ध्वनितरंगांचा रचनाकार - मंदार कमलापूरकर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Jul-2019   

संगीताशिवाय चित्रपटातील अनेक ध्वनी हे त्यातील वातावरणनिर्मितीचं काम करत असतात. या ध्वनींचे योग्य संयोजन अर्थात ध्वनीसंयोजन चित्रपटाच्या परिणामकारकतेत भर घालतात. कला आणि तंत्र यांचा संगम असलेल्या या क्षेत्राविषयी आणि त्यात राज्य पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या रचनाकाराविषयी या लेखात जाणून घेऊया.

कोणत्याही चित्रपटाचं कौतुक करायचं झालं तर ते त्याचे दिग्दर्शक, कलाकार, लेखक-पटकथालेखक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक यांच्या वाटेला येतं. चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणारे मात्र फारसे प्रकाशझोतात येत नाहीत. त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारांबाबतही फारशी उत्सुकता नसते. खरं तर चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेत त्यांची कामगिरीही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे त्या चित्रपटाच्या यशात या पडद्यामागच्या कलाकारांचाही तितकाच वाटा असतो. काही दिवसांपूर्वीराज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कारांमध्ये एक परिचित नाव झळकलं होतं, ते म्हणजे मंदार कमलापूरकर. 'पुष्पक विमान' या चित्रपटासाठी ध्वनीसंयोजनाचा पुरस्कार त्याला मिळाला आणि या क्षेत्राविषयीचं कुतूहल मनात जागृत झालं. साउंड डिझायनिंग म्हणजे नक्की असतं तरी काय, चित्रपटाच्या संगीतापेक्षा नक्कीच हे काही तरी वेगळं दिसतंय असं मनात आलं. मंदारला प्रत्यक्षात भेटल्यानंतर या क्षेत्राचे अनेक पैलू समजून घेता आले.

खरं तर मंदारने अभियांत्रिकीत पदवी घेतली आहे. पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतानाच मनोरंजन क्षेत्राशी नाळ जुळलेली. इंजीनिअरिंग करताना फिरोदिया करंडकसाठी त्याने एक नाटक लिहिलं होतं आणि पुरुषोत्तम करंडकसाठी पार्श्वसंगीतही केलं होतं.  हीच मंदारची ध्वनीच्या क्षेत्रात काम करण्याची सुरुवात असल्याचं तो सांगतो. ते करता करता संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांशी त्याच्या ओळखी झाल्या. त्यापैकी सत्यजित केळकर यांच्या होम स्टुडिओतलं रेकॉर्डिंग त्याला पाहायला मिळालं. मंदारचा या कामातला रस बघून केळकरांनी त्याला पुण्यातील एफटीआयआयमध्ये (फिल्म ऍंड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया) असलेल्या या विषयीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाविषयी सांगितलं.

त्यानंतर मंदार फिल्म इन्स्टिटयूटला जायला लागला. तिथल्या ग्रंथालयात जाऊन तो या विषयाचं वाचन करायचा. फिल्म इन्स्टिटयूटमध्ये तेव्हा शिकत असलेल्या अनमोल भावेच्या कामात तो साहाय्यक म्हणून काम करू लागला. या क्षेत्राविषयीचा त्याचा आत्मविश्वास वाढू लागला, तेव्हा त्याने प्रवेश परीक्षा द्यायचं ठरवलं. संपूर्ण भारतातून तेथे एकूण 10 जागा, त्यातील फक्त आठच जागा खुल्या प्रवर्गासाठी होत्या. त्यावरूनच परीक्षेची काठिण्यपातळी समजू शकते.

मंदार सांगतो, ''ही परीक्षा देणारे अनेक जण इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष अनुभव घतलेले होते, त्यामानाने मी फ्रेशर होतो. दुसरं म्हणजे अनेकांना यश मिळवण्यासाठी अनेकदा ही परीक्षा द्यावी लागली होती. मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं. माझी तयारी चांगल्या प्रकारे झाल्याने या प्रवेश परीक्षेत माझा देशातून तिसरा क्रमांक आला आणि मला प्रवेश मिळाला.

या कोर्सचं नाव 'साउंड इंजीनिअरिंग' असंच असल्याने ते एक प्रकारे माझ्या इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाचं एक्स्टेन्शनच होतं. माइकपासून स्पीकरपर्यंत जे जे साहित्य वापरले जातं, ते सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य असतं. आतातर यातही डिजिटल तंत्रज्ञानच आलं आहे. सेटवर कुठेही काम करताना एखादं उपकरण बिघडलं, तर ते दुरुस्त करायला माझ्यातील इंजीनिअर उपयोगी पडतो. रेकॉर्डिंगसाठीही इंजीनिअरिंगची जी शिस्त असते ती उपयोगी पडते.''

एकीकडे शिकता शिकता प्रत्यक्ष अनुभव घेणंही सुरू होतं. चित्रपटातील संगीत, पार्श्वसंगीत इथपर्यंतच आपण ध्वनीचा विचार करत असतो. त्याशिवायही चित्रपटात अनेक ध्वनी ऐकू येत असतात. ध्वनीचं काम हे तीन-चार वेगवेगळया टप्प्यात केलं जातं. एखादी व्यक्ती चित्रपटासाठी त्यातलं एखादंच काम किंवा एकापेक्षा अधिक किंवा सगळीच कामं करू शकते. त्याविषयीची माहिती देताना मंदार सांगतो, ''ध्वनीच्या प्रत्येक कामाची वेगवेगळी गरज आणि वेगवेगळा परिणाम असतो.

सिंक साउंड - यामध्ये प्रत्यक्ष लोकेशनवरचेच संवाद रेकॉर्ड करून चित्रीकरणात वापरले जातात. या संवादांचं स्टुडिओत डबिंग होत नसल्याने सिंक साउंड करताना काळजी घ्यावी लागते. लोकेशन निवडण्यापासून ही काळजी घ्यावी लागते. रेकॉर्डिंगच्या वेळी तिथे कोणत्याही प्रकारच्या आवाजाचा व्यत्यय नको असतो. त्याप्रमाणे लोकेशनवरची व्यवस्था करावी लागते. जेवढे कलाकार संवाद बोलणार असतील, त्या सगळयांना वायरलेस माइक किंवा लेपल माइक लावावे लागतात. त्यामुळे संवादातील सहभागींच्या संख्येनुसार माइकची आणि रेकॉर्डिंगच्या सर्वच उपकरणांची संख्या वाढवावी लागते. जोडीने बूम माइक नावाचा एक प्रकारही वापरला जातो. बूम माइकमुळे त्या व्यक्तीच्या कॅमेऱ्यापासूनचं किंवा अन्य कलाकारांपासूनचं अंतर किंवा तो मोकळया जागेत उभा आहे की बंद खोलीत त्यानुसार होणारे आवाजातील बदल, घुमणं या गोष्टी चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करता येतात. त्यानंतर स्टुडिओमध्ये आम्ही प्रसंगाच्या गरजेनुसार बूम माइक आणि लेपल माइक यांच्याद्वारे झालेल्या आवाजांचे मिश्रण करून अपेक्षित परिणाम साधतो. काही प्रोजेक्टसाठी मी फक्त सिंक साउंड करतो. त्यामुळे मी फक्त सेटवर असतो, चित्रीकरणानंतरच्या प्रक्रियेत मी सहभागी नसतो.

साउंड डिझायनिंग (ध्वनिसंयोजन)- कधीकधी फक्त साउंड डिझायनिंग करायचं असतं. दुसऱ्या व्यक्तीने सिंक साउंड केलेला असतो आणि तो तयार आवाज आणि एडिट झालेलं चित्रीकरण माझ्याकडे येतं. त्या संवादात कुठे काही व्यत्यय असेल, नको ते आवाज असतील, तर कुठल्या भागाचं डबिंग करावं लागेल, हे मी तपासतो. समजा, दोनच वाक्यांचं डबिंग करावं लागलं असेल आणि बाकीचा आवाज लोकेशनवरचा असेल, तर ते एकमेकांशी जुळवून घ्यावं लागतं. त्याशिवाय प्रसंग कुठल्या जागी, कोणत्या वेळी घडतोय त्यानुसार साउंड डिझायनिंग करावं लागतं. शहर आहे की गाव आहे, दिवस आहे की रात्र आहे, इतकंच काय तर चित्रपटातील पात्रं किती श्रीमंत आहेत किंवा गरीब आहेत त्यानुसार आजूबाजूचा परिसर कसा असेल हे सगळं आवाजातून दाखवता येतं. समोरच्या प्रसंगात न दिसणाऱ्या वातावरणाची कल्पना करून ध्वनीद्वारे ते उभं करावं लागतं. उदाहरणार्थ, एखाद्या चित्रपटात दाखवलेली झोपडी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असल्याचं एखाद्या प्रसंगात दाखवलं असेल आणि बाकी सगळा चित्रपट घरात जरी घडला असेल, तरी अधूनमधून रेल्वे जातानाचा आवाज वापरत राहावा लागतो.

फॉली - फॉली म्हणजे पडद्यावरच्या ज्या हालचाली घडत असतात, त्यांचा आवाज. उदा. एक बाई घरात येते, ती पर्स काढून ठेवते, ती स्वयंपाक करायला सुरुवात करते, त्या वेळी तिच्या हातातील बांगडया, पायातील पैंजण, पर्स ठेवल्याचा, भांडयाचा असे सगळे आवाज स्टुडिओत तयार करावे लागतात. चित्रिकरणानंतर ते आवाज तयार करण्यासाठी फॉली आर्टिस्ट असतात. ते पडद्यावरचं चित्र बघून त्याच वेगामध्ये सगळया हालचाली जुळवून त्या त्या गोष्टींचे आवाज तयार करतात. त्यासाठी त्यांना प्रॉपर्टीज लागतात. समजा, कढईत भाजी असेल, तर नुसतीच रिकामी कढई आणून टणटण करून उपयोग नाही, त्यासाठी भरलेल्या कढईचे आवाज काढावे लागतात. खाण्याच्या प्रसंगात तर प्रत्यक्ष तो पदार्थ खाऊनच ते आवाज काढावे लागतात.

साउंड इफेक्ट्स - साउंड इफेक्ट्स देताना अनेक आवाज संबंधित स्थळावरून रेकॉर्ड करावे लागतात. उदा. 'डोंबिवली रिटर्न' चित्रपटात अनेक आवाज डोंबिवली स्थानकात जाऊन रेकॉर्ड केले आहेत. पुष्पक विमानातील विमानांचे आवाज हे साउंड इफेक्टचाच भाग आहे. काही आवाज संबंधित स्थळावरून रेकॉर्ड करावे लागतात, तर काही आवाज आमच्याकडे स्टॉकमध्ये असतात. जुन्या काळापासून अशी एक आवाजांची लायब्ररी तयार केलेली असून त्यातील आवाजांचाही गरजेनुसार वापर केला गातो.

साउंड मिक्सिंग : काही चित्रपटांसाठी फक्त मिक्सिंग करायचं काम असतं. सिंक साउंड एकाने केलेलं असतं, साउंड डिझायनिंग दुसऱ्याने केलेलं असतं, फॉली आवाज तिसऱ्यानेच केलेले असतात, शिवाय संगीतकाराकडून म्युझिक ट्रॅक्स येतात. हे सगळे आवाज एकत्र करून ते योग्य प्रमाणात मिक्स करायचे. उदा., नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रभुदेवा आणि तमन्नाचा चित्रपट खामोशी. त्याचं मिक्सिंगचं काम माझ्याकडे होतं.''

फिल्म इन्स्टिटयूटमध्ये शिकत असतानाच मंदार अनेक लहान-मोठया प्रोजेक्ट्समध्ये साहाय्यक म्हणून काम करत होता. त्याच दरम्यान सचिन कुंडलकरच्या 'गंध' चित्रपटासाठी अनमोल भावे साउंड डिझायनिंग करत होता. त्या चित्रपटासाठी मंदारने साहाय्यक म्हणून काम केलं होतं. या निमित्ताने शूटिंगची सर्व प्रक्रिया त्याला पाहता आली.

हिंदीतील त्याचा पहिला अनुभव चित्तगाँग नावाच्या (चितगावच्या उठावावरच्या) चित्रपटाचा होता. ऑस्करविजेते रसूल पुकुट्टी यांनी त्याचं साउंड डिझायनिंग केलं होतं. त्यांचा साहाय्यक म्हणून मंदारने काम केलं. दरम्यान स्वतंत्रपणेही काही प्रोजेक्ट तो करत होता. त्यात काही डॉक्युमेंटरीज होत्या. प्रभात फिल्म्सचे अनिल दामले केनियामध्ये जंगल सफारी आयोजित करतात. तिथल्या त्यांच्या अनुभवांवर तयार करण्यात आलल्या डॉक्युमेंटरीचं साउंड डिझायनिंग त्याने केलं होतं. सचिन खेडेकरने त्यासाठी निवेदन केलं होतं.

मंदारने चित्रपटासाठी साउंड डिझायनिंगचं स्वतंत्रपणे काम पहिल्यांदा 'सेव्हन्थ वॉक' या चित्रपटासाठी केलं होतं. या चित्रपटाविषयी मंदार सांगतो, ''हा चित्रपट व्यावसायिक नसल्याने केवळ चित्रपट महोत्सवांमध्येच दाखवला जातो. 'सेव्हन्थ वॉक' या 70 मिनिटांच्या सिनेमात एकही संवाद नाही. एका चित्रकाराच्या सभोवतालच्या प्रेरणांविषयीचा हा चित्रपट आहे. तो चित्रं काढतानाची दृश्यं आहेत. अशा वेळी कोणकोणते ध्वनी वापरायचे हे आव्हान होतं. चित्रकार कधी पेन्सिलने चित्र काढतो, तर कधी चारकोलने चित्र काढतो. तो जे माध्यम वापरतो त्याचा विशिष्ट असा ध्वनी उमटतो, तो आम्ही त्यात दाखवला आहे. कमालीची निरीक्षणशक्ती असेल, तरच अशा वेगळया प्रयोगांसाठी काम करण्याचं आव्हान पेलता येतं.'' 

व्यावसायिक चित्रपटांमध्ये 'नदी वाहते'च्या कामाचा अनुभवही असाच वेगळा असल्याचं मंदार सांगतो. ''इतकी वर्षं साहाय्यक म्हणून किंवा स्वतंत्रपणे काम करताना कामाची एक चौकट तयार होते. ती चौकट मोडून खूप वेगळया प्रकारे या चित्रपटासाठी काम करायचं होतं. त्यात संगीत आणि संवाद खूप कमी वापरले होते. त्यामुळे साउंड डिझायनिंगचं काम महत्त्वाचं होतं. नदी हे पात्र म्हणून तिचे वेगवेगळे आवाज, कोकणातल्या सुंदर निसर्गाचा भाग असलेल्या निरनिराळया पक्ष्यांचे आवाज, ते त्या त्या प्रसंगानुरूप कसे वापरता येतील, तेथील बोलीभाषा कशा प्रकारे हायलाइट करता येईल असा सगळा विचार या चित्रपटाच्या साउंड डिझायनिंगमध्ये केलेला होता. सुहास राणे यांनी या चित्रपटाचं सिंक साउंड केलं होतं. त्याच वेळी त्यांनी त्या परिसरातील अनेक आवाज रेकॉर्ड केले होते. दिग्दर्शक संदीप सावंत यांनी त्या आवाजांचा एक तक्ताच तयार केला होता. त्यामुळे साउंड डिझायनिंग करताना माझं काम सोप्पं झालं.'' या चित्रपटातील ध्वनीच्या कामाचं समीक्षकांनी तर कौतुक केलंच, तशीच सामान्य प्रेक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळाली. एका स्क्रीनिंगच्या वेळी एक महिला प्रेक्षक म्हणाल्या, ''मला यातील तांत्रिक बाबी फारशा कळत नाही. पण केवळ आवाजातून सगळं वातावरण आमच्यासमोर जिवंत झालं. जर ध्वनीसाठी कोणता पुरस्कार असेल तर तो या कामासाठी मिळाला पाहिजे.'' 

अनमोल भावेसह केलेल्या 'डोंबिवली रिटर्न'च्या साउंड डिझायनिंगचाही समीक्षकांनी विशेष उल्लेख केला होता. अशोक राणे आपल्या लेखात म्हणाले होते की, या चित्रपटातील साउंड डिझायनिंग हा कथेचाच भाग आहे. लोकल ट्रेन हा नायकाच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यानुसार साउंड डिझायनिंगचा विचार केला होता.'पुष्पक विमान'चं यश

'कटयार काळजात घुसली'साठी मंदारने साहाय्यक म्हणून काम केलं होतं. 'पुष्पक विमान'साठी बरीचशी त्याच टीममधली मंडळी होती. त्यामुळे मंदारचं टयूनिंग खूप चांगलं जुळलं होतं. छोटया कथाबीजाचं चित्रपटात रूपांतर कसं होतं, कॅमेऱ्यात ती कशा प्रकारे चित्रित होते, एडिट केल्यानंतर ती कशी दिसते ही सर्व प्रक्रिया पाहत असतानाच त्याच्या डोक्यात साउंड डिझायनिंगच्या कल्पना तयार होत होत्या. त्याविषयीचा अनुभव सांगताना मंदार म्हणतो, '''पुष्पक विमान'च्या ध्वनिसंयोजनासाठी राज्य सरकारचा पुरस्कार मिळाल्याचा पहिला फोन मला सुबोधनेच केला होता. त्या वेळी मी परगावी होतो आणि या पुरस्कारासाठी काही नामांकन वगैरे नसल्याने अगदीच अनपेक्षित होतं.

पुष्पक विमानमध्ये पहिल्या प्रसंगात सुबोध भावे गच्चीत उभा असतो आणि त्यापासून काही अंतरावर एक विमान लँड करत असतं. त्याच गच्चीवर उभे राहून आम्ही अनेक आवाज रेकॉर्ड केले. एका प्रसंगात तात्या म्हणजेच मोहन जोशी गावच्या मंदिरात कीर्तनानंतर 'देह पांडुरंग' हे भजन सादर करत असतात. आणि भजनानंतरचा 'पांडुरंग पांडुरंग'चा गजर सुरू असतो, तो गजर संपल्यानंतरचा कट टू सीन मुंबईतल्या लोकलचा असतो. हे दोन प्रसंग जोडण्यासाठी आम्ही त्या कीर्तनाच्या गजराला जोडून मुंबईतल्या लोकलमधील भजनाचा गजर दाखवला. या दोन्ही गजरातील फरक लक्षात येतो. गावच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गजरात भक्तीचा गोडवा आहे, तर मुंबईत लोकलच्या गर्दीत, उकाडा अशा त्रस्त वातावरणात सुरू असलेला टाळांचा आवाज आणि कर्कश सुरातील गजर कानाला कठोर वाटतो. अशा प्रकारे दोन वेगळया पार्श्वभूमीची दृश्यं विरोधाभासी ध्वनींचा वापर करून दाखवली आहेत.''

वर उल्लेखलेल्या चित्रपटांशिवाय मराठीत उबुंटू, वेलकम होम, किल्ला (साहाय्यक) या चित्रपटांसाठी तर हिंदीत हल्का, राकोश, तुंबाड, विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला बॉबी जासूस, नासीरुद्दिन शहा आणि कल्की यांचा वेटिंग, जलपरी - द डेझर्ट मरमेड, दिल जो ना कह सका या चित्रपटांसाठी मंदारने सिंक साऊंडचं काम केलं आहे. मराठीतील पोरबाजार, हिंदीत थोडा लुत्फ़ थोडा इश्क़, पंजाबी भाषेतील बिग डॅडी या चित्रपटांचे साऊंड डिझायनिंग केले आहे. डबिंग सुपरवायझर म्हणून कटयार काळजात घुसली, न्यूड, टाइम प्लीज आदी चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे. याशिवाय मंदारने साहाय्यक म्हणून हिंदीत मौसम, मिकी वायरस, हंटर, वन बाय टू, मॉम, क्या दिल्ली क्या लाहोर, मंजुनाथ अशा अनेक सिनेमांवर साहाय्यक म्हणून काम केले आहे. सुभाष साहू, निहार रंजन सामल, रसूल पुकुट्टी यांसारख्या दिग्जांबरोबर काम करण्याचा अनुभव त्याला मिळाला.

'उबुंटू'च्या साउंड डिझायनिंगच्या कामासाठी मंदार आणि अनमोल भावे यांना झी गौरव पुरस्कारही मिळाला होता. शांघाय चित्रपट महोत्सवात गौरवल्या गेलेल्या अक्षय इंडीकरच्या त्रिज्या चित्रपटाचा अनुभवही वेगळा असल्याचे मंदार सांगतो.

'कालिचरण' या आगामी इंडी फिल्म्स (इंडिपेंडन्ट फिल्मस) प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटाविषयी माहिती देताना मंदार म्हणतो, ''कालिचरण चित्रपट पुण्यातील एक ग्रूप करत आहे. इंडी फिल्म्स म्हणजे कोणताही मोठा बॅनर नसताना काही मित्र किंवा समविचारी एकत्र येऊन, पैसे जमवून चित्रपट तयार करतात. यात काम करताना कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक दबाव नसतो. त्यामुळे कामाचं स्वातंत्र्य मिळतं. शिवाय कमीत कमी संसाधनांमध्ये, कमीत कमी पैशांमध्ये चांगली कलाकृती देण्याचं आव्हान असतं.''

मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच मंदारने अनेक शॉर्ट फिल्म्ससाठीही काम केलं आहे. शॉर्ट फिल्म हा या सगळया स्पेक्ट्रमना छेद देणारं माध्यम असल्याचे तो सांगतो. गोव्याच्या इफ्फी चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेली 'पॅम्प्लेट' नावाची शॉर्ट फिल्म खेडयातल्या एका लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून बनवली आहे. हा मुलगा जेव्हा अस्वस्थ होतो, त्या वेळी साउंड इफेक्ट म्हणून मंदारने त्याच्या डोक्यात घुंगरू फिरत राहतात अशाप्रकारचा आवाज दाखवला आहे. दुसऱ्या एका प्रसंगात भांडयांवर नाव कोरणाऱ्या मशीनचा कर्कश आवाज वापरला आहे.

'आई शप्पथ' (यूटयूबवर उपलब्ध आहे.) या शॉर्ट फिल्ममध्ये मुंबईतल्या चाळीत राहणारा मुलगा दाखवला आहे. चाळीतले वातावरण चित्रित करताना कापूस पिंजणाऱ्याकडच्या यंत्राचा आवाज, आजूबाजूच्या घरातील भांडी घासतानाचे आवाज, पाणी भरतानाचे आवाज दाखवले आहेत. याशिवाय कलंदर, सोलमेट, आयडॉल (यूटयूबवर उपलब्ध)अशा अनेक शॉर्ट फिल्मसाठी साऊंड डिझायनिंग केले.  

उत्तुंग परिवारच्या 'अनादि मी, अनंत मी' या ध्वनिनाटय रूपांतरणातही साउंड डिझायनिंगचं काम त्याने केलं.

नुकतेच मंदारने सध्या चर्चेत असलेल्या 'माइंड द मल्होत्राज' नावाच्या वेबसिरीजसाठीही सिंक साऊंड केलं आहे. तसेच 'ऑपरेशन कोब्रा' या वेबसिरीजसाठीही साऊंड डिझाइन केले आहे. वेबसिरीजचं माध्यम तसं वेगळं आहे. तिथे हे लक्षात ठेवावं लागतं की प्रेक्षक ती मोबाइलवर, लॅपटॉपवर बघतील, प्रवासात बघतील. मोठया पडद्यासाठी लागणारी भव्यता, गुणवत्ता यांची पोर्टेबल माध्यमात गरज नसते. त्यामुळे तिथले पॅरामीटर्स वेगळे असतात. या सर्व बाबींचा विचार करून मंदारने याच्या ध्वनीचे काम केले. या वेबसिरीजमुळे आणखी एका माध्यमाचा अनुभव मंदारच्या गाठीशी जमा झाला.

 मंदारच्या या प्रवासात त्याचे आई-वडील आणि पत्नी निशिगंधा कायम त्याच्या पाठीशी राहिले. इंजीनिअरिंगसारख्या स्थिर पगाराची खात्री असलेल्या क्षेत्राऐवजी अस्थिर अशा क्षेत्रात करिअर करण्याच्या त्याच्या निर्णयाला पाठिंबा देताना वडील म्हणाले, ''या क्षेत्रात आपले कोणी नातेवाईक नाही, की कोणी गॉडफादर नाही. जे करशील ते स्वत:च्या जबाबदारीवर कर.'' वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे मंदारला अनेक गावे आणि शाळा बदलाव्या लागल्या. मात्र त्यामुळे विविध भागातील बोलीभाषांविषयीची जाण वाढली आणि त्याचा उपयोग डबिंगसारख्या कामात झाला.

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मंदार सांगतो, ''फिल्म इन्स्टिटयूटमध्ये या कोर्ससाठी असलेले दोन निकष महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे पदवीपर्यंतचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण झालेले असलं पाहिजे. पदवी होईपर्यंत त्या व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची प्रगल्भता आलेली असते. तसेच साउंड माध्यमात करिअर करू इच्छिणाऱ्यांना ध्वनीच्या संदर्भातील विज्ञानविषयक संकल्पना (उदा. फ्रिक्वेन्सी, डेसिबल इ.) स्पष्ट असणे गरजेचं असतं. कोणता माइक वापरला तर काय होईल याचं तंत्रशुध्द उत्तर देता आलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला या क्षेत्रात स्वारस्य असलं पाहिजे. हे कलेचं क्षेत्र असल्याने चिकाटी, संघर्षाची तयारीही हवी.'' मंदारच्या या वक्तव्यातच या क्षेत्रातील त्याच्या यशाचं उत्तर आहे.

[email protected]