खलील जिब्रान

विवेक मराठी    19-Jul-2019   
Total Views |

***रमा गर्गे***

तत्त्वचिंतक, लेखक, कवी आणि चित्रकार अशी खलील जिब्रान यांची जगभर ओळख आहे. त्यांच्या साहित्याने, विचाराने समाजमनाला मोहिनी घातलेली आहे. आजही त्यांचे गारूड कायम आहे.


 

सीरियामधील लेबॅनॉन भागात बशरी (Bsharri) या गावात 1883 रोजी जन्मलेला एक कॅथलिक ख्रिश्चन मुलगा जगभरातील सर्व धर्मीयांचा 'दार्शनिक' होईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. त्याच्या आईने - कमिलाने त्याचे नावही त्याच्या भावी कार्यासाठी जणू उचितच ठेवले! 'खलील!' म्हणजे 'मित्रविंद' - निवडलेला मित्र!

एकाच वेळी तत्त्वचिंतक, लेखक, कवी आणि चित्रकार अशा पैलूंना न्याय देणाऱ्या या दार्शनिकाला आज जात, धर्म, देश, भाषा या सर्वांना दूर सारत साऱ्या जगाने उचलून धरले आहे.

नवीन युगाला कळणारी, थेट भिडणारी स्वच्छ सरळ भाषा, मोहवून टाकणारी चित्रे आणि मुग्ध करणारी काव्यशिल्पे खलील जिब्रान आपल्याला देऊन गेला. त्याचे बालपण अत्यंत अस्थिरतेमध्ये गेले. वडिलांच्या तुरुंगवासामुळे आईने संपूर्ण कुटुंबच न्यूयॉर्क येथे हलवले. चार मुलांना अत्यंत कष्टाने शिक्षण देणे सुरू केले. येथे खलीलच्या चित्रकलेला बहर आला. याच दरम्यान त्याला अरबी भाषेबरोबरच इंग्लिश भाषेचेही ज्ञान मिळाले.

परत काही कारणांनी सर्व कुटुंब लेबॅनॉनला स्थायिक झाले. तेथे खलीलने वयाच्या सतराव्या वर्षी 'अल-हकीकत' नावाचे मासिक चालवले. अरबी भाषेतील काव्यावर त्याचे नितांत प्रेम होते, परंतु हे काव्य रचणाऱ्या कवींची चित्रे-छायाचित्रेच उपलब्ध नव्हती. खलील जिब्रानने आपल्या आंतरिक ऊर्मीने या कवींची चित्रे रेखाटली. त्याच्या या व अन्य चित्रांचे प्रदर्शन अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड अशा देशांत भरवले गेले आणि या तरुण चित्रकाराने कला जगताचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर त्याच्या लेखनाला बहर आला. स्वत: ख्रिश्चन असलेल्या खलीलने चर्चच्या पुरोहितशाहीला आव्हान दिले. त्याने 'स्पिरिट्स रेबेलिअस' या कथासंग्रहातून धर्मसत्तेलाच जणू आव्हान दिला. परिणामी त्याला स्वदेशातून हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. नंतर तो अधिक काळ न्यूयॉर्कमध्येच राहिला. एक जीवन समीक्षक, दार्शनिक म्हणून खलील जिब्रानची 'द प्रॉफेट' ही कृती सर्वाधिक प्रसिध्द आहे.

त्याचा हा प्रॉफेट अखिल विश्वाला मानवतेला आणि सर्व धर्मीयांना त्यांचा स्वत:चा वाटतो, यातच त्याची आध्यात्मिक उंची लक्षात येते.

'अल मुस्तफा' हा या जीवनदर्शनाचा नायक, ऑरफॉलिझ या समुद्रकाठच्या गावात तो असतो. धुक्यातून त्याला नेण्यासाठी, त्याच्या मूळ जन्मगावी घेऊन जाण्यासाठी जहाज येताना त्याला दिसून येते आणि मग अल-मुस्तफाच्या मनात विचार येतात -

'हे शहर सोडताना माझ्या आत्म्याला खोलवर दु:ख झाल्याशिवाय राहील का? फक्त एक विचार मी माझ्या पाठीमागे ठेवून जात आहे असे नाही, तर क्षुधा आणि तृष्णा यांनी आतुर आणि आकर्षक झालेले हृदयच ठेवून जात आहे.

तथापि, मी इथे जास्त काळ थांबू शकत नाही. सकलांना खुणावणारा तो सागर मलाही खुणावत आहे.

खरोखर, इथे जे काही आहे, ते घेऊन जाणे मला आवडेल, पण मी ते कसे नेणार?

जीभ आणि ओठ यांनी ज्या आवाजाला पंख दिले, तो आवाज त्या जिभेला आणि ओठांना आपल्याबरोबर नेऊ शकत नाही. त्याला एकटयालाच आकाश शोधावे लागते!'

असे विचार करणाऱ्या अल-मुस्तफाकडे ऑरफॉलिझ नगरीतले लोक येतात. ते त्याला म्हणतात, ''तू इतक्यातच आमच्यापासून दूर जाऊ नकोस. एक प्रेरणादायक चैतन्य म्हणून तू आमच्यामध्ये वावरला आहेस, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम केले, पण आमचे प्रेम केवळ अबोलच होते आणि हे नेहमीचेच आहे की, वियोगाचा क्षण येईपर्यंत प्रेमाला आपली अगाधता कळतच नाही.''

त्यानंतर एक द्रष्टी स्त्री अल् मित्रा त्याला विनंती करते, ''हे प्रेषिता, जाण्यापूर्वी तू आमच्याशी काही बोलावेस., असे जीवनसत्य जे आम्ही नंतर आमच्या मुलांना देऊ.''

त्यानंतर अल्-मुस्तफा जीवनातील विविध विषयांवर बोलतो.

या प्रॉफेटमध्ये वापरलेली शैली खूपच अभिनव आहे. सुटी सुटी वचनेदेखील अंतरंग उजळवून टाकणारी आहेत.

अल् मुस्तफा म्हणतो, ''जर हा माझा सुगीचा दिवस असेल तर कोणत्या शेतांमध्ये आणि कोणत्या विस्मृतीत गेलेल्या ऋतूंमध्ये मी बी पेरले होते?''

प्रॉफेटच्या सुरुवातीला खलील जिब्रान लिहितो, 'आपल्या कामाशी स्नेहाचे संबंध ठेवणे म्हणजे खरोखरच जीवनावर प्रेम करणे होय.'

या पुस्तकामध्ये प्रेम, मैत्री, विवाह, कायदे, अध्यापन, धर्म, प्रार्थना या मानवी जीवनाशी संबंधित सगळयाच बिंदूंवर भाष्य केले आहे. अगदी साध्या साध्या शब्दांमधून खलील जिब्रानचा हा अल्-मुस्तफा जीवन संदेश देऊन जातो. प्रेमाविषयी बोलताना तो म्हणतो, ''प्रेम तुमच्या इतके उंच होऊन जीवनाच्या फांद्यांना कुरवाळते आणि पृथ्वीच्या तळाशी गेलेल्या तुमच्या मुळांनाही हलवते.''

आत्मज्ञानावर भाष्य करताना अल्-मुस्तफा म्हणतो, ''मला आत्म्याचा मार्ग सापडला असे कधीही म्हणू नका, तर माझ्या वाटेवरून चालणाऱ्या आत्म्याला मी भेटलो आहे, असे म्हणा!''

प्रॉफेटमध्ये मैत्रीवरचे सांगणे तर केवळ अप्रतिम आहे. ''मैत्रीच्या माधुर्यात हास्य आणि सुखांची परस्पर वाटणी असू द्यात. कारण लहान लहान दवबिंदूंमध्येच हृदयाला त्याची सकाळ सापडते आणि ते ताजेतवाने होते. तुमची गरज भागवणे हा मैत्रीचा धर्म आहे. तुमचे रितेपण भरून काढणे हा नव्हे.''

प्रॉफेटसारखेच, तत्त्वचिंतनाने भरलेले दुसरे पुस्तक म्हणजे 'द मॅडमन' हा लघुकथा संग्रह होय. यात गद्य व काव्य असे दोन्ही प्रकारचे लेखन आहे. यातील पहिलीच कथा वेडयाची आहे. हाच वेडा पुढे सगळया कथा, कविता आपल्याला सांगतो. पहिल्या कथेत तो वेडा कसा झाला हे सांगितले आहे.

या माणसाचे सात मुखवटे चोरीला जातात. तो रस्त्यावरून धावत जातो व चोर चोर असे ओरडत जातो. छतावरून एक जण ओरडतो, ''तो बघा वेडा'' मग हा माणूस वर बघतो आणि त्याला पहिल्यांदाच मुखवटा नसलेल्या चेहऱ्याने सूर्यदर्शन होते. सूर्यकिरणांमुळे लाल झालेल्या चेहऱ्याने तो ओरडतो, 'तो चोर महान आहे. ज्याने माझे मुखवटे काढून घेतले!' आणि मग तो माणूस वेडा होतो.

हा मॅडमन म्हणतो, ''मी वेडा झालो. त्यामुळे एकाकी झालो. मला स्वातंत्र्य मिळाले. मी वेडा झालो, त्यामुळे मला कळले की आता कोणीही मला समजून घेणार नाही. त्यामुळे मी सुरक्षित झालो. कारण कोणी तुम्हाला समजून घेत असते तेव्हा ते तुमच्यातील कशाला तरी त्यांचे गुलाम बनवतात.''

यातील छोटया छोटया कथा आपल्याला मोहिनी घालतात. ''आपल्यालाच अनभिज्ञ असे मनाचे कोपरे उजळवून टाकतात.''

एकदा बुजगावण्याकडे जाऊन वेडा त्यांना विचारतो की, ''तुला एकटेपणाचा कंटाळा येतो का?'' त्यावर बुजगावणे म्हणते की, ''एखाद्याला घाबरवून सोडण्याचा आनंद हा फार खोल आणि जास्त काळ टिकणारा असतो. त्याचा कधीच कंटाळा येत नाही.''

पुढे हे बुजगावणे तत्त्वज्ञानी पंडित होते. पाप, सद्वर्तन, अभिलाषा, सुख या सगळया बाबींवर हा वेडा कथा सांगतो, काव्य वाचतो!

अरबी भाषेत आठ आणि इंग्लिश भाषेत सतरा पुस्तके खलील लिब्रानने लिहिली. अशा या महान दार्शनिकाने 10 एप्रिल 1930 रोजी देह सोडला. त्याच्या मृत्यूने अवघ्या चिंतनशील जगाला हळहळ वाटली. शिया, सुन्नी, यहुदी, इस्लामी, ख्रिस्ती, कॅथलिक ख्रिश्चन, बौध्द, हिंदू सगळयाच धर्मांमध्ये त्याचे चाहते होते. अमेरिका आणि लेबॅनॉन दोन्ही देशांचे ध्वज त्याच्या शवपेटीला गुंडाळलेले होते. त्याच्या मातृभूमीतच त्याचे दफन केले गेले.

त्याच्या कबरीवर लिहिले आहे - 'I am alive like you, and I am standing beside you. Close your eyes and look around, you will see me in front of you.'