डॉक्टर, तुम्हीसुध्दा...

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Jun-2019

** डॉ. क्षिप्रा आफळे***

घरदार सोडून आलेल्या अत्यंतिक शारीरिक कष्ट झेलणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांचा प्रचंड असा मानसिक छळही केला जातो. सर्वत्र असे घडते असे नाही. पण बहुतेक कॉलेजेसमध्ये हे चालते. तऱ्हा वेगवेगळया, तीव्रता कमी-अधिक. या विद्यार्थ्यांना कोणी वालीच नसतो. सर्वच विद्यार्थी हे सर्व सहन करण्याएवढे सक्षम नसतात. बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात. पायलचे हेच झाले असावे.


पायल तडवी या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि पीजी मेडिकल स्टुडंटच्या छळकहाणीला परत एकदा वाचा फुटली.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 साडेपाच वर्षे प्रचंड अभ्यास करून एमबीबीएस झालेली मुले पुन्हा वर्ष, दोन वर्ष एका वेगळयाच प्रकारच्या अतिकठीण पीजी एन्ट्रन्सची तयारी करतात.

एमबीबीएस झालेली ही मुलेमुली 24-27व्या वर्षी पी.जी.ला प्रवेश घेतात. पी.जी. कोर्स डिप्लोमा 2 वर्षे व डिग्री 3 वर्षांचा असतो. म्हणजे त्यातून बाहेर पडेपर्यंत हे लोक 26 ते 28 वर्षांचे होतात. सततच्या परीक्षा, प्रचंड स्पर्धा, अनंत असा मेडिकलचा अभ्यास यामुळे बहुतेक जण लग्न, मुलेबाळे या नैसर्गिक गोष्टींपासून वंचितच राहतात.

ज्या वयात इतर मुले-मुली करियर पूर्ण करून लग्, मुले, ट्रेकिंग, पाटर्या, सिनेमे यांचा मजेत आस्वाद घेत असतात, तेव्हा पी.जी. मेडिकल स्टुडंट पेशंटची काळजी घेण्यात व अभ्यास करण्यात व्यग्र असतात.

पण हे इतकेच आहे का? सरकारी पीजी मेडिकलच्या ऍडमिशन सरकारी हॉस्पिटलला संलग्न अशा मेडिकल कॉलेजमध्ये होतात.

कॉलेज, क्लासरूम वगैरे असे काही नसते. कॉन्फरस रूम असली तर वॉर्ड, आयसीयू, ऑपरेशन थेटर (OT), ओपीडी हेच कॉलेज. पेशंटची काळजी घेण्याचे जितेजागते ट्रेनिंग देणे इथे अपेक्षित असते.

यात पेशंट आल्यापासून त्याची पूर्ण हिस्टरी लिहिणे, तपासणे, वेगवेगळया तपासण्या, चाचण्या करणे, काही प्रोसीजर असेल तर ती करणे, औषधोपचार, ड्रेसिंग, ऑपरेशन असेल तर त्याची तयारी. पेशंटची ऑपरेशनसाठी तयारी, ऑपरेशनला मदत करणे. ऑपरेशननंतर सर्व काळजी घेणे, इमर्जन्सी आल्यास ती मॅनेज करणे अशी सगळी कामे पीजी मेडिकल स्टुडंट (शिकाऊ डॉक्टर) आपल्या वरिष्ठ शिकाऊ डॉक्टरांच्या मदतीने करत असतात. शेकडयांनी पेशंट सरकारी हॉस्पिटलमध्ये ओतत असतात. तुटपुंजे शिकाऊ डॉक्टर त्यांना मॅनेज करत असतात. सीनियर लेक्चरर, प्रोफेसर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते.

ज्युनिअर डॉक्टरांना रात्रंदिवस डयुटी असते. एक-दीड वर्ष वॉर्ड हेच घर! खाण्यापिण्याचे भान नाही. पेशंट आला तर हातातला डबा टाकून पळायचे. 2-2, 3-3 दिवस सलग न झोपताही काम करावे लागते. नैसर्गिक विधीलाही वेळ नसतो की मुलींना मासिक धर्मामुळेही सूट मिळत नाही. पेशंटचा जीव वाचवणे एवढेच ध्येय असते.

या सगळया कष्टामागे आवड हा भाग असतोच. शिवाय स्वार्थ हा असतो की, हे सगळे शिकून स्वतंत्रपणे आपण पेशंट बरा करू शकू ही आशा. हे सर्व काम करत करतच ही आशा फलद्रूप होते.

सर्जिकल क्षेत्रात सुरुवातीला छोटी ऑपरेशन करायला देणे अपेक्षित असते. हळूहळू सीनियर झाल्यावर मोठी ऑपरेशन प्रथम देखरेखीखाली व नंतर स्वतंत्रपणे देणे अपेक्षित असते.

तसेच प्रत्येक रुग्णाचा आजार वेगवेगळा, तेव्हा त्याविषयी शिकण्यासांठी त्या आजाराबद्दल पुस्तकातून वाचून पीजी डॉक्टर्सनी त्यावर एकत्र चर्चा करणे अपेक्षित असते. अशा रितीने एकीकडे काम करत शिकणे अपेक्षित असते.

आता प्रत्यक्षात काय होते पाहू. (काही सन्माननीय अपवाद वगळता) कठीण अशी पीजी मेडिकल एन्ट्रन्स परीक्षा पास होऊन मोजक्या सीट्सपैकी सीट पटकावून अत्यंत उमेदीने व आत्मविश्वासाने ज्युनियर डॉक्टर वॉर्डमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तेथील सीनियर डॉक्टर्स 'चला, आला आता बकरा कामाला!' असे मनातल्या मनात म्हणत खदखदून हसत असतात.

हॉस्पिटलची व कामाची थोडक्यात माहिती देऊन झाल्यावर लगेच कामाला अक्षरश: जुंपले जाते. कामाची सवय व माहिती होईपर्यंत नवीन स्टुडंट चुका करतात. नुकत्याच सीनियर झालेल्यांना आता अजिबात ते काम नको असते. पण जबाबदारी तर असते. मग ते ज्युनिअर्सवर वाटेल तसे ओरडत सुटतात. रुग्णांच्या समोरही हे चालते. याचा परिणाम म्हणून काही रुग्णही या डॉक्टरांचा अपमान करायला कमी करत नाही. काही मात्र रडत रडत काम करणाऱ्या डॉक्टर्सची समजूतही काढतात.

कामातील चुकांची शिक्षा म्हणून अथवा सासू-सुनांच्या छळाचा प्रकार म्हणून ज्युनिअर्सना 50 वेळा तेच तेच लिहायला लावणे, सर्वांचे नाष्टयाचे व जेवणाचे बिल द्यायला लावणे, सिस्टरचे व वॉर्ड बॉयचे काम करायला लावणे, टोमणे मारणे, नावे ठेवणे, दूषणे देणे, उगाचच इकडे-तिकडे जायला लावून पळापळ करायला लावणे, जेवण-नाष्टयालाही वेळ न देणे असा छळवाद सुरू होतो. म्हटले तर हे रॅगिंगच, पण म्हटले तर पेशंट केअरचे गोंडस नाव देऊ शकता. काहीही सिध्द करणे अवघडच. ट्रेनिंगच्या व विद्यार्थ्याला कष्टाची सवय करून कडक बनवण्याच्या नावाखाली हे सररास चालते. यात वरिष्ठ डॉक्टर, प्रोफेसर लोकांचे कान भरणे हाही भाग असतो.

घरदार सोडून आलेल्या अत्यंतिक शारीरिक कष्ट झेलणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांचा प्रचंड असा मानसिक छळही केला जातो. सर्वत्र असे घडते असे नाही. पण बहुतेक कॉलेजेसमध्ये हे चालते. तऱ्हा वेगवेगळया, तीव्रता कमी-अधिक. या विद्यार्थ्यांना कोणी वालीच नसतो. सर्वच विद्यार्थी हे सर्व सहन करण्याएवढे सक्षम नसतात. बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात. पायलचे हेच झाले असावे.

रविवारची सुट्टी नसते, तर घरी वगैरे जाणे दूरच. आजारी पडला तर हाल विचारूच नका. परत वर टोमणे. अशा या कामाच्या धबडक्यात भाषणे, केस डिस्कशन, अभ्यास याला वेळ व उत्साह उरतच नाही. त्यातून एखादा हुशार विद्यार्थी असेल, तर कमी हुशार सीनियर्स त्याला पुरता नामोहरम करून टाकतात. एखाद्याला 'टार्गेट' अथवा 'बळी' करणेही चालते.

वॉर्डमधील कामाव्यतिरिक्त सीनियर्सची वैयक्तिक कामे करणे, पाटर्या देणे, नाष्टयाची बिले देणे, वस्तू वाहने वापरायला देणे यासारखे प्रकारही चालतात. हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. पण सर्वात वाईट शिक्षा म्हणजे ऑपरेशन न करू देणे.

ऑपरेशन करणे ही अशी गोष्ट आहे की काही लोक हे धाडस व कौशल्य जन्मजातच घेऊन येतात किंवा चटकन आत्मसात करतात. तर काहींना खूप प्रयत्न करावे लागतात. तर काहींना कधीच धड जमत नाही. पण मेडिकल कॉलेजमध्य सब घोडे बारा टक्के. कौशल्य नसले तर सीनियर म्हणून काही लोक अधिकाराने ऑपरेशन करतच राहतात व इतरांना संधीच दिली जात नाही.

बऱ्याचदा आपल्या आवडत्या म्हणजे 'हाजी हाजी' करणाऱ्या किंवा 'अन्य' मार्गाने मित्र झालेल्या ज्युनियरलाच संधी दिली जाते. व इतरांना शिक्षेच्या नावाखाली बाजूला केले जाते.

सीनियर्सना अमर्याद अधिकार असतात. त्याचा ज्ञान व कौशल्याशी काही संबंध नाही. ज्युनियरला जर अधिक कौशल्य असेल तर आपली नाचक्की घेऊ नये म्हणून त्याला ऑपरेशनची संधीच दिली जात नाही.

मुलींचे तर हाल विचारायलाच नको. जिथे एकटीदुकटी मुलगी असते, तिथे सर्व मुले एकत्रितपणे तिला सर्जरीतून बाजूला करतात. कारण लहानसहान गावात अजूनही पुरुषी वर्चस्वाचीच मानसिकता आहे.

हे सगळे राजकारण तिसऱ्या वर्षापर्यंत चालते. यात पास होऊन तेथेच काम करणारे सीनियर्सही सामील असतात. या सगळया छुप्या रॅगिंगची दाद कोणाकडेच मागता येत नाही. जरा जरी कळले तरी तीव्रता वाढू शकते. सर्जरी देणे पूर्ण बंद होऊ शकते व शेवटच्या वर्षी नापास केले जाऊ शकते.

हो! हा सर्वात भयानक प्रकार आहे. तीन वर्षांच्या कोर्समध्ये ही नापास होण्याची (खरे तर करण्याची) सततची टांगती तलवार असते. कारण पीजीला एका वेळी 7-8च विद्यार्थी परीक्षेला बसतात. परीक्षा 50% लेखी व 50% प्रॅक्टिकल असते. प्रॅक्टिकलमध्ये तोंडी परीक्षा, पेशंट तपासणी, त्यावर चर्चा असे असते.

गंमत म्हणजे सर्जरीचे क्षेत्र असले, तरी प्रत्यक्ष सर्जरी येते की नाही हे बघितलेच जात नाही. परीक्षक हे एक कॉलेजचे व 2-3 बाहेरचे असतात. पण तेही कॉलेजच्या प्रोफेसरांशी मिळालेले असतात.


परीक्षेतील प्रश्नोत्तरांपेक्षाही प्रोफेसरांच्या मर्जीवर पास-नापास अवलंबून असते व परीक्षेचे कुठलेही स्टॅण्डर्ड वा रेकॉर्ड नसल्याने कोणालाही पास अथवा नापास करता येते. तसे होतेच असे नाही. पण होण्याची शक्यता व त्याचा विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक तणाव हा मुद्दा आहे.

ज्यांना याला तोंड द्यायला जमत नाही, ते एकतर कोर्स सोडून पळून जातात किंवा आत्महत्या करतात. जे टिकतात, ते नंतरचे कित्येक वर्षे कटुता घेऊन जगतात.

जे निरागस कोवळे मन घेऊन विद्यार्थी येतात, त्यांचे या वातावरणात पुन्हा ज्युनियर्सना छळणाऱ्यांत रूपांतर होते.

या सर्व परिस्थितीची कारणे बघितली, तर इथे सीनियर्सना व प्रोफेसर्सना असलेली अनिर्बंध सत्ता हे कारण दिसते. याशिवाय पेशंटच्या तुलनेत असलेले तुटपुंजे शिकाऊ डॉक्टर्स व त्यांच्या डयूटीत नसलेली सुसूत्रता हीही कारणे आहेत.

शिकाऊ डॉक्टर्सना सतत अपमानकारक बोलणे, त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करणे, त्यांच्यात सोयीनुसार भेदभाव करणे, मर्जी असेल तर शिकवणे, मर्जीतल्या विद्यार्थ्यांना ऑपरेशनच्या संधी देणे हे चालते.

हे विद्यार्थी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत कसेबसे पास होऊन बाहेर पडतात, तेव्हा आत्मविश्वास हरवलेले, तुटपुंजे ज्ञान असलेले, हताश भकास असतात. वरून मात्र आत्मविश्वास दाखवावाच लागतो जगाला.

मग पुन्हा 28व्या वर्षी कुठेतरी नोकरी शोधून स्वत:ला ट्रेन करावे लागते. त्यात वषर्े वाया जातात. 30-32 वर्षापर्यंत लग्न, मुलेबाळे सर्व अशक्यच होते.

असे सगळे असूनही आज भारतातील डॉक्टर खूप हुशार व कौशल्यपूर्ण समजले जातात, पण (काही सन्माननीय अपवाद वगळता) यात मेडिकल कॉलेजचा वाटा किती, हा प्रश्नच आहे.

परदेशातील सुनियंत्रित मेडिकल प्रशिक्षणाचा आपल्या इथे अभावच आहे. कारण आपल्या इथे सर्व काही अनियंत्रित आहे.

यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर मेडिकल क्षेत्राचे व पर्यायाने समाजाच्या आरोग्याचे तीनतेरा वाजायला वेळ लागणार नाही व अत्यंत अमूल्य अशा शिकाऊ डॉक्टरांच्या आत्महत्याही थांबणार नाहीत.

शिवाय पेशंटच्या बेडजवळच पण डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला वाटेल तसे अपमानकारक बोलताना बघून सरकारी रुग्णालयातील रुग्णांची भीड चेपते व तेही या डॉक्टर्सना मारणे, रुग्णालयाची तोडफोड करणे या गोष्टी करू धजतात.

या सर्वांवर सरकारने त्वरित विचार करून पीजी कोर्सला अधिक ठळक स्वरूप दिले पाहिजे. पीजी कोर्सची व्यवस्थित रूपरेषा बनवून त्याचे कडकपणे पालन होते की नाही हे पाहिले पाहिजे. वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग येथे सर्वत्र CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत, जेणेकरून कामाच्या जागी असभ्य भाषा व वर्तन टाळले जाईल.

प्रत्येक शिकाऊ डॉक्टरला प्रत्येक प्रकारची ठरावीक प्रमाणात सर्जरी मिळतात की नाही, याचे रेकॉर्ड व्हिडिओद्वारे ठेवले पाहिजे.

शैक्षणिक चर्चा, कोर्सेसची चर्चा यांची रूपरेषा देऊन त्याचेही रेकॉर्ड ठेवले गेले पाहिजे. तसेच कॉलेजच्या प्रोफेसर्सच्या हातात केवळ ट्रेनिंगची जबाबदारी द्यावी. परीक्षा व पास-नापासशी त्यांचा संबंध नसावा, प्रॅक्टिकल परीक्षा दूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये पूर्णपणे अनभिज्ञ परीक्षकांमार्फत घेतली जावी. त्याचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावे. म्हणजे कुणाला मुद्दाम नापासही केले जाऊ नये, तसेच लायकी नसताना पासही केले जाऊ नये. कारण दयेने पास केलेले डॉक्टर नंतर रुग्णांवर चुकीचे उपचार करतात व सर्वच डॉक्टरांची समाजातील प्रतिमा खराब करतात.

नवीन विद्यार्थ्यांचे 1 महिना व्यवस्थित ट्रेनिंग झाले पाहिजे व हळूहळू जबाबदारी टाकली पाहिजे. चुका सभ्यपणे सुधारल्या पाहिजेत. सीनियर्सनाही ज्युनियरकडून काम कसे करून घ्यायचे याचे नीट ट्रेनिंग दिले पाहिजे. सासू-सूनेचा राग कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यांचे त्याबाबत समुपदेशन केले पाहिजे. डयूटी विभागून दिल्या पाहिजेत. म्हणजे कामाचा भाग विभागला जाईल.

नवीन विद्यार्थ्यांचेही वरचेवर समुपदेशन केले पाहिजे. प्रत्यक्ष भेटून त्यांना बोलते केल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत. मुख्य म्हणजे मेडिकल एथिक्सवर अधिक भर दिला पाहिजे. आपल्या सहाध्यायाशीही आदराने व सामोपचाराने न वागणाऱ्या व्यक्तीकडून चांगला डॉक्टर होण्याची अपेक्षा कशी करणार?

यातले काही उपाय योजले तरी मध्येच आत्महत्या न करता 3 वर्षांनी बाहेर पडणारा मेडिकलचा विद्यार्थी आत्मविश्वासाने, ज्ञानाने व कौशल्याने परिपूर्ण होऊन समाजाच्या सेवेला आनंदाने सिध्द होईल.

(लेखिका नेत्रशल्यचिकित्सक आहेत.)