'लांडगा आला रे आला'

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Jul-2019

*** कुचाळक्या***

साडेचार वर्षे शांत बसल्यानंतर देशातले डावे पुरोगामी अचानक जागे जाहले. एका रम्य संध्याकाळी, रमचे घोट घेताना ह्या कंपूच्या असे लक्षात आले की अरेच्चा! अनेक दिवस जाहले आपण प्रसिध्दीत नाही. वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर आपल्याला कोणी बोलविले नाही. एक-दोन अपवाद वगळता कुठल्याही माध्यमाने आपली साधी दखलसुध्दा घेतलेली नाही. दाढीधारी पुरोगामी जटाधारी पुरोगाम्याला म्हणते जाहले, ''बंधू, अशाने आपले दुकान कसे चालायचे? आपण कायम माध्यमांत राहिले पाहिजे. चर्चेत राहिले पाहिजे. आपण विचारजंत... अर्रर्रर्रर्र.. विचारवंत आहोत! आपण काही हालचाल केली नाही, तर आपले मालक नाराज होतील आणि आपली रसद बंद पडेल. दिवस फार वाईट आले आहेत, म्हणून साथी हाथ बढाना...''

 
 

ह्यावर जटाधारी पुरोगामी डोके खाजवू लागला. महत्प्रयासाने बोटे केसांत गेली आणि क्रिया पूर्ण झाली. अचानक साक्षात्कार झाला. डोळयात चमक आली. चेहरा उजळून निघाला. ''अरे, मुद्दा आहे तर! आपण तो पेटवला पाहिजे. देशात इतके निष्पाप शांतिदूत हिंसक जमावाकडून मारले जात आहेत. देशात अराजक माजले आहे आणि मोदी बघ, आपल्या कार्यालयात लहान बाळाशी खेळण्यात मग्न आहेत. असे कसे काय करू शकतात? चल, आपण आपली ऍवॉर्ड-वापसी गँग कामाला लावू.''

ही बाकी भन्नाट आयडिया! दोघांनी रम संपवली - हो! आजकाल स्वतःच्या पैशांनी विकत घ्यावी लागते. आधीसारखी फुकट नाही मिळत, म्हणून संपवावी लागते. आणि म्हणून स्वस्त रम पितात आजकाल - आणि दोघे लगोलग कामाला लागले. आता आपण काही तरी मोठ्ठे करणार आणि देश हादरवून सोडणार म्हणून दोघेही खुशीत होते. आपल्या मालकाला लाल सलाम करून त्याला सगळी योजना समजावून सांगितली आणि त्याच्या परवानगीने काम सुरू केले. गेल्या वेळेप्रमाणेच ह्या वेळीदेखील खान मार्केटमधील आकांच्या आदेशानुसार रिकामटेकडी टाळकी गोळा करण्यात आली आणि मग एक फर्मास पत्र तयार झाले. ते पत्र ठरल्याप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याअगोदर माध्यमांना दिले गेले. त्यावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या 49 विद्वानांनी माध्यमांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला आणि देश कसा बिकट परिस्थितीतून जातो आहे, सामाजिक सलोखा कसा बिघडला आहे याचे रसभरीत वर्णन सुरू झाले.

हे सगळे ऐकून/वाचून आम्ही नगराचा फेरफटका मारला. म्हटले, बघू या कुठे सापडते का एखादी घटना मॉब लिंचिंगची! भर पावसात वणवण केली दिवसभर, खिशातला मोबाइदेखील भिजला, पण मॉब लिंचिंग का काय म्हणतात तसले काही सापडले नाही. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचल्या. जरा शोध घेता असे समजले की, ह्या एकाही घटनेत तथ्य नाही. पण पुरोगाम्यांनी एकदा ठरवले की ते मांजरीचादेखील सिंह करू शकतात! पण आता जनतेने ह्यांच्या सिंहाचा पार उंदीर करून टाकला आहे. लाल माकडांच्या आदेशाने मॉब लिंचिंगच्या नावाने बांगडया तर फोडून घेतल्या, पण ह्यांचे डोळे पुसायला कुणीच आले नाही. आणि डाव उलटतोयसे बघून, यांचे आका लोक नेहमीप्रमाणे बिळात लपून बसले आणि यांची गोची झाली.

गेल्या वेळी चार-दोन महिने चाललेले नाटक ह्या वेळी एका दिवसातच थेटरातून उतरले, कारण जनतेने खेटराने स्वागत केले. गेल्या वेळी ह्या नाटकासाठी आकांनी भरपूर बिदागी दिली होती. ह्या वेळीदेखील मिळणार होती. पण प्रयोग चालला नाही. आता आकांनी मागच्या वेळी दिलेले पैसे वसूल केले नाही म्हणजे मिळवली, ह्या विवंचनेत दाढीधारी आणि जटाधारी पुरोगामी आहेत. आधी संध्याकाळच्या रमची विवंचना कमी होती की काय म्हणून देवाने... सॉरी सॉरी... माओने हे आणखी एक झेंगाट मागे लावले. गेल्या वेळी ऍवॉर्ड वापसीला लोकांनी थोडा तरी प्रतिसाद दिला होता. पण ह्या वेळी अगदीच पचका झाला. आता यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, म्हणून सगळा थयथयाट सुरू आहे. पण तादेखील मर्यादेत असावा. मॉब लिंचिंग गंभीर विषय आहेच. पण त्याचा पार 'लांडगा आला रे आला' झाला आहे.

- भटकबहाद्दर