डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निमित्ताने

स्रोत: विवेक मराठी    दिनांक22-Jun-2019

***डॉ. जान्हवी  केदारे***

 डॉक्टर आणि रुग्ण यातले नाते नेहमी विश्वासावर आधारित राहिले आहे. आताच्या परिस्थितीत दोन्ही बाजूंनी या विश्वासाला तडा गेला आहे की काय असे वाटते. पुन्हा एकदा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वास निर्माण झाला, तर हे नाते सुदृढ बनेल. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही सुरक्षित वाटेल.

कुठल्या तरी रुग्णाच्या नातेवाइकांनी रागाच्या भरात हॉस्पिटलची तोडफोड केली, डॉक्टरांना शिवीगाळ केली किंवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मारहाण केली, अशा बातम्या दर काही दिवसांनी माध्यमांमध्ये ठळकपणे येतात. त्याची तात्पुरती चर्चा होते आणि एका दिवसात सर्व जण घडलेली घटना विसरून जातात. डॉक्टर आपली कर्तव्ये नेहमीप्रमाणे पार पाडू लागतात आणि रुग्णांच्या रांगाही नेहमीइतक्याच लांबलचक राहतात. परंतु गेल्या आठवडयापासून कोलकात्यात घडलेल्या घटनेने मन विषण्ण झाले. दोन शिका डॉक्टरांवर एका मोठया जमावाने येऊन केलेला प्राणघातक हल्ला धक्कादायक होता.

निषेध! निषेध!  निषेध! अशा या हल्ल्याचे देशभर पडसाद उमटले. डॉक्टरांच्या विविध संघटनानी एकत्र येऊन या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून संप केला, आपले काम बंद ठेवले. या घटनेमुळे अनेक प्रश्न ऐरणीवर आले. असे कसे डॉक्टरांवर हल्ले होतात? का होतात? त्यावर काय उपाय करता येतील? उदात्त आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डॉक्टरी पेशामध्ये अशा घटना कशा काय घडतात? डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना शासन होणार की नाही?

 एक नजर जगभरातल्या सर्वेक्षणांवर

गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये आपल्या देशात अशा घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्या देशात जवळजवळ 75% डॉक्टरांना रुग्णाच्या आक्रमकतेला तोंड द्यावे लागते, असे एका सर्वेक्षणात आढळले  आहे. बहुतेकदा ही आक्रमकता शाब्दिक असते - उदा. भांडण करणे, शिवीगाळ करणे इ. काही वेळेस ही शाब्दिक आक्रमकता हिंसाचाराचे रूप घेते आणि डॉक्टरांवर हल्ले होतात, मारहाण केली जाते. केवळ आपल्या देशातच नाही, तर जगभरात डॉक्टरांना रुग्णांच्या क्षोभाला सामोरे जावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार 8-38% डॉक्टरांना रुग्णांच्या हल्ल्याला कधी ना कधी तोंड द्यावे लागते. जगभरात विविध देशांमध्ये या हिंसाचाराचे कमी-अधिक प्रमाण आढळते. जपानमध्ये जवळजवळ 84% डॉक्टर, ऑॅस्ट्रेलियामध्ये 57% आणि तुर्कस्तानात 69% डॉक्टर रुग्णांच्या हल्ल्यांना तोंड देतात, असे विविध सर्वेक्षणांतून आढळले आहे. शिवीगाळ, मारहाण याबरोबरच काही वेळा तोडफोड, नासधूस, आग लावणे अशा घटना घडतात, तर क्वचित प्रसंगी एखाद्या डॉक्टरला लैंगिक अत्याचारालासुध्दा बळी पडावे लागते.

डॉक्टरांवरील हल्ल्यांची कारणे

डॉक्टरी पेशाकडे बघण्याचा आपल्या समाजाचा एक विशिष्ट दृष्टीकोन आहे. डॉक्टर म्हणजे एका उदात्त हेतूने रुग्णसेवा करणारी व्यक्ती असे मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांकडून कायमच भरपूर अपेक्षा केल्या जातात. आपल्या देशात तर डॉक्टर म्हणजे देवासमान अशी डॉक्टरची प्रतिमा वर्षानुवर्षे निर्माण केली गेली आहे. अशा देवासमान माणसाकडून काहीही चूक घडता कामा नये आणि जर काही चूक घडली तर तो अक्षम्य गुन्हाच, अशी भावना बऱ्याच वेळा लोकांच्या मनात असते. किंबहुना कुठल्याही दुर्धर आजारातून आणि कितीही अत्यवस्थ रुग्ण असला, तरी डॉक्टरने त्याला बरे केलेच पाहिजे अशी अपेक्षा असते. अशा सगळया अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला डॉक्टरांवरील हल्ल्यांची करणे शोधावी लागतात.

आपल्याकडे सर्वांना 'झटपट इलाज' हवा असतो. 'दोन दिवसात बरे' करणारे डॉक्टर चांगले, इंजेक्शन देणारे, सलाइन लावणारे डॉक्टर चांगले; पण तपासण्या करायला सांगणारे, बरे व्हायला वेळ लागेल असे म्हणणारे डॉक्टर मात्र जरा नावडतेच! रोगाचे निदान, त्यावरील उपचार हे गणित 1 + 1 = 2 असे साधे नसते, तर त्या त्या रुणाप्रमाणे, त्या त्या आजाराप्रमाणे, आजार किती बळावला आहे , उपचार किती वेळेवर सुरू केले आहेत अशा अनेक गोष्टींवर निदान आणि उपचार अवलंबून असतात. अवास्तव अपेक्षा ठेवून डॉक्टरांकडे गेले, तर डॉक्टरांच्या हाताला यश नाही असे वाटून राग येऊ  लागतो.

आपल्याकडे रुग्ण स्वत: फार कमी वेळा डॉक्टरांना काही बोलतो. येणारा रुग्ण एकटा नसतो. त्याच्याबरोबर त्याच्या घरचे किंवा शेजारचे असे कोणीतरी आलेले असते. खूप वेळा एका रुग्णाबरोबर 8-10 जणसुध्दा हॉस्पिटलमध्ये जातात. आपल्या नातेवाइकाविषयी वाटणारी चिंता, काळजी त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करते, अपेक्षेप्रमाणे तब्येतीत सुधारणा झाली नाही, तर निराशा निर्माण करते आणि त्यातून संताप निर्माण होतो आणि नातेवाइकांचा संयम सुटतो; एकत्र आलेल्यांची जमावाची आक्रमक मानसिकता तयार होते आणि बहुतेकदा असे रुग्णाचे नातेवाईक, शेजारीपाजारी किंवा जवळपासचा एखादा राजकीय पुढारी डॉक्टरांना शिवीगाळ करू लागतात किंवा त्यांच्यावर हात टाकतात.

खूप वेळा रुग्णाला आणि नातेवाइकांना धीर नसतो. एका डॉक्टरांकडे दोन दिवसात बरे वाटले नाही, तर लगेच दुसऱ्या डॉक्टरकडे धाव घेतात. माल पसंत नाही पडला म्हणून  दुकानादुकानांत फिरावे, तसे ही मंडळी डॉक्टर बदलत राहतात. त्याने निदान आणि उपचारामध्ये सातत्य राहू शकत नाही आणि जर अशा रुग्णाची तब्येत खालावली, तर अखेरचा उपाय म्हणून ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन येतात, तिथल्या डॉक्टरांवर दबाव निर्माण होतो. असा आधीच सीरिअस असलेला पेशंट आला तर कधीकधी डॉक्टर काही करू शकत नाहीत. मात्र अनेक ठिकाणी जाऊनही काही उपाय नाही या भावनेतून नातेवाईक निराश होतात आणि संतापून चुकीची कृती करू शकतात.

रुग्ण आणि नातेवाईक यांच्या मन:स्थितीशी निगडित अशी अनेक कारणे डॉक्टरांवरच्या हिंसाचाराला कारणीभूत होतात असे दिसून येते, तसेच आपल्याकडच्या आरोग्य सेवांमधील काही घटकही रुग्णाच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या निराशेला जबाबदार ठरतात. डॉक्टरला भेटण्यासाठी रुग्णाला खूप वेळ थांबावे लागते, मोठया हॉस्पिटलमध्ये तर रांगा असतात आणि दिवसाचे अनेक तास आजारी माणसाला ताटकळत राहावे लागते. याशिवाय तपासण्या आणि औषधोपचार यांच्यावर होणार खर्च वेगळाच! विशेषत: आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या रुग्णांना तर त्याचा भार फार वाटतो. अनेक ठिकाणी पुरेशा सुविधा नसतात. घरापासून खूप दूरपर्यंत प्रवास करावा लागतो. रुग्णांची खूप गर्दी असेल अशा ठिकाणी स्वच्छता राहत नाही. गर्दी, अस्वच्छता, कोलाहल यानेसुध्दा माणूस कंटाळतो, त्याला वाटते की डॉक्टर आपल्याकडे पुरेसे आणि नीट लक्ष देत )नाहीत आणि त्याची सहनशीलता संपून जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत सगळा राग डॉक्टरवर निघतो.

या सगळया चर्चेत हे लक्षात ठेवण्याजोगे आहे की, सरकारी रुग्णालये, जनरल हॉस्पिटल्स, खाजगी रुग्णालये, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स यापैकी कुठेही अशा घटना घडू शकतात. जिथे शिकाऊ डॉक्टर असतात किंवा डॉक्टर अननुभवी आहेत असे नातेवाइकांना वाटते, तिथे अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते. तरुण रुग्ण, घरातली कमावणारी एकमेव व्यक्ती, एकुलता एक मुलगा, अचानक आलेले गंभीर आजारपण किंवा अपघात, लहान मूल अशा प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत नातेवाइकांना लवकर निराशा येते, भावनांवर ताबा राहत नाही आणि सगळा राग डॉक्टरांवर काढला जातो.

डॉक्टरांवरील हल्ले कमी करता येतील का?

अशा प्रकारे विविध कारणांमुळे होणारे डॉक्टरांवरील हल्ले कमी करता येतील का? असा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कुठे सापडणार? डॉक्टर-रुग्ण यांचे व्यस्त प्रमाण, आपल्याकडील आरोग्य सेवांची सद्यःस्थिती, रुग्णाला करावा लागणारा खर्च या अनेक दूरगामी मुद्दयांची चर्चा सुरू राहू शकते, पण आत्ताच्या परिस्थितीत ह्या घटना कशा टाळता येतील याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे.

आपल्याकडे रुग्णांची गर्दी खूप, डॉक्टरांकडे त्यामुळे वेळ कमी. डॉक्टरांना रुग्णाशी कमी वेळात योग्य तो संवाद कसा निर्माण करायचा ह्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. उदा. हॉस्पिटलच्या तत्काळ विभागात आलेला रुग्ण अत्यवस्थ असेल, तर नातेवाइकांना त्याच्या स्थितीची पूर्ण आणि योग्य कल्पना देणे, उपचाराविषयी, त्यासाठी येणाऱ्या खर्चाविषयी पारदर्शकता बाळगणे, खोटी आशा न दाखवणे याचे प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे. यातून विनाकारण निर्माण होणारा असंतोष टळेल. ओपीडीमध्ये, क्लिनिकमध्ये बसलेले असतानासुध्दा तपासण्या आणि औषधे यांविषयी सोप्या शब्दात आणि रुग्णाला समजेपर्यंत सूचना देणे गरजेचे असते. डॉक्टर शिकताना त्यांना त्याचेही प्रशिक्षण दिल्याचा फायदाच होईल. हॉस्पिटलमध्ये तक्रार निवारण कक्ष कार्यरत असेल, तर रुग्णांना आपल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे सोपे जाईल. भावनांचा अनावश्यक उद्रेक होणार नाही. संगणकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाट पाहण्याचा कालावधी कमी करणे, रुग्णाविषयी नोंदी ठेवणे, रिपोर्ट जागच्या जागी मिळणे अशा सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. यातून रुग्णाचा आणि डॉक्टरांचा वेळ वाचेल.

त्यातूनही एखादी अशी घटना घडलीच, तर त्याला दिली जाणारी प्रसिध्दी, माध्यमांमधून त्याविषयी केलेली खरपूस चर्चा मारक ठरते. माध्यमांनीही बातम्या संयमित पध्दतीने देण्याची आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

 हॉस्पिटलमधील सोयीसुविधांची कमतरता, रुग्णांची बदललेली मानसिकता आणि डॉक्टरांवरील कामाचा भार, त्यांच्या प्रशिक्षणातील आवश्यक बदल अशा अनेक गोष्टींबरोबर हल्ला करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असा विशेष कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्याची तितकीच कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तर डॉक्टरांवर हल्ला करायला कोणी सहज धजावणार नाही.

आज सारे समाजमनच अस्वस्थ झाले आहे. माणसामाणसामधले सामंजस्य कमी झाले आहे असे जाणवते. आपापल्या जीवनसंघर्षाने लोक दबून जातात. त्यामुळे सहनशीलता संपलेली दिसते, पटकन नैराश्य येते, वैफल्य येते, आक्रमकता वाढते. समाजाच्या या मन:स्थितीचे प्रतिबिंब डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंधांमध्ये दिसून येते.

डॉक्टर आणि रुग्ण यातले नाते नेहमी विश्वासावर आधारित राहिले आहे. आताच्या परिस्थितीत दोन्ही बाजूंनी या विश्वासाला तडा गेला आहे की काय असे वाटते. काही डॉक्टरांच्या लोभी आणि अनैतिक वागणुकीमुळे सगळया डॉक्टरांबद्दल अविश्वास बाळगण्याचे कारण नाही. रुग्णसेवाच आपले ध्येय मानणारे डॉक्टर आपल्या रुग्णांसाठी जिवापाड कष्ट घेतात. अयोग्य पध्दतीने वागणाऱ्या डॉक्टरांविषयी तक्रार करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यासारख्या सुविधा आज उपलब्ध आहेत. आजाराच्या उपचारादरम्यानच्या निर्णयप्रक्रियेत सजगपणे रुग्णांना आणि नातेवाइकांना आज सामील होता येते. असे केले तर आपोआप सहभागाची भावना निर्माण होऊन डॉक्टर आणि रुग्ण-नातेवाईक एकत्रितपणे आजाराला सामोरे जातात.

पुन्हा एकदा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वास निर्माण झाला, तर हे नाते सुदृढ बनेल. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही सुरक्षित वाटेल.