स्कूल चलें हम!

विवेक मराठी    17-Jun-2019
Total Views |

सुट्टी संपून एव्हाना शाळा सुरु होत आहेत.शाळा सुरु होण्याच्या आधी पंधरा दिवस  शालेय वस्तूंची आणि त्यासंबंधित अनेक गोष्टींनी बाजारात खरेदीचा उत्साह पाहण्यासारखा असतो.

उन्हाळयातील रानमेव्यांचा आस्वाद, मामाचा गाव, आंब्यावर सडकून मारलेला ताव, वेगवेगळी शिबिरे, रिसॉर्ट, चौपाटी, मॉलमधील ऍडव्हेन्चर गेम ही सगळी मज्जा उन्हाळयाच्या लांबलचक सुट्टीत अनुभवत असतानाच सुट्टी संपत येते, तेव्हा साऱ्याच बच्चेकंपनीला वेध लागतात ते शाळेचे.

नवे शिक्षक, नवीन वर्ग, नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन स्कूल बॅग, नवीन पुस्तके (नवीन पुस्तकांचा सुगंध तर...), नवी छत्री, नवा रेनकोट, सारेच कसे नवे नवे... या नवेपणाच्या ओढीने येणारा उत्साह आणि येणारी ऊर्जा काही औरच. हे सारे नवीन असले, तरी उन्हाळयाच्या सुट्टीत वाढवलेले स्टाईलिश केस आणि मोठया दीदीसारखी नेलपॉलिश लावलेली नखे यांना मात्र तिलांजली द्यावी लागते. पण शाळेत जाण्याचा उत्साह एवढा प्रचंड असतो की, 'स्कूल के आगे तू भी क्या चीज है' असे म्हणत, बच्चेकंपनी हसत हसत त्याची छाटणी करून शाळेला जायला तयार होतात.

यांच्या उत्साहाला भरीस भर म्हणजे टीव्हीवरील जाहिराती. आजच्या या तंत्रज्ञानाने भारलेल्या युगात मुले तरी त्यापासून दूर कशी राहतील? खरे सांगायचे तर या विषयात तीच आपल्यापेक्षा चार पावले पुढे असतात. शाळेत लागणाऱ्या वस्तूंच्या जाहिराती अगदी शाळा सुरू व्हायला महिनाभर अवकाश असतानाच टीव्हीवर सुरू होतात. उन्हळयाच्या सुट्टीची मज्जा घेत असतानाच जाहिराती मध्ये मध्ये डोके वर काढत, तुमची शाळा सुरू होणार आहे लवकरच, याची आठवण करून देत असतात. मुलेच ती, मग त्यांचे आपल्या पालकांकडे एक-एका गोष्टींचे फर्मान चालू होते. पालक कसेबसे पाल्याची समजूत काढत असतात की, अजून वेळ आहे शाळा सुरू व्हायला. पण शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना पालकांचीसुध्दा मुलांसाठी शाळेतील वस्तूंची खरेदी करायला लगबग चालू होते. बऱ्याच अंशी बहुतेक आई-बाबा नोकरदार असतात, त्यामुळे खरेदीसाठी मिळणारा तुटपुंजा वेळ, त्यात मुलांच्या वेगवेगळया मागण्या. सगळेच एका दिवशीच्या खरेदीत शक्य नसते.

काळ बदलला, तसा शाळेच्या खरेदीच्या पध्दतीदेखील बदलल्या, उत्साह मात्र अजूनही तोच. पूर्वी बरीच मुले (आता असलेले पालक) महानगरपालिकेच्या शाळेत जाणारी. दगडी पाटी, सगळयांची एकसारखीच खाकी दप्तरे, एवढया कमी खरेदीत मुले समाधानी असायची. काळपरत्वे छानछोकीची जीवनपध्दती सगळयांना प्रिय झाली. लहानपणी आपल्याला ज्या गोष्टी परिस्थितीअभावी मिळाल्या नाहीत, त्या गोष्टी मुलांना द्यायच्या, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते.

या पार्श्वभूमीवर, मोर्चा वळतो तो खरेदीसाठी बाजारात. बाजारातही विविध शालेय वस्तूंनी दुकाने, रस्ते फुलून गेलेले असतात. दुकानदारही बच्चेकंपनी खूश होईल याची पुरेपूर काळजी घेताना दिसतात. आज बाजारात एका वस्तूचे अनेक प्रकार बघायला मिळताहेत. पाऊस आणि शाळा हे जसे समीकरण आहे, त्याचा परिणाम बाजारपेठेवर झालेलाही पहायला मिळतो. शालेय तयारीच्या विविधरंगी वस्तू बाजारात आपल्या कमानी डोलवत होत्या. दुकानांतून दिसणाऱ्या छत्र्या आणि रेनकोट पावसाळयाच्या आगमनाची वर्दी देऊ लागल्या आहेत. चिनी वस्तूंना बंदी असली, तरी मेड इन चायना ते मायभूमीत तयार झालेल्या अनेक शालेय वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या सगळया वस्तू एका छाताखाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे मॉल. तिथे अनेकजण वेळेची बचत होते म्हणून खरेदीला जातात. मात्र खुल्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविधतेचा मॉलमध्ये अभाव असतो. तसेच दुकानदारांना आपले विक्री कौशल्य दाखवण्याची आणि ग्राहकांना किमतीत घासाघीस करण्याचे कौशल्य दाखवण्याची संधी तिथे मिळत नाही.

 नवे फॅड की फॅशन?

अलीकडे बऱ्याच शाळांमधून वह्या शाळेतूनच जादा पैसे आकारून दिल्या जातात. शाळेचे गणवेशही एकाच विशिष्ट दुकानातून घेण्याची धमकीवजा विनंती शाळेतून केली जाते. शाळेचा गणवेश म्हणजे फार-फार तर दोन जोड. परंतु आताचा शाळेतील गणवेश खरेदी म्हणजे दैनंदिन शाळेच्या गणवेशाच्या दोन जोडया, शारीरिक शिक्षणाच्या तासासाठी दोन जोड, स्वीमिंगसाठी दोन जोड, डान्ससाठी वेगवेगळया प्रकारचे शाळेत ठरलेले कॉश्च्यूम, टाय असा शाळेच्या गणवेशाचा एकंदर लवाजमा, जवळपास पाच हजाराच्या घरात जाणार असतो. प्रत्येक शाळांचा कमी-अधिक याच प्रमाणात गणवेशाचा खर्च असतो. 

 

हल्लीची मुलांची पिढी तंत्रज्ञानस्नेही आहे. कार्टून्स, यूटयूबवरील अनेक सिरीजच्या प्रमुख पात्रांची मुले फॅन नाही तर अगदी एसी झालेली असतात - म्हणजे फॅनच्या पलीकडील चाहता. त्यामुळे शाळेत लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीतही त्यांना त्यांचा आयडॉल असणाऱ्या पात्रांचा फोटो किंवा आकार असणाऱ्या वस्तूंची मागणी आपल्या आई-वडिलांकडे करताना दिसतात. मुलांचा हाच वीक पॉइंट लक्षात घेऊन मोठया चलाखीने त्याच वस्तू अग्रक्रमाने दाखविण्याचा दुकानदारांचा प्रयत्न चालू असतो.

मुलांवर असलेले कार्टून्सचे हे गारुड आता शालेय वस्तूंवर थ्रीडी अवतारातही पहायला मिळत आहे. मात्र त्या अवाच्या सवा भावाने विकल्या जातात आणि अनेक जण त्या घेतानाही दिसतात. त्याचा उपयोग किती, या मूळ गोष्टीकडे कानाडोळा करत या वस्तूंची आनंदाने खरेदीही केली जात आहे. खरे तर मुलांपेक्षा पालकांचा अशा गोष्टी खरेदी करण्यासाठीचा उत्साह अधिक. स्पर्धेचे युग जसे झपाटयाने वाढत आहे, तसे शिक्षण असो किंवा प्रत्येक क्षेत्रात आपलेच मूल क्रमांक एकचे मानकरी असायला हवे, तसेच शालेय वस्तू खरेदीतही आपल्या मुलाकडे असलेली वस्तू सगळयांपेक्षा हटके असली पाहिजे, म्हणजे सगळी स्तुतिसुमने आपल्याच मुलावर उधळली जातील, अशीच थोडयाफार फरकाने अनेक पालकांची मानसिकता असते.

मुंबईतील घाऊक दरात वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथील भव्य बाजारपेठ. रविवारच्या दिवशी ही बाजारपेठ बंद असते, परंतु शाळा सुरू व्हायच्या आधीचा आठवडा रविवार असूनही बाजारपेठ तुडुंब भरलेली. काही मोठी दुकाने बंद होती, परंतु रात्रीचे साडेदहा वाजले तरी अनेक छोटे दुकानदार, रस्त्यावर असणारे विक्रेते यांचा उत्साह आणि ग्राहकांचा उत्साह कायम होता.


बाजारात मुलगे आणि मुली यांच्यासाठी वेगवेगळया डिझाइनच्या स्कूल बॅग उपलब्ध आहेत. साध्या प्रिंटपासून ते थ्रीडी इफेक्ट असलेल्या बॅग्ज आहेत. पावसात बॅग भिजू नये म्हणून बॅगसाठी वेगळया प्रकारचे बॅग रेनकोटही या वेळेस बाजारात बघायला मिळाले. 50 ते 500 रुपयांपर्यंतच्या पाण्याच्या बॉटल्स विक्रीकरता उपलब्ध होत्या. एकापेक्षा एक आकर्षक अशा बॉटल्स मुलांचे लक्ष वेधून घेत होत्या. कंपॉस बॉक्सदेखील वेगवेगळया आकाराच्या होत्या.

कंपॉस बॉक्स म्हणजे पेन्सिल, पेन, खोडरबर, इत्यादी शाळेत वापरात येणाऱ्या गोष्टी ठेवायची पेटी. परंतु बाजारात बघण्यात आलेले बरेच कंपॉस बॉक्स या पेटी आहे की जादूची पेटी असा प्रश्न पडेल, अशी एक से बढकर एक डिझाईन्स आहेत. ऑटोमॅटिक पध्दतीने उघडली जाणारी, अमुक एक बटण दाबल्यानंतर नेमकी वस्तू बाहेर येणारे कंपॉस बॉक्सही बाजारात उपलब्ध आहेत. तर काही बॉक्सच्या मुखपृष्ठावर मुलांना आवडणारे गेम्स आहेत. डबल-टि्रपल डेकरबॉक्सही आहेत. शार्पनर्सचे विविध आकार पाहून मुलं पेन्सिलने अभ्यास करणार की सारखे पेन्सिलचे टोकच काढत बसणार असा प्रश्न पालकांना पडत असला तरी  मुलांबरोबर पालकांनाही त्या गोष्टींचे आकर्षण वाटत असते हे नक्की. आणि त्याचा परिणाम वस्तू खरेदीवर होताना दिसतो आहे.

मुले रेनकोटबरोबर छत्रीचीही खरेदी करताना दिसतात. शाळेत जाताना रेनकोट आणि टयूशनला जाताना छत्री असे दुहेरी लाड पुरवावे लागतात. आकर्षक रंगसंगती आणि वैविध्य यांमुळेही रेनकोट आणि छत्र्या खरेदीचा मोह त्यांना आवरत नाही. पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये जाणाऱ्या छोटयांसाठीही रेनकोट खरेदी केला जातो. नुकतेच चालायला शिकत असलेल्या बाळांपासून ते नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या अशा छोटयांसाठी बाजारात एक अनोखा रेनकोट आलेला आहे. त्याने पूर्ण शरीर छत्रीसारखे वर्तुळाकार झाकून घेतले जाते आणि डोक्याचा खालील भाग रेनकोटने आच्छादलेला असतो. ते पाहताना एखादा छोटा प्राणी आपल्या बाजूने जात आहे, असा भास होतो. चेहऱ्याचा समोरील भाग भिजू नये यासाठी पुढे टोपीसारखा आकार, पण त्या आकारातही वैविध्य. इतके लोभासवाणे रेनकोट पाहताक्षणीच विकत घ्यायची इच्छा न होईल तरच नवल! काही जणांची मुले चार वर्षांच्या पुढील होती, तेही खरेदी करताना दिसत होते, म्हणून सहज एकीला विचारले, ''तुमचं मूल तर मोठं आहे, मग तुम्ही हा रेनकोट का खरेदी करता?'' तेव्हा त्या म्हणाल्या, ''आमची मुलं मोठी झाली असली तरी हे रेनकोट इतके सुंदर आहेत की ते घेण्याचा मोह आवरत नाही. म्हणून आमच्या नात्यातल्या लहान मुलांसाठी ही खरेदी करतोय.''

बाजारात नवनवीन शालेय वस्तू आणि पावसाळी वस्तू यांची जत्रा भरली आहे. खरेदीसाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत ग्राहकांची रीघ लागलेली आहे. पूर्वीपेक्षा शालेय खरेदी ही अधिक खर्चीक दिसत असली, तरी आनंदाने सारे जण खरेदी करताना दिसत आहेत. आतापर्यंत बऱ्याच छोटया दोस्तांची शाळेची खरेदी झालेली असेल आणि आपली नवीन खरेदी दोस्तांना दाखविण्यासाठी ते शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट पाहत असणार, याची खात्री आहे.