गोष्ट पाण्याची - माणसाची आणि माकडाची

विवेक मराठी    13-Jul-2019   
Total Views |

माणूस हा प्राणी उत्क्रांत होत असताना भविष्याचा विचार करू लागला आणि माणसाची प्रगती झपाटयाने होत गेली. परंतु दुर्दैवाने, माणसाने केवळ आपल्या प्रजातीपुरता विचार आणि कृती केली, ज्यामुळे निसर्गातील समतोल ढासळत चालला आहे. नैसर्गिक स्रोत, साधनसंपत्ती यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. परंतु वेळ अजूनही गेली नाही, माणसाने गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिले तर पुढील मार्ग सुखकर होऊ शकतो. §

 

काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एक बातमी वाचली. मध्य प्रदेशमध्ये देवासमधील बागली येथील जोशी बाबा वनक्षेत्रात माकडांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. खरं तर मारामारी हा शब्द फारच सौम्य आहे. त्या प्रसंगामध्ये अंदाजे 14-15 माकडांनी आपला जीव गमावला. या तीव्र संघर्षाचं कारण वाचलं आणि अंगावर काटा आला. तीव्र उन्हाळयामुळे तो भाग अतिशय रखरखीत झाला होता. पाण्याचे साठे मर्यादित झाले होते. एका गटातील माकडांनी (30-35 माकडांचा गट) दुसऱ्या गटातील माकडांना (दुसऱ्या कोणत्या प्राण्याला नव्हे) हे पाणी पिण्यास विरोध केला. आसपासच्या पाणवठयांवर त्या गटाने ताबा मिळवला होता आणि ते इतर कोणत्याही गटाला त्या पाणवठयांवर येऊ देत नव्हते. एकतर अतिशय कडक उन्हाळा आणि त्यात पाण्यापर्यंत पोहोचता येत नाही या दोन अडचणींमुळे पाण्यावाचून तडफडत, उष्माघाताचा फटका बसल्याने, साधारण 15 माकडांचा मृत्यू झाला अशी वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती आहे. 9 माकडं गुहेमध्ये मेलेली मिळाली, तर 6 माकडं बाहेर मिळाली. काही माकडांच्या वैद्यकीय तपासणीतून हे उघड झालं की उष्माघात हे मृत्यूचं कारण आहे. ही घटना मला ज्ञात असलेल्या दुर्मीळ घटनांपैकी एक विशेष घटना आहे. वन्य जीवांत झालेली एक घटना असं म्हणून याकडे दुर्लक्ष करणं ही आपली मोठी चूक होऊ शकते, असं वाटलं आणि या घटनेवरून मनात आलेले विचार लेख लिहून उतरवून काढावेत या हेतूने हा लेख लिहायला घेतला.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

माणसांच्या लक्षात का येत नाही?

गेली काही वर्षं सातत्याने दर वर्षी उन्हाळयात वेगवेगळया ठिकाणी पडलेल्या दुष्काळाच्या बातम्या आपण वाचतो आणि विसरून जातो. त्यात एखाद्या गावात कोरडया विहिरीत पाडून मृत्युमुखी पडणारी मुलगी किंवा महिला असते, एखाद्या गावातून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या टँकरमागे धावून त्या नळातून वाहणारं पाणी भरण्याच्या प्रयत्नात पडून हातपाय मोडून घेणारे किंवा प्रसंगी जीव गमावणारे तरुण-तरुणी असतात, गावातील पाण्याचे सरकारी स्रोत कोरडे पडल्यामुळे आणि खासगी स्रोतांमधून पाणी मिळायला प्रतिबंध केल्यामुळे त्रास भोगणारे नागरिक असतात. आठवडयातून एकदा नव्हे, तर अनेक ठिकाणी तीन आठवडयांतून एकदा पाणीपुरवठा होणारे लोक असतात, दर उन्हाळयात गावातील सगळे जलस्रोत कोरडे पडले म्हणून स्थलांतर करून आरोग्य, शिक्षण, शेती या गोष्टींवर पाणी सोडणारे हतबल नागरिक असतात. पण जिथे नळातून मुबलक किंवा पुरेसं पाणी मिळतं, तिथल्या बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने या फक्त बातम्या असतात, वाचून हळहळ वाटण्यासाठी आणि क्षणात ते विसरून जाण्यासाठी. आपल्याला मिळणारं पाणी हे यातल्या अनेकांच्या वाटयाचं आणि हक्काचं आहे, याची जाणीवच करून देण्यात सर्व संस्था, यंत्रणा बऱ्याच अंशी अपयशी ठरल्या आहेत.

जगात पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे आणि मर्यादितच राहणार आहे, हे एकतर बहुसंख्य माणसांच्या लक्षात येत नाहीये किंवा ही गोष्ट त्यांना पटत तरी नाहीये असा निष्कर्ष आपल्या सध्याच्या एकूण बदलत्या जीवनशैलीवरून काढता येईल. नैसर्गिक स्रोतांवर सर्वच सजीवांचा समान अधिकार आहे, आणि आपण याची जाणीव ठेवून आपला व्यवहार ठेवला पाहिजे हे आपण लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. पाणी, किंवा एकूणच नैसर्गिक स्रोत हे सर्वांसाठी असून त्यामध्ये केवळ माणसाच्या फायद्यासाठी काही फेरफार करणं हे निसर्गातील समतोल ढासळण्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचा थेट परिणाम दिसायला वेळ लागत असला, तरी हे बदल बरेच वेळा अपरिवर्तनीय आहेत हे लक्षात ठेवलं तर आपलाच फायदा आहे.

तहान लागली की विहीर खणायची ही म्हण आपली पूर्वीपासून पाण्याबाबत उदासीन असलेली वृत्ती दाखवणारी आहे, कदाचित तसा अनुभव दाखवणारीसुध्दा आहे, असं मला कायम वाटत आलंय. आपल्याला दर वर्षी नेमाने भरपूर पाणी मिळण्याचं नैसर्गिक वरदान आहे. आणि बहुधा ही गरजेपेक्षा खूप जास्त उपलब्धता आपल्या या जीवनस्रोताबाबत आपल्या असलेल्या अनास्थेला कारणीभूत ठरलेली असावी. एकांगी विकास करताना आपण औद्योगिक विकासाला जे महत्त्व दिलं, त्याच्या निम्मं जरी जलस्रोतांकडे दिलं असतं, त्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून आपल्या जीवनाच्या दृष्टीने असलेलं पाण्याचं महत्त्व अधोरेखित करून परिस्थिती चांगली ठेवणं फार कठीण नव्हतं, आजही नाहीये. प्रश्न आपल्या बदललेल्या मानसिकतेचा आहे.

अज्ञानाबाबत जागृती व्हावी

गेली काही वर्षं माझ्यासारखे वेडे पाण्याच्या घटत्या उपलब्धतेबद्दल आंधळेपणाने अनुकरण करून आपण अर्धवट विचाराने करत असलेल्या उपायांच्या दुष्परिणामांबद्दल, लोकांच्या उदासीन मानसिकतेबद्दल, पाण्याची नक्की परिस्थिती काय आहे याबद्दल असलेल्या अनभिज्ञतेबाबत, अज्ञानाबाबत जागृती व्हावी म्हणून करत असलेल्या प्रयत्नांकडे बहुसंख्य लोक चक्क दुर्लक्ष करत आहेत. काही तर खाजगीमध्ये या विचारांची खिल्ली उडवत आहेत. जिथे नळाने पाणी येतं, तिथे तर लोकांचा पाणी परिस्थितीबाबत असलेला दृष्टीकोन फारच संकुचित झाला आहे असं दिसतंय.

जगात आता महायुध्द झालंच तर ते पाण्यावरून होईल, असं जगभरातील अनेक तज्ज्ञ, विचारवंत बोलताना दिसतात. आपल्याकडेही असं सांगणारे अनेक तज्ज्ञ आहेत. पण आपल्या कृतीतून आपल्याला हे बोलणं पटलंय आणि त्यावर योग्य उपाय शोधायचा आपण संघटित प्रयत्न करतोय असं काही दिसत नाहीये. अगदी आपल्याला या दुष्काळाची, अनियमित होत चाललेल्या पावसाची, दर वर्षी खालावत चाललेल्या भूजल पातळीची काही काळजी खरंच आहे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय आपण करतोय, किमान करू इच्छितोय असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये. आणि हे काळजीचं प्रमुख कारण आहे.

माकडापासून आपली उत्क्रांती झाली असा एक सर्वमान्य शास्त्रीय समज आहे. माणूस हा प्राणी उत्क्रांत होताना जास्त विचार करत गेला आणि विचार करू शकणं आणि भविष्याचा विचार करू शकणं या दोन गोष्टींमुळे माणसाची प्रगती होत गेली, असं आपण आपल्या उत्क्रांतीबद्दल म्हणू शकतो. माणूस विचार करू शकतो आणि आपल्या विचारांनी आणि कृतीने आपल्याच नव्हे, तर आजूबाजूच्या सजीव-निर्जीव यांच्यावरही चांगला-वाईट परिणाम घडवू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने, माणसाला आपल्या या ताकदीचा अहंकार तर आहे, पण या सामर्थ्याबरोबर आवश्यक असलेल्या जबाबदारीची जाणीव पुरेशी नसल्याने माणूस केवळ आपल्या प्रजातीपुरता विचार आणि कृती करतोय, ज्यामुळे निसर्गातील समतोल ढासळत चालला आहे. नैसर्गिक स्रोत, साधनसंपत्ती या गोष्टी आपल्या गरजा पुरवू शकतात, आपली हाव पूर्ण करू शकत नाहीत, हे आपण अजूनही समजू शकत नाही आहोत. त्यामुळे आजही, चुकीच्या संकल्पनांच्या आणि विचारांच्या मागे धावत असताना आपण आपल्या पुढच्या पिढयांना संकटात टाकत आहोत. आणि आपल्याला याची जाणीवही नाहीये ही आजची वस्तुस्थिती आहे.

आपण काय शिकायचं?

मग या माकडांच्या मारामारीच्या घटनेतून आपण काय शिकायचं? यातून आपल्याला काही धडा मिळतोय का? असे अनेक प्रश्न मनात आले. असे प्रश्न समोर आले. त्यात आत्ताच्या उन्हाळयात पालघर जिल्ह्यात काम करताना आलेल्या एक अनुभवाची आणि त्यातून काढलेल्या मार्गाची आठवण झाली.

पालघर जिल्ह्यातील एक जुळं गाव. म्हणजे आता दोन गावं झाली आहेत, पण पूर्वी एकच गाव होतं. दोन्ही गावांचे पाण्याचे स्रोत एकाच परिसरात. सगळे एकत्र पाणी भरायचे. एका गावाला ते लांब पडायचं, म्हणून त्यांनी एका संस्थेला मदतीसाठी विनंती केली. त्यांच्यासाठी मी त्या गावात सर्वेक्षण करायला गेलो होतो. ज्या गावाच्या जवळ स्रोत होते, त्यांच्यातील काहींच्या मनात वेगळे विचार यायला लागले आणि त्यांनी इतकी वर्षं असलेला एकोपा संपवला. चांगले पाण्याचे स्रोत आपल्याकडे ठेवून दुसऱ्या गावातील लोकांना मिळणारं पाणी सहज मिळू नये यासाठी भांडण सुरू केलं. तीन-चार वेळा गावांमध्ये लोकांना एकत्र करून, समजावून एक महिन्यानंतर त्यांचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यात संस्थेला यश मिळालं. त्याचा परिणाम असा झाला की ज्या गावाला पाणी लांब जाऊन आणावं लागत होतं, त्यांना स्वत:च्या वाटयाचा स्रोत मिळालाच, तसंच पाणी थेट गावापर्यंत आणून मिळालं.

इथे दोन गटांमध्ये सामोपचाराने प्रश्न सोडवायला संस्था आणि मी होतो आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळालं म्हणून चित्र वेगळं दिसतंय. अन्यथा, त्या माकडांच्या गटांमध्ये झालेल्या भांडणात आणि या भांडणात काही फार फरक नाहीये. इथेही, आपल्या स्रोतावर पाणी भरू न देणारा गट होता आणि पाण्याची गरज असलेला, दुर्बळ पण काम करून पाणी मिळवण्याची इच्छा असलेला गटही होता. दोन्ही गटांना एकत्र आणून, चर्चा घडवून सामोपचाराने उपाययोजना करणारी यंत्रणा उपलब्ध झाल्याने दोन्ही गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला.

पण तरीही हा विचार मनात येतोच. जर तेव्हढाच चांगला पाण्याचा दुसरा स्रोत नसता, तर हा प्रश्न इतक्या सहज सुटला असता का? मग ते माकडांचे गट आणि हे माणसांचे गट यात काही फरक आहे का? हे केवळ बळी तो कान पिळी, या उक्तीप्रमाणे व्हायला लागलं, तर ही प्रगती, उत्क्रांती, विकास, वगैरे गोष्टी म्हणजे केवळ कल्पनांचे बुडबुडे आहेत का?

पाण्यासाठी झालेला आणि चालू असलेला हा संघर्ष कुठे जाणार आहे? पाण्याच्या साठयांवर ताबा मिळवून ते दुसऱ्याला वापरायला बंदी घालणं म्हणजेच पाणीसाठयांचे खाजगीकरण नव्हे काय? मग आत्ता सगळया शहरांना जिथून पाणीपुरवठा होतो, तिथे तरी काय वेगळी परिस्थिती आहे? तिथेही साठयावर ताबा आहे आणि स्थानिकांना बंदी आहे. मग आपण नक्की कुठे चाललो आहोत?

माणूस हा भविष्याचा विचार करणारा प्राणी आहे. त्यामुळे पाणी या जीवनासाठी अत्यावश्यक गोष्टीबद्दल तो एक गट म्हणून विचार करणार की एक प्रजाती म्हणून? माणूस त्याचं माणूसपण दाखवून देणार की या माकडांचे अनुकरण करून (जंगलाचा कायदा राबवून) ते आपले पूर्वज होते आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार असं म्हणणार, हे कुतूहल मात्र सध्याच्या काही अनुभवांवरून नक्की निर्माण झालंय.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट - त्या माकडांना आत्तापर्यंत पाणी पिऊ द्यायला बंदी नव्हती. मग असं तर झालं नसेल की पाण्याचे साठे या वर्षी आपल्याला पुरणार नाहीत हे त्या बलशाली गटाला कळलं आणि म्हणून त्यांनी या उन्हाळयात दुसऱ्या गटाला पाण्यापर्यंत येऊ दिलं नाही! मग तर माणसाने आणखी सजग व्हायची गरज आहे, कारण माणसाच्या आजच्या पाण्याच्या आकलनाचा विचार केला, तर आपल्यातल्या बहुसंख्य लोकांना पाणी संपत चाललंय हे शेवटपर्यंत कळणारच नाही.

मला मात्र अजूनही आशा वाटते आहे की माणूस जर अजूनही जागा झाला आणि त्याने गांभीर्याने हा प्रश्न हाताळायचं ठरवलं, तर पाण्याच्या प्रश्नावरून तिसरं महायुध्द हा विषय नक्की लांबवता येईल, किमान आपल्या देशात असणारे दोन राज्यांमधील पाणी तंटे, एकाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये असलेले पाणी तंटे, एका जिल्ह्यातील गावांमध्ये असलेले पाणी तंटे, इत्यादि गोष्टींवर एकमत तयार करून ते प्रश्न तरी सामोपचाराने संपवता येतील.

मुद्दा फक्त हा आहे, की हे माणूस कधी ठरवणार?