गुरू कायम सोबतच आहे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Jul-2019

गुरू म्हणून आयुष्यात आलेल्या व्यक्तींशी आपले मैत्रही होते आणि ते फार महत्त्वाचे होते, अशा शब्दात अभिनेत्री प्रिया जामकर गुरूविषयी व्यक्त होतात. पु. शि. रेगे यांची आनंदभाविनी 'सावित्री' रंगभूमीवर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्रीची गुरूविषयीची व्याख्या आणि त्यांना गुरुस्थानी असलेल्या व्यक्ती यांच्याविषयी त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया.

 गुरू नेमकं कोणाला म्हणावं? असा विचार केला की वाटतं - ज्यामुळे तुमच्या धारणा मुळातून बदलतात, तुमची आमूलाग्र मोडतोड होते अशी व्यक्ती किंवा काहीही. ते तुमचा गुरू. (ज्यांच्याकडून आपण काही कौशल्यं आत्मसात करतो, तेही गुरूच.) असा गुरू माझ्या आयुष्यात कायम कोणाच्या ना कोणाच्या रूपात सोबत आहे. कधी ती माणसं आहेत, तर कधी पुस्तकं, कधी निसर्ग नि पुष्कळ प्रमाणात परिस्थिती!!

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 माणसांपासून सुरूवात करायची, तर मला आठवतं लहानपणी मी ज्यांच्याकडे नृत्याच्या ओढीने वेडयासारखी ओढले गेले, त्या अशिरगडे बाई! त्या अप्रतिम नाचायच्या. स्वत: संगीतिका बसवायच्या. मी त्यात असायचेच. खरं तर मी तांत्रिक भाग त्यांच्याकडून शिकले नाही, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने माझ्यावर सौंदर्य नि तन्मयता यांचा खूप दाट संस्कार केला. फार सुंदर दिवस होते ते. अर्थात, ते दिवस वेगात बदलले, मीही परिस्थितीबरोबर नि स्वत:हूनही वाहत पुढे गेले. पण तो तन्मयतेचा संस्कार कधीही पुसला गेला नाही.

मी जेव्हा पुण्यात आले, तेव्हा दोन व्यक्ती मला अशा भेटल्या की ज्यांनी माझ्या अस्तित्वावर, जगण्यावर सवयी धारणांवर प्रचंड परिणाम केला. त्यातली एक म्हणजे कमल देसाई नि दुसरी म्हणजे माझ्या कथक नृत्याच्या गुरू शमा भाटे. दाजीकाका पणशीकरांसोबत मी पहिल्यांदा नादरूपवर गेले. सकाळी. शमाताई रियाज करीत होत्या. फिकट पिवळया रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता आणि मजबूत तत्कार सुरू होता. शेवटी त्यांनी चक्कर घेत तिहाई घेतली नि त्या समेवर आल्या. मी भांबावून नि भारावून बघत राहिले. मी तीन-चार वर्षं त्यांच्यासमोर उभी राहून काही धडे घेतले. तेव्ही मी एस.एन.डी.टी.ला एम.ए. करत होते पण अर्धाअधिक वेळ मी नादरूपवर पडीक असायचे. नृत्यात मी खूप पारंगत खरं तर झाले नाही, कारण नंतर मला मार्ग बदलावा लागला, मी तो बदललाही. पण माझी जाणीव बदलली, पार बदलली. आकृतिबंधातलं सौंदर्य, ठहराव, अवकाश, संगीतातल्या मोकळया जागा, चालणं उभं राहणं, तत्परता... कितीतरी गोष्टी ताईंमुळे उमजल्या. शमाताईंचा संस्कार नसता, तर कमल देसाईंच्या माणसाची गोष्ट कथेचं सौदर्य असं जाणवलंच नसतं.

कमलताईंची भेट योगायोगानं झाली. त्या माझ्या गुरू होत्या का? की मैत्रीण? वडील मैत्रीण.. पण त्यांनी मला प्रचंड समृध्द केलं. मी जो स्वैपाक करते, त्यावरही त्यांची छाया आहे. अर्थात मी त्यांच्यापेक्षा वेगळी होते, याची मला जाणीव होती नि त्यांनाही ते वेगळेपण आवडायचं. आम्ही भरपूर अघळपघळ गप्पा मारायचो. त्या गप्पांमधून मी स्वत:ला, आयुष्याला सामोरी जायला शिकत गेले. ते शिक्षण अद्भुत होतं. त्यात मानसिक कष्ट होते. जोडीला तेव्हाचा कठीण काळ होताच. म्हणजे दोन प्रभावी गुरूच होते की सोबत. ज्यांनी मला मजबूत केलं नि त्याचबरोबर माझ्यातलं हळवंपणही टिकवलं. कमलताईंबाबतची गंमत अशी की आज त्या ह्यात नाहीत, पण तरी त्यांच्या आठवणीतूनही मी काही न काही मिळवत असते. जिथे कुठे असतील, त्या तिथून जर त्यांनी हे वाक्य वाचलं ना, तर त्या खुदकन हसतील.

मला खरं तर थिएटर करायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. ती भूक शमली नाही, उलट प्रज्वलित होत राहिली. तो जो अदृश्य गुरू असतो, त्याचं लक्ष असावं की ही बाई मरते की जिवंत राहते. ही तरीही जिवंतच आहे असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं असावं, तेव्हा त्याने माझ्या वाटेत रवींद्र लाखेंना सावित्री घेऊन आणलं असावं. रवी माझा रंगभूमीवरचा गुरू.. गुरुमित्र खरं तर! नाटक करतानाच्या प्राथमिक धडयांपासून ते सावित्रीच्या अंतरंगाचा ठाव घेण्यापर्यंतच्या अनंत गोष्टी त्याने मला शिकवल्या. मी सुरुवातीला म्हणाले तसं स्वत:तील मोडतोडीला सामोरं जाण्यासारखं दुसरं शिक्षण नाही. सावित्रीच्या निमित्ताने रवीमुळे ते करता आलं. रवीमुळे मी सावित्री साकारू शकले. ती प्रकिया नक्कीच केवळ रम्य नव्हती, त्यात अनंत अडचणी होत्या, आव्हानं होती, अडथळे होते, कष्ट तर होतेच. पण हा सगळा भाग जरी असला, तरी आज माझ्याजवळ आहे ती प्रचंड विधायक नि समृध्द जाणीव!

ही माणसं माझे गुरू तर आहेतच, तसंच त्यांच्याबरोबरचं मैत्र मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यामध्ये स्वाभाविक चढउतार असतातच, पण या वळणांनी आपल्याला प्रचंड समृध्द केलंय ही जाणीव समाधानकारक असते. आयुष्यासोबत वाहावं लागतंच, वाहिलं पाहिजेही, पण काही विशिष्ट माणसं आपल्याला भेटलीच नसती, तर तुम्ही 'तुम्ही' नसताच. गुरू आणखी वेगळा काय असतो, हो ना?

प्रिया जामकर

9423223475

[email protected]