गुरू अंतर्यामी

विवेक मराठी    11-Jul-2019
Total Views |

आयुष्याच्या एका टप्प्यावर रिक्ततेचा अनुभव येऊन स्वत:ला नव्याने शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा गुरू चित्रकार श्रीनिवास बाळकृष्णन यांना जे.जे. कला महाविद्यालयाच्या रूपाने भेटला. आज ते 'चित्रपतंग' या त्यांच्या उपक्रमाद्वारे शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात.


 

गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन या दोन्ही दिवसांतला फरक न कळणाऱ्या किंवा तसं न करणाऱ्या मित्रांबरोबर माझं शालेय शिक्षण झालं. शालेय वयात अंगठा मागणारे द्रोणाचार्य वगैरे वाचल्याने गुरूवरून श्रध्दाच उडालेली.

घरीच शिक्षक असल्याने पालकातही गुरू वगैरे सापडला नाही.

एकूण शाळा-चाळ व घर ही ठिकाणं माझं कुतूहल शमवण्यास पुरेशी नव्हती.

प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी - करून बघण्यासाठी स्वतःलाच पुढाकार घ्यावा लागला. काही कार्टून फिल्म, सवंगडी, पुस्तकं, वर्तमानपत्र, विविध गावाकडील ठिकाणं यामुळे त्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा व मार्गदर्शन झालं. हे कॉलेजपर्यंत चाललं.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

   लहानपणापासून चांगली चित्रं काढत असल्याचा पुरेसा माज मी करत होतो. त्यात रुईयातून जे.जे. कला महाविद्यालयात गेल्यामुळे तो वाढण्याचे संकेत होते. अनेक जण जे.जे.मध्ये शिकत असताना, शिकल्यावर माज करताना पाहिले होते. पण माझ्याबाबत नेमकं उलट झालं. चार वर्षांत इतकी चांगली, विविध प्रकारातील चित्रं पाहता आली, जगभरातील चित्रांचा अभ्यास झाला, अनेक कलाकार कळले नि आपण आता काही करण्यासारखं उरलं नाही, असं वाटलं. मला शून्य करण्याचं काम या कला वातावरणानं दिलं. म्हणून या वास्तूला, त्यातील पुस्तकांना, दिलेल्या विचारमांडणीच्या स्वातंत्र्याला महत्त्वाचा मार्गदर्शक - गुरू मानण्यास हरकत नाही.

शिक्षणानंतर पराग राजे या अत्यंत हुशार, अध्यात्मातील ज्ञानदीप असणाऱ्या व्यक्तीचा सहवास काही काळ लाभला. मानवी जगण्याच्या, कलेच्या, खाण्याच्या, देवाच्या कल्पना, सध्याच्या समस्या व त्यावर उपाय, भविष्यातील माणूस यावर अखंड चर्चा चालायच्या! ऍरिस्टॉटलच्या किंवा प्लेटोच्या काळात गुरू-शिष्य संवाद व्हावा तसाच. त्या वेळी हे आयुष्यात कोणी गुरू असतीलच तर हे, अशी जाणीव झाली. परंतु असं काही ठरवून आपण कोणाला टॅग लावू शकत नाही. जिवलग मित्र असा काही टॅग नाही, तसं. त्यामुळे मी त्यांना 'गुरुमित्र' ही मनोमन उपाधी दिली. ह्यांच्या सान्निध्यात मानवी वर्तनापासून ते जगाकडे पाहण्याची दृष्टी व संधी मिळाली.


 

कामानिमित्त राजेंद्र प्रधान ही व्यक्ती संपर्कात आली. त्या वेळी नुकताच बिझनेस सुरू केलेला. स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा, संकटाच्या काळात तग धरण्याचा संयम इथे कळला. आर्थिकदृष्टया मोठे होण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

प. राजे आणि राजू प्र. या दोन्ही दिलदार व्यक्तींच्या सान्निध्यात जगण्याचा, आतापर्यंतच्या दुःखांचा, परिस्थितीबद्दलचा दृष्टीकोन गळून पडला.

त्या आचरणाने नवा समूह मला जोडता आला. या स्थितीतच 'स्वतःला आनंदी ठेवा' हे ब्रीदवाक्य माझ्या संस्थेसाठी सुचलं!

आताचा क्षण जगणाऱ्या सहचारिणी प्राचीमुळे मला सुखाचा संसार व व्यवसाय करता आला.

सध्या वेगाने सर्व बदलत आहे. हे सततच्या बदलाला सामोरं जाण्याचं बळ देणाऱ्या कायझेन तत्त्वामुळे जमलं.

अनेक चांगले चित्रपट पुस्तकापेक्षाही कमी वेळ खर्चून माझ्या विचारात बदल करत असतात. त्याचे दिग्दर्शक, संवाद लेखक माझे महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत.

फेसबुकमुळे नेटिकेट्स तर शिकता आलेच, तसंच एकाच विषयाचे अनेक विचार असू शकतात हेही पाहता आलं. टिकेला उत्तर देण्याची संधी मिळाली. त्यात सुधारणा करता आली. संयमाची वेळ वाढवता आली. समविचारीही भेटले. कमी काळात अनेक माणसांशी परिचय होण्याची मोठी संधी फेसबुकने दिली.

समाजाचा, माणसाचा आतील चेहरा दाखवण्याचं काम गुरू करतो, खूप सारं स्वातंत्र्य देतो, जे सध्या फेसबुकइतकं चांगलं कोणीही करत नाही. फेसबुक हाच तरुणांचा गुरू!

कधीकधी वाटतं, मी माझ्या गुरूला बाहेर शोधतोय आणि सर्वात महान गुरू माझ्यातच आहे. हा नेहमी झोपलेला असतो. कुठल्याही घटनेने जागृत झाला की मला ज्ञान करून देतो व स्वतः पुन्हा झोपतो.

- श्रीनिवास बाळकृष्णन

9082483665