कथानकाच्या शोधात 'पुरोगामी कोडगे'

विवेक मराठी    25-Jun-2019   
Total Views |

 पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे संघाचे स्वयंसेवक आहेत, तसेच ते देशाचे नागरिक आहेत. संसदीय लोकशाही पध्दती कशी चालते आणि कशी चालवावी लागते, याबद्दलचे त्यांचे ज्ञान फार उच्च प्रतीचे आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना विरोधी पक्षांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विचार मांडले आहेत, ते 'कथानक' शोधणाऱ्यांच्या डोक्यावरून जाणारे आहेत, पण सामान्य माणसाच्या मनात जाणारे आहेत.

'विच्छा माझी पुरी करा' हे 1960च्या दशकात गाजलेले वगनाटय आहे. वसंत सबनीस त्याचे लेखक आहेत आणि दादा कोंडके यांची मध्यवर्ती भूमिका या वगनाटयात होती. वगनाटयाच्या पहिल्या प्रवेशात लेखक आणि शाहीर यांचा खुमासदार संवाद आहे. त्यातली दोन वाक्ये मला आठवतात. लेखक म्हणतो, ''मी शाई शोधत आहे आणि शाईबरोबर शाहीर शोधतो आहे.'' लेखकाला शाहीर सापडतो आणि शाहिराला लेखक सापडतो.

नरेंद्र मोदी यांचे शासन 2014साली सत्तेवर आले. तेव्हा लेखक वसंत सबनीस नव्हते, पण डावे पुरोगामी फलटण करून शाहिरांच्या शोधात निघाले. त्यांनी वगनाटय लिहिले की नाही, काही माहीत नाही. कारण 'वगनाटय' ही त्यांची भाषा नाही. त्यांची भाषा आहे 'नॅरेटिव्ह', म्हणजे कथानक. मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी कथानक रचायला सुरुवात केली. हे सरकार दलितविरोधी आहे - (रोहित वेमुला कथानक). हे सरकार अभिव्यक्तिस्वातंत्र्यविरोधी आहे - (पुरस्कारवापसी कथानक). हे सरकार मुस्लीमविरोधी आहे - (अफलाक हत्या कथानक) मोदी अधिकारवादी आहेत, ते पक्षातील ज्येष्ठांना किंमत देत नाहीत (अडवाणी-जोशी कथानक).

दादा कोंडके यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे वगनाटय लोकांनी डोक्यावर घेतले. पुरोगामी 'दादा कोडग्यांची' कथानके लोकांनी पायदळी तुडविली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 'पायातील वहाणा काढून झोडले' ही एक खास मराठी म्हण आहे. तिचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. तिचा अर्थ झाला -जनतेने सर्व पुरोगामी दादा कोडग्यांना झोडून काढले आणि झोपवून टाकले.

ते आता नवीन कथानकाच्या शोधासाठी बाहेर पडले आहेत. त्यांना कुणी शाहीर मिळतील की नाही... माहीत नाही. (उदा., पुरस्कारवापसीवाले). पण ते हिंमत हरणारे नाहीत. त्यांनी नवीन कथानक रचायला सुरुवात केलेली आहे - 'भाजपाला 305 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे प्रचंड बहुमत मिळाले आहे. आता बहुमताच्या जुलूमशाहीचा कालखंड सुरू होईल. नरेंद्र मोदी या बहुमताच्या आधाराने हुकूमशहा होतील. सर्व लोकशाही संस्थांचा ऱ्हास तरी होईल, किंवा नाश तरी होईल. आपली संसदीय लोकशाही कधी नव्हे एवढया मोठया प्रमाणात धोक्यात आलेली आहे.' 'दादा कोडग्यांचे' शाहीर या कथानकावर आता देशभर तमाशगिरी सुरू करतील. काही प्रमाणात ती झालेली आहे.

म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की, नरेंद्र मोदी हुकूमशहा होतील का? अनेक लोकांनी जगातील हुकूमशहांचा अभ्यास केलेला आहे. हुकूमशहा होण्यासाठी सत्ताधीशांकडे अनेक (अव)गुण असावे लागतात. त्यातील पहिला गुण सत्ताधीश अत्यंत निर्दयी आणि क्रूर असावा लागतो. मानवी जीवनाविषयी त्याच्या मनात शून्य सहानुभूती असावी लागते. हिटलर, स्टॅलिन, पॉलपॉट, माओ यांच्यामध्ये हा गुण शंभर टक्के होता. हिटलरने 60 लाख ज्यूंची हत्या केली. स्टॅलिनने जवळजवळ दोन कोटी माणसे मारली. पॉलपॉटनेदेखील 50-60 लाख लोक मारले. माओनेदेखील कोटयवधी चिनी ठार केले. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वात हा गुण शून्य उणे अगणित शून्य आहे.

हुकूमशहा होण्यासाठी मी म्हणजेच सर्व काही, माझ्यासारखा मीच, मला कुणी प्रतिस्पर्धी असू शकत नाही, मी म्हणेन तीच पूर्व दिशा, लोकांना काही समजत नाही, लोक अडाणी असतात, अशा प्रकारची भावना असावी लागते. नरेंद्र मोदी म्हणतात की, ''मी जनतेचा प्रधानसेवक आहे. जोवर जनतेची इच्छा आणि विश्वास आहे, तोवर मी सत्तेवर आहे. मला सर्व काही समजते असे नाही. मी कुठे चुकत असेन, तर मला त्याची जाणीव करून द्या.'' कोणताही हुकूमशहा ही भाषा वापरीत नाही.

हुकूमशहा होण्यासाठी राज्याची दंडशक्ती, सैनिकी शक्ती, आणि न्यायपालिका ताब्यात घ्यावी लागते. हुकूमशहा सैन्याच्या मदतीने लोकांवर राज्य करतो. लोकमताची अनुकूलता हा त्याचा राज्याचा आधार नसतो. दहशत हा त्याचा राज्याचा आधार असतो. रशिया स्टॅलिनचे राज्य असताना 'मिडनाइट नॉक' हा शब्दप्रयोग भयानक भीती दाखविणारा झाला होता. मध्यरात्री घरावर कुणाची थाप पडली, तर घरातील स्त्री किंवा पुरुष कधी कधी दोघेही, यांना पोलीस घेऊन जात. यातील बुहतेक जण कधीच परत येत नसत. सैबेरियातील छळ-छावणीतील वर्णने आपण भारतीय लोक वाचू शकत नाही. कौर्याची सीमा काय असते, यांच्या दर्शन घडविणाऱ्या या कथा आहेत. (1. Kolyma Tales (Varlan shalamov) 2. One day in the Life of Ivan Denisovich_ A Novel (Aleksandr Solzhenilsyn) 3. Resistance In the Gulag archipelago (Donalad G. Boudreau) )

लिबियाचा कर्नल गडाफी, इराणचा शहा, इराकचा सद्दाम हुसेन, दक्षिण अमेरिकेतील काही देशांचे हुकूमशहा, सैन्य आणि पोलिसांच्या मदतीने लोकांना चिरडून टाकत. ही एक मनोवृत्ती आहे. मोदींच्या आज्ञेत सैन्य नाही. मोदी यांचे स्वतःचे गुप्तहेर खाते नाही. सद्दाम, शहा, स्टॅलिन या सर्वांनी लोकांवर पाळत ठेवण्यासाठी अत्यंत ताकदवर असे अंतर्गत गुप्त पोलीस दल उभे केले होते. भारताची रॉ संघटना आहे, सीबीआय आहे, आयबी आहे, या सर्व संघटना कायद्याने बांधलेल्या आहेत. कायदा मोडून त्या काहीही काम करू शकत नाहीत. त्यांच्या कुण्या अधिकाऱ्याने असे काम केल्यास त्याला जेलमध्ये जावे लागते.

नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक आहेत. भाजपात जाण्यापूर्वी ते संघाचे प्रचारक होते. संघसंस्कार संघस्वयंसेवकाला हुकूमशहा बनविण्यास उपयुक्त नाहीत. संघसंस्काराचा पहिला भाग येतो, सर्व देश माझा आहे, देशातील सर्व नागरिक माझे आत्मीय आहेत. त्यांचे सुख ते माझे सुख, त्यांचे दुःख ते माझे दुःख. या जीवनाचा उपयोग समाजाला सुखी करण्यासाठी करायचा, या जीवनाचा उपयोग समाजाला निर्दोष करण्यासाठी करायचा. संघकामाचा आत्मा समाजावर निरपेक्ष प्रेम करण्याचा आहे. असे प्रेम की ज्याच्या परतफेडीची काही अपेक्षा नाही. सर्व सुखी व्हावेत. सर्व आरोग्यसंपन्न व्हावेत. कुणालाही कसलेही दुःख असू नये, ही स्वयंसेवकाची काम करण्याची प्रेरणा असते. असा स्वयंसेवक सत्ताधीश झाला तरी, तो आपले स्वयंसेवकत्व विसरू शकत नाही. संघसंस्कार तकलादू नसतात. ते फार खोलवर मुरलेले असतात. आणि जो स्वयंसेवक प्रचारक म्हणून आपले जीवन व्यतीत करतो, त्याच्या जीवनातून हे संस्कार वेगळे करता येत नाहीत. मोदी हुकूमशहा होणार ही पुरोगाम्यांची ओरड त्यांच्या परंपरेला शोभणारी असली, तरी तिचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे संघाचे स्वयंसेवक आहेत, तसेच ते देशाचे नागरिक आहेत. संसदीय लोकशाहीच्या सत्ताधारी पक्षाचे नेता आहेत. संसदीय लोकशाही पध्दती कशी चालते आणि कशी चालवावी लागते, याबद्दलचे त्यांचे ज्ञान फार उच्च प्रतीचे आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना विरोधी पक्षांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विचार मांडले आहेत, ते 'कथानक' शोधणाऱ्यांच्या डोक्यावरून जाणारे आहेत, पण सामान्य माणसाच्या मनात जाणारे आहेत.

पंतप्रधान म्हणतात, ''लोकशाहीत विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आपल्याला किती मते मिळाली? आपले संख्याबळ किती आहे? याचा विचार विरोधकांनी सोडून द्यावा. अनेकदा अनेक विरोधी पक्षाचे खासदार अशा प्रकारे मते मांडतात की त्यातून अनेक चांगल्या गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात. तर्काच्या आधारावर बोलणाऱ्या प्रत्येकाला संधी दिली जाईल.'' ''देशाने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली, त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. सबका साथ, सबका विकास हे आमचे धोरण आहे. देशाच्या जनतेला ते भावले म्हणूनच आम्ही पुन्हा सत्तेवर आलो...'' ''मागील पाच वर्षांत संसदेत जनहिताचे अनेक निर्णय झाले. येत्या काळातही आम्ही असेच निर्णय घेऊ. 'सबका साथ, सबका विकास,' हे आमचे लक्ष्य आहे. संसदेच्या सभागृहांमध्ये अनेक सदस्य असे आहेत, जे खूप चांगले विचार, चांगले प्रस्ताव मांडतात. तर्काच्या आधारावर सरकारवर टीका केली जावी. लोकशाहीत विरोधकांची ताकद खूप महत्त्वाची असते. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.''

भारतातील लोकशाही केवळ राजकीय लोकशाही नाही. त्याचप्रमाणे भारतातील लोकशाही, केवळ लोकशाही संस्था जीवनाचा सांगाडा नाही. लोकशाही संस्था जीवनामुळे लोकशाही बळकट होते, हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य असे आहे की, लोकशाही जीवनमूल्ये लोकांच्या जीवनात उतरावी लागतात. आपले भारतीय लोकजीवन लोकशाही जीवनमूल्यांवरच शेकडो वर्षांपासून उभे आहे. दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, त्याच्या म्हणण्यातही सत्यांश आहे, हे मान्य करणे, वेगवेगळया उपासना पध्दतींना स्वीकारणे, वेगवेगळया भाषांचा सन्मान करणे, वेगवेगळया आहार पध्दतींचा आस्वाद घेणे, विविध पोशाखांचा सन्मान करणे ही आपली जीवनशैली आहे. ती जोपर्यंत जिवंत आहे, जिवंत राहील, ती जिवंत ठेवणारा संघ जोपर्यंत अस्तित्वात असेल, तो वर्धिष्णू असेल, तोपर्यंत भारतातील लोकशाहीला शून्य धोका आहे. धोक्याची घंटा वाजविणारे बोक्याची लबाडी करीत आहेत, हे त्यांना समजत नसले तरी ते ज्यांना अडाणी समजतात, त्या सामान्य माणसाला 'पानी का पानी आणि दूध का दूध' करण्याची शक्ती उपजताच प्राप्त झालेली आहे.

vivekedit@gmail.com