मिथकांचा 'स्वामी' गिरीश कार्नाड

स्रोत: विवेक मराठी    दिनांक15-Jun-2019

***माधवी भट***

रंगभूमी, चित्रपट आणि साहित्य अशा तीनही क्षेत्रावर आपला न पुसणारा ठसा उमटवणाऱ्या गिरीश कार्नाड यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांमध्ये त्यांच्याविषयी दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या. कलाकार, दिग्दर्शक, लेखक म्हणून त्यांचे योगदान, त्यांची शैली, वेगळे प्रयोग यांविषयीचा घेतलेला हा वेध.

 गिरीश कार्नाड गेल्याची बातमी ऐकली आणि प्रथम आठवला त्यांचा चित्रपट 'चेलुवी' आणि दुसरा 'सूर संगम'!

चेलुवी चित्रपट लहानपणी पाहिल्याचा आठवतो आणि त्यानंतर एकदा आत्ता काही वर्षांपूर्वी! सुगंधी फुलांचं झाड होणारी चेलुवी आणि ती फुलं विकून आपला चरितार्थ चालवणाऱ्या त्या दोघी बहिणी! हा चित्रपट म्हणजे नेहमीचा चित्रपट नसून आपण आजीकडून गोष्ट ऐकत आहोत असं वाटलं होतं. तीच जादू, चेलुवीमधलं साधेपण, स्वत:ला मिळालेल्या त्या अद्भुत शक्तीचं गुपित आपल्या नवऱ्याला मोठया विश्वासाने सहज सांगून देण्याचा सरळपणा आणि पुढे श्यामाच्या आग्राहाला नाइलाजाने भुलून स्वत:चा जीव धोक्यात घालणारी चेलुवी!

कार्नाड तिथेही आपल्याला लाकूडतोडयाच्या भूमिकेत दिसतात. जखमी चेलुवीला आपल्या अंगणात घेऊन येतात, तिच्या नवऱ्याचा शोध घेतात. चेलुवीच्या तुटलेल्या फांद्या पुन्हा गोळा करायला तडफडणारा तिचा नवरा! आत्ता कार्नाड गेल्याची बातमी ऐकून ह्या सर्व फ्रेम्स लगेच झरझर आठवत गेल्या.

स्त्री देताना हातचं काहीही राखून ठेवत नाही. उधळून देते सर्व. मात्र तिचा भोवताल ते अगदी बेजबाबदारपणे ओरबाडून घेतो आणि पुन्हा तिच्या दु:खाची त्याला फारशी काळजीही नसते, इतका तो स्वार्थी असतो. हेच चेलुवीतून दिसत राहिलं.

त्यांचा आणखी एक चित्रपट म्हणजे सूर संगम. या  चित्रपटातली सगळी गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यातले दोन ठळक प्रसंग आठवतात -

एक म्हणजे शिवशंकर शास्त्री यांच्या मुलीला - शारदाला मुलगा बघायला येतो आणि त्या वेळी ती गाते - 'मै का पिया बुलावे अपने मंदिरवा..' गाण्यात तो मुलगा (सचिन पिळगावकर) आणि शारदादेखील स्वप्नात इतके रमतात की गाताना आपण रागात दुसरा स्वर गातोय याचंही भान शारदाला राहत नाही आणि शिवशंकर तिच्यावर ओरडतात - ''लाज नाही वाटत तुला? राग भ्रष्ट करतेस? या रागात रिषभाचा वापर कसा केलास तू?'' त्यावर साहजिकच सगळे घाबरतात आणि मग ती बोलणी फिसकटतात.

याच चित्रपटात शास्त्रींवर मनोभावे श्रध्दा, आदर आणि प्रेम असलेली तुलसी आहे. तिचा मुलगा शास्त्रींकडे गाणं शिकतो आहे. जाऊ तोरे चरण कमल पार वारी..  या गाण्याच्या दुसऱ्या अंतऱ्यात 'टूट रहा सांसो का तार' गाताना तुलसीला आपल्या मुलातच शास्त्री दिसू लागतो आणि ती त्याच्या पायांवर डोकं ठेवते. ही फ्रेम खूप सुंदर होती. संपूर्ण चित्रपटभर गिरीश कार्नाड यांचा ठेवणीतला अंडर प्ले बघायला मिळतो.

भारतीय नाटयपरंपरा अतिशय जुनी आहे. मात्र महाराष्ट्रात तेंडुलकर युग सुरू झालं, त्याच वेळी मराठी नाटकांनी कात टाकली. ह्याच पिढीत आणि विचारधारेत समाविष्ट असलेली आणखी तीन नावं म्हणजे बादल सरकार, मोहन राकेश आणि गिरीश कार्नाड. ते तिघं आधीच निघून गेले होते. आता कार्नाडही!

'स्वामी' चित्रपटातला घनश्याम आठवण्याआधी मला का कुणास ठाऊक, 'मनपसंद' चित्रपटातली त्यांची भूमिका आठवली. खरं तर देव आनंद आणि टीना मुनीम हे व्यावसायिक चित्रपटात गाजलेले नट होते आणि त्या वेळी कार्नाड यांचा अनुभव अपने पराये, रत्नदीप आणि स्वामी, मनपसंद या चित्रपटांमुळे बासू चटर्जी यांच्याशी संबंध आला. तरीही देव आनंद आणि गिरीश कार्नाड ही जुगलबंदी देखणीच होती असं म्हणावं लागेल. जॉर्ज बर्नाड शॉच्या पिग्मॅलिअनची मूळ प्रेरणा 'माय फेअर लेडी' आणि पु.ल. देशपांडे यांच्या 'ती फुलराणी' यांचा मनपसंदवर प्रभाव होता, हे अगदी स्पष्ट होतं. देव आनंद यांचा उत्साह, त्यांची संवादफेक, एक विवक्षित शैली आणि त्याबरोबर गिरीश कार्नाड यांचा गंभीर, शांत वावर हे समीकरण खूप मस्त जुळून आलं होतं.

तीच कथा 'उंबरठा'मधल्या सुभाष महाजनचीदेखील. उंबरठा हा चित्रपट स्मिता पाटीलचा होता. तरीही त्यात कार्नाड ठळकपणे अधोरेखित होतात. समाजसेवक आईची दोन मुलं, नाश्त्याच्या टेबलवर बलात्काराच्या केसवर बोलत असताना, मुळात बलात्कार झालाच नाही हे सिध्द करून आपल्या अशिलाला कसं वाचवणार आहेत या चर्चेत आई मुलांचं कौतुक बघत असते आणि स्मिता पाटीलला वाटतं, हे चूक आहे. मात्र तिथे प्रश्न किंवा फुशारकी फक्त वकिली डावपेच इतकीच असते. तीच स्मिता पाटील आपली बाजू मांडायला सुभाषला (कार्नाड) सासूसमोर उभं करते. तिला करून बघायचं आहे सोशल वर्क तर जाऊ दे ना एकदा ... हे सगळं स्मिता भिंतीमागे लपून ऐकतेय. तोच सुभाष सुलभाच्या (स्मिता) परतण्यानंतर तिला आपल्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या घटनेबद्दल स्पष्टपणे सांगतो.

अनेकांना त्या वेळी - अजूनही सुभाष महाजन हे पात्र पसंत पडत नाही. मात्र एक पात्र म्हणून सुभाष अगदी त्याच्या स्थायिभावानुसारच वागतो. आणि त्यात कार्नाड यांनी त्यांच्या संयत अभिनयाने भर घातली होती, हे नक्की!

या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचा 'स्वामी'मधला घनश्याम पाहिला, तर खूप चकित व्हायला होत नाही. आपण मनातूनच घनश्यामकडे एक समजूतदारपणा देतो आणि अपेक्षाही करतो.

'मालगुडी डेज' ही मालिका आमच्या लहानपणी फार लोकप्रिय होती. इतकी की कालांतराने जेव्हा मोबाइल फोन्स आले, तेव्हा अनेकांची रिंगिंग टोन मालगुडी डेजची असे! त्या मालिकेतल्या स्वामीचे वडील म्हणूनदेखील कार्नाड अगदी चपखल बसले. कपाळावर आडवं शैव गंध पाहून पुन्हा एकदा सूर संगममधला त्यांचा शास्त्री आठवतोच.

'हम से है मुकाबला' नावाच्या चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत होते. 'इक्बाल'मध्ये नसीरुद्दिन शाहसमोर अत्यंत मुत्सद्दी क्रिकेट कोचची भूमिका असो किंवा अगदी अलीकडेदेखील ऑक्सिजन नळया असतानाही 'टायगर जिंदा है' चित्रपटात काम केलं, तेव्हा अनेकांना तो त्या भूमिकेचाच एक भाग वाटला.

मात्र कार्नाड चित्रपट अभिनेत्याहून नाटककार म्हणून अधिक आवडतात. त्यांच्या अनेक नाटकांवर या निमित्ताने सतत बोललं जात आहे. ययाती, तुघलक, काटेसावरी (अंजुमल्लिगे), बली, तलेदण्ड, अग्नी आणि पाऊस, टिपू सुल्तानचे स्वप्न, हयवदन आणि नागमंडल इत्यादी.

त्यांनी लिहिलेली नाटकं ही मिथकांचा हात धरूनही वर्तमान परिस्थितीवर नेमकं बोट ठेवणारी होती. हे सगळेच जाणतात. त्यासाठी त्यांचा आपल्या लोकसाहित्य, पुराण, इतिहास यांचा आणि एकुणातच मिथकांचा अभ्यास अतिशय उत्तम होता आणि त्याचबरोबर भोवतालाविषयीचं जागृत भान त्यांच्याजवळ होतं. स्पष्ट आणि ठाम भूमिका घेण्याची ताकददेखील सर्वांनीच पाहिली होती.

आज ते नाहीत म्हणताना मात्र विशेषत्वाने बोलावंसं वाटतं ते त्यांच्या हयवदन, नागमंडल आणि ययाती या नाटकांवर. कारण या नाटकांत स्त्री मन अतिशय टोकदारपणे व्यक्त झालं आहे. ययाती नाटकातला, ययाती आणि चित्रलेखा यांच्यातला अखेरचा संवाद वाचल्यावर मनात आलं - 1961 साली कार्नाड हे स्पष्टपणे लिहू शकले. ययातीचे वार्धक्य त्याच्या मुलाने - पुरूने घेतल्यावर तरुण झालेला ययाती, पुरूच्या बायकोपुढे - चित्रलेखेपुढे उभा आहे. तिच्या लग्नाला जेमतेम पंधरा दिवस झाले आहेत. तिच्या नवऱ्याचं तारुण्यच तिच्या सासऱ्याने घेतलं आहे. ती त्याच्याशी वाद घालताना स्पष्ट म्हणते - ''होय हाच तो क्षण, याआधी कुणावर आला नाही आणि यानंतरही कुणावर असा प्रसंग येणार नाही. तर मग महाराज, आपणही असामान्य व्हायचं आव्हान पेलायला सज्ज आहात? लग्नाच्या वेळी मला युवराजांविषयी काहीही माहिती नव्हती. मी त्यांच्याशी लग्न केलं ते त्यांच्या तारुण्यासाठी. माझ्या गर्भात भरतकुलाच्या बीजाची प्राणप्रतिष्ठा करू शकणाऱ्या तारुण्याची. आता त्यांनी ते गमावलं आहे. ज्यासाठी मी लग्न केलं, तेच त्यांच्यापाशी राहिलं नाही..आता ते तुमच्यापाशी आहे.''

आपल्याच नवऱ्याचं तारुण्य मागणाऱ्या सासऱ्याकडे आपल्या सुखाची मागणी करणारी चित्रलेखा आणि तिचा युक्तिवाद थक्क करणारा आहे. पुरूकडे बापाचं वार्धक्य घेतलं याचं पुण्य आहे. त्याचा गौरव करणार आहे इतिहास आणि तुमच्याकडे आता पुन्हा एकदा तारुण्य आहे. मधल्या मध्ये माझं काय? माझी काय चूक होती? मला का गृहीत धरलं? असा स्पष्ट प्रश्न विचारू पाहणारी चित्रलेखा या नाटकात जास्त उठून दिसते.

पूर्णत्वाची ओढ कितीही असली, तरी माणूस हा अपूर्णच असतो. हयवदन नाटकात त्यांनी हा विचार अधोरेखित केला. लोककथेचा बाज घेऊन आलेलं हे नाटक, मूळ संस्कृत कथेवर बेतलेल्या थॉमस मॉन यांच्या Transposed Heads या कादंबरीतून प्रेरणा घेतलेलं आहे. अतिशय कणखर पद्मिनी, प्रखर बुध्दिशाली देवदत्त आणि पिळदार देहयष्टीचा कपिल या तिघांसह नाटक सुरू होतं. देवदत्तसारखी कुशाग्र बुध्दी आणि कपिलसारखा बलदंड देह असणारा पुरुष आपल्याला मिळावा, ही पद्मिनीची इच्छा आहे. पद्मिनीचं लग्न देवदत्ताशी झालं असलं, तरी तिला कपिलच्या देहाचं आकर्षण वाटत असतं. त्यातून कालीमातेपुढे दोघांची शिरं ती अदलाबदल करते आणि नवरा म्हणून कपिलचं शरीर आणि देवदत्तचं तोंड असलेल्या पुरुषाची निवड करते. कारण तिला वाटतं की त्याने तिची बौध्दिक आणि शारीरसुखाची इच्छा अशी पूर्ण होईल. मात्र बुध्दीचा प्रभाव देहावर होतो. त्यामुळे देवदत्तच्या बुध्दीने कपिलचं शरीरदेखील कोमल होतं. हा नवा पेच पद्मिनीपुढे उभा राहतो.

मात्र त्यातून स्त्री म्हणून तिच्या इच्छा अगदी स्पष्टपणे दिसू लागतात. ते जास्त महत्त्वाचं वाटलं.

'नागमंडल' नाटक हे दोन मिथक कथांना एकत्र घेऊन साकार झालं आहे. सहसा अशा लोककथा थोडयाबहुत फरकाने अनेक जागी सापडतात. खुद्द आप्पण्णा - राणी आणि नागप्पा यांची लोककथा राजस्थानच्या विजयदान देथा यांच्या दुविधा कथेपाशी जाते. ती वाचताना हिची आठवण येतेच. पुरुषाने व्यभिचार केला तरी चालतो, मात्र त्याच्या स्त्रीने त्याच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे या विचाराने आपल्या बायकोला लग्न झाल्या दिवसापासून कुलूपबंद करून आपण मात्र वेश्येकडे जाणारा आप्पण्णा, नवऱ्याचं प्रेम मिळावं म्हणून शेजारच्या अंध स्त्रीने दिलेली मुळी उगाळून ठेवणारी राणी आणि ती उगाळलेली मुळी नागाच्या शिरावर पडून नागप्पाने राणीच्या नवऱ्याचा वेश करून रात्री राणीसोबत राहणं! तिला गर्भ राहून पुन्हा पावित्र्य सिध्द करायची परीक्षा.. मी फक्त तुम्हाला आणि नागाला स्पर्श केला आहे या नरो वा कुंजरो वा पध्दतीची कबुली... आणि नागानेच साक्षात छत्र धरल्यामुळे राणीला प्राप्त झालेलं देवत्व... असा नाटकाचा पट असला, तरी इथे पुन्हा पुरुषप्रधान संस्कृतीचं रूप स्पष्ट होतं. आपण बाहेरख्यालीपणा करायचा आणि बायकोने तिचं साधं सुखदेखील शोधू नये. तसं झालं तर तिने स्वत:चं चारित्र्य शुध्द आहे हे सिध्द करायचं. परंपरा पुरुषाला प्रश्न विचारत नाही. पंचायतदेखील आप्पण्णाला हा प्रश्न करत नाही की तू कुठे जातोस? तू रात्री घरी का नसतोस? कारण त्याला काहीही करायला मोकळीक आहे. बाईला नाही या नेमक्या प्रश्नावर कार्नाड बोट ठेवतात. म्हणून ते विशेष ठरतात.

आपल्या भारतात कोणत्याही कलावंताचं तटस्थ, विशुध्द मूल्यमापन नाही झालं. यातून कोणीच सुटलं नाही. कार्नाडदेखील त्याला अपवाद नाहीतच. अर्थात, तो एक संपूर्ण वेगळा विषय आहे.

एक मात्र खरं की त्यांच्यासारखा कलावंत जाण्याने नक्कीच मोठी हानी झाली आहे.

गिरीश कार्नाडांना आदरांजली!