उध्दवगीता - भाग 2

विवेक मराठी    27-Jul-2019
Total Views |

उध्दवगीतेवरील पहिल्या लेखात आपण पाहिले की श्रीकृष्णाने उध्दवाला समदृष्टींची शिकवण दिली. या लेखात उध्दवगीतेतही मुक्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग आहेत असे सांगताना श्रीकृष्णाने उध्दवाला ज्ञानमार्गाने प्राप्त होऊ शकणाऱ्या काही सिध्दींचे वर्णनासह काही माहिती आहे.


 

उध्दवगीतेवरील पहिल्या लेखात आपण पाहिले की श्रीकृष्णाने उध्दवाला समदृष्टींची शिकवण दिली. सर्वांमधे माझाच आत्मा वसत आहे ही आनंददायक दृष्टी ज्याला मिळाली, तो समदृष्टी. असा मनुष्य राग-द्वेष, सुख-दुःख, तसेच देहाच्या व्यापारात सत्त्व-रज-तम या त्रिगुणांच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या कर्मफलांच्या इच्छेपासून मुक्त राहतो.


ज्ञान आणि विज्ञान यामधील फरक उध्दवगीतेत स्पष्ट केलेला आहे. शास्त्रग्रांथांद्वारे जाणून घेता येते ते ज्ञान
, पण अनुभूतीशिवाय त्याला विशेषत्व येत नाही. अनुभूतीतून मिळवलेले ते विज्ञान. यामुळेच मनुष्याची व्याख्या 'ब्रह्मावलोकधिषणः पुरुषः' अशी करत श्रीकृष्ण सांगतो की माझ्याच रचलेल्या संपूर्ण सृष्टीपैकी मानव जन्मधारी मला सर्वात प्रिय आहेत, कारण तीक्ष्ण बुध्दीच्या व योगाच्या साहाय्याने एकाग्राचित्त होणारा मनुष्यच बुध्दीच्या पलीकडील परमात्म्याला जाणून घेऊन परमपद प्राप्त करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवधूत दत्तात्रेय, असे सांगत श्रीकृष्णाने उध्दवाला अवधूत आख्यान सांगितले, परंतु ते एरवीही प्रसिध्द असल्याने या लेखात मी मांडलेले नाही.


ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य सर्व काही खरेच मानतो
, पण स्वप्नातून जागृतीत आल्यावर स्वप्न हे मिथ्या असल्याचे समजते, तसेच जागृतावस्थेतील व्यवहारही इंद्रियगत व त्रिगुणात्मक आणि म्हणूनच मिथ्या आहेत, ही यथार्थता समदृष्टीने कळून येते.


सांख्य तत्त्वज्ञान

उध्दवाने श्रीकृष्णाला सांख्य तत्त्वज्ञान समाजावून सांगण्याची विनंती केली. सांख्यशास्त्र सांगणारे कणाद व कपिल हे दोन ऋषी होऊन गेले. श्रीकृष्णाने त्या शास्त्राचे थोडक्यात विवेचन केले. सत् चित् आनंद अशा परब्रह्मातून माया अथवा शिवस्वरूपातून शक्तीचे प्राकटय झाले. तिलाच प्रकृती किंवा प्रधान असेही नाव आहे. या प्रकृतीनेच प्रथम महत् हे तत्त्व निर्माण केले, ज्याला बुध्दी असे म्हणतात. महतामधून अहंकार, चित्त आणि मन निर्माण झाले. शिवाय प्रकृतीने पाचमहाभूते - म्हणजे आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी व त्यांच्या तन्मात्रा अर्थात त्यांच्या प्रकट होण्याची साधने -शब्द, स्पर्श रूप, रस व गंध निर्माण केले. या तन्मात्राद्वारे सृष्टिज्ञान ग्राहण करू शकतील अशी पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हेही प्रत्येक प्राण्याला दिले आणि ज्ञानग्राहणाच्या टप्प्यानंतर त्याला कर्म करता यावे, म्हणून पाच कर्मेंद्रियेदेखील निर्माण केली.


अशा तऱ्हेने प्राणिमात्राकडील पाच कर्मेंद्रिये
, पाच ज्ञानेंद्रिये, पंचमहाभूते व त्यांच्याकडून ज्ञानग्राहणाचे साधनस्वरूप पाच तन्मात्रा, याशिवाय मन, अहंकार, चित्त व बुध्दी अशी एकूण चोवीस तत्त्वे आहेत. प्रकृतीने यांची निर्मिती केली असली, तरी यामधील जीव हा ब्रह्माचे चैतन्य घेऊन आलेला आहे. त्यालाच देही, म्हणजे देहात राहणारा असेही नाव आहे. देहात राहूनच तो प्रकृतीचा उपभोग घेऊ शकतो किंवा देहात राहूनच बुध्दीच्या द्वारे तो बुध्दीपलीकडील परब्रह्माला जाणू शकतो.


देहात राहणारा जीव प्रकृतीच्या प्रेरणेमुळे कर्म करीत राहतो. त्याचे कर्मफल तयार होते. तेच जीव भोगाच्या रूपाने भोगतो. तसे करीत असताना त्याबरोबर रागद्वेषाच्या भावना चिकटल्या
, तर त्यातून पुन्हा कर्म, कर्मफल आणि कर्मभोग उत्पन्न होतात. या ज्या भावना चिकटतात, त्यांचे प्रेरक मन आणि अहंकार असतात. मात्र त्यांत गुंतून न पडता परब्रह्माकडे पोहोचण्यासाठी चित्त व बुध्दी हे साहाय्यभूत ठरतात. यापैकी पंचमहाभूते, मन, बुध्दी व अहंकार यांना 'अष्टधा प्रकृती' असे म्हटले जाते.


तीक्ष्ण बुध्दीच्या साहाय्याने ज्ञान-विज्ञानाचे विवेचन करीत परब्रह्म जाणून घेणे हा सांख्यमार्ग आहे. योगशास्त्र यापेक्षा वेगळे काय सांगते
? तर ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची अनन्य भक्ती, सतत चिंतन याशिवाय परब्रह्मप्राप्ती होत नाही. पातञ्जल योगसूत्रांत चित्तशुध्दीचे तसेच चित्तवृत्तिनिरोधाचे जे उपाय सांगितले आहेत, ते फक्त पूर्वतयारीसाठी आहेत. त्यापुढे ईश्वरभक्तीने व ईश्वरसमर्पणाने मुक्तीचा मार्ग सुकर होतो.


ज्ञानमार्ग


उध्दवगीतेतही मुक्तीसाठी ज्ञानमार्ग
, कर्ममार्ग व भक्तिमार्ग आहेत असे सांगताना श्रीकृष्णाने उध्दवाला ज्ञानमार्गाने प्राप्त होऊ शकणाऱ्या काही सिध्दींचे वर्णन केले. यामधे अणिमा, लघिमा व महिमा या शरीराला अनुक्रमे अणुरूप, भारहीन व विशाल करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात (उदाहरण - हनुमानाने सुरसा राक्षसीविरुध्द या सिध्दी वापरल्या). प्राप्ती, प्राकाम्य व कामावसियिता या सिध्दींमुळे कामना केलेली गोष्ट मिळते. ईशिता व वशिता या इतरांना वश करून घेण्यासाठी आहेत. ऊर्मी या सिध्दीने भूक-तहान, शोक, मोह व जन्म-मृत्यू या सहा गोष्टींवर विजय मिळवता येतो. आपले शरीर बदलून इतर प्राण्याचे शरीर धारण करू शकणे ही सिध्दी महाभारतातील कर्दम ऋषींना प्राप्त होती. दूरचे ऐकणे, दूरचे पाहणे किंवा क्षणात दूर पोहोचणे (मनोजव सिध्दी), परकाया प्रवेश, देवक्रीडादर्शन, इच्छामृत्यू व त्रिकालज्ञता या सिध्दीदेखील ज्ञानमार्गाने प्राप्त होतात. असे सिध्दपुरुष असतील त्या परिसरातील सर्व प्राणिमात्र हिंसेचा त्याग करून राहतात (उदाहरण - चांगदेव वाघाला वाहन व सापाला चाबूक करून घेऊ शकले व ज्ञानदेवाला भेटण्यास आले).

यानंतर श्रीकृष्णाने उध्दवाला एक रोचक कथानक सांगितले. सनातन, सनत्कुमार, सनक आणि सनंदन असे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र एकदा चर्चेला बसले असता सर्वांनी निर्गुण परब्रह्माचे गुणवर्णन कसे होईल हा विषय घेतला व सनंदन यांना विषय मांडण्यास विनंती केली. त्यावर सनंदनाने एक पुरातन कथा ऐकविली. श्रुतींमध्ये सर्वत्र सगुण देवतांची स्तुती व उपासना विधी आहेत. तेव्हा एकदा प्रत्यक्ष श्रुतींनीच निर्गुणाचे वर्णन करण्याचे ठरविले. त्या प्रयत्नांत श्रुतींनीच एक स्तोत्र रचलेले आहे. तर हे उध्दवा, त्या स्तोत्रातून तू निर्गुण परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. (हे स्तोत्र भागवतपुराण या ग्रांथाच्या अकराव्या अध्यायाचा एक भाग आहे.)


भक्तिमार्ग

 

अशा तऱ्हेने मुक्तीसाठी ज्ञान-कर्म व भक्तिमार्ग असले, तरी कलियुगासाठी भक्तिमार्गच श्रेष्ठ असे श्रीकृष्णाने उध्दवाला सांगितले. तेव्हा उध्दवाने म्हटले की हे श्रीकृष्णा, तू जरी म्हणत असलास की ज्ञान, कर्म-भक्ती यापैकी भक्तिमार्ग सोपा आहे, तरी मला असे वाटते की कलियुगात मनुष्याला या भक्तिप्रत नेणेदेखील अवघड असेल, कारण मन आणि अहंकार हे बाह्य प्रकृतीकडे धावतात. त्यांचा ओढाच प्राणिमात्रांवर अधिक प्रभावी ठरतो. तर मग माणसाला भक्तीकडे कसे वळवावे?


क्रियायोग

यावर श्रीकृष्णाने चित्तात भक्ती उत्पन्न होण्यासाठी क्रियायोग सांगितला. क्रियायोगात मुख्यतः शुध्दीकडे व प्रसन्नतेकडे लक्ष वेधले आहे. क्रियायोगात अगोदर संकल्प करावा. तो काही काळाचा, काही दिवसाचा किंवा दीर्घकाळाचा असू शकतो. संकल्पानंतर प्रथमतः शुध्दी हवी. त्यात देहशुध्दीसाठी शौच, स्नान, स्वच्छ वस्त्रे, त्यानंतर वाचिक शुध्दीसाठी मौन अथवा नामजप अथवा शुभ आणि प्रसन्न शब्दांचे उच्चारण हा विधी आहे. त्याचबरोबर मानसिक शुध्दीसाठी मनात दुष्ट विचार न येऊ देणे, मृदुभाषिता हे गुण हवेत. मनाच्या एकाग्रातेसाठी एखाद्या देवतेची सगुण मूर्ती घ्यावी - मग ती चित्रमय, वालुकामय अथवा धातुमय असेल. तिच्या ठिकाणी वसत असलेल्या देवतेलादेखील षोडशोपचार पूजा द्यावी. मनामध्ये ईश्वरप्रणिधानाची व भक्तिची जाणीव कायम ठेवण्यासाठी हे सर्व मार्ग आहेत. हा क्रियायोग अल्पकाळ जरी केला, तरी तो मनात, स्मृतीत कायम राहतो व पुढील काळात भावप्राकटय करीत असतो. समजा, लहानपणी आपण सातत्याने एखाद्या प्रजातीचे फूल देवावर वाहिलेले पाहत असलो, तर खूप काळानंतर पुन्हा ते फूल दिसले की स्मृतीमधून ती ईश्वरप्रणिधानाची भावना पुनः प्रकट होते. याची खूण म्हणजे कधीकधी अशा भावप्रकटनामुळे आपल्या शरीरावर रोमांच उभे राहतात किंवा अकारणच अश्रू भरून येतात. म्हणूनच अर्जुनगीतेतही कृष्णाने म्हटले होते की अत्यल्प ईश्वरभक्ती केली, तरी ती वाया जात नाही. स्मृतीमध्ये आणि संस्कारांमध्ये ती टिकून राहते. मात्र आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की वाईट वागण्याची स्मृतीदेखील पुढे-मागे वाईट परिणाम देऊन जाणार आहे.


अनन्यभक्ति

एका प्रकारे असे म्हणता येईल की भक्तिमार्गाची सुरुवात करून देण्यासाठी व तसे संस्कार घडविण्यासाठी क्रियायोग उपयोगी ठरतो. त्याला कर्मकांड म्हणून त्याची उपेक्षा करणे योग्य नाही. जोपर्यंत एखादा साधक अनन्यभक्तिमय अवस्थेला पोहोचत नाही, तोपर्यंत क्रियायोग हे एक साहाय्यक उपकरण असते. क्वचित कोणी कोणी क्रियायोगाची अथवा कर्मकांडाची मदत न घेताच अनन्यभक्तीला पावू शकतात. त्यांना क्रियायोगाची गरज उरत नाही. पण अशा व्यक्ती क्वचित असतात. बहुधा त्यांच्याकडेही त्यांच्या पूर्वजन्मीचे संस्कार टिकून राहिल्याने असे घडत असावे. असो.


असा अनन्यभक्त असेल
, तर आपोआपच त्याला समदृष्टी म्हणजे आपलाच आत्मा सृष्टीत सर्वत्र भरलेला आहे ही दृष्टी प्राप्त होते व अशा भक्ताला उच्चकोटीचा भागवत म्हणावे. जो माणूस इतरांना दुखवू नये या भावनेने वागतो, मात्र आपण आणि इतर ही आपपर भावना बाळगतो, तो मध्यम कोटीचा भागवत. याउलट एरवी देवावर श्रध्दा ठेवणारा, परंतु प्रसंगी इतरांशी दर्ुव्यवहारही करू शकतो, तो निम्नकोटीचा भागवत. तरी हे उध्दवा, तू समदृष्टी बाळगायला शिकलास की तुला उच्चकोटीचे भागवतपद प्राप्त होऊन तुझ्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्ग कळेल.


या एकूण श्रवणानंतर उध्दव बदरिकाश्रमात काही काळ राहिला व नंतर तो देशभ्रमण करीत सर्वांना भक्तिमार्ग दाखवू लागला. याप्रमाणे आपल्या देशातील संतपरंपरा ही थेट भगवत् आदेशातून व उध्दवाच्या काळापासून अस्तित्वात आली
, असे दिसून येते.

 

अर्जुनाचा मोह नष्ट होऊन तो पुनः युध्दास उद्युक्त झाला हा अर्जुनगीतेचा परिपाक आहे, तर उध्दवगीतेतून भक्तिमार्गाचा आरंभ झाला असे म्हणता येईल. यामुळेच की काय, संपूर्ण भारतात व विशेषेकरून उत्तर भारतात उध्दवासंबंधी कित्येक लोककथा प्रचलित आहेत, ज्यामध्ये भक्ती, सगुण-निर्गुण, विरहव्याकुळता, गूढ तत्त्वज्ञान आदींचा समावेश आहे. सूरदासांचे प्रसिध्द पद 'ऊधो, जोग सिखावन आये' हे त्याचाच नमुना म्हणता येईल.


समाप्त