मावशी मला वाचव.....

18 Jul 2019 13:29:02

सदर : कुचाळक्या 

 गेल्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओफार गाजला. लोकांचं मोक्कार मनोरंजन, ज्याला मराठीत 'एंटरटेंमेंट' म्हणतात, ते झालं. पाच वर्षांपूर्वी मोदींचे पाय धुऊन तीर्थ पिणारे राजसाहेब ठाकरे मोदींच्या नरडीचा घोट घ्यायच्या तयारीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला उतरले. त्यासाठी राणा भीमदेवी थाटाच्या गमजादेखील खूप मारल्या. त्यांच्या भरवशावर अशोक चव्हाण आणि पवार कंपनी लोकसभेत जायची स्वप्न बघत होते. इतकंच नाही, तर आता आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडूनच येणार आणि केंद्रात काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार तिसऱ्यांदा स्थापन होणार, असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. पण प्रत्यक्षात जे झालं ते केवळ अनाकलनीयच होतं.


 

त्या वेळी राजसाहेबांनी काका, मला युतीत घ्याअसा आर्त टाहो फोडला होता. पण उत्तर भारतीय मतदार दुरावतील या भीतीने काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला. तरीदेखील मराठीहृदयसम्राटफुल्ल थ्रोटल प्रचारला भिडले आणि इंजीन सुसाट सोडलं. त्या नादात आपल्याला लुक्खाम्हणणाऱ्या निरुपमच्या नावानेदेखील निरूपण केलं. इतकं करूनही हाती उरलं शून्य! इतका आटापिटा करूनही इंजीन शिवाजी पार्कातदेखील धावू शकलं नाही.

आता विधानसभेचे वेध लागले आहेत. पुन्हा एकदा इंजीन फूस फूस करत वाफ तोंडाची सोडायची तयारी करत आहे. गेल्या वेळी काकांचे प्रयत्न कमी पडले की काय, म्हणून ह्या वेळी साहेब डायरेक्ट खुद्द सोनियामावशीलाच भेटून आले. त्याचा परिमाण म्हणून की काय, थोरातांच्या बाळासाहेबांनी हाताला इंजीनाची पवार... अर्रर्रर्रर्रर्रर्र पॉवर देण्याची तयारी सुरू केली आहे. पुन्हा एकदा सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. पुन्हा एकदा जाहीर सभांचा धडाका लागणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मनोरंजन - म्हणजे एंटरटेंमेंट होणार आहे. आणि लोकसभेत काँग्रेस नामशेष होता होता वाचली, ती विधासभेत होणार आहे.

- भटकबहाद्दर

जय हिंद!

जय महाराष्ट्र!

Powered By Sangraha 9.0