाला. ज्यांना राष्ट्र मान्य नाही, भारत एक राष्ट्र आहे हेदेखील ज्यांना मान्य नाही, अशा लोकांनी देशात धुमाकूळ घातला. 2014 साली त्यावर मर्मांतक प्रहार झाला. दुसरा प्रहार आता म्हणजे 2019ला झाला. राष्ट्राविषयी विपरीत विचार करणारी मंडळी 'असे कसे घडले, असे कसे झाले, आपण कुठे चाललो आहोत, देशाचे काय होणार, लोकशाहीचे काय होणार, आपण मध्ययुगात चाललो आहोत' असा विलाप करीत बसली आहेत. काल-परवापर्यंत त्यांना वाटत होते की, देश आपणच चालवतो. पण त्यांना हे समजले नाही की खेडयापाडयातील सामान्य माणूस, रिक्षा चालविणारा, भाजी विकणारा, शेतकरी आणि शेतमजूर, सामान्य महिला, देश चालवीत असतात.

त्यांना देश समजतो. त्यांना आपली संस्कृती समजते. त्यांना आपली मूल्यपरंपरा समजते. त्यांना आपले अध्यात्म समजते. त्यांना आपले रितीरिवाज समजतात. आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे त्यांना हे समजते की, या सर्वांशी एकरूप झालेले कोण आहेत. आणि जे कुणी आहेत ते आपले आहेत, हे त्यांना बरोबर समजते. म्हणून पंचा नेसणारे, हातात काठी असणारे, महात्मा गांधी त्यांना आपले वाटतात. भगवी वस्त्रे घालणारे विवेकानंद त्यांना आपले वाटतात. धोती, कुर्ता, टोपी घालणारे लालबहादुर शास्त्री त्यांना आपले वाटतात. आणि दुर्गेचा अवतार घेणारी इंदिरा गांधीदेखील त्यांना आपली वाटते. देश हे लोक चालवितात.

या लोकांविषयी विवेकानंद म्हणतात, ''घोर निद्रेतून आपली भारतमाता आज जागी होत आहे. तिच्या जागृतीला कोणी रोखू शकत नाही. ती पुन्हा कधीही झोपी जाणार नाही. कोणतीही बाह्य शक्ती तिला रोखू शकत नाही. तिच्या पदतली अफाट शक्तीचा उदय होत आहे.'' 2019च्या निवडणुकीचे निकाल आपल्याला या शक्तीच्या एका अंगाचे दर्शन घडवीत आहे. हे अंग आहे राजकीय इच्छाशक्तीचे. आध्यात्मिक अंग, सामाजिक अंग, आर्थिक अंग, अशी इतर विविध अंगे आहेत.

आश्चर्याची गोष्ट अशी की, विवेकानंदाचा आशय महात्मा गांधी आपल्या शब्दात अशा प्रकारे मांडतात - ''सत्याचा निरंतर शोध, याचे दुसरे नाव हिंदू धर्म आहे. (हिंदू धर्म म्हणजे पूजा पध्दती, चातुरर््वण्य, अंधश्रध्दा नव्हे, हे गांधीजींनी सुचविले.) सत्य म्हणजेच परमेश्वर. असा हिंदू धर्म मृत्युपंथाला आज लागलेला दिसत असला, निष्क्रिय झालेला वाटत असला, वाढीस प्रतिकूल वाटतो, याचे कारण असे की, आम्ही अत्यंत थकलेलो आहोत आणि ज्याक्षणी हा थकवा दूर होईल, त्याक्षणी हिंदू धर्म जगावर यापूर्वी ज्या तेजस्वीपणे प्रकट झाला नसेल, त्या तेजाने जगावर कोसळेल.'' (भावानुवाद.)

पाच वर्षांपूर्वी झालेली निवडणूक आणि तिचे निकाल आणि आता झालेली निवडणूक आणि तिचे निकाल, आणि त्यातून येणारे परिवर्तन, आपल्या दूरदृष्टीने पाहणाऱ्या आपल्या या दोन राष्ट्रपुरुषांना प्रणाम! त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनादेखील प्रणाम!

जेवढा मोठा विजय, तेवढा तो पचविणे कठीण असते. त्यासाठी विशाल अंतःकरण आणि विशाल उदर पाहिजे. ज्यांनी शिव्या दिल्या, वाटेल ते आरोप केले, ती सर्व मंडळी आपलीच आहेत, त्यांच्याबद्दल द्वेषभावना नको. त्यांना हिणवू नये. त्यांच्या पराभवाचे भांडवल करू नये. आपल्या वागणुकीने त्यांना धीर द्यावा. त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्र सर्वांचे आहे आणि ते सर्वयुक्तच असले पाहिजे. अध्यात्मात मुक्ती हे ध्येय असते, राजकारणात युक्तता हे ध्येय हवे.

vivekedit@yahoo.com