कचरा व्यवस्थापन आणि भंगारवाले सहभाग

स्रोत: विवेक मराठी    दिनांक10-Jun-2019

भंगारवाल्या बांधवांचे स्वतःचे असे एक जाळे (Network) आहे. अनेक संस्था, कारखाने, पुनर्चक्रण स्रंस्था (Recyclers), त्यांच्या या साखळीचा उपयोग करून, त्यांच्याशी संवाद साधून 'स्वच्छ डोंबिवली अभियान' हा स्तुत्य उपक्रम चालू आहे.

 

देश स्वतंत्र होऊन 71 वर्षे लोटली, अनेक राजकीय वादळे आली-गेली, या सर्व काळात देशात प्रगतीचे अनेक प्रकारचे वारे वाहिले. खरे पाहिले, तर प्रत्येक राजकीय पक्षाला जर जनतेसमोर स्वतःच्या पक्षाची प्रतिमा उजळ किंवा उजवी करायची असेल, तर हा प्रगती नावाचा वापर सररास करणे अनिवार्य आहे. बरे! प्रगती झालीच पाहिजे, परंतु आपल्या देशाला एक प्रकारे शाप आहे की काय? जिथे लोकांना स्वतःला लोकशाहीच्या आड शिस्त सोडून वागण्याची दिलेली मुभाच आहे की काय?

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 प्रगतीच्या नावावर वाढत चाललेला उपभोक्तावाद, अर्थातच त्यायोगे येणारे मॉलस, अनेक उत्पादने, वापरा आणि फेकून द्या इत्यादी गोष्टींचा वाढता प्रभाव हे सर्व वाढत्या लोकसंख्येबरोबर, वाढत्या शहरीकरणाबरोबर आलेच! पण याला पोसताना आपण पर्यावरणाकडे व स्वच्छतेकडे केलेली डोळझाक, दुर्लक्ष हे मोठया प्रमाणावर बोचू लागले आहे. काही उदाहरणे - 2005 साली झालेली मुंबईची अवस्था आपल्या सर्वांच्या स्मरणात असेलच. अनेक तज्ज्ञांनी याची अनेक कारणे शोधून काढली, पण या सर्वांचा सूर एकाच होता, तो म्हणजे कचरा!

कचरा होण्याचे कारण म्हणजे आपण सर्व या उपभोक्तावादाच्या जाळयात पुरते अडकलो आहोत, पण त्यातून स्वतःला मोकळे ठेवणे विसरलो. कसे ते पाहू! 

कचरा व्यवस्थापन हे एक शास्त्र

एखाद्या मुलाने दुकानदाराकडून चॉकलेट घेतले व तिथेच खाल्ले, पण त्याला हे नाही शिकवण्यात आले की ते कचऱ्याच्या कुंडीत टाकावे. दुसरे उदाहरण म्हणजे, सिगारेट, गुटखा खाणारे यांच्याकडून सिगारेट, गुटखा पाकिटे, बडीशेपची पाकिटे, हॉल्सची किंवा मिंटची पाकिटे इत्यादी सररास रस्त्यावर टाकले जातात आणि ते सर्व गटारे, नाले तुंबवतात. तिसरे म्हणजे, भाजी घ्यायला जाणारे भाजीवाल्याकडून हमखास पिशवी घेतात आणि मग ती पिशवी कचऱ्यात टाकून दिली की ती गटारे-नाले यात वाहून नेली जाते, कारण घरातला कचरा कचराकुंडीत आणि कुंडीतील कचरा फक्त कुंडीत न राहता आजूबाजूला पसरून उकिरडे तयार करतो. आपल्याकडे असे अनेक प्रकार सहज घडतात. सफाई कामगार त्यांना डम्पिंग ग्रााउंडवर टाकतात. म्हणजे कचऱ्याला अंत हा नाहीच! आता इथून पुढची प्रगती म्हणजे यंत्रणेचे सक्षमीकरण, नियमांची अंमलबजावणी यात प्रामुख्याने जनतेतील स्वच्छता, कचरा, प्रक्रिया (Process) याबद्दल जागरूकतेचा अभाव, शिस्तीचा अभाव, नियमांची खिल्ली सहज उडवणे इत्यादी दुर्लक्षित गोष्टी. कचरा व्यवस्थापन हेही एक शास्त्र आहे आणि जर त्यावर विश्वास ठेवला तर त्याचे व्यवस्थापन हे काही रॉकेट सायन्स नाही. अगदी छोटया मुलापासून ते वायोवृध्दांपर्यंत, गरिबातील गरीब व्यक्तींपासून ते श्रीमंतीत लोळणाऱ्या, राजकारणात तरंगणाऱ्यांपर्यंत सहज शक्य आहे, तसेच हा एक संस्कार असायला हवा!

कचरा व्यवस्थापनात ओला कचरा व सुका कचरा हे दोन प्रमुख भाग येतात. ओल्या काचऱ्यासंदर्भात अनेक उपाय आहेत. जसे घरात आपल्या फुटलेल्या बदली, फुटलेली कुंडी यात हा प्रयोग करू शकतो. अनेक YouTube व्हिडिओज उपलब्ध आहेत. मॅजिक बकेट, पालिकेचे बायोगॅस प्लांट आहेत. सोसायटी स्तरावर अनेक उपाय उपलब्ध आहेत. फक्त इच्छाशक्ती हवी!


 पण नंतर काय?

मुख्य मुद्दा आहे तो सुक्या कचऱ्याचा, सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा. सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण हे प्रत्येक घराघरांत होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अगदी सोपा उपाय असा की आपण घरात वेगवेगळया पिशव्या कराव्यात. एक पिशवी प्लास्टिक/थर्माकॉल, दुसरी कागद, तिसरी धातूंसाठी, चौथी काच आणि पाचवी इतर गोष्टींसाठी. यात E-Waste व अन्य गोष्टींचा समावेश करता येईल. आपला जेव्हा जेव्हा वस्तूंचा वापर होईल आणि कचरा निर्मिती होईल, तेव्हा लगेच या पिशव्यांमध्ये भरला जाईल. लोकांच्या वापरावर या पिशव्यांचा भरण्याचा कालावधी अवलंबून आहे. प्लास्टिकची पिशवी भरायला एक आठवडा ते तीन आठवडे, कागदाची पिशवी भरायला किमान एक महिना ते तीन महिने लागतील, आणि बाकीच्या पिशव्या भरायला सहा महिने ते एक वर्षही लागेल. पिशवीचा आकार पाच किलोची पिशवी डोळयासमोर ठेवून सांगितले गेले आहे. कृपया एक नियम मात्र पाळावयाचा आहे, मुख्यतः प्लास्टिकच्या कचऱ्यासंदर्भात, तो म्हणजे प्लास्टिकला जर काही पदार्थ चिकटले असतील तर ते स्वच्छ करूनच पिशवीत भरायचे, तसेच नाही! उदा. जर चॉकलेटचे आवरण किंवा दुधाची पिशवी किंवा हॉटेल मधून मागवलेले पदार्थ काढून झाले आणि त्याला काही पदार्थ चिकटलेले, तेलकटपणा इत्यादी धुऊन साफ करून मग त्या पिशवीत भरण्यात यावे. प्लास्टिकचा कचरा भरण्याच्या संदर्भात काही नावीन्यपूर्वक कल्पनाही काही जण अमलात आणतात, ते म्हणजे प्लास्टिकचा कचरा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठोसून भरणे ज्याने खूप जागा व्यापली नाही जात तसेच कचरा भरायचा आणि द्यायचा कालावधी वाढतो. आता हे झाले सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि साठवण, पण नंतर काय?

हा प्रश्न अनेक संस्था वेगवेगळया प्रकारे हाताळीत आहेत. पण त्याची एकमार्गी व्यवस्था नाही त्यांना कचऱ्याच्या निर्मिती स्थानांपर्यंत, सर्व जनतेपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. सुक्या कचऱ्याचे घनफळ (Volume) इतके जास्त आहे, तसेच खूप पसरलेले आहे की तो सामावून घेणे शक्य होत नाही. काही पालिकांकडे त्या संबंधात उपाययोजना आहेत, पण ती यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती व प्रक्रिया (Process) यांच्या अभावामुळे पुन्हा डम्पिंग ग्रााउंडवरच कचऱ्याची भर पडते.


भंगारवाला बांधवांमार्फत कचरा व्यवस्थापन

आपल्याजवळ एक मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या आवतीभोवती, प्रत्येक गल्लीबोळात असलेले भंगारवाल्यांचे जाळे. ह्या भंगारवाल्या बांधवांमार्फत घरोघरी वर्गीकरण केलेल्या सुक्या कचऱ्याला मार्गस्थ करता येईल का? यावर काही भंगारवाले बांधवांबरोबर चर्चा केल्या गेल्या, तेव्हा असे जाणवले की यांच्याकडे याचे उत्तर आहे आणि एक प्रदीर्घ काळ ही प्रक्रिया नियमित केल्यास कचऱ्याचा अंत करणे शक्य आहे. डोंबिवली शहरात या सर्व भंगारवाले बांधवांचे एकत्रीकरण, एक सम्मेलन आयोजित करण्यात आले. जवळजवळ दोनशे भंगारवाल्यांशी संपर्क साधला गेला, त्या सर्वांना रीतसर आमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित करण्यात आले. शास्त्री हॉलमध्ये, त्यांना श्रीफळ, शाल, गुलाबपुष्प आणि त्यांच्या दुकानात लावण्यासाठीचा फलक - 'स्वच्छ डोंबिवली अभियान पुरस्कृत' असे किट देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना सन्मानित करण्यात आले. या सर्वांना सम्मेलनात कोणत्या गोष्टींवर चर्चा होणार आहे, मुख्य उद्देश काय आहे याची योग्य माहिती आधीच संपर्क करतेवेळी देण्यात आली होती. या बांधवांकडून असे जाणवले की त्यांच्याकडे सर्व गोष्टींचे उत्तर कमी-अधिक प्रमाणात आहे. मुख्य म्हणजे त्यांचे एक जाळे (Network) आहे. अनेक संस्था, कारखाने, पुनर्चक्रण स्रंस्था (Recyclers) इत्यादी त्यांच्या या साखळीचा उपयोग करू शकतात आणि त्यांच्या या देशसेवेच्या कार्याबद्दल त्यांना योग्य मोबदला देऊ शकतात. जर ही यंत्रणा, ही समाजव्यवस्था याकडे नीट लक्ष दिले गेले, तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी लक्षणीय उत्तरे मिळतील. संपूर्ण सुका कचरा वर्गीकरण करून एकमार्गी मिळण्याचे जाळे विकसित होईल आणि कोणताही कचरा डम्पिंग ग्रााउंडची भर होणार नाही. शहरांमध्ये, गावांमध्ये उकिरडे आणि कचऱ्यांचे डोंगर दिसणार नाहीत.

आता ही व्यवस्था नीट वापरात येण्यासाठी शहरातील/गावांतील नागरिकांनी घरटी सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. वर्गीकरण केलेल्या पध्दतीने भंगारवाल्यांना हा कचरा देऊन त्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रण किंवा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी करू शकतो. फक्त या कचऱ्याच्या मोबदल्यात कोणत्याही नागरिकाने भंगारवाल्यांकडून कोणताही मोबदला मागू नये ही विनंती! यात रद्दी, इतर विक्रीयोग्य व्यवहार याबद्दल कोणताही आक्षेप नाही. पुढील काळात कचरा वेचकांचे संमेलन घेण्याची योजना आहे, जेणेकरून कोणत्याही व्यवस्थेची वाट न बघता नागरिकांनी नागरिकांसाठी चालवलेल्या या स्वच्छता मोहिमेतून आपला परिसर, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश स्वच्छ होण्यासाठी आणि कायम स्वच्छ राहण्यासाठी वेळ लागणार नाही.

नंदकुमार पालकर

9967024237

स्वच्छ डोंबिवली अभियान

विवेकांनद सेवा मंडळ, डोंबिवली

nkpalkargmail.com