संघतपस्येचा पुण्यप्रभाव

विवेक मराठी    28-May-2019   
Total Views |

सत्ता त्यांच्या हातात आली म्हणजे सत्ता संघाच्या हातात आली असे होत नाही. सत्ताप्राप्ती हे संघाचे लक्ष्य नसल्यामुळे सत्ता अनुकूल असली काय किंवा प्रतिकूल असली काय, संघावर त्याचा काही परिणाम होत नाही. केंद्रस्थानी स्वयंसेवक सत्तेवर गेल्यामुळे संघशाखा वाढत नाहीत आणि ती न गेल्यामुळे संघशाखा कमी होत नाहीत, हा संघाचा गेल्या नव्वद वर्षांचा अनुभव आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019च्या निवडणुकीत भाग घेतला होता का? संघाने, ठराव करून भाजपाला मत दिले पाहिजे, असे सांगितले होते का? संघाने आदेश काढून सर्व शाखांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशी आहेत. संघ सत्तेचे राजकारण करीत नाही, संघ निवडणुकांत भाग घेत नाही, अमुक एका पक्षाला मत द्या, असे संघ सांगत नाही.

 असे जरी असले, तरी निवडणूक निकालांवर भाष्य करताना अनेकांनी म्हटले की, हा संघाचा विजय आहे. संघ विचारधारेचा विजय आहे. वाचायला आणि ऐकायलाही विचित्र वाटावे अशी स्थिती आहे. निवडणुकांत संघ नसताना, संघाचा एकही उमेदवार उभा नसताना संघ कसा काय विजयी झाला? बुचकळयात टाकणारा हा प्रश्न आहे.

या निवडणुकीत स्वयंसेवक विजयी झालेले आहेत. स्वयंसेवक नसलेले अनेक जण भाजपाच्या तिकिटावर विजयी झालेले आहेत. ज्या-ज्या संस्थात स्वयंसेवक काम करतात, त्या-त्या संस्थांनी आपआपल्या परीने निवडणुकांत भाग घेतला. सा. विवेक हे संघविचारधारेचे साप्ताहिक आहे. या साप्तहिकानेदेखील निवडणूक प्रचारात भाग घेतला आणि राष्ट्रीय विचाराचे लोक निवडून यावेत असा प्रचार केला.

निवडणुका घोषित झाल्यानंतर निवडणुकांत संघाला ओढण्याचा अनेकांनी आपआपल्या परीने प्रयत्न केला. मायावती म्हणाल्या, ''नरेंद्र मोदी यांचे सरकार हे बुडते जहाज आहे. संघाने तिचा त्याग केला आहे. वचनपूर्तता न झाल्यामुळे संघाने, भाजपाला सोडून दिले आहे. निवडणूक प्रचारात संघ स्वयंसेवक कोठेही दिसत नाही, त्यामुळे मोदी यांना घाम फुटला आहे.''

 बीबीसी बातमी देताना तिला संपादकीय मुलामा लावून देत असते. बीबीसीचे शब्दप्रयोगही बघण्यासारखे असतात. निवडणूक निकालपूर्व बातमीपत्रात ते कसे दिसतात ते बघू. 'भारतात फार मोठया लोकांची अपेक्षा अशी आहे की, हिंदू राष्ट्रीय पक्ष भाजपाचे नेते नरेंद्र मोदी हे भारताचे पुन्हा पंतप्रधान होतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या शक्तिशाली हिंदू राष्ट्रीय संघटनेने भाजपाला महत्त्वाचा प्रचाराचा पाठिंबा दिलेला आहे. परंतु संघ या संघटनेचे हेतू प्रश्न उपस्थित करतात. काही भारतीयांना असे वाटते की, संघ आपले मत सर्व देशावर लादू इच्छितो.'' बातमीतच संपादकीय कसे द्यायचे याचा हा उत्तम नमुना आहे.

एनपीआर या विदेशी मिडियाचे म्हणणे असे - 'या निवडणुकीत हिंदू राष्ट्रवादावर सार्वमत घेतले जाणार आहे... भविष्यातील भारत सेक्युलर प्रजासत्ताक राहणार की हिंदू राज्य होणार, याचा निर्णय होणार आहे. सेक्युलर प्रजासत्ताकाने बहुविधतेवर भर दिला होता. भारताचे ऐक्य तिच्या विविधतेच्या सबलीकरणातच आहे, असा सेक्युलर प्रजासत्ताकाचा सिध्दान्त होता.'

इंडिया टुडे म्हणतो, 'इसमें कोई शक नहीं है की 2019 का लोकसभा चुनाव भारतीय जनता पार्टी की जीत से ज्यादा संघ की प्रतिष्ठा का सवाल है। अपने वैचारिक सिपाही का समर्थन ही तो आरएसएस के सपनों की मंजिल है। हां, एक बात और है की आज पार्टी के भीतर नरेंद्र मोदी का कद इतना बडा हो गया है की अब तो संघ के लिये भी नमो का गुणगान करना उनकी जरुरत से ज्यादा मजबूरी लगता है। एक गुरु के लिये अगर उसका चेला अनुशाषित है और संगठन के विचारो के प्रति श्रध्दा भाव रखता है तो संघ के लिये इससे बडी बात क्या होगी?'

संघ ही काही निष्क्रिय लोकांची संघटना नाही. संघाचे काम ठाम विचारधारेवर उभे आहे. आपल्याला कुठे जायचे आहे, हे निश्चित आहे, कसे जायचे हेदेखील निश्चित आहे. त्यामुळे संघ ही जगातील एकमेव अशी संघटना आहे, जिच्या नेत्यात आणि अनुयायात आपल्या विचारासंबंधी, आपल्या गंतव्य स्थानासंबंधी कसलीही शंका नसते.

संघाचे काम राष्ट्र उभारणीचे आहे. अनेक अज्ञानी विद्वानांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हे समजत नाही. ते विद्वान असल्यामुळे आपण त्यांना सांगू शकत नाही. संघाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचे नाही. जे मुळातच आहे, ते निर्माण करणारे आम्ही कोण? हिंदू राष्ट्राचे लोकांना विस्मरण झाले आहे, त्याची जाणीव करुन देणे, हेच संघाचे काम. योगी आदित्यनाथ भगव्या कपडयात असतात, ते मुख्यमंत्री झाले, त्यामुळे हिंदू राष्ट्र आता होणार, असे एका घटनातज्ज्ञाने लिहिले. घटनातज्ज्ञही हास्यास्पद विधाने करू शकतो, हे तेव्हा माझ्या लक्षात आले.

राज्य हे हिंदू राष्ट्राचे एक अंग आहे. हिंदू राष्ट्राचे राजकीय अंग म्हणजे भारतीय राज्य. हे भारतीय राज्य कसे चालावे, कसे चालले पाहिजे, कोणत्या विचारांना बळ मिळाले पाहिजे, राज्यावर कोण बसले पाहिजेत, इत्यादी विषयासंबंधी संघाची ठाम मते आहेत. आमचे राज्यकर्ते प्रामाणिक असले पाहिजेत, त्यांनी भ्रष्टाचार करता कामा नये, ते देशाला समर्पित असले पाहिजेत. स्वतःचे नाममाहात्म्य वाढविण्यासाठी, परिवाराचे हित बघण्यासाठी त्यांनी सत्तेचा उपयोग करता कामा नये, हे संघाचे म्हणणे आहे.

सत्ता राबविताना जातिकलह निर्माण करू नये, धार्मिक भेद वाढवू नये, समाजातील एका गटाचे लाड करून अन्यांचा तिरस्कार करू नये, सर्वांना न्याय देणारे राज्य असले पाहिजे हे संघाचे म्हणणे आहे. संघाने हे आज सांगितले आहे असे नाही. जन्मापासून संघ हेच सांगत आलेला आहे. सरसंघचालक विजयादशमीच्या उत्सवात समाजाला उद्देशून भाषण करतात. या भाषणात ते राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा करतात. या भाषणांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर वर जे काही म्हटले आहे ते लक्षात येईल.

संघ स्वयंसेवक देशाचा नागरिक असतो. एक नागरिक म्हणून त्यची काही कर्तव्ये असतात. तो राजकीयदृष्टया जागरूक असतो. यातील काही स्वयंसेवकांना वाटते की, आपण राजकारणात गेले पाहिजे. ते राजकारणात जातात, निवडणूक लढवितात, कधी निवडून येतात, कधी पडतात. अशा स्वयंसेवकांनी भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष उभा केला आणि या पक्षाच्या माध्यमातून आता ते केंद्रस्थानी गेले आहेत, सत्ता त्यांच्या हातात आली आहे.

सत्ता त्यांच्या हातात आली म्हणजे सत्ता संघाच्या हातात आली असे होत नाही. सत्ताप्राप्ती हे संघाचे लक्ष्य नसल्यामुळे सत्ता अनुकूल असली काय किंवा प्रतिकूल असली काय, संघावर त्याचा काही परिणाम होत नाही. केंद्रस्थानी स्वयंसेवक सत्तेवर गेल्यामुळे संघशाखा वाढत नाहीत आणि ती न गेल्यामुळे संघशाखा कमी होत नाहीत, हा संघाचा गेल्या नव्वद वर्षांचा अनुभव आहे. जे स्वयंसेवक सत्तेवर गेलेले आहेत, त्यांनी देशाचा प्रथम विचार करावा, सर्व नागरिकांचा विचार करावा, सर्वांना न्याय मिळेल अशी धोरणे आखावी, सगळे कृत्रिम भेद संपवून टाकावेत, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

सर्व शाळांतून संघाची प्रार्थना म्हटली जावी, सर्व सरकारी निमसरकारी नोकरदारांनी शाखेत जावे असले कायदे करणे या सरकारकडून अपेक्षित नाही. असले कायदे माझ्या मते हास्यास्पद कायदे ठरतील.

निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानादेखील संघाचे नित्य आणि नैमित्तिक कार्यक्रम चालू राहतात. एप्रिल ते जून हे महिने संघ शिक्षा वर्गाचे महिने असतात. प्रत्येक राज्यात त्या-त्या राज्याच्या संघकामाच्या स्थितीनुसार चार ते सहा वर्ग होतात. या वर्गाच्या रचनेत देशभरातील हजारो कार्यकर्ते गुंतलेले असतात. ते कोणत्याही बूथवर जाऊ शकत नाहीत. प्रचारात भाग घेऊ शकत नाहीत. त्यांना वर्ग यशस्वी करण्यात सर्व शक्ती लावावी लागते. संघविचारधारेतील वेगवेगळया संघटनांची जवळजवळ अशी स्थिती असते. त्यांचे त्यांचे ठरलेले कार्यक्रम ठरलेल्या पध्दतीनुसार होत जातात. निवडणुकांच्या रणधुमाळीत तेदेखील फारसे उतरत नाहीत.

तरीही निवडणुकांतील विजयाचे श्रेय अनेक जण संघालाच देतात. संघाच्या सातत्याच्या कामामुळे, विपरीत परिस्थितीला शरण न जाता काम करत राहण्याच्या प्रवृत्तीमुळे सर्व समाजावर त्याचा परिणाम होतो. तो आपोआप होतो. ही तपस्या आहे. या तपस्येचा पुण्यप्रभाव समाजावर आपोआप होतो. तो मुद्दाम घडवून आणावा लागत नाही. संघाचे स्वयंसेवक प्रामाणिक आहेत, निष्ठेने काम करणारे आहेत, आपआपसात भांडत नाहीत, त्यांच्यामध्ये जबरदस्त शिस्त आहे आणि ते देशाचाच विचार करतात, हे जनतेला मीडियाच्या माध्यमातून न सांगताच समजते. माझा प्रकाश बघायला या, असे सूर्याला सांगावे लागत नाही. माझ्या चांदण्याचा आनंद लुटायला या, हे चंद्राला सांगावे लागत नाही. तसे संघाचे आहे. तो स्वयंप्रकाशित आहे. आणि त्याचा प्रभाव आपोआप होत जातो.

ज्या स्वयंसेवकांनी राजकीय पक्ष निर्माण केला, त्यांना याचा आपोआप फायदा होतो. जनता आपल्या स्तरावर भेद करीत नाही. हा संघाचा कार्यकर्ता आणि हा भाजपाचा, असा भेद लोकांच्या मनात राहत नाही. जे संघात तेच भाजपात असणार, असे लोकांना वाटते. म्हणून जनता भाजपाच्या मागे उभी राहते. निवडणुकांत संघ नसतो, पण स्वयंसेवक असतात आणि स्वयंसेवक संघाचा विचार घेऊन पुढे जातात. ज्यांना हे समजत नाही, ते म्हणणार संघाचा विजय झाला आणि ज्यांना हे समजत ते म्हणणार, संघ विचार राजकारणात घेऊन जाणारे स्वयंसेवक विजयी झालेले आहेत.

vivekedit@gmail.com