द्रष्ट्या उद्योजकाची निवृत्ती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक15-Jun-2019

 ***राजेश मंडलिक ***

अझीम प्रेमजी विप्रो चेअरमन म्हणून निवृत्त होणार अशी बातमी नुकतीच वाचली. काही लोकांनी भारतीय उद्योग जगतावर आपली अमीट छाप सोडली आहे आणि त्यात अझीम प्रेमजी यांचं स्थान अगदी वरचं आहे, हे निर्विवाद.

एकुणात विप्रोची कहाणी ही उद्योग जगतातील ‘अजूबा’ आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. विप्रोचं मुख्य कार्यालय जरी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये असलं, तरी विप्रोचा आणि महाराष्ट्राचा एक जवळचा संबंध आहे. विप्रो म्हणजे खरं तर ‘वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स’ (Western  Indian vegetable Products) किंवा काही ठिकाणी त्याचा संदर्भ वेस्टर्न इंडिया पाम रिफाइंड ऑइल असाही येतो. आणि ही कंपनी चालू झाली होती जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर या गावी. ही कंपनी चालू केली होती अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी, म्हणजे मोहम्मद प्रेमजी यांनी 1945 साली. ‘सनफ्लॉवर’ ब्रँडखाली तेल बनवण्याची ही कंपनी होती. पुढे इथे मग तेलापासून बनणारे साबणासारखे बायप्रॉडक्ट्स बनू लागले. अगदी 2012पर्यंत सनफ्लॉवर ब्रँड विप्रोकडे होता. त्यामुळे सूर्यफूल असाच कंपनीचा लोगो होता. पण मग तो कारगिल नावाच्या एका अमेरिकन कंपनीला विकला. आज अंमळनेरच्या फॅक्टरीत संतूर आणि शिकेकाई या साबणांचं उत्पादन होतं. अंमळनेर गावामध्ये विप्रोचे शेअर्स घेऊन कोट्यधीश झालेल्या अनेक कहाण्या आहेत.

अझीम प्रेमजी हे साठच्या दशकातील अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे स्नातक. आज परदेशात जाऊन शिक्षण घेणं सोपं झालं असलं, तरी त्या काळात हे दिव्य होतं. 1966 साली जेव्हा त्यांचे वडील आजारी पडले, तेव्हा मानसिक द्वंद्व झालं होतं. अमेरिकेचं सुखी आयुष्य जगायचं की भारतात परत यायचं? त्या वेळी 21 वर्षं वय असलेल्या अझीम प्रेमजी यांनी भारतात परत यायचा निर्णय घेतला. लौकिकार्थाने छोटा उद्योग चालवणं हे आजच्या जागतिकीकरणाच्या काळातसुद्धा अवघड आहे. 1966 साली लायसन्स राजच्या काळात तर ते दुरापास्त. पण अझीम प्रेमजी यांनी ते आव्हान स्वीकारलं. आणि नुसतं स्वीकारलं नाही, तर आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगातल्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवलं.

पुढील दहा वर्षांमध्ये मग विप्रोने अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्योगांत पाय रोवले. विप्रो लायटिंग, विप्रो कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, विप्रो हायड्रॉलिक्स. व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी शोधत असताना विप्रोला संधी मिळाली ती आयटी क्षेत्रात काम करण्याची. 1975 ते 1980च्या काळात संगणक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आयबीएमला राजकीय निर्णयामुळे भारतातून गाशा गुंडाळावा लागला आणि अझीम प्रेमजी यांनी तयार झालेल्या पोकळीमध्ये विप्रोला बसवलं. 1980 ते 1990मध्ये हा उद्योग बस्तान बसवत असतानाच, 1991मध्ये त्या वेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरणाचे दरवाजे खुले केले आणि त्यानंतर मग विप्रोने मागे वळून पाहिलं नाही. तेव्हापासून ते आजपर्यंत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बिझनेसच्या लाटेवर आरूढ होताना भारतातल्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये विप्रोचा समावेश होतो.

या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षणीय आहे, ती म्हणजे तंत्रज्ञानाच्या जोरावर विप्रोने सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये मानाचं स्थान मिळवलं, तरी प्रेमजी यांनी त्यांच्या पारंपरिक उद्योगाला जिवंत ठेवलं. ते उद्योग बंद वा विकले नाहीत. सनफ्लॉवर हा त्यांनी ब्रँड विकला, पण अंमळनेरची फॅक्टरी आजही कार्यरत आहे. तीच कथा हायड्रॉलिक्स वा हेल्थकेअर प्रॉडक्ट्सची. हायड्रॉलिक्स हा बिझनेस कष्टाचा आणि आयटीसापेक्ष कमी नफ्याचा. पण अझीम प्रेमजी यांनी त्या उद्योगावर आयटीइतकं लक्ष ठेवलं आणि त्यांनाही जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवलं.

आज विप्रो ग्रूपची वार्षिक उलाढाल 50000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. स्वतः अझीम प्रेमजी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत क्रमांक दोनवर आहेत आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत हे पहिल्या पन्नासात असावेत. पण इतकं असूनही त्यांचा साधेपणा स्तिमित करून जातो. जगातली कोणतीही कार पदरी बाळगू शकणार्‍या अझीम प्रेमजी सरांकडे टोयोटा करोला गाडी आहे. जवळच्या लोकांनी खूप आग्रह केला, तेव्हा त्यांनी मर्क घेतली, तीसुद्धा सेकंड हॅन्ड. गंमत म्हणजे मर्सिडीझचा प्रथम मालक विप्रोमध्येच काम करत होता. स्वतःचं विमान घेऊ शकणारा हा उद्योजक इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. इतकंच काय, आजही अझीम सर पब्लिक ट्रान्स्पोर्टने किंवा टॅक्सीने प्रवास करतात.

आणि मला त्यांचं व्यक्तिमत्त्व सगळ्यात जास्त भावतं ते त्यांच्या समाजोपयोगी कामासाठी पैसा उभा केल्याबद्दल. भारतामधील उद्योजकांमध्ये चॅरिटीसाठी उदासीनता दिसते. त्या पार्श्वभूमीवर अझीम प्रेमजी यांचं विप्रो फाउंडेशन /अझीम प्रेमजी फाउंडेशन उठून दिसतं. अझीम प्रेमजी सरांनी या फाउंडेशनला थोडेथोडके नाही, तब्बल 50000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. अझीम प्रेमजी हे वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनी राबवलेल्या ढहश ॠर्ळींळपस झश्रशवसश या मोहिमेला पूर्ण पाठिंबा देणारे पहिले भारतीय. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत विप्रो फाउंडेशन येणार्‍या वर्षात भरीव कामगिरी करेल याबाबत काही शंका नाही. गरीब लोकांचं आयुष्य सुखकर व्हावं, यासाठी आपल्या संपत्तीचा वापर करण्याबद्दल ते नेहमी आग्रही असतात.

असे विविध आयाम असणार्‍या व्यक्तिमत्त्वाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2011 साली भारत सरकारने अत्यंत प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं.

तब्बल 51 वर्षं विप्रो ग्रूपची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या अझीम प्रेमजी यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं आहे. त्यांच्या द्रष्टेपणाला, उद्योजकतेला आणि कल्पकतेला मानाचा मुजरा आणि यापुढील आयुष्य सुखकर असो, या शुभेच्छा.