मोबाइल व्यसनाधीनता

स्रोत: विवेक मराठी    दिनांक28-Jun-2019

***वर्षा वेलणकर***

 नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे काही चूक नाही. पण त्याचा गरजेपेक्षा अधिक वापर ही चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे नवनवीन उपकरणे आणि त्याचे दुष्परिणाम यावर सखोल अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे. त्यातही मोबाइल, कारण हल्ली वापरात असलेल्या स्मार्ट फोनचे सगळयाच वयोगटातील लोकांना व्यसन लागले आहे.

घटना तशी फार जुनी नाही. फक्त सात वर्षे झालीत तिला. पण या सात वर्षांत अशा घटनांची संख्या सात पटींनी वाढली आहे, एवढे मात्र नक्की. शिवाय, एखादी सवय किंवा गरज ही कधी व्यसनात परिवर्तित होईल हे सांगता येत नाही, ही गोष्ट पुरेपूर अनुभवावयास देणारी ही घटना आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याची धडपड सुरू असताना एका शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. दोन वर्षे हा उपक्रम सुरू होता. एके दिवशी शाळेतील एक शिक्षक त्यांच्या स्नेह्यांना मला भेटायला घेऊन आले. त्यांच्याशी झालेला हा संवाद -

''माझी मुलगी या वर्षी बारावीला आहे. दहावीला तिला मेरिट मिळाला होतं. खूप हुशार आहे ती. पण गेले वर्षभर तिला मोबाइलचा नाद लागला आहे. सतत सतत मोबाइलवर काहीतरी करत असते आणि अभ्यासाची आठवण करून दिली की चिडते.'' यावर मी साधारण जे काही बोलले जाते, ते बोलले. पण त्यांचे समाधान झाल्याचे दिसले नाही. शेवटी जरा खोलवर चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की फोन काढून घेऊ असे म्हटले की ती आक्रमक होते आणि आत्महत्येची धमकी देते.

हे माझ्यासाठी तसे नवीन नव्हते. कारण असे बरेच किस्से त्या वेळी कानावर येऊ लागले होते. पण माझ्याकडे आलेली ही पहिलीच अशी घटना होती. मी त्यांना थोडे समजावून सांगितले आणि मुलीला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

मोबाइल फोन आल्यावर त्याने जे मानवी जीवनावर आक्रमण केले आहे, त्याचे ते पहिले उदाहरण मी पाहत होते. अंगावर सरसरून काटा आला होता. हे असेच चालत राहिले, तर आणखी काय काय घडणार? या प्रश्नाचे उत्तर शोधत असतानाच मे महिन्याच्या शेवटी बातमी वाचायला मिळाली ती पुण्याच्या एका युवा राष्ट्रीय जलतरणपटूच्या आत्महत्येची. ''सतत फोनवर असतोस, जरा अभ्यासाकडे  दे'' म्हणून वडिलांनी रागावले, तर वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या या मुलाने आयुष्यच संपवले.

मुलांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या पालकांचे काही चुकते आहे का? नवीन तंत्रज्ञानाची कास धरण्यात काही चूक झाले का? नेमके काय चुकत आहे? अशा प्रश्नांनी आता डोके भंडावले आहे आणि म्हणून नवनवीन उपकरणे आणि त्याचे दुष्परिणाम यावर सखोल अभ्यासाची गरजही निर्माण झाली आहे. आणि त्यातही मोबाइल फोन व संगणक या दोन उपकरणांच्या वाढत्या प्रभावावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज भासू लागली आहे.

दृक-श्राव्य माध्यमांचा मानवी मनावर जास्त परिणाम होतो, हे तर सिध्दच झाले आहे. त्यातही मनोरंजनपर सादरीकरणांचा तर पाहणाऱ्याला लळाच लागतो. आधी टेलीव्हिजन, नंतर संगणक आणि आता स्मार्ट फोन यांच्या अतिवापराने माणसाच्या मनावर असे काही परिणाम होऊ लागले आहेत की तो आता व्यसनाधीनतेकडे वाटचाल करू लागला आहे, असा निष्कर्ष अनेक मनोविकारतज्ज्ञांनी काढला आहे. त्यातही लहान मुलांच्या आयुष्यावर या उपकरणांचे भयंकर परिणाम होऊ लागले आहेत, असेही अनेक अभ्यासकांना आढळून आले आहे.

चार्टर हार्ले स्ट्रीट क्लिनिक या मनोविकाराशी आणि व्यसनाधीनतेशी लढणाऱ्या, लंडन येथील अत्यंत प्रथितयश संस्थेच्या सह-संस्थापक आणि संचालक डॉ. मॅन्डी सॅलीगर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर ''लहान मुलांच्या हाती मोबाइल आणि स्मार्टफोन देणे म्हणजे त्यांना रोज एक ग्रााम कोकेन (मादक द्रव्य) देण्यासारखे आहे.'' एका परिषदेत आपले अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, ''स्क्रीन असलेली उपकरणे - उदा., संगणक, टॅबलेट किंवा स्मार्ट फोन मुलांना लहान वयात देणे म्हणजे खरेच त्यांच्या हाती दारूची बाटली किंवा एक ग्रॉम मादक द्रव्य देण्यासारखे आहे. कारण आता ही मुले स्क्रीनसमोर घालवत असलेला वेळ आणि प्रत्यक्ष जगात वावरण्याचे क्षण यांचा या मुलांना कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही, भान राहिलेले नाही.''

Mobile Addiction of Generation

 

2017मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतातील स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या 29 कोटी 92.4 लाख  (299.24 मिलियन) इतकी आहे आणि जगभरातील अशा स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची आकडा या वर्षी - म्हणजे 2019मध्ये 2 अब्ज 70 कोटी ही संख्या गाठू शकतो. यात लहान मुले आणि तरुण मुले यांची संख्या जरी दिलेली नसली, तरी सर्वेक्षणात आढळून आल्या प्रमाणे सरासरी 10.3 या वयात मुलांना त्यांचा पहिला स्मार्ट फोन मिळू लागला आहे आणि यातील पन्नास टक्के मुले वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत सगळया समाजमाध्यमांचा वापर करू लागतात. यात फेसबुक, इन्स्टाग्रााम, टि्वटर, स्नॅपचॅट यासारख्या माध्यमांचा समावेश मोठया प्रमाणात आहे.

डॉ. सॅलीगर सांगतात की त्यांच्याकडे व्यसन लागलेल्या मुलांचे सरासरी वय 16 ते 20 इतके आहे. तशी उपचारासाठी येणाऱ्या मुलांमध्ये लहान मुले अधिक आहेत. पण ते अजून व्यसनाधीन झालेले नाहीत. भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली आणि काही नामांकित वैद्यकीय संस्थांनी मिळून केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 16 ते 22 या वयोगटातील मोबाइल आणि स्मार्ट फोन वापरणारी मुले दिवसातून सुमारे 163 वेळा आपला फोन पाहतात. म्हणजे काहीही काम नसताना ही मुले फक्त सवय म्हणून फोन हातात घेऊन त्याचा स्क्रीन तपासतात, असे या सर्वेक्षणाचा निष्कर्ष सांगतो. ही फक्त सवय आहे की ते व्यसन आहे? तसे पाहता ही सवय व्यसनात कधीही परिवर्तित होऊ शकते.

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लाँगन मेडिकल सेंटरच्या डॉक्टर रेडिओचे संचालक असलेले डॉ. मार्क सिगेल यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सुमारे 92 टक्के पौगंडावस्थेतील मुलांकडे स्मार्ट फोन आहे. ''या परिस्थितीकडे पाहिले तर लक्षात येते की या सर्व मुलांचे पालकच फोनला आणि संगणकाला सतत चिकटून असतात आणि मुलांनी आपल्या कामात व्यत्यय आणू नये म्हणून ते मुलांनाही अगदी नकळत्या वयात फोन देऊन देतात'', डॉ. सिगेल सांगतात.

स्क्रीन असलेल्या उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे फक्त मुलांच्याच नाही, तर वयस्क लोकांच्याही मनोवस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसू लागले आहे. मुलांमध्ये तर अगदी लहान वयात एकलकोंडेपणा, सतत दुर्मुखलेले असणे, नैराश्य, व्यायामाच्या अभावामुळे कमकुवत शरीर आणि एवढेच नाही, तर आत्महत्येची प्रवृत्तीदेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे, असे डॉ. सिगेल यांनी सांगितले. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, अमेरिका यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की 2010 ते 2015 या काळात 13 ते 18 वर्षीय मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण तब्बल 30 टक्क्यांनी वाढले आहे आणि यातही मुलींमध्ये ही टक्केवारी 60 इतकी आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतात 15 ते 18 वषर्े वय असलेल्या मुलांमध्ये दर 55 मिनिटाला एक आत्महत्या केली जाते.

लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की एक गरज म्हणून या व्यसनाची सुरुवात झाली आहे आणि आता संगणक, फोन, स्मार्ट फोन मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. पण तरुण वयात या उपकरणाचा जसा वापर केला जातो आहे, तो धोकादायक ठरतो आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. फक्त मनोरंजन किंवा फक्त संवाद एवढयावर या उपकरणांचा वापर थांबलेला नाही. समाजमाध्यमातून मुले परस्परांशी ज्या प्रकारचे संवाद करत आहेत, तो त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. याचे मुख्य उदाहरण म्हणजे 'सेक्सटिंग'! डॉ. मॅन्डी सांगतात की त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांमध्ये 10 ते 15 वयोगटातील मुलांना सेक्सटिंगचे अजिबात वावडे नाही. सेक्सटिंग म्हणजे प्रणयासंदर्भातील किंवा संभोगसंदर्भातील संवाद. यात मुलीही आघाडीवर आहेत. त्यांना स्वतःचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवणे अजिबात गैर वाटत नाही. फक्त पालक जेव्हा अशा गोष्टींमध्ये लक्ष घालतात, तेव्हाच तो डोक्याला ताप होतो, असे या मुलींचे म्हणणे असते... त्या सांगतात.

आपली नवीन पिढी तांत्रिकतेच्या स्पर्धेत मागास ठरू नये म्हणून पालक त्यांना या उपकरणांपासून दूर ठेवू इच्छित नाहीत आणि म्हणून अगदी शाळांमध्येसुध्दा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. मुलांना अगदी शाळेतसुध्दा आता संगणक, स्मार्ट फोन वापरण्याची मुभा आहे. तुम्ही शाळांमध्ये एक नजर टाका, अगदी जेवायच्या सुट्टीतसुध्दा मुलांच्या हातात मोबाइल असतो आणि ते एकटे एकटे कोपऱ्यांमध्ये जाऊन त्यात डोके घालून बसले असतात, डॉ. सिगेल आपला मुद्दा पटवून देताना सांगतात. हे व्यसन नाही तर काय आहे? असा सवालही ते करतात. जर येणाऱ्या पिढीला शारीरिकरीत्या व मानसिकरीत्या सुदृढ बनवायचे असेल, तर या मुलांच्या हातून फोन काढून घेण्याची गरज आहे, असे ते आपल्या निरीक्षणात म्हणतात.

मोबाइल वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील शाळांमध्ये संगणक, फोन वापरावर बंदी नाही. अशात भारतीय मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन जर जडले, तर त्या संकटाशी लढायचे कसे? आजवर जगात फक्त फ्रान्स हे एक असे राष्ट्र आहे, ज्याने शाळांमध्ये मोबाइल वापरावर बंदीसंदर्भात विधेयक पारित केले आहे. त्याची अंमलबजावणी कशी करावी, याचीही ते तयारी करीत आहेत. कारण या उपकरणाच्या वापरातून पुढे येणाऱ्या परिणामांची चिंता त्यांना वाटू लागली आहे.

या व्यसनावर मात करण्यात पालकांची भूमिका सगळयात मोठी आहे. त्यांनी जर मुलांना या उपकरणापासून दूर ठेवले, तरच काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील. आधी स्वतः पालकांनी या उपकरणांशी फारकत घेण्याची गरज आहे. मुलांना त्यांचा वेळ हवा आहे. त्यांच्याशी खेळणे, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणे, त्यांच्या अभ्यासात लक्ष देणे असे जर त्यांनी केले, तरच ही मुले या व्यसनापासून दूर राहू शकतील. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. सिगेल यांचे ठाम मत आहे.

अर्थात हे सगळे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा या उपकरणांचा अतिवापर धोकादायक ठरतो आहे याची आपल्याला जाणीव होईल. पूर्वी दारू पिणे किंवा धूम्रपान करणे हे समाजमान्य नव्हते. असे करणारी व्यक्ती काहीतरी चूक करते आहे, असा लोकांमध्ये समज होता. त्याला व्यसन समजले जात असे आणि तरुण पिढीला त्यापासून परावृत्त केले जात असे. मात्र बदलत्या काळानुसार आता दारू पिण्याला आणि धूम्रपानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. काही उच्चभ्रू मंडळींमध्ये वडीलधारी मंडळी आणि मुले एकत्र बसून मद्यपान करतात. हेच जर मोबाइल वापराच्या व्यसनाबाबतही झाले, तर मग सारे काही हाताबाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे.

मग काय आधुनिक तंत्रज्ञानापासून मुलांना वंचित ठेवायचे काय? आणि मागास ठरायचे काय? असे सवाल केले जाण्याची शक्यता आहे. पण ज्या प्रगतीने आयुष्य विनाशाकडे जात असेल, त्या प्रगतीची कास धरण्यापेक्षा मागास म्हणवून घेणे योग्य वा अयोग्य, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ज्या काळात ही उपकरणे नव्हती, त्या काळातील लोक मागास होते का? आणि फक्त तांत्रिक माहिती असणे किंवा त्याचा उपयोग करणे म्हणजेच प्रगती का? याही प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपले आपले शोधायचे आहे. पण येणाऱ्या पिढीच्या आरोग्यासाठी तरी काही गोष्टींचा त्याग करण्यात अयोग्य काही नाही, असे मला वाटते.

विविध बिले भरणे, खरेदी करणे, मित्रमैत्रिणींना भेटायला जाणे, समारंभांना उपस्थित राहणे या सगळया शारीरिक हालचालींना वाव देणाऱ्या गोष्टी आता मोबाइलच्या एका बटणने सहज साध्य होतात. फोनवर बोलून ख्यालीखुशाली विचारली की नातेवाइकांना भेटण्याचा प्रश्नच उरत नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओच जेव्हा घरी कोचावर बसून पाहणे शक्य आहे, तर कुणी कशाला अशा कार्यक्रमांसाठी बाहेर पडणार? ऑनलाइन खरेदी हा तर आता मध्यमवर्गीय घरांमध्येही सहज स्वीकारला गेलेला पर्याय ठरला आहे. आणि जेव्हा हे सगळे आचरणात आणणारे घरातील जाणते लोक आहेत, तर मग मुलांकडून कुठल्या अनुकरणाचा अपेक्षा केली जावी? फक्त आपण ज्यांना जिवापाड जपण्याचा प्रयत्न करतो आहे, ती येणारी पिढी कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये असे वाटत असेल, तर आता मोबाइलच्या आणि स्मार्ट फोनच्या संयत वापराची वेळ आली आहे, हे निश्चित.

मुक्त पत्रकार, अनुवादक, समुपदेशक