लाओ त्से - चीनचा तत्त्ववेत्ता

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Jul-2019

***रमा गर्गे**

लाओ-त्से हा चीनमधील तत्त्ववेत्ता. वैश्विक गतीची प्रगल्भ जाणीव असणारा हा चिनी दार्शनिक आपल्या 'यिन आणि यँग' या पुरुष व प्रकृती यांच्याशी मिळत्याजुळत्या तत्त्वांसाठी सगळीकडे ओळखला जातो. बुध्दाची करुणा आणि लाओ त्सेचा साधेपणा यांचा संगमच चीनच्या अध्यात्मजीवनात घडून आला.

  एक लहान मुलगा आईवडिलांकडे हट्ट करून लाकूडतोडयासह जंगलात गेला. बरेच आत गेल्यावर त्या तिघाचौघांनी काम सुरू केले. उंच झाडे, डेरेदार वृक्ष, लता-वेली या सगळया वनसृष्टीकडे तो मुलगा बघत होता. त्याला एक खूप जुना, मोठया खोडाचा वृक्ष दिसला. त्याने लाकूडतोडयाला विचारले, ''ते झाड का नाही तोडले?'' त्या वृक्षाकडे बघत कुत्सितपणे लाकूडतोडया म्हणाला, ''अरे, ते झाड काहीच कामाचे नाही. त्याची पाने गुरे खात नाहीत. फांद्या वेडयावाकडया वाढल्यात, त्यांचा उपयोग बांधकामाला होत नाही आणि जळणाचे म्हणशील तर धुराचा इतका वाईट वास येतो की त्याच्यावर शिजवलेला स्वयंपाक गुरेही खाणार नाहीत. तुझ्या वयाचा असताना वडिलांसह येत असे, तेव्हापासून हा वृक्ष असाच आहे. निरुपयोगी, लहान पिवळी फुले येणारा!''

तो मुलगा त्या वृक्षाखाली गेला. हजारभर जनावरे त्याच्या सावलीत निवांत पहुडली असती एवढा विस्तार! त्याने वर पाहिले, लहान आकाराच्या पानांसोबत इवली इवली पिवळी फुले बहरून आली होती. त्यातून आकाशाचे तुकडे दाखवणारे सूर्यकिरण अलगदपणे खाली येत होते. त्या मुलाची नजर तशीच खिळून राहिली. त्याच्या मुखातून शब्द निघाले, 'ताओ'.

या मुलाचे नाव लाओ-त्से आणि त्याने जो शब्द उच्चारला, त्याचा अर्थ होतो मार्ग, पथ! इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात संपूर्ण चीनवर 'बोधवादाची' घनदाट छाया होती. सगळीकडे आदर्शवादाची पकड घट्ट होती. कन्फ्युशिअस या तत्त्ववेत्त्याने चीनमधील जुन्यातली जुनी अशी सगळी आदर्शवादी सूत्रे एकत्रित करून समाजात त्यांचा प्रसार करणे सुरू केले होते.

शिक्षणावर आत्यंतिक भर देऊन त्याने नीतिमान असण्यासाठी शिक्षण आणि प्रबोधनातून सुधारणा यांना महत्त्व दिले होते. समाजाची बांधणी, राजकीय रचना, शिक्षणाचे महत्त्व या सगळया आदर्शवादी आणि बोधवादी तत्त्वांमध्ये, आध्यात्मिक जाणीव आणि निसर्ग व माणसाच्या स्वाभाविक नात्याचा बंध यांना कुठेच स्थान नव्हते.

याच काळात लाओ-त्से यांनी 'ताओ-तेह-किंग' हा सूत्रगं्रथ रचून चिनी मनुष्याला 'यिन आणि यँग' या परस्परपूरक तत्त्वांची जाणीव करून दिली.

ज्या वृक्षाकडे पाहून 'ताओ' उच्चारले, त्याबाबत बोलताना लाओ-त्से म्हणत, ''स्वत:ला आहे तसे अत्यंत साधारण ठेवल्याने त्या वृक्षाचा संपूर्ण विकास झाला. शिक्षणाने, सतत काहीतरी आदर्श जोपासत राहिल्याने आपण 'असाधारण' असल्याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे हळूहळू आपला नाश ओढवतो.''

लाओ-त्सेचा सूत्रग्रंथ 'ताओ तेह किंग' हा त्याच्या वचनांचा संग्रह आहे. मुळातच लाओ त्से विषयी फार थोडी ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे. त्यातही विविध मतमतांतरे आहेत. त्यांचे खरे नाव लाओ-त्से आहे की नंतर मिळालेले आहे, या विषयीदेखील एकमत नाही. कारण लाओ म्हणजे आदरणीय आणि त्से म्हणजे गुरू.

झोऊ या राजाच्या कालखंडात लाओ त्से होऊन गेले. राजादेखील त्यांच्या शिकवणीने प्रभावित होता. त्याच्याच आग्रहावरून शिष्यांच्या मदतीने 'ताओ'ची लिखित प्रत तयार झाली, असे मानले जाते.

या छोटयाशा प्रज्ञावान पुस्तिकेने सगळया जगाला मुग्ध केले आहे. वास्तविक 'ताओ' हा काही संघटित धर्म नाही. मात्र प्रत्येक व्यक्ती, ज्याला खऱ्या अर्थाने 'धार्मिक' व्हावयाचे आहे, तो ताओचे अनुसरण करीत असतो.

काय आहे हा ताओवाद? ताओचे मुख्य प्रतिपादन आहे, 'आपण महत्त्वपूर्ण नाही याचा स्वीकार करा.' ताओ आपल्याला स्पर्धामुक्त संघर्षविरहित जीवन जगण्यास शिकवते.

साधारणपणे आपण यशस्वी आयुष्य म्हणजे तर्क, विज्ञान आणि स्पर्धेवर जोर देऊन भौतिक गोष्टींचा संचय करणे असे समजतो. असे आयुष्य प्राप्त करण्यासाठी स्पर्धात्मकता, आक्रमकता, ताठरपणा, कठोर परिश्रम यांचा अवलंब करतो. या सगळयामधून इतरांपेक्षा 'वेगळे' 'महत्त्वपूर्ण' असे व्यक्तित्व निर्माण करतो. त्यातून अहंकाराचे परिपोषण करतो. मग सुरू होते तारेवरची कसरत. हे व्यक्तित्व सतत सांभाळावे लागते. त्याला पोशाखी झूल चढवावी लागते. स्तर सांभाळावा लागतो.

लाओ त्से म्हणतो - जे सांभाळत बसावे लागते, स्वाभाविक प्रकटीकरण नसते, ते खोटे असते. असे आयुष्य नेहमी आंतरिक द्वंद्वाने भरलेले, असंमजस, आत्मप्रधान आणि एकरेषीय होऊन जाते.

ताओ तत्त्वज्ञान सांगते की, केवळ बुध्दीपर्यंत जी चेतना तुम्ही मर्यादित करून ठेवली आहे, ती नाभीपर्यंत आणा. जेव्हा नाभीतून श्वसन सुरू होईल, तेव्हा तुम्हाला खरे व्यक्तित्व प्राप्त होईल. जे सतत असेल. त्याला जोपासून, सांभाळत बसण्याची गरज असणार नाही. ते तुमचे खरे व्यक्तित्व असेल.

यासाठी 'ताओ'मध्ये परस्पर संतुलनाची एक सुंदर कल्पना मांडली आहे. 'यिन आणि यँग' असे तिचे नाव.

मनुष्याच्या स्वभावापासून सृष्टीपर्यंत सर्वत्र आपल्याला परस्परविरोधी गुण आढळून येतात. आयुष्यात आपण कोणी महत्त्वपूर्ण व्हावे यासाठीच्या प्रयत्नात या गुणांकडे संघर्ष असल्याप्रमाणे पाहिले जाते. आक्रमक गुणांची साधना करताना अंत:प्रज्ञेला दडपून टाकले जाते आणि मग यातून निर्माण होते एक यशस्वी समजले जाणारे खोटे व्यक्तित्व!

यिन म्हणजे स्त्रैण गुण आणि यँग म्हणजे पौरुष गुण होत. त्यांची परस्परपूरकता आणि संतुलन म्हणजेच 'ताओ तेह किंग' होय. स्त्री गुणांची यादी पुढीलप्रमाणे आहे - पृथ्वी, रात्र, अंधार, हिवाळा, आर्द्रता, शीतलता, नम्रपणा, सहकार्य, अंत:प्रज्ञा, समज, संश्लेषणात्मकता! तर पुरुष गुणांची यादी - सूर्य, दिवस, उजेड, कोरडेपणा, उष्णता, ताठरपणा, आक्रमकता, स्पर्धात्मकता, विश्लेषणात्मकता, तर्क.

लाओ त्से म्हणतात - कोणताही समाज, त्यातील व्यक्तिजीवने जेव्हा विचार, भावना, राजकीय, आर्थिक व सामाजिक रचना केवळ पौरुष गुणांवर, शिक्षणाच्या आधारे प्रस्थापित करू पाहतात तेव्हा ते एकांगी ठरतात. त्यातून असंतुलन निर्माण होते.

ताओवाद म्हणजे साधेपणा. हा साधेपणा ऐच्छिक आहे. लादलेला नाही, तर संपूर्णपणे स्वीकारलेला साधेपणा.

ताओ तत्त्वज्ञानात रोजच्या कामांना फार महत्त्व दिलेले आहे. स्वयंपाक करणे, स्वच्छता, बागकाम, शेती यासारखी दैनंदिन कामे नीटसपणे व नियमित करणे याला ताओवादात फार मोठे आध्यात्मिक मूल्य आहे. ध्यानासाठी लागणारी आंतरिक शक्ती अशा कामांमधून मिळते, असे मानले जाते.

चीनमध्ये नंतरच्या काळात येणाऱ्या बौध्दमतासाठी लाओ त्से यांनी जणू काही सुपीक जमीनच तयार करून ठेवल्याप्रमाणे जाणवते.

बुध्दाची करुणा आणि लाओ त्सेचा साधेपणा यांचा संगमच चीनच्या अध्यात्मजीवनात घडून आला. 'जे होत आहे ते ठीकच आहे', 'मी प्रथमपासूनच हरलेला आहे (म्हणजे स्पर्धेत नाही)', 'पाणी अतिशय मृदू आणि लवचीक असते, परंतु त्याला कुणी थांबवू शकत नाही', 'प्रकृतीमध्ये मानवी हृदय नाही' अशा प्रकारची अनेक वचने, सूत्रे ताओ तेह किंगमध्ये - म्हणजेच पुरातन अशा गुणवान मार्गात सांगितली आहेत. चीनमध्ये मान्यता आहे की लाओ-त्से जन्मले, तेव्हापासून वृध्द स्वरूप होते. वैश्विक गतीची प्रगल्भ जाणीव असणारा हा चिनी दार्शनिक आपल्या 'यिन आणि यँग' या पुरुष व प्रकृती यांच्याशी मिळत्याजुळत्या तत्त्वांसाठी सगळीकडे ओळखला जातो.

जगाला सौम्यपणाच्या, अंत:प्रज्ञेच्या वाटेवर चालण्यासाठी प्रकाश दाखवणाऱ्या या तत्त्वज्ञाचे विचारविश्वात आदरयुक्त स्थान आहे!