रानमेव्यांचा उत्सव

08 May 2019 15:19:00

***आर्या जोशी**** 

निसर्ग ऋतुचक्रानुसार बहरत असतो. त्या-त्या ऋतूत येणारी फळं, भाज्या हे त्या-त्या स्थानिक प्रदेशातील लोकांच्या आहारात असण्यालाही विशेष महत्त्व आहे. उन्हाळयात आंब्याच्या जोडीने रानावनात निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या रानमेव्याकडेही डोळेझाक करून चालणार नाही.

   अक्षय्य तृतीयेला पहिला आंबा खायचा हे लहानपणापासून पक्कं डोक्यात जुळलेलं समीकरण आहे. निसर्ग ज्या गतीने आणि ज्या पध्दतीने फळाला परिपक्वता देईल, ते फळ आरोग्यासाठी अधिक लाभदायक असं आता हळूहळू समाजमनाला उमगायला लागलं आहे. 

खरं तर निसर्ग ऋतुचक्रानुसार बहरत असतो. त्या-त्या ऋतूत येणारी फळं, भाज्या हे त्या-त्या स्थानिक प्रदेशातील लोकांच्या आहारात असण्यालाही विशेष महत्त्व आहे. भारतीय धार्मिक परंपरेत पूजा करताना 'पूजार्थे ऋतूकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि'।  असं म्हटलं जातं ते यासाठीच!

भर उन्हाळयात जिवाची काहिली होत असताना आपण कलिंगड, उसाचा रस, ताक यांनी शरीराला आणि मनाला थंडावा द्यायचा प्रयत्न करतो. चैत्रगौरीच्या तृतीयेपासून  पन्ह्यालाही मागणी वाढते. निसर्गात पळस, पांगारा आपला आब सांभाळून उभे असतात. कोकिळ पक्ष्याच्या आवाजाने जाग येणारी पहाट आल्हाददायकच वाटते. आंब्याच्या मोसमाची चाहूल लागताच वर्षातून एकदाच येणाऱ्या या फळांच्या राजाची वाट पाहिली जात नसेल तरच नवल. पण आंब्याच्या जोडीने उन्हाळयात रानावनात निसर्गाने मुक्त हाताने उधळलेल्या मेव्याकडेही डोळेझाक करून चालणार नाही.

वर्षानुवर्षं दऱ्या-डोंगरात राहणाऱ्या आपल्या वनबांधवांचा तर हा मेवा विशेष जिव्हाळयाचा.

मला या मेव्याचं नवल अशासाठी वाटतं की या रानमेव्याला कुणी आवर्जून पाणी घालतं असं नाही, त्याच्या मुळाशी खत घातलं जात नाही. असं असूनही अस्ताव्यस्त - किंबहुना आपल्या मर्जीने हवं तसं वाढलेल्या झाडांवरचा हा रानमेवा खऱ्या अर्थाने नैसर्गिक असतो!

खेडयापाडयातून लहान-थोरांना आवडणारा हा मेवा शहरातही उपलब्ध होतोच! उन्हाळयात शहरातील एखाद्या गल्लीच्या टोकापासून आवाज येऊ लागतो -

लई काळी मैना डोंगरची मैना

मैना आली मैना

उन्हाळयातली काहिलीत खरी गंमत आणणारा हा रानमेवा सर्वांना माहीत असाच आहे.

महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम घाटात, कोकणात तर उन्हाळयात या मेव्याची चंगळच अनुभवायला  मिळते.

 करवंद ही ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही माहीत असलेली मेव्यातली गंमत आहे. बाजारात करवंद विकत मिळतातच. पण थोडं शहरातून बाहेर पडून एकाद्या गड-किल्ल्याच्या दिशेने जायला लागलं की वाटेतल्या पाडया-वस्त्यांवरची लहान मुलं रस्त्याच्या बाजूला पानाच्या द्रोणात बांधलेली करवंद विकायला उभी असलेली दिसतात. पण तोंड लाल आणि हात चिकट करून, करवंदाच्या जाळीत घुसून थेट झाडावरून पोटात करवंद पोहोचवण्याची मजा अनुभवायची असेल, तर कोकणातल्या एखाद्या सडयावर नक्की जा. करवंदाच्या जाळीतून करवंद तोडताना फळाबरोबर चिकही हाताला लागतो. फळ धुऊन घेणं वगैरे स्वछतेचे सोपस्कार बाजूला ठेवून काळी, लाल करवंद तोंडात टाकण्याची गंमत वेगळीच आहे.

हापूस आंबा किंवा पायरी आंबा हा तर आता जगात प्रसिध्द आहे. पण रानावनात सापडणारा रायवळ आंबा चोखून खाणं हाही अनुभव घेण्यासारखा आहे. हापूसइतकी गोडी किंवा नीटनेटकेपणा या आंब्याला नसला, तरी या केसाळ आंब्यातून रस चोखून खाणं उन्हाळयात आनंद देतं. कोकणात काही ठिकाणी काळा आंबा खाल्ल्याचं आठवतं. हा आंबा आकाराने लहान असतो, पण तो चवीला सुरेख लागतो. आणि विशेष म्हणजे याची साल अगदी पातळ असल्याने हा सालासकट खाता येतो.

आंब्यापाठोपाठ कोकण प्रांताचा महत्त्वाचा मेवा म्हणजे फणस. बाळफणसांची भाजी - जिला पुसभाजी असंही म्हटलं जातं - ही तर कोकणातली विशेष पाककृती आहे. या भाजीत ओले काजू घालूनही तिची चव अधिक रुचकर केली जाते. बाळफणसाचे गरे, अर्धे पिकलेले गरे आणि पूर्ण पिकलेले गरे अशा सर्व अवस्थतेल्या गऱ्यांची, भरपूर ताजा ओला नारळ घालून केलेली भाजी म्हणजे कोकणात पर्वणीच! कापा आणि बरका फणस म्हणजे कोकणी माणसाचा जीवच! राईतल्या फणसाचा फडशा पाडताना रमलेली माकडं पाहून त्यांना पळवून लावण्याऐवजी काही वेळा आपण तो खेळ पाहण्यातच रमून जातो! बरका फणस काहीसा मऊसर असतो, त्यामुळे कापा फणसाचं अधिक आकर्षण वाटणं स्वाभाविक! पण तोंडात विरघळणारा बरकाही सुंदर लागतो, बरं का!

 काजू हा सुक्यामेव्यात मानाचं स्थान पटकावून आहे. पण रानमेवा म्हणून कोकणात काजूची बोंडं खायला नक्की जा. काजू काढून घेतल्यानंतर उरलेल्या बोंडातून एक गोडसर रस चोखायला मिळतो. हात बरबटून कोपरापर्यंत ओघळणारा हा रस चोखून तोंडही काळं-चिकट होतं! कोकणात या बोंडांची भाजीदेखील केली जाते.

कैरी, रातांबा म्हणजे कोकम ही आंबट फळं हा कोकणातला  खास उन्हाळी मेवा!

कोकणातल्या अंगण-परसात उन्हाळयाच्या दिवसात वाळत घातलेले कोकम हाही जिभेवर रेंगाळणारा रानमेवाच आहे. आमसुलं करण्यासाठी कोकमाची साल मीठ लावून उन्हात पसरून ठेवतात. चिंचेच्या बरोबरीने आमसूल भाजी-आमटीत वापरलं जात असलं, तरी अशा वाळवणात हात घालून खाण्याची मजा अनुभवण्यासारखी आहेच!

आंबट कैरीला तिखट-मीठ लावून खाणं हा तर सर्वांचा बालपणापासूनचा उन्हाळी उद्योगच असतो. करवंदाच्या जोडीनेच हात-तोंड जांभळया रंगात रंगवणारं जांभूळ हाही विशेष रानमेवा आहे. जांभूळ हे मधुमेहावर गुणकारी मानलं जातं.

अटक हे फळ याच मोसमात खायला मिळतं. मध्यम आकाराच्या आवळयाएवढं चवीला आंबट-तुरट असं हे फळ एकदा चाखून नक्की पाहा.

कोकणात उन्हाळयात येणारं आणखी एक जंगली फळ म्हणजे 'आळू'! अळू नव्हे हं! साधारण पेरूएवढा आकार झाला की याला एक उग्र असा वास येतो.

धुंद करणाऱ्या मंद सुवासाची बकुळ जशी मन मोहवते, तसंच तिचं फळही उन्हाळयात खाल्लं जातं. या फळाला 'ओवळी' म्हटलं जातं. तुलनेने अपरिचित असा हा मेवा आहे. आमच्या परसात मात्र माकडांची टोळी येऊन या ओवळया फस्त करून जाते.


इंडियन ब्लू बेरी या नावाने ओळखलं जाणारं भोकराचं फळ हाही उन्हाळयातील मेवाच! औषधी गुणधर्म असलेल्या भोकराचं लोणचं केलं जातं, तसंच फळांची भाजीही करतात.

पाणीदार, लुसलुशीत आणि पारदर्शक ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करतात. चवीला मधुर असलेले ताडगोळे अलीकडे  शहरातील बाजारात उपलब्ध आहेत. पण तरीही तुलनेने समाजात अजून ते माहीत असण्याचं प्रमाण तसं कमी आहे, त्यामुळे समोर दिसले की आवर्जून विकत घेऊन खाणारे ग्राहक तुलनेने कमीच. 

फेब्रुवारी-मार्चमध्ये सातपुडयाच्या डोंगराळ प्रदेशात  उन्हाळयाच्या सुरुवातीला येणारी मोहाची फुलं आणि फळं म्हणजे वनवासी बांधवांचा आल्हादच. मोहाच्या फळात साखर असल्याने हे फळ चवीला गोड. आदिवासी आणि ग्रामीण महिला या फळांची भाजीदेखील करतात. मोहाच्या फुलापासून मद्य तयार केलं जात असल्याने आदिवासी बांधव मोहाची रात्री उमलणारी फुलं सकाळी गोळा करतात. यातून त्यांना उत्पन्नाचं साधनही मिळतं.

मावळ खोऱ्यात एक म्हण आहे - 'पाडव्याला पाड आणि अखितीला गोड'. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाणपोई घालावी आणि भर उन्हाळयाचा दाह कमी करणारं असं दान करून पुण्य मिळवावं, असं धर्मशास्त्र सांगतं. पण निसर्ग कोणतीही पुण्याची अपेक्षा न करता आपल्याला असा छान रानमेवा खुला करून देतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात त्याचं महत्त्व अविवाद्य आहेच. अलीकडच्या गतिमान आणि आधुनिक जीवनशैलीत उन्हाळयात थंड पाणी, शीतपेयं यांना पसंती दिली जाते. पण कधीतरी निसर्गातील या मेव्याचा शोध घेऊ या, भेटू या या रानमेव्यांच्या झाडांना आणि केवळ ओरबाडून खाण्यापेक्षा त्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्नही करू या. औषधी गुणधर्मानुसार उपयुक्त असा हा मेवा पुढील अनेक पिढयांना खाण्यासाठी मिळावा अशी इच्छा मनाशी बाळगत ही रानमेवा जगवण्यासाठी पाऊल पुढे टाकू या.

या लेखात काही मोजक्या रानमेव्याचा उल्लेख आला आहे. तुम्हाला आणखी काही अशी खास फळं माहीत असतील, तर  तीही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण प्रत्येक प्रदेशानुसार वनस्पतींचं वैविध्य आहेच!

शेवटी काय! निसर्ग आपल्या सर्वांचे हे लाड पुरवायला सज्ज आहे, गरज आहे ती आपणही त्याची काळजी घ्यायची! चला तर मग, रानमेवा चाखून हा उन्हाळा अधिक थंडगार करू या!

Powered By Sangraha 9.0