कोंडीवयला बावा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक04-Jul-2019

मराठी कथेचे दालन विविध बोलीकथेने समृध्द झालेले आहे. 'विवेक साहित्य मंच' आयोजित 'बोलीकथा लेखन स्पर्धे'तील द्वितीय क्रमांकप्राप्त अरुण इंगवले लिखित कथा... 'कोंडीवयला बावा' ही कथा तिलोरी बोलीतील आहे. संपूर्ण रत्ागिरी जिल्हा हा या बोलीचा प्रदेश आहे. या बोलीला संगमेश्वरी असेही संबोधले जाते...

 

थोरल्या कोंबडयाला मुंगती उलासली, तसी तं ती इरातभर तलमालतंच व्हती. निजरूक्या डोल्यान परब्याच्या कपालावं तीनं पालता हात टेकवलान. कांबरूनातंना पर चटका बसला. धा दिसाधरना परब्या तापान फनफानला व्हता. कोंडीच्या ढवात आंगूलीचा निमित झाला. परब्या रातसान काय-बाय जाबडत व्हता. जाबाडण्याचा आदमास घेत परब्याच्या केसात हात फिरवीत मुंगती चितागती मोंदयासारी बसून ऱ्हायली. वाडकऱ्यांनी डोलीकरून त्याला डाकतराकं न्हेलीन. दोन इंजिसना ना चार परकारच्या गोल्या देऊन डाकतरान चारशे रुपये घेतलान, पर गुण नाय ना मासला नाय. तीनं जीवाचा कान केलान ''बावा, काय म्हणतोयस?'' परब्या तीचेसी बोलत न्हवताच. त्याचा आपला तापाच्या धुंदरीत कायसा भलतासाच चाललीला. मुंगतीन म्हारोतला हलवून जागसूद केलान. म्हारोत्यान कुशी बदलल्यावं रातीच्या दारूचा भपकारा मुंगतीच्या नाकात शिरला. 'नाकाचं कॅस करपाटलं, जल्ली पिताव तरी कशी' पुटपुटत तीनं म्हारोत्याला नीट बसता केलान. बगतलाव राती आंग शाप थंड पडला व्हता ना? आता आंगाला हात लावत नाय. ना रातबर असा जाबाडतोय.

''काय म्हंतोय?''

''तां कुटं काय उमांगतंय''

''डागतर म्हणला व्हता उंद्याला हिंडता फिरता व्हयल.''

''कलच्या परोस जास्ती पर कमी नाय. आयकलाव मला काय हयी आंगरोगाची भावना वाटत नाय.''

म्हारोत्या चीटभीन चितागती बसून ऱ्हाला. कोंडीचा ढव काय चांगला न्हवं. पाच-धा वरसाला यकुदा जीव घेणार मजे घेणार. तरी दर मीरगात थतं गाव राकान असते. नायतं यवाना गाव रिकामा केलान आसता, असा थतला शेवात्रा कडक. मुला-मानसा, गुरा-ढोरा कोणला सुदिक सोडीत नाय. गुदस्ता भिक्या लवारान कोंडीच्या ढवात कोंडीत घातलीली ढोरा त्याला आटावली. टीका पाडा कोंडीतला नायसा झाला. त्याला वाटला नंदार चुकवून झुकाटला. ढवात तं नाय. ना दोन दिसी फुगून वर आला अशातली तरा. सोनबान सांगितलेला इत्यास त्याला आठावला. शे सवाशे वरसा मांगं शेवरीच्या ढवात भांडीकुंडी मिलायची. गोरगरीबाच्या घरास लगन-कार्य आसला तर शेवरीच्या ढवावर जायाचं. थतं निवेद ठेऊ न काय काय भांडा-कुंडा हावाय तां सांगायचा नि दुसऱ्या दिसी झुटमुटक्या जाऊन ती भांडी घेऊन ययांचा. बरोबर आटादिसी ती भांडी ढवात टाकायची. कुणीतरी लबाडी केलान भांडी काय परत न्हेलान नाय. तवा धीनं ढवातला बावा पिसालला. भांडीकुंडी मिलायची बंद झाली. ना पाच-धा वरसातना यकूदा घातपात व्हया लागला.

वायसा खाकरत म्हारोत्या म्हणला, ''तू म्हंतेस ता खरा हाय मना पर हयी येगलीच व्हायकल वाटतेय.''

''नारोबाला इचारून बघतांव काय?''

खलावटयातला नारोबा पाच-धा गावात यलमी भगत म्हणून परख्यात. भूता-खेताच काय देवा-दिकांना पर तो दमात घेयाचा. म्हारोत्यान परब्याच्या गल्याला हात लावून बगतलान नि त्याची उरली सुरली धुंदरी पर उतारली.

''नारबा बिगर इलाज नाय, नारबा भायर पडण्या अगूदर त्याला गाठवाया हवा काय समाजलीस !' म्हारोत्या सान्यातली मशेरी हातावर घेता घेता पुटपुटला.

''मी पन तांच म्हणताय' मुंगती म्हनली.

कासराभंर दिस वर आल्यावं म्हारोत्या नि नारबा भेलकांडत आले. त्यानला बगून मुंगती किदासली, ''काय हया देवा धरमाच्या कामासाठना तरी शापेपनात ययाचा.''

नारोबान चऊक आखलान. तांदुल, कणकेचे गोळे, अबीर, पिंजर, हलद, धुपारत, वेताची शिमटी मांडून सोता भवतान रांगालीचा चऊक आखलान. मुंगतीन जात्याची पेड त्याच्या संबुर ठेवलान. हलद, पिंजर, फुला, घालून नारबान पावक्याला हात घातलान.

''आंगरोग आसल तं फुलासारा ये''

पेड भूयला घट चिकाटल्या सारी नारबाच्या दंडाच्या मनगटाच्या नसा फुगल्या, पर पेड काय भूय सोडीना.

व्हता व्हता शेवरीच्या ढवाचा शेवात्रा साबिद झाला. ढवातला बावा बोकडाशिवाय आयकत नाय म्हनल्यावं म्हारोत्या नि मुंगती दोगाव चराकली.

मुंगतीन म्हारोत्याला आडकूसी घेऊन सांगतलान ''कायता वगमान देऊ न टाका डामोडा नायतं चोंडा घाणवड टाका. पोरापरोस काय बी अधिक नाय.''

''अग पर बोकड कूनशी पैदा करायचा.''

म्हारोत्या भायेर आला. ''नारबा बोकड देया कानमान नाय, पर बोकड कूठना पैदा करायचा? मी काय म्हंताय, कोंडीवयला बावाला इचार बोकडाचे बदली दोन कोंबडं चालतील काय.''

नारबान पुन्यांदा पावक्याला हात घातलान कोंडीवयला बावा काय कोंबडयाला तयार व्हयना पर नारबान ''झ्याट सुदी काय देणार नाय असाच घालवीन.'' असा दम देल्यावं पावका फुलासारा हल्लक आला.

कोंबडयांचा सोदात भायर पडलेले म्हारत्या ना नारबा तीनसांजचं झेलपांडत आलं. परब्याच्या हातरूनाच्या कडंला बसून नारबा कोंडीवयल्या बावाशी काय बाय बाचत ऱ्हाला. परब्याच्या अंगावर तांदुल भारलान, त्याच्या डोल्याला भारणीचा पाणी लावलान, कपालाला अबीर थापून नारबा ना म्हारोत्या कोंबडं घेऊन कालोखात गुडूप झालं. वायच वकतान म्हारोत्या परत आला.

''मुंगते, भायेर ये.''

''वगमान देऊन झाला?''

''अगं वगमान कंचा ना कंचा काय कोंडीतल्या बावान माजे हातातला कोंबडा उडवलान. सादा काय हाय तो.''

''तूमी कशाला कोंबडा घेतलाव दोनीवलं नारबाच्या हातात देयाचं.''

''त्याला नाय पावंडा टाकयाची ताकत.''

''आता वो काय, आयत्या वकताला कोंबडा खयसून आनयाचा?''

''म्हणून तुला भायर बोलवली, राजा बिगर आणिक दुसरा उपाय नाय.''

''ना ऽऽ य  ना ऽऽ य. ता पर माजा पॉरच हाय.''

''दिवस मोडून शान कसंतरी दोन आरावत कोंबडं पैदा झालं. तुच आन आयत्या वकताला कुठनाता''

''मी कुठना आणू ?''

''तांच म्हतायती वकत काढू नको.''

''अवो पर परब्याला सुनकट लागली तं.''

''परब्यासाठनाच करताव ना, त्याच्या परोस राजा अधिक हाय काय?''

तिदस्ता परब्या आजोलास गेला व्हता मामाच्या पिलकरीन कोंबडीच्या एका पिलक्याचा परब्याला जीव लागला. परब्याच्या हातावर चढून पिलू दाणं टिपायचा. परब्यान ता पिलका मावळयाशी मांगतलान ना  घेऊ न आला. त्याचा नाव राजा ठेवलान. वरीसभरात राजा राजबिंडा कोंबडा झाला. लालचुटुक तुऱ्यासारी शिरगोली, गालावरची लोली, झुपुरका शेपटा, राजा सारा डौल, परब्यान त्याचा नाव 'राजा' ठेवलान. राजा त्याच्या मांडीवर बसायचा. सादवलान तं आसल थतना धाव ठोकायचा. परब्याच्या मांगना हिंडायचा. मुंगती सैरावली.

'''अगं पोरा परोस कोंबडा अधिक काय? नारबा थोपलाय कदीचा'

कोंडीवयल्या बावाचा देनामांगना देऊ न नारबा, म्हारोत्या परत आले. नारबाला सवताच्या पायान चालायची पर ताकत नव्हती. दोघांनी त्याला दोनीवाल्या बावकाडांना धरून आंगण्यात आणलीन. डोलीवाल्यांनला जेवणाचा आग्रव झाला. दोनीवल्या कोंबडयांचा कालीज भाजून परब्यासाठी परसादी झाली. अनाची उमका टाकलेल्या परब्यान परसादी मांगून मांगून खाललान. माज्या परब्याला लवकर उठता कर असा आरज करून मुंगतीन कोंडीवरल्या बावाला नमस्कार घातलान.

झुटूमूटक्याला परब्यान सादवल्यावर मुंगतीला जाग आली. ''आये राजा आरावला नाय?''

''आरावला आसल तं, माजा बावा लय दिसान राती डोला लागला.'' मुंगतीने वकत मारून न्हेलान.

दिवस उजाडल्यावं ना सादवता राजा एकदा तरी परब्याच्या हातरूणाशी येऊ न जायाचा. पिलपिल करून त्याचेशी कायबाय बोलायचा.

''आये, राजाला सादव.''

''आरं मॉप लांब गेलाय ता, परसावनाच्या भायर.''

''सादव, यंल ता''

मुंगतीला कायच सुदरना. त्याच्या तोंडावं हात फिरवित ती बोल्ली, ''बावा तुला बरा वाटताय ना?''

''व्हयं, कालच्या परोस हुशारी वाटतेय.''

''बावा, तुझ्यासाठना राजान आपला परान देलान.''

''मजें?''

''राती नारबा न्हवं आला व्हता''

''मला देलीला परसादीं?''

''व्हय बावा, राजाचीच व्हता.''

परब्याच्या नंदरवं अंधारी आली ना भडभडून दोन वांत्या झाल्या. परब्या 'राजा', 'राजा' पुटपुटत बेसुद झाला.

म्हारोत्यान कुकारं घालून रातीच्या डोलीवाल्यानला जमवलान ना डोलीत घालून तालुक्याला मोटया डाकतराकं डोलीवालं धावाया लागलं.

 

-अरुण इंगवले

 

गाथा              तिलोरी         प्र.मराठी

सोस (आवड)        आवड      हव्यास

कूट(निंदानालस्ती)    निंदानालस्ती कोडेसमस्या

भाडेकरी (ओझेकरी)   ओझेकरी        भाडयाने राहणारा

हेवा(हाव/इच्छा) हाव/इच्छा  मत्सर