पर्यावरण किंवा निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भागच आहे.त्यामुळे मानव आणि पर्यावरण असे द्वैत मानणं योग्य होईल का?
आपण ज्या निसर्गाची लेकरं आहोत तो निसर्ग आणि आपण प्रेमाने बांधलेले आहोत. माता भूमिः पुत्रोsहं पृथिव्या:! भारतीय संस्कृती ही जशी ऋषी संस्कृती आहे तशीच ती कृषी संस्कृतीही आहेच की! अग्नीपूजक पूर्वजांनी आयुष्यातलं अग्नीचं महत्व ओळखून त्याला देवत्व दिलं. ऋग्वेदातली पहिली ऋचा ही अग्नीला उद्देशूनच आहे अग्निमीळे पुरोहितं! पहाटेचं सौंदर्य पाहून वैदिकांनी तिच्यात सुंदर स्रीची कल्पना केली आणि उषासूक्त रचलं! वारा मरूत् म्हणून, पाऊस वरूण म्हणून देवत्व पावला आणि त्यांना यज्ञातील आहुतींचा मान मिळाला. ज्या नदीच्या काठी संस्कृती रूजली ती सरस्वती नंतर विद्येची देवता म्हणून पूजिली जाऊ लागली. सारांश,पर्यावरण किंवा निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भागच आहे.त्यामुळे मानव आणि पर्यावरण असे द्वैत मानणं योग्य होईल का? या सृष्टीचा कर्ता कोण? कर्ता वा अकर्ता? असा तो शेवटी सर्व व्यापून दहा बोटे उरला. श्रीसूक्तातील देवी चिखलाची माता म्हणून वर्णिली गेली आहे. अलीकडच्या काळात पर्यावरण, निसर्ग ,निसर्गस्नेही जीवन असे वेगळे विचार पुढे येत आहेत. प्रत्येकजण त्याकडे औत्सुक्याने पाहत आहे. समाजात अशा प्रकारच्या विचारधारणा वलयांकित आणि सामाजिक प्रतिष्ठेचा भाग होत चालल्या आहेत. पण याकडे जर आपल्या संस्कृतीचं उगमस्थान आणि आपलं बीज म्हणून पाहिलं तर हे काही नवीन, Glamorus वाटणार नाही. आपण ज्या पृथ्वीची लेकरं आहोत तिचा योग्य पद्धतीने सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. गेली दोन तीन वर्षे विविध निमित्ताने पर्यावरण आणि त्यासंबंधी विविध आयाम ऐकण्याची संधी मिळाली.त्यामुळेच एक अभ्यासक संशोधक म्हणून आपली वैदिक परंपरा आणि निसर्ग याबद्दल काही नोंदवावंसं वाटलं.
डाॅ.आर्या जोशी
( लेखिका धर्मशास्र विषयातील अभ्यासक आहेत.)