माझ्या आयुष्याचे सोने करणारे परिस - अशोक देशमाने

विवेक मराठी    15-Jul-2019
Total Views |

अभियांत्रिकी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारा अशोक देशमाने आज 'स्ेहवन'च्या माध्यमातून कित्येक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा आधार बनला आहे. स्वामी विवेकानंद, बाबा आमटे, रा. स्व. संघ यांच्या विचारांच्या प्रभावाने तरुण वयातच त्याच्यात सामाजिक जाणीव जागृत झाली.

  

मानवत तालुक्यातील मंगरूळ गावात माझे बालपण गेले. घरची अत्यंत गरीब परिस्थिती, पण वारकरी संप्रदायाचा पगडा असल्याने परिस्थितीवर मात करायची हिंमत मिळाली. वारकरी संप्रदायाचे संस्कार आई-वडिलांकडून मिळाले. वडील ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग तोंडपाठ करून घ्यायचे. आईवडिलांनी अत्यंत गरिबीतही माणुसकीचे आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार केले.

आमचे गाव तसे शेतीवर अवलंबून होते. त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण अल्प होते. गावात वाचनालय नव्हते, पण शाळेतून पुस्तक वाचायला मिळायची. शाळेतल्या शिक्षकांनी मला वाचनाची गोडी लावली. एके दिवशी भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक माझ्या हाती पडले. या पुस्तकाने माझ्या बालमनाला इतके प्रभावित केले की शालेय जीवनापासून माझ्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा मोठा पगडा बसला. स्वामीजींचे विचार माझ्या दैनंदिन जीवनात ऊर्जा भरायचे काम नकळत करत राहतात. 'दुसऱ्यांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात, बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे असतात' हा गुरुमंत्र म्हणून मी स्वीकारला.

परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात शिकत असताना 'स्वामी विवेकानंद विचार दर्शन'चे 4 खंड वाचून काढले. या विचारांच्या दर्शनाने मी प्रेरित झालो. देशासाठी काहीतरी करायचे या विचाराने मी एकदा घरही सोडले होते, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही. आयुष्यात खूप मोठी मोठी संकटे येऊन गेली, परंतु न डगमगता त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वामीजींच्या विचारांनीच मिळाली. ते विचार आजही मला दिशा दाखवतात, माझ्या मनाला भौतिक आकर्षणांपासून, वाईट प्रलोभनांपासून दूर ठेवतात.

2010-11चे वर्षं असावे. मी महाविद्यालयात शिकत होतो. बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेच्या मदतीसाठी परभणी शहरात 'स्वरानंदनवन' संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांचे जीवनदर्शन दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे स्वामीजींबरोबर बाबा आमटे यांच्या विचारांचे गारूड माझ्या मनाला झपाटून गेले, सर्वस्व अर्पून समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या विचारांनी मला दिली.

पुढे कामानिमित्ताने पुण्यात आलो. सिंहगड रोडवरील रामकृष्ण मठात जाणे-येणे झाले. इथे येत राहिल्याने स्वामी विवेकांनदांचे विचारदर्शन अधिक होत गेले. पिंपरी भागात 'आयटी मिलन' नावाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरायची. शाखेत सहभागी होणाऱ्या संघस्वयंसेवकांची संख्या बरी होती. या शाखेशी मी जोडला गेलो. जवळपास दीड वषर्े मी शाखेत जायचो. सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांची पुस्तक वाचण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार गुरू होऊन मनावर बिंबले. शाखेमुळे मनाला आणि विचारांना शिस्त लागली. राष्ट्र प्रथम, जात-पंथ विसरून देशातील समस्या दिसायला लागल्या. सर्वस्व अर्पून, ध्येयाने प्रेरित होऊन निःस्वार्थीपणे काम करत राहणारे असंख्य प्रचारक मी पाहिले. झोकून देणे काय असते हे मी त्यांच्याकडून शिकलो. पद्मभूषण डॉ. अशोकराव (काका) कुकडे यांचे बौध्दिक ऐकण्याचा अनेक वेळा योग आला. काकांच्या निःस्पृह कामामुळे मलाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

2015 साली वयाच्या 26व्या वर्षी नोकरी सोडून देशासाठी, समाजातील वंचित मुलांसाठी पूर्णवेळ झोकून दिले. आज त्या गोष्टीलाही 4-5 वर्षे झाली, परंतु मी काहीतरी वेगळे करतोय याचा तिळमात्र अहंकार माझ्या मनाला येत नाही आणि माझे गुरू ते येऊही देणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे या आयुष्यात दरिद्रीनारायणाची जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून घडावी, हेच गुरुचरणी मागणे. असे हे माझ्या आयुष्याचे सोने करणारे गुरू. पुढच्या आयुष्यात आणखीही काही जण गुरुस्थानी येऊन दिशा दाखवतील.

8796400484

(अध्यक्ष, स्नेहवन संस्था, पुणे)