लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता मतदारांना आणि राजकीय पक्षांना तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यही आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांना घवघवीत यश प्राप्त झाले आणि आता विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. भाजपाने 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत 'महाजनादेश यात्रे'चे आयोजन केले आहे. दोन टप्प्यात चालणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे होणार आहे आणि नाशिक येथे या यात्रेची सांगता होईल. एकूणच गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात भाजपाप्रणीत सरकारने जो विकासाचा आलेख उंचावला आहे, जनहिताचे जे निर्णय घेतले आहेत, त्यांना यात्रेच्या काळात उजाळा दिला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली आणि त्यासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले, त्याचे परिणाम महाराष्ट्रात झालेल्या विविध निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसून येतात. मतदार भाजपाबरोबर आहेत हे जरी स्पष्टपणे दिसत असले, तरीही सातत्याने जनसंपर्क आणि जनसंवाद आवश्यक असतो आणि म्हणूनच भाजपाने आयोजित केलेल्या महाजनादेश यात्रेला विशेष महत्त्व आहे. गेल्या पाच वर्षांत दुष्काळ, सामाजिक आंदोलने, मोर्चे, शेतकऱ्याचे संप अशा काटेरी वाटेने वाटचाल करताना देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले, त्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येतील, अशी भाजपा नेतृत्वाला खात्री आहे. एकूणच पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपा-सेना आणि मित्रपक्षांच्या युतीचे सरकार येईल, अशी पक्षनेतृत्वाला खात्री आहे.
सत्ताधारी पक्षाकडून विजयाची मानसिकता जोपासत जेव्हा महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली जाते, तेव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काय स्थितीत आहेत यांचा अंदाज घेणेही आवश्यक होऊन जाते. महाराष्ट्रात सद्यःस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना विरोधी बाकावर बसण्याचे काम मतदारांनी सोपवले आहे. या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि दोघांच्या मिळून केवळ पाच जागा निवडून आल्या. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना हार पत्करावी लागली. बारामतीत पवारांना तळ ठोकून बसावे लागले, तेव्हा कुठे तेथे यश मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षांचा मतदारांवर किती प्रभाव आहे हे लक्षात आले होते. कोणतेही राजकीय भविष्य नसणारे पक्ष अशी त्यांची स्थिती झाली असून आता मोठया प्रमाणात गळती सुरू झाली आहे आणि ती थांबवण्याची, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागवण्याची ताकद पक्षनेतृत्वामध्ये राहिली नाही. मुंबईसारख्या महानगराचा पक्षाध्यक्ष पक्ष सोडतो. जागोजागीचे शिलेदार पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत येतात आणि पवारांनी बोलावलेल्या बैठकीसही उपस्थित राहत नाहीत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवण्याची नाही, तर पक्ष वाचवण्याची धडपड चालू आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. कधीकाळी पवारांच्या एका इशाऱ्यावर मैदानात उतरणारे त्यांचे शिलेदार आता त्यांना सोडून आपल्या भविष्याचा विचार करू लागले आहेत. ही बाब केवळ राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच आहे असे नाही, तर राष्ट्रीय काँग्रेसमध्येही तीच स्थिती आहे. बाळासाहेब थोरात यांना जरी अध्यक्षपद दिले गेले असले, तरी पक्षातील कार्यकर्त्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढून निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्याचबरोबर गटातटामध्ये दुभंगलेला पक्ष एकसंघ करण्यात त्यांना आपली शक्ती खर्च करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कशा प्रकारे निवडणुकीला सामोरा जातो? हा प्रश्न पक्ष कार्यकर्ते आणि राजकीय तज्ज्ञ यांच्यासमोर आहे. याचे उत्तर बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या टीमला शोधावे लागले. तरच पक्ष आगामी निवडणूक लढवू शकेल.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नावाचा प्रयोग झाला. लोकसभा निवडणुकीत पक्ष नोंदणीइतका प्रभाव निर्माण करणाऱ्या या आघाडीत विधानसभा निवडणुकीपूर्वी बिघाडी निर्माण झाली असून प्रकाश आंबेडकर आणि लक्ष्मण माने यांच्या दोन वंचित आघाडया आगामी निवडणुकीत मैदानात असतील, अशी स्थिती निर्माण आहे. महाराष्ट्रातील वंचित, उपेक्षित समाजाच्या मतांच्या आधाराने सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या मंडळींचे राजकारण परस्परावरील अविश्वासाच्या आणि कुरघोडीच्या गर्तेत घसरले आहे. जातीय समीकरणांच्या आणि जातीच्या मतांची बेरीज करत राजकारण करू पाहणाऱ्या आघाडीतच उभी फूट पडली आहे. या साऱ्याचा परिणाम निवडणुकीत होणार आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर 'मी पुन्हा येईन' अशा आत्मविश्वासाने भारलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महाजनादेश यात्रा आयोजित करत आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात त्यांनी ज्या प्रकारे विकासाभिमुख राजकारण केलेआणि सामाजिक ताणतणावातून मार्ग काढला, हे महाराष्ट्रातील मतदारांनी पाहिले आहे. या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क आणि संवाद साधण्याची संधी भाजपा कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाला मिळणार आहे. मोडून पडलेले, दिशाहीन विरोधी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी आयोजित केलेली महाजनादेश यात्रा अशी आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा भाजपाला नक्कीच फायदा होणार आहे.