उध्दवगीता भाग 1

विवेक मराठी    17-Jul-2019
Total Views |

**लीना मेहेंदळे***

महाभारत युध्दानंतर एकदा अर्जुनाने पुन्हा मला गीतेचे तत्त्वज्ञान सांग, अशी विनंती केली असता श्रीकृष्ण म्हणाला होता की अर्जुना, पुन्हा ते तत्त्वज्ञान सांगणे कठीण आहे. पण कारणपरत्वे उध्दवाला उपदेश देताना त्यातील बराच भाग श्रीकृष्णाने पुन्हा मांडला आहे, असे समजून येते. त्याचाच आढावा येथे प्रस्तुत आहे.


 

भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात सात ते एकोणतिसाव्या अध्यायात श्रीकृष्णाने उध्दवाला जो दीर्घ उपदेश दिला, त्याचे वर्णन आहे. हाच उध्दवगीता या नावाने ओळखला जातो. त्यापैकी 7 ते 9 अध्याय अवधूत आख्यान आहे, जे स्वतःच्या वेगळेपणामुळे एरवीही छोटया आख्यानाच्या रूपाने प्रसिध्द आहे.

ऋषींकडून यदुवंशाला नष्ट होण्याचा शाप मिळाला. पण त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न बलराम अथवा श्रीकृष्ण यांनी केला नाही. त्याऐवजी बलरामाने लगेच वनात जाऊन आपले अवतारकार्य संपवले. श्रीकृष्णही तसेच काही करणार या विरह-जाणिवेने उध्दव व्याकूळ झाला. ''तू तरी आम्हास सोडून जाऊ नकोस'' असे म्हणू लागला. पण श्रीकृष्णाने त्याला बजावून सांगितले की ''आता तूच स्वजन बांधवांचा मोह सोड, द्वारका सोड आणि संपूर्ण चित्त माझ्या ठायी ठेवून समदृष्टीने पृथ्वीवर विचरण कर. समदृष्टी - म्हणजे प्रत्येक प्राण्यात, किंबहुना चराचराच्या प्रत्येक कणात मीच दिसेन अशी तुझी दृष्टी होऊ दे.'' मग उध्दवाला पुढील काळासाठी जणू शिदोरीच, असा उपदेश श्रीकृष्णाने केला.

गीतेचे तत्त्वज्ञान

महाभारत युध्दानंतर एकदा अर्जुनाने पुन्हा मला गीतेचे तत्त्वज्ञान सांग, अशी विनंती केली असता श्रीकृष्ण म्हणाला होता की अर्जुना, पुन्हा ते तत्त्वज्ञान सांगणे कठीण आहे. पण कारणपरत्वे उध्दवाला उपदेश देताना त्यातील बराच भाग श्रीकृष्णाने पुन्हा मांडला आहे, असे समजून येते. त्याचाच आढावा येथे प्रस्तुत आहे.

''या जगात जे जे इंद्रियांकडून जाणले जाते, ते सर्व नाशिवंत आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणारे सर्व मनोविलास असते आणि जागृती आल्याशिवाय हे समजत नाही, त्याचप्रमाणे जागृतीत दिसणारेदेखील मनोविलासच असतात आणि समदृष्टी आल्याशिवाय याची जाणीव होत नाही. संसारातील बाह्य वस्तूंमध्ये आपण भेदाभेद करतो. असे ते असंख्य भेद, त्यांचे वेगळेपण, त्या वेगळेपणाची चर्चा यातच मनुष्य गुंग होऊन जातो. त्यामध्ये गुण आणि दोष असा भेदही केला जातो. मग कर्म, अकर्म (म्हणजे विहित कर्मांचा लोप) आणि विकर्म म्हणजे निषिध्द कर्म असेही भेद उत्पन्न होऊन त्यांनाही राग-द्वेषाचे आडंबर चिकटवले जाते. म्हणून हे उध्दवा, तू अगोदर इंद्रियांना वश कर.'' भगवद्गीतेत, किंवा तिला आपण अर्जुनगीता असे म्हटले तर अर्जुनगीतेतदेखील हेच सांगितले आहे - तस्मात् त्वं इंद्रिण्यादौ नियम्य भरतर्षभ।

''हे उध्दवा, तू इंद्रियापाठोपाठ चित्तवृत्तींनाही थोपव आणि विचारांद्वारे, बुध्दीच्याद्वारे हे समजून घे की तुझा आत्मा हाच या बाह्य जगाला प्रकट करीत आहे. एकीकडे तो बाह्य जगाशी तादात्म्य करीत आहे, तर दुसरीकडे तोच माझ्या परमात्मस्वरूपाला जोडलेला आहे असे समजल्याने तू ज्ञानविज्ञानाने संपन्न होशील.

तस्मात् युक्तेंद्रियग्राामो युक्तचित्त इदं जगत् ।

आत्मनीक्षस्व विततमात्मानं मय्यधीश्वरे॥''

गीताप्रेसच्या भाष्यकारांनी ज्ञान आणि विज्ञान यांची तर्कसंगत व्याख्या केली आहे. ज्ञान म्हणजे वेदांत वर्णन केलेले तथ्य माहीत करून घेणे आणि विज्ञान म्हणजे आपण स्वतः त्यापैकी निदान काहींची अनुभूती करून घेणे, असा अर्थ लावला आहे. 'एक तरी ओवी अनुभवावी' असे उगाच नाही ज्ञानेश्वर सांगत. भागवतकारांनीदेखील अशा व्यक्तींचे 'आत्मानुभवतुष्टात्मा' असे वर्णन केले आहे. तर स्वानुभवातून, स्वानुभूतीतून जेव्हा आपलाच आत्मा या बाह्य जगातही व्याप्त आहे ही आनंददायक जाणीव होते, तेव्हा ती व्यक्ती विज्ञानयुक्त होते. अशा व्यक्तीला या जगातील विघ्ने त्रास देऊ शकत नाहीत.

जसे लहान अर्भकाला गुण-दोष यांचे आकलन नसल्यामुळे ते बालक एखादे काम करताना त्याच्या गुण-दोषांची चिकित्सा करीत नाही, तद्वतच अनुभूती घेतलेला विज्ञानी ही चिकित्सा करीत नाही. पण बालकाप्रमाणे अज्ञान हे त्याचे कारण नसून अनुभूतिजन्य विज्ञान हे असते. म्हणूनच असा तो ज्ञानी निषिध्द गोष्टींपासून आपोआप परावृत्त होतो.

दोषबुध्दोभयातीतो निषेधान्न निवर्तते।

गुणबुध्दया च विहितं न करोति यथार्भकः॥

असा आत्मदर्शी हा सर्वथा शांतिचित्त आणि सर्व प्राणिमात्रांना सुहृद मानणारा होतो. अर्जुनगीतेतही म्हटले आहे -'सुहृदं सर्वभूतानाम् ज्ञात्वा माम् शांतिमृच्छति।' ज्ञानी पुरुष सर्व प्राणिमात्रांना सुहृद असे जाणून स्वतः अपार शांती पावतो. तसेच व त्यामुळेच तो पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकत नाही.

संन्यास आणि त्याग

यावर उध्दवाने श्रीकृष्णाला संन्यास आणि त्याग यांबद्दल विचारले. उध्दव म्हणतो, ''हे कृष्णा, तू कालातीत सत्य, स्वयंप्रकाश, आत्मस्वरूप, नारायण, नरसखा, सर्वज्ञ, सर्वेश्वर आणि मायेच्या मोहपाशातून सोडवणारा आहेस. म्हणून तूच मला हे तत्त्व सांग. इंद्रियजन्य विषयभोगाचा त्याग करणे अत्यंत कठीण आहे. मी व माझे या विचाराने मनुष्य पूर्णपणे भारावलेला असतो. असा माणूस संन्यासाप्रत कसा पोहोचतो, ते तत्त्व मला पूर्ण निरूपण करून सांग.'' अर्जुनही शेवटच्या अध्यायात संन्यास आणि त्यागाचीच महती विचारतो -

संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्।

त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिसूदन॥

श्रीकृष्ण सांगतो की ''हे उध्द वा, आत्मा हाच या बाबतीत आपला गुरू असतो - आत्मनो गुरूरात्मैव।'' अर्जुनगीतादेखील सांगते - आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः। मी जरी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली असली, तरी त्यातील मनुष्ययोनी ही विशिष्ट आहे. कारण मनुष्य हाच तीक्ष्ण बुध्दीच्या योगाने व एकाग्राचित्त होऊन बुध्दीपलीकडील जो परमात्मा, त्याचा अनुभव घेऊ शकतो. असा अनुभव घेतलेला जो अवधूत दत्तात्रेय, तो यदुराजाला कसा दिसला - तर निपुणबुध्दि, परमविद्वान, सर्व यशदायक कर्म करण्यास समर्थ, तरीही त्या कर्मेच्छेपासून अलिप्त, काम आणि लोभ या दोघांच्या बंधनातून मुक्त, आत्मानंद घेत स्वरूपावस्थित असे अवधूताचे रूप यदुराजाला दिसले. या स्वरूपाप्रत येण्यासाठी लागणारे ज्ञान कसे मिळाले? हे विचारल्यावर अवधूतांनी आपण कोणते चोवीस गुरू केले व त्यांच्याकडून कोणते गुण ग्राहण करीत स्वतःच्या आत्म्याला एकाग्राचित्ताने जाणून घेतले, तो उपदेश केला. या आख्यानामध्ये 'ब्रह्मावलोकधिषणः पुरुषः'' अशी मनुष्याची व्याख्या केली आहे, म्हणजे जो बुध्दी-ज्ञानाच्या योगाने परब्रह्माचे अवलोकन करू शकतो, तो मनुष्य.

दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो की मनुष्याने माझी भक्ती करीत स्वधर्मपालन करताना सदाचार व निष्कामभाव सोडू नयेत. जग हे मिथ्या का आहे, तर ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत निव्वळ मनोरथांचे डोंगर उभारले जाऊन हाती काहीच लागत नाही, तद्वतच जागृत अवस्थेतही इंद्रिय-प्रयत्नातून साध्य केलेले हे जग तितकेच क्षणभंगुर असल्याने हाती लागू शकत नाही. म्हणून आत्मज्ञान हवे असल्यास सकाम कर्मांचा त्याग करावा. यम-नियमांपैकी यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्राह) हे त्याज्य नाहीत, पण नियम मात्र माझ्या तीव्र उपासनेच्या आड येत असल्यास त्यांचाही त्याग करावा (उदा. शौच, स्वाध्याय). माझ्या प्राप्तीसाठी योग्य गुरू शोधून त्यावर श्रध्दा ठेवून राहावे. आळस न करता कुशलतेने कामे करावीत. संसार, स्वजन, धन-धान्य आदीबाबत मोहमय ममत्वाचा त्याग करावा.

ज्याप्रमाणे स्थूल लाकूड आगीच्या योगाने प्रज्वलित होते, पण आग मात्र लाकडापासून अलिप्तच राहते, त्याप्रमाणे देहाभिमान तसेच जन्ममृत्युरूप संसारचक्रातून ज्ञानाग्नीच्या साहाय्याने अलिप्त होता येते. (अर्जुनगीता सांगते - ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरूते।) बुध्दिमान शिष्य व योग्य गुरू यांच्या संयोगाने हा ज्ञानाग्नी प्रकट होतो.

स्थितप्रज्ञाची लक्षणे

अर्जुनाने स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारली, त्याप्रमाणे उध्दवही विचारतो की बंधयुक्त जीव आणि बंधमुक्त जीव यांची लक्षणे कशी ओळखावी? बंधमुक्त पुरुष कसा वागतो, कसा विहरतो, कसा खातो, कसा उठतो-बसतो, कसा झोपतो, इत्यादी. कारण आत्मा नित्यबध्द भासतो व नित्यमुक्तही भासतो, त्यामुळे मी भ्रमात पडलो आहे.

यावर श्रीकृष्णाचे उत्तर असे की सुखदुःखांचा भोक्ता असणारा जीव हा बंधनात असतो. मनुष्य जरी अतिशय यशस्वी, धनवान, व सुखोपभोग घेणारा असला, तरी ते सुखही क्षणभंगुर आहे. पुण्यफल भोगून झाले की त्या पुण्याचा क्षय होत जातो आणि शेवटी असे क्षीणपुण्य झालेले प्राणी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात. (अर्जुनगीता - क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशन्ति।)

जीव जोपर्यंत सत्त्व, रज, तम, या गुणांना व इंद्रियांनाच आपले स्वरूप समजतो, तोपर्यंत त्याला सुख-दुःख, राग-द्वेष व अभिमान यांची जाणीव असते व तो बंधनात असतो (अर्जुनगीता - बंध मोक्षंच या वेत्ति बुध्दिः सा पार्थ सात्त्विक।) या गुणकर्मफलांचे वैराग्य आले की मोक्षाची वाट सुरू होते.

श्रीकृष्ण सांगतो की आत्म्याला बध्द किंवा मुक्त या उपाधी सत्त्व, रज, तम या त्रिगुणांमुळे मिळतात. स्वप्न हे जसे बुध्दीचे विवर्त, तसेच शरीराचा जन्म-मृत्यू, सुख-दुःख हेही मायेने उत्पन्न केलेले विवर्त (मिथ्या) आहे. देहधारींना मुक्तीचा अनुभव देणारी आत्मविद्या आणि बंधनाचा अनुभव देणारी अविद्या ही दोन्ही माझीच रूपे आहेत.

नित्यमुक्त मी आणि बध्द-मुक्ततेत अडकलेला जीव हे दोघेही एकाच शरीरामधे नियंता आणि नियंत्रित या स्वरूपात राहतात. 'एकाच वृक्षावर असलेले दोन जिवलग सहोदर पक्षी' - द्वा सुपर्णा सयुजा सखायाः' असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यातील एक पक्षी त्या वृक्षाची सुखदुःखरूप फळे उपभोगत असतो, तर दुसरा त्या फळांबाबत निरीच्छ, निर्विकार राहून ती फळे न खाता फक्त साक्षी भावनेने रहातो. उपनिषदातील हा प्रसिध्द दृष्टान्त उध्दवगीतेतही पुन्हा एकदा वापरला आहे.

हा जो अभोक्ता ईश्वर, तो ज्ञान, ऐश्वर्य व आनंद या तिन्ही बाबतीत भोक्ता असलेल्या जीवापेक्षा श्रेष्ठ आहे. इतकेच नाही, तर स्वस्वरूपाला व जगत-रूप वृक्षाला पूर्णपणे जाणत असल्याने तो नित्यमुक्त आहे. भोक्ता जीव मात्र हे जाणत नाही, तोपर्यंत बध्द आहे.

ज्याप्रमाणे स्वप्नातून जागा झालेला मनुष्य त्या स्वप्नाची अयथार्थता जाणतो, त्याप्रमाणे या संसाराची अयथार्थता जाणल्याने जीवही अविद्येतून मुक्त होतो, शरीरात राहूनही तो देहकर्मांनी निवध्न होत नाही. गुणागुणेषु वर्तन्त - म्हणजे आपली इंद्रिये त्यांच्या त्यांच्या गुणवस्तूंना ग्राहण करणारच, हे जाणून घेणारा जीव गुणांमध्ये अडकत नाही, म्हणूनच बध्द होत नाही.

असा जीव जरी शरीरव्यापार करीत असला - उठला, बसला, जेवला, झोपला, चालला, थांबला, तरी स्वतःला त्या क्रियांचा कर्ता न मानता, गुणांनाच कर्ता म्हणून ओळखतो व म्हणून त्या कर्मांच्या फळापासून अलिप्त राहू शकतो. मग तो निंदा-स्तुती, मान-अपमान, शत्रू-मित्र, असा भेद न करता अनुराग व द्वेषापासूनही निर्द्वंद्व रहातो.

जी व्यक्ती वेदाध्यायन करते, परंतु परमात्म्याबाबत अनभिज्ञच राहते, ती मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच हे उध्दवा, जर तू बुध्दीच्या योगाने परब्रह्माला जाणून घेण्यास असमर्थ असशील, तर निदान सर्व कर्मांबाबत निष्काम भाव ठेवून सर्व कर्मफल मला अर्पण कर. माझ्यावर श्रध्दा राखून माझ्या सर्व लीलांचे नित्य गायन, कथन, भजन कर. असे केल्याने तुला माझ्या प्रति प्रेममय भक्ती उत्पन्न होईल. माझी उपासना केल्याने तुला माझे सान्निध्य प्राप्त होईल.

यावर उध्दव म्हणतो, ''हे श्रीकृष्णा, तूच परब्रह्म आहेस आणि तूच हा लीलापुरुष, शरीरधारी श्रीकृष्ण आहेस हे मी जाणतो. म्हणून तूच मला भक्ती आणि भक्तियुक्त संताबाबत सांग.'' यावर श्रीकृष्णाने मद्भक्त संताची लक्षणे सांगितली - ''माझा भक्त कृपाळू, निर्वैर, सत्यनिष्ठ, घोर दुःखातही धीर न सोडणारा, पापवासना न ठेवणारा, समदर्शी, संयमी, मधुर स्वभावाचा, अपरिग्राही, कोणत्याही वस्तूची आसक्ती न ठेवणारा, स्थिरबुध्दि, परिमित आहार-विहार घेणारा व शांत प्रवृत्तीचा असतो. तो प्रमादरहित, सन्मानाची अपेक्षा न ठेवणारा, परंतु इतरांशी मित्रत्व ठेवून त्यांचा सन्मान करणारा असतो. मी वेदादी शास्त्रांद्वारे धर्माचरणाच्या विधी सांगितल्या आहेत; परंतु जो अनन्य भावनेने माझी भक्ती करतो, त्याला या विधी-विधानांचेही बंधन उरत नाही.

हे उध्दवा, माझ्या भक्ताने कशी पूजा करावी ती माझ्या पूजेची विधाने मी तुला सांगून ठेवतो. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा आणि सर्व प्राणिमात्र या माझ्या पूजास्थली आहेत. ऋक्-साम-यजुमधील मंत्रांनी सूर्यामध्ये माझी पूजा बांधावी. अतिथ्याद्वारे ब्राह्मणामधे माझी पूजा करावी. हिरवा चारा देऊन गाईमध्ये व बंधुभावाने सत्कार करून वैष्णवांमधे माझी पूजा केली जाते. निरंतर ध्यानाने हृदयाकाशात, पंचप्राणांनी वायूमध्ये, जलपुष्पांनी जलामध्ये, गुप्तमंत्रांनी मातीमध्ये आणि समदृष्टीने सर्व प्राणिमात्रांमध्ये माझी पूजा बांधावी. यज्ञयागादि इष्टकर्म तसेच वृक्षारोपण, कूपखनन इत्यादी पूर्तकर्मांनी माझी पूजा करावी.

सत्संग आणि भक्तियोग हे दोन उपाय कलियुगातील संसारभयाचे निवारण करतात. म्हणून हे उध्दवा, तू भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांना जाणून घे असे जरी माझे वाक्य असले, तरी भक्तिमार्गाचाच प्रचार करीत देशभ्रमण कर.''