माय ग्रीन सोसायटीचा पर्यावरण जागर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक05-Jun-2019

 

घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणाशी संबंधित इतर अनेक उपक्रम हाती घेऊन शहरी नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती करणारी संस्था म्हणजे मुंबईतील 'माय ग्रीन सोसायटी'. संस्थेद्वारे चालणाऱ्या या उपक्रमांविषयी आणि त्यांच्या सकारात्मक परिणामांविषयी माहिती देणारा लेख.

***सुशील जाजू****

या सृष्टीतील प्रत्येक घटक - मग ती चिमणी असेल, हवा असेल, झाड असेल - आपल्यासाठी अप्रत्यक्षपणे काय काय करतात, याची आपल्याला जाणीव नसते. आपण कोणत्या झाडाचे फळ खातो, कोणत्या मधमाशीने त्याचे परागीभवन केले, कोणत्या शेतकऱ्याने पिकवलेले कोणते धान्य आपण खात आहोत या कशाचीच आपल्याला जाणीव नसते. निसर्ग आपल्याला इतक्या सगळया गोष्टी देत असतो की त्याचे उपकार फेडणे आपल्यासाठी अशक्य आहे. जाणते-अजाणतेपणी आपण फक्त निसर्गाचे नुकसानच करत असतो. मी लहानपणापासून संघाचा कार्यकर्ता असल्याने निसर्गाविषयीच्या संवेदनशीलतेचे संस्कार माझ्या मनावर होतेच. याबाबत काही वाचले असता निसर्गासाठी काम करण्याची ही जाणीव तीव्र झाली.

माय ग्रीन सोसायटीची स्थापना

त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. मनात विचार आला की काय करता येईल ज्यामुळे अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेता येईल. तसेच एका बैठकीत रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी एका विषयावर चर्चा झाली होती. उच्चभ्रू वर्गात पर्यावरणविषयक काम कशा प्रकारे पुढे नेता येईल, असा तो विषय होता. या सगळयाचा विचार करताना घनकचरा व्यवस्थापनापासून सुरुवात करावी अशी कल्पना सुचली. या कामात उच्चभ्रू वर्गालाही सहभागी करून घेता येईल, तसेच स्वच्छता आणि पर्यावरण या दोन्हीसाठी काम करता येईल, असे लक्षात आले. मग घनकचरा व्यवस्थापनाविषयी आम्ही अभ्यास सुरू केला. जे लोक आधीपासून या कामात आहेत, त्यांना भेटून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. त्यानंतर आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला. त्यात 40-50 गृहनिर्माण सोसायटयांचे सदस्य उपस्थित होते. त्या वेळी आम्ही या उपक्रमाचे नाव 'माय ग्रीन सोसायटी' असे ठेवले. केशवसृष्टीच्या अंतर्गत आम्ही त्याला संस्थात्मक रूप दिले. या कामाचे हे तिसरे वर्ष आहे.

 वेस्ट टू कम्पोस्ट

घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व प्रौढांपेक्षा तरुण पिढी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते, हे लक्षात घेऊन आम्ही या कामात महाविद्यालयातील एनएसएसच्या 15000 विद्यार्थ्यांना सहभागी केले. मुंबई विद्यापीठाच्या परवानगीने विद्यापीठाशी संलग् सुमारे 150 महाविद्यालयांमध्ये 'वेस्ट टू कंपोस्ट' या उपक्रमांतंर्गत घनकचरा व्यवस्थापनांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. यात प्रचार-प्रसारासाठी आम्हाला एस्सेल वर्ल्डचेही सहकार्य मिळाले. यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे, कोणत्या कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करायची, कोणत्या कचऱ्याचा पुनर्वापर करायचा याबाबत माहिती दिली.  या विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून आम्ही 5000 ते 8000 सोसायटयांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती केली.

आमचे आगामी काम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षात मुंबईतील दीडशे महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये आम्ही कंपोस्टिंग यंत्रे बसवणार आहोत, जेणेकरून ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून कंपोस्टिंग कसे होते हे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहतील आणि आपल्या सोसायटयांमध्ये हे काम सुरू करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. माय ग्रीन सोसायटीच्या सदस्यांच्या घरांमध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करून आम्ही खत तयार करतो. त्या माध्यमातून किचन गार्डन तयार करता येते. यासाठी महिला कार्यकर्त्यांची एक टीम तयार केली आहे. ही टीम किचन गार्डनिंगविषयीच्या कार्यशाळा घेते.

घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती देणारे काही व्हिडिओही आम्ही तयार केले आहेत. आमचे कार्यकर्ता विशाल टिबे्रवाला यांची या कामात महत्त्वाची भूमिका आहे. आम्ही www.mygreensociety.in या आमच्या वेबसाइटवर आमच्या वेगवेगळया कामांविषयीची माहिती, प्रात्यक्षिके, पर्यावरणाशी संबंधित प्रश्ांची उत्तरे आणि ज्या कंपन्या पर्यावरणीय प्रकल्पांसाठी उपकरणे तयार करतात त्यांची यादी, तसेच संस्थेच्या माध्यमातून अनेक सोसायटयांमध्ये होत असलेली कामे या सगळयाची माहिती उपलब्ध आहे.

आशीर्वाद खाद प्रकल्प

माय ग्रीन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेला दुसरा विषय म्हणजे आशीर्वाद खाद प्रकल्प. त्याअंतर्गत मंदिरांमध्ये रोजच्या रोज तयार होणाऱ्या निर्माल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी सीएसआर फंडिंग उपलब्ध करून साठ मंदिरांमध्ये आम्ही कंपोस्टर लावले आहेत. या मंदिरांना कंपोस्टर वापरण्यासाठी वर्षभर आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य विनामूल्य करत आहोत. म्हणजे आमचे कार्यकर्ते येऊन त्यांना मार्गदर्शन करतात, त्यात काही अडचण असेल तर ती सोडवतील. मंदिरात येणाऱ्या अधिकाधिक लोकांपर्यंत कंपोस्टिंगचा विषय पोहोचून त्यांना प्रेरणा मिळावी हा आमचा मुख्य उद्देश होता.


 निर्माल्यापासून बनवणारे कंपोस्टर

 केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट

घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच आम्ही इतरही पर्यावरणीय समस्यांवर काम करतो. जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकीरा मियावाकी यांच्या तंत्रावर आधारित 'केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट' उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. या तंत्राद्वारे कमीत कमी जागेत घनदाट जंगल तयार करता येते. 2000 चौ. फुटाच्या जागेत 1500 ते 2000 झाडे लावता येतात. या जंगलाला सुरुवातीचे 7-8 महिने पाणी द्यावे लागते. त्यानंतर त्याच्या देखभालीसाठी काहीही करावे लागत नाही. दोन पावसाळयांमध्ये सगळी झाडे जोर धरतात. त्यांच्या वाढीचा दर दहा पटींनी जास्त असतो. आम्ही या उपक्रमात 100 टक्के भारतीय झाडांचा वापर केला.

दीड वर्षांपूर्वी गोरेगाव पश्चिम भागात आम्ही पहिल्यांदा अशा प्रकारचे 'सिटी फॉरेस्ट' तयार केले. 2200 चौ.फूट जागेत आम्ही 63 जातींची 1350 झाडे लावली. आज तेथे अतिशय घनदाट जंगल तयार झाले आहे. त्या भागातील रहिवासी, नगरसेवक, कार्यकर्ते आम्हाला आनंदाने सांगतात की, या परिसरात आता खूप फूलपाखरे दिसतात. या भागातील जीवविविधता निर्देशांक खूपच उंचावला आहे. मुंबईत कुठेच पाहायला मिळणार नाहीत अशी 30-40 प्रजातींची पाखरे या भागात दिसू लागली आहेत. परागीभवनाच्या माध्यमातून अधिकाधिक झाडे उगवू लागतात.


 सिटी फॉरेस्ट

 

मुंबई आणि मुंबईनजीकच्या परिसरात अशा प्रकारची 15हून अधिक सिटी फॉरेस्ट आम्ही तयार केली आहेत. अधिकाधिक ठिकाणी अशा प्रकारची जंगले तयार करण्याचा आमचा मानस आहे. मात्र त्यासाठी लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे.  ज्या लोकांना, संस्थांना, शाळा-महाविद्यालयांना अशा प्रकारची छोटया जागेतील जंगले तयार करण्याची इच्छा असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. या कामासाठी आम्ही प्रायोजकही उपलब्ध करून देतो. आमच्याकडे या क्षेत्रातील जाणकारांची टीम आहे, जी या कामात मार्गदर्शन करते. त्यामुळे कमीत कमी खर्चात अशा प्रकारची जंगले उभारता येऊ शकतील.

सीड बॉल मेकिंग

या वर्षीपासून आम्ही सीडबॉल मेकिंग हा उपक्रम सुरू केला आहे. बी, लाल माती, गोमय, गोमूत्र यांपासून हे सीड बॉल बनवलेले असतात. यासाठीही आम्ही केवळ भारतीय झाडांच्या बीजांचीच निवड करतो. तसेच जी बीजे दोन महिन्यांपर्यंत या गोळयांमध्ये सुप्तावस्थेत राहतील अशीच बीजे आम्ही त्यासाठी घेतली आहेत. आमचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन सीड बॉल तयार करण्याच्या कार्यशाळा घेतात. अनेक विद्यार्थ्यांना आम्ही त्यात सहभागी करून घेतले आहे. आपल्याला ज्या भागात झाडे लावायची आहेत, तिथे हे सीड बॉल्स टाकायचे. उदाहरणार्थ आम्ही पालघरमधील वन भागात हे सीडबॉल्स रुजवणार आहोत. त्यासाठी आम्ही वन विभागाकडून परवानगी घेतली आहे. आतापर्यंत आम्ही 25000-30000 बॉल्स तयार केले आहेत. मात्र हे गोळे कुठे टाकावेत याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला किंवा कोणाच्या शेतात, घराजवळ ते  टाकू नयेत.

नदी बचाव मोहीम

त्याशिवाय मुंबईतील नद्यांच्या स्वच्छतेसाठी आम्ही एका रिव्हर मार्च ग्रूपशी जोडले गेलो. ओशिवरा, पोईसर, दहिसर, मिठी या मुंबईतल्या नद्या आता नाले म्हणूनच ओळखल्या जातात. मिठी नदीचे काम तर केंद्र सरकारनेच हाती घेतले आहे. बाकीच्या तीन नद्यांसाठी हा ग्रुप काम करतो. दहिसर नदीमध्ये त्या परिसरातील तबेल्यांमधून रोज 4-5 गाडया शेण टाकले जाते. ते थांबवण्यासांठीही या ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. 

एकमेकां साह्य करू...

अशी कामे फक्त आमचीच संस्था करते असे नाही. अनेक संस्था, माणसे यात सहभागी आहेत. विशाल टिब्रेवाल, निलय चौबळ, विनय नत्थाणी, पूर्वी शाह, भावना शाह, सुभाष राणे, नीलिमाजी, प्रा. काबे, स्वच्छ पार्ले अभियानचे सतीश कोळवणकर असे अनेक लोक आमच्या या कामात जोडले गेले आहेत. स्थानिक राजकीय नेतेही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. घाटकोपरचे चिराग शाह, दीपक ठाकूर, अतुल भातखळकर यांसारख्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात आमच्या उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित केले होते. केशवसृष्टी, वनवासी कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणाशी संबंधित काही ना काही उपक्रम राबवत असतो. मोहम्मद दिलावर, ओन दिलावर यांची  Nature Forever Society, रोटरी क्लब आणि अन्य सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांच्याशी आम्ही जोडलेले आहोत. या संस्थांशी आम्ही नियमित संपर्क ठेवतो, परस्परांना सहकार्य करतो, अनुभवांची देवाणघेवाण करतो. या कामात आम्ही समन्वयकाच्या भूमिकेत आहोत.

सोसायटयांना प्रोत्साहन मिळावे

कचरा व्यवस्थापनासाठी रहिवाशी सोसायटयांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुंबईच्या नव्या आयुक्तांनी नुकतेच कचरा व्यवस्थापन करणाऱ्या सोसायटयांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसे झाल्यास अशा सोसायटयांना प्रोत्साहन मिळेल. तसेच पालिकेलाही त्याचा फायदाच होईल. कचऱ्याचे वर्गीकरण झाले, तर सुक्या कचऱ्यातून उत्पन्नही मिळवता येईल आणि केवळ 10-15 टक्के कचराच डंपिंग ग्राउंडवर जाईल. तसेच जे लोक कचऱ्याचे वर्गीकरण करत नसतील त्यांना दंडही आकारला पाहिजे.

रोजगाराच्या दृष्टीनेही या सगळयाचा विचार करता येईल. हाउसकीपिंगची कामे करणाऱ्या तरुणांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सोसायटयांसाठी कचरा वर्गीकरणाचे काम देता येईल. स्त्रीमुक्ती संघटनांनाही आम्ही या कामात सहभागी करून घेतले आहे. कचरा वेचक महिलांना यातून 10000-15000 रुपये मासिक उत्पन्न मिळवता येते.

आगामी ध्येय

आगामी काळात नद्यांच्या विषयावर अधिक काम करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी प्रशासन आणि सरकार या दोघांशीही आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच याबाबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशीही समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटारे साफ करताना सफाई कर्मचाऱ्यांचे होणारे मृत्यू हे अतिशय गंभीर आणि वेदनादायक आहेत. हे थांबवण्यासाठी काय करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. त्यासाठी मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांशी आम्ही चर्चा करत आहोत. या घटना थांबवण्यासाठी काही उपकरणे असतील तर ती उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू. याबाबत मी सगळयांनाच आवाहन करीन की सफाई कर्मचारी आपल्यासारखीच माणसे आहेत हे लक्षात ठेवून त्यांच्याशी माणुसकीने, आपलेपणाने वागा.

- लेखक माय ग्रीन सोसायटीचे मुख्य संयोजक

शब्दांकन : सपना कदम-आचरेकर