भवितव्य काँग्रेसचे

विवेक मराठी    08-Jun-2019   
Total Views |

 काँग्रेसला पुन्हा उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी, त्यांनी आपण कोण होतो, आपली मूळे कुठे आहेत, आपली संस्कृती कोणती आहेत आणि लोकांशी आपल्याला कसे जोडून (कनेक्ट) घ्यायचे आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे. हा विचार नेहरू-गांधी घराणेशाहीसाठी नाही, तर देशासाठी केला पाहिजे.

देशाच्या राजकीय विषयसूचीवर 'काँग्रेसचे भवितव्य कोणते' हा विषय सध्या गंभीर चर्चेचा विषय झालेला आहे. विषय खरोखरच गंभीर आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात वयोवृध्द पक्ष आहे. 1885 साली त्याची स्थापना झाली. देशाची स्वातंत्र्यचळवळ काँग्रेसच्या झेंडयाखालीच उभी राहिली. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसच सर्व देशात होती. त्यामुळे सत्तांतर काँग्रेसकडेच झाले. असा दीर्घ इतिहास असलेली काँग्रेस आता नामशेष होण्याच्या मागे लागली आहे का? हा प्रश्न चिंता निर्माण करणारा झालेला आहे.

'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा भाजपाने 2014 सालीच दिली होती. तिचा परिणाम म्हणा किंवा काँग्रेसविषयी असलेली नाराजी म्हणा, 2014 साली काँग्रेसचे फक्त 44 खासदार लोकसभेत होते. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपददेखील मिळविता आले नाही. 2019 च्या निवडणुकीत अपेक्षा अशी होती की काँग्रेसच्या तिकिटावर 100 ते 125 खासदार लोकसभेत निवडून येतील. परंतु फक्त 8 खासदार अधिक निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद यावेळीदेखील काँग्रेसला मिळणार नाही. अठरा राज्यांत काँग्रेसला भोपळादेखील फोडता आला नाही. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तेथून एकाचा अपवाद सोडता कुणीही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले नाही.

राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही. त्यांच्या परंपरागत अमेठी मतदारसंघात स्मृती इराणींकडून ते पराभूत झाले. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस वर्किंग कमिटीने तो स्वीकारला नाही. राजीनामा देण्याच्या भूमिकेवर राहुल गांधी ठाम आहेत.

राहुल गांधींनी राजीनामा द्यावा हे अनेकांना आवडले नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, राजीनामा म्हणजे पराभवातून खचून जाऊन निराशेपोटी केलेली कृती आहे. अशा वेळी पराभव स्वीकारून धैर्याने उभे राहिले पाहिजे. नेताच जर रणांगण सोडून पळू लागला, तर अनुयायी अस्ताव्यस्त होतील. काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच संपेल. या सर्वांना धीर देऊन एकत्र केले पाहिजे. त्यांचे नेतृत्व केले पाहिजे. अनेकांचे असे म्हणणे आहे.

काँग्रेसमधील काही जणांनी अशी सूचना केली की, राहुल गांधी यांनी पुढील सहा महिने देशाचा प्रवास करावा. राज्या-राज्यातील काँग्रेसचे पुनर्गठन करावे. नवीन लोकांना पुढे आणावे. कर्तृत्ववान तरुणांचा गट उभा करावा. त्यांच्या सल्ल्याने राजकारण करावे. काँग्रेसमध्ये जे सिंडिकेट (काँग्रेसमधील म्हातारी नेतेमंडळी) आहे, ते मोडून काढावे. काँग्रेसने सत्तेत असलेल्या नेत्याच्या मुलाला तिकिट द्यायचे नाही, असा एक नियम काही अपवाद करून पाळला. परंतु आता प्रत्येक म्हातारा नेता आपल्या मुलाच्या तिकिटासाठी हटून बसतो. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत.

काँग्रेस डाव्या विचारसरणीच्या बाजूने दीर्घकाळ झुकती राहिली. राजीव गांधी यांच्या काळात उजव्या विचारसरणीकडे ती हळूहळू झुकू लागली. पत्रकारांनी याला 'सॉफ्ट हिंदुत्व' अशी संज्ञा दिली. काही जणांनी असे सुचविले आहे की, काँग्रेसने आपली विचारधारा डावी ठेवता कामा नये आणि उजवीसुध्दा ठेवता कामा नये. काँग्रेसने मध्यममार्ग स्वीकारला पाहिजे.

पराभूतांना सल्ला देणाऱ्यांची कधीच कमतरता नसते. सल्ला देण्याइतके सोपे काम जगात कुठलेही नसते. सल्ला देणारा जे सांगतो, त्यातील त्याला एकही गोष्ट करायची नसते. एकही गोष्ट करण्याची क्षमता त्याच्यात नसते. म्हणून हे सगळे सल्ले टीव्हीवरील वादविवाद चर्चेमध्ये चांगले असतात आणि वृत्तपत्रांच्या लेखातूनही चांगले असतात.

काँग्रेसने कसे उभे राहायचे हे काँग्रेसनेच ठरवायचे आहे. अध्यक्ष कुणाला करायचे याचा निर्णयदेखील त्यांनीच घ्यायचा आहे. भाजपा विरोधात लढण्यासाठी कोणती रणनीती आखायची, हेदेखील त्यांनीच ठरवायचे आहे. तेथे आपल्या सल्ल्याचे काही काम नाही.

असे जरी असले, तरी एक गोष्ट ठामपणे सांगावी लागेल, ती म्हणजे काँग्रेस संपता कामा नये. ती उभी राहिली पाहिजे. राजकीय शक्तीच्या रूपात उभी राहिली पाहिजे. केवळ राजकीय विचार करून चालणार नाही, देशाचा विचार केला पाहिजे. देशाचा विचार करता काँग्रेसने असंख्य चुका केल्या असतील आणि त्याचे परिणाम ती आता भोगत आहे हे जसे खरे आहे, तसे काँग्रेसने तेवढयाच उत्तम गोष्टी केलेल्या आहेत. त्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे.

आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. आपल्याबरोबर जगात अनेक देश स्वतंत्र झाले. यातील अनेक देशांची वाताहत झाली. गृहयुध्द, हुकूमशाही, नागरिकांच्या कत्तली, प्रचंड लूट, तुडुंब भरलेले तुरुंग अशी अवस्था पाकिस्तान, ब्रह्मदेश, आफ्रिकेतील युगांडा, कांगो, नायझेरिया इ. अनेक देश याची जिवंत उदाहरणे आहेत. आपल्या देशात लोकशाही नांदते आहे. येथे कायद्याचे राज्य आहे. राजकीय स्थिरता आहे. अराजक निर्माण झालेले नाही. दीर्घकाळ देशाला राजकीय स्थैर्य देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. सत्ता राबविताना अनेक चुका झाल्या असतील, चुकीचे निर्णय घेतले गेले असतील, एक विचारधारा नाहीशी करण्याचा प्रयत्नही झाला असेल, परंतु काँग्रेसने देश एक ठेवला, हे काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. काँग्रेसची अनेक पापे धुऊन काढणारे हे योगदान आहे.

पं. नेहरूंपासून ते राजीव गांधींपर्यंत एकाच घराण्याची सत्ता राहिली. इंदिरा गांधींचा सतरा महिन्यांचा अपवाद सोडला, तर कुणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला नाही. इजिप्तच्या नासेरने तो केला. इंडोनेशियाच्या सुकार्नोने केला. युगोस्लावियाचा टिटो तर मार्शलच होता. पण त्यांचे समकालीन पं. नेहरू जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान होते. त्यांनी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला नाही. राजीव गांधी यांना तर लोकसभेत चारशेहून अधिक जागा मिळाल्या. पण ते पंतप्रधानच राहिले. लोकसभेचा ठराव करून 'मरेपर्यंत मीच पंतप्रधान' अशी घोषणा त्यांनी केली नाही. लोकशाही रुजविण्यात काँग्रेसचा वाटा आपण नाकारू शकत नाही. काँग्रेसचा राजकीय विरोध करणे आणि राजकीय विरोधाचे रूपांतर द्वेषभावनेत करणे ही गोष्ट वेगळी. देशाचा विचार करत असताना आपण असा विचार करू शकत नाही.

यासाठी काँग्रेस उभी राहिली पाहिजे. झाडावर बांडगुळे झाली की ती झाड खाऊ लागतात, ती काढून टाकावी लागतात. झाडाला उभे राहण्यासाठी आपल्या मुळाची काळजी करावी लागते. ती दिसत नाहीत. कारण ती जमिनीत खोलवर गेलेली असतात. जेव्हा काँग्रेसची मुळे जनतेत खोलवर गेली होती, तेव्हा काँग्रेस नावाचे झाड सदा टवटवीत राहिले. जेव्हा बांडगुळे वाढली आणि मुळांचीच छाटणी सुरू झाली, तेव्हा काँग्रेसची अवस्था आज आहे ती झाली.

जेव्हा काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस होती, तेव्हा ती जातीचे, धर्माचे, भाषेचे, प्रादेशिक अस्मितांचे राजकारण करीत नव्हती. सर्वसमावेशकता हा तिचा गुण होता. सर्वांना बरोबर घेऊन जायचे हा तिचा मंत्र होता. सर्वसमावेशकता, सर्व मतांचा आदर, सर्वांचा सन्मान ही हिंदू जीवनशैली आहे. काँग्रेसने कधी हिंदू शब्द आपल्या विचारधारेत आणला नाही. काँग्रेस मात्र हिंदूपण जगत राहिली. ज्याक्षणी काँगे्रसने हिंदूपणाला सोडचिठ्ठी देण्याचे धोरण अवलंबविले, त्याक्षणी तिचा ऱ्हास सुरू झाला.

ती जातीय राजकारण करणारी झाली. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणारी काँग्रेस झाली. भाषावादाला खतपाणी घालणारी झाली. घराणेशाहीची झाली. जे घराण्याला अनुकूल ते पक्षाला प्रतिकूल आहे, हे काँग्रेसला समजलेच नाही. हिंदू माणूस काँग्रेसपासून क्रमाक्रमाने दूर होत गेला. 1989पासून ही प्रक्रिया सुरू झाली. 2019 साली तिचे परिणाम समोर आले.

ज्यांना कुणाला काँग्रेस उभी करायची आहे, त्यांनी आपण कोण होतो, आपली मूळे कुठे आहेत, आपली संस्कृती कोणती आहेत आणि लोकांशी आपल्याला कसे जोडून (कनेक्ट) घ्यायचे आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे. काँग्रेसला उभे राहिले पाहिजे. नेहरू-गांधी घराणेशाहीसाठी नाही, तर देशासाठी.

रमेश पतंगे

9869206101