डॉ. हेडगेवारांची ऋषिदृष्टी!

विवेक मराठी    18-Jun-2019   
Total Views |

  डॉ. हेडगेवारांची दृष्टी ऋषिदृष्टी होती. त्याग-तपस्येतून ती आली होती. हा हिंदू समाज जागा होणार, याबद्दल त्यांना तिळमात्र शंका नव्हती. राजकीयदृष्टया जी भावजागृती झालेली आपल्याला आज दिसते, तिचे उद्गाते डॉ. हेडगेवार आहेत.

भाजपाच्या विजयावर वेगवेगळया वृत्तवाहिन्यांवरून आणि वर्तमानपत्रांतून भाष्य येत आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार ज्यांना भाजपाचा विजय सहनच होत नाही, ते आपल्या पध्दतीने विजयाचे विश्लेषण करतात. त्यांचे मुख्य मुद्दे असे असतात - आता लोकशाहीचे काय होणार? संसदीय लोकशाही संपणार का? मुसलमानांच्या कत्तली होणार का? अभिव्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य यावर बंधने येणार का? धार्मिक आधारावर देशाचे विभाजन होणार का? गांधी-नेहरूंचा देश कुठे जाणार? इत्यादी.

जन्मभर जे चुकीच्या वाटेवर चालत राहिले, विचारांचा चुकीचा दिवा हातात घेतला, जे आपल्याच विश्वात दंग राहिले, ते अशा प्रकारचे विश्लेषण करीत राहणार. काल करत होते, आज करतील आणि उद्या जिवंत असेपर्यंत करत राहतील. ही पिढी नैसर्गिकरीत्या यमाच्या दरबारात जाईल, तेव्हाच ही वटवट संपेल. शहाण्या माणसाने त्यांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांचे खंडन करू नये. ऐकायची हिम्मत असेल तर ऐकावे आणि वाचनाची सोशिकता असेल तर वाचावे.

दुसऱ्या प्रकारात येणारी मंडळी वेगळया प्रकारचे विश्लेषण करतात. ते म्हणतात - भारत आता बदलत चालला आहे. घराणेशाही लोकांना मान्य नाही. जातीच्या आधारावर कुणी मतदान करत नाही. देशप्रेमाची भावना फार मोठया प्रमाणात जागी झाली आहे. हिंदू जागा झाला आहे. तो स्वतःला अभिव्यक्त करू लागला आहे. मुसलमान आणि ख्रिश्चन समाजातही भारतभक्ती मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. यात पुढच्या काळात बदल होणार नाही.

हे दुसऱ्या प्रकारचे विश्लेषण जमिनीवर पाय असलेल्यांचे विश्लेषण आहे. हे विश्लेषण करणारे सगळेच हिंदुत्ववादी नाहीत. उलट यातील बहुसंख्य पूर्वी हिंदुत्ववादी कधीच नव्हते. पण ते प्रामाणिक आहेत. डोळयावर पट्टी बांधून ते बसलेले नाहीत. यातील काही जण कदाचित स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजसत्तेकडून काही लाभ मिळविण्यासाठी यथार्थवादी विश्लेषक झाले असतील. जसा वारा वाहील तशी पाठ फिरविण्यात अनेक लोक फार हुशार असतात, असो.

एक गोष्ट खरी की, देशाने कूस बदलली आहे. सर्वसामान्य हिंदू माणूस राजकीयदृष्टया आणि राष्ट्रीयदृष्टया जागा होत चालला आहे. तो मतदान करताना हिंदू म्हणून मतदान करायला लागला आहे. मला देशासाठी मतदान करायचे आहे, हे त्याला समजू लागले आहे. हे क्रांतीकारक परिवर्तन आहे. 'क्रांतिकारक परिवर्तन' हा शब्द मुद्दाम वापरला आहे. जेव्हा अनावश्यक अशा बंधनात समाज अडकलेला असतो आणि जेव्हा ही बंधने समाज फेकून द्यायला सुरुवात करतो, तेव्हा जे होते त्याला क्रांतिकारक परिवर्तन असे म्हणतात. या परिवर्तनाच्या युगातून आपण जात आहोत.

या परिवर्तनाचे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी पाहिले. त्यांचे स्वप्न (व्हिजन) आता प्रत्यक्षात अवतरण्याचा कालखंड सुरू झालेला आहे. राजकीय सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी संघ सुरू केलेला नाही. सत्ता हस्तगत करणे हा विषय संघाच्या विषयसूचीचा कधीच नव्हता. डॉक्टर म्हणत असत, ''हे हिंदुराष्ट्र आहे.'' त्या वेळी लोकांनी त्यांची खिल्ली उडविली.

डॉक्टरांनी असे कधीच म्हटले नाही की, मला हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. हिंदुराष्ट्र प्राचीन आहे, वेदकाळापासून आहे. ते सनातन आहे. त्याचा निर्माता कुणी एक माणूस नाही. हजारो थोर लोकांच्या, हजारो वर्षांच्या त्याग-तपस्येतून हिंदुराष्ट्र निर्माण झालेले आहे. ते काल होते, आज आहे आणि उद्याही असणारच आहे. भाजपा सत्तेत आल्यानंतर ते होणार नाही. भाजपा नव्हता, तेव्हा ते नव्हते, असेही नाही. त्याचे अस्तित्व नित्याचे आहे.

हे जे आपले सनातन हिंदुराष्ट्र आहे, त्याचा विसर सामान्य हिंदूला पडलेला आहे. डॉक्टरांनी ठरविले की, याची भावजागृती  मी करीन. 1925 साली भारताची लोकसंख्या 30-35 कोटीच्या आसपास असावी. या करोडो हिंदूंच्या मनामध्ये हिंदुराष्ट्राची भावजागृती एकटे डॉक्टर हेडगेवार कसे काय घडवून आणणार? आज 2019 साली आपण म्हणू शकतो की, करोडो भारतीयांच्या मनात ही भावजागृती झालेली आहे. एका माणसाने आपल्या त्याग-तपस्येने केलेला हा अलौकिक चमत्कार आहे.

देशामध्ये थोर माणसांची परंपरा मोठी आहे. त्यांच्या नावाने संस्था उभ्या राहतात. त्यांच्या विचारांचे ग्रंथ तयार होतात. या ग्रंथावर भाष्य करणारी हजारो पुस्तके लिहिली जातात. अनेक विद्यार्थी थोर पुरुषांच्या विचारांवर पीएच.डी. करतात. काहींचे चित्रपट निघतात. डॉक्टर हेडगेवार या सर्वांना अपवाद आहेत. ते कोणत्याही ग्रंथात नाहीत, लाखो स्वयंसेवकांच्या हृदयात आहेत. त्यांच्यावर भाष्य करणारे ग्रंथ नाहीत, पण त्यांच्या आदर्शाने जगणारे चालते-बोलते मनुष्यरूपातील ग्रंथ आहेत. त्यांच्यावर भव्य चित्रपटाची निर्मिती झालेली नाही, परंतु त्यांचे भव्य जीवन लाखो हिंदूंच्या घरात पोहोचलेले आहे.

राजकीयदृष्टया जी भावजागृती झालेली आपल्याला आज दिसते, तिचे उद्गाते डॉ. हेडगेवार आहेत. राजकीयदृष्टया ही जागृती खेडयापाडयात घेऊन जाण्याचे काम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. डॉ. हेडगेवार हे त्यांचे परमश्रध्देय स्थान आहे. आपल्या राजकीय भाषणातून याचा ते कधी उल्लेख करीत नाहीत, त्याची गरज नसते. डॉ. हेडगेवारांची ती अपेक्षादेखील नाही. संघाची प्रार्थना त्यांच्या हयातीत तयार झाली. प्रार्थनेची शेवटची ओळ, 'डॉ. हेडगेवार की जय' अशी नाही, 'भारतमाता की जय' अशी आहे.

नरेंद्र मोदी यांची प्रत्येक सभा 'भारतमाता की जय' या घोषणेने समाप्त होते. संघाच्या प्रार्थनेत डॉ. हेडगेवारांनी 'भारतमात की जय' हे शब्द आणले. ती संघाने शोधलेली शब्दप्रणाली झाली. बंकीमचंद्र यांनी भारतमाता की जय याचा उद्घोष प्रथम केला. 'वंदे मातरम्' म्हणजेच भारतमाता की जय. काही विचारधारांनी वंदे मातरम् नाकारले. त्यांचे वर्चस्व राहिले. पण सामान्य हिंदूंनी 'भारत ही माझी माता आहे', हे कधी नाकारले नाही. नाकारणाऱ्यांची वटवट तो ऐकत बसला, प्रथम 2014 साली आणि नंतर आता 2019 साली त्याने वंदे मातरम् नाकारणाऱ्यांना नाकारले आहे. डॉक्टरांच्या दूरदृष्टीचा हा प्रचंड विजय आहे.

हिंदू उत्थानात भारताचे उत्थान आहे आणि हिंदू पतनात भारताचे पतन आहे, हे डॉ. हेडगेवारांनी सांगितले. हिंदूंना संघटित केले पाहिजे. त्याला समाजाचा विचार करायला शिकविले पाहिजे. देश प्रथम, नंतर मी, हे त्याच्या मनात रुजविले पाहिजे. डॉ. हेडगेवारांनी हे काम नागपुरात सुरू केले. नागपुरात सुरू झालेले काम हळूहळू सर्व देशभर पसरले. आज सत्तेत असणारी माणसे, आपले पंतप्रधान म्हणतात की, माझ्या जीवनातील क्षण आणि क्षण, कण आणि कण देशाला अर्पण आहे. त्यांचे हे वाक्य डॉक्टरांच्या जीवनाचा प्रतिध्वनी असतो.

देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेली व्यक्ती जेव्हा कायावाचामनाने देशाला समर्पित होते, स्वतःसाठी काही करीत नाही, जे काही करायचे ते देशासाठी, लोकांच्या भल्यासाठी तेव्हा लोकांना संघभाव आपोआप समजतो. त्याच्यासाठी बौध्दिक वर्ग घेण्याची गरज नाही. डॉक्टरांची अपेक्षा होती की, स्वयंसेवकाने चालता-बोलता आदर्श झाले पाहिजे. तो ज्या क्षेत्रात जाईल, त्या क्षेत्रात त्याचे काम आदर्श वाटेल असेच असले पाहिजे. त्याच्या चालण्या-बोलण्या-वागण्यातून आपण सर्व हिंदू राष्ट्राचे अंग आहोत, हे आपोआप लोकांना समजेल.

समाजावर निरपेक्ष प्रेम हा डॉक्टरांच्या जीवनाचा चिरंतन संदेश आहे. सर्व हिंदू आपले आत्मीय आहेत. हिंदू समाजाचे सुख ते माझे सुख आणि हिंदू समाजाचे दुःख ते माझे दुःख, असे हेडगेवार वारंवार सांगत. भारतात राहणारे सगळेच हिंदू आहेत. काहींनी आपली उपासना पध्दती बदलली. यातील बहुसंख्यांना ती जबरदस्तीने बदलावी लागलेली आहे. सर्वांचे बापजादे हिंदू आहेत. म्हणून भारतात राहणारा मुसलमान 'हिंदू मुसलमान' असतो. ख्रिश्चन 'हिंदू ख्रिश्चन' असतो. पारशी समाजाने फार पूर्वीच स्वतःला 'हिंदू पारशी' करून टाकलेले आहे.

हिंदू भावजागृतीचा हा जो प्रवाह आहे, तो रूढार्थाने जे हिंदू आहेत, त्यांच्यापुरता मर्यादित राहणार नाही. ज्यांना आपले हिंदूपण विसरायला लावण्यात आले, त्यांच्याही मनात ही भावजागृती उत्पन्न करावी लागेल. आमची उपासना पध्दती वेगळी असेल, पण आम्ही हिंदू राष्ट्राचे अंग आहोत, असा भाव त्यांच्या मनात निर्माण करावा लागेल. येणाऱ्या काळात अग्रक्रमाने करण्याचे हे काम राहील. डॉ. हेडगेवारांच्या क्रमबध्द विचार विकासातील हा एक अनिवार्य टप्पा राहील.

हे दिवास्वप्न नाही. तीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, या देशात झोपलेल्या हिंदूला जागे करणे कठीण आहे, म्हणून हिंदूपणाचे राजकारण करता येणार नाही हा विचारप्रवाह होता. ज्यांनी असा विचार करू नये, तेच विचार मांडत होते. पण कालप्रवाह बदलला. डॉ. हेडगेवारांची दृष्टी ऋषिदृष्टी होती. त्याग-तपस्येतून ती आली होती. हा हिंदू समाज जागा होणार, याबद्दल त्यांना तिळमात्र शंका नव्हती. तो जागा होत आहे. त्याचीच पुढची पायरी, हिंदूपण विसरलेल्यांच्या जागृतीची आहे. आणि तीही पुढच्या काही काळात होत जाणार. डॉक्टरांच्या संकल्पनेतील हिंदुराष्ट्र सर्वांना कवेत घेणारे, सर्वांना आपलेसे करणारे आहे. शुध्द सात्त्वि प्रेम हा त्याचा आधार आहे.

vivekedit@gmail.com