विविध भक्तिसंप्रदायांची उज्ज्वल परंपरा

विवेक मराठी    08-Jul-2019
Total Views |

***श्रीराम पुरोहित***

भारताच्या विविध भागांमध्ये संतांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेले विविध भक्तिसंप्रदाय आजही त्याच परंपरेनुसार वाटचाल करीत आहेत. या सर्वच भक्तिसंप्रदायांचे कार्य उल्लेखनीय आहे. आध्यात्मिक क्षेत्रात वाटचाल करीत असलेल्या  सर्व संप्रदाय एखाद्या दीपस्तंभांप्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत.

आपला हिंदुस्थान ही देवभूमी आणि संतभूमी म्हणून संपूर्ण जगाला सुपरिचित आहे. त्यातही आपला महाराष्ट्र या बाबतीत  कमालीचा भाग्यवान ठरला आहे. महाराष्ट्रात अनेक संतांचा अवतार झालेला आहे. विशेष म्हणजे भारताच्या विविध भागांमध्ये या संतांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेले विविध भक्तिसंप्रदाय आजही त्याच परंपरेनुसार वाटचाल करीत आहेत. या सर्वच भक्तिसंप्रदायांचे कार्य उल्लेखनीय आहे. शब्दमर्यादा लक्षात घेऊन निदान यापैकी काही भक्तिसंप्रदायांचा अगदी संक्षिप्त स्वरूपाचा आढावा प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

यापैकी प्रत्येक संप्रदायाने आपला स्वत:चा असा एक साधनामार्ग निश्चित केलेला आहे. प्रत्येक संप्रदायाचे स्वत:चे असे काही नियम, दंडक अथवा मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्या त्या संप्रदायाचे अनुयायी या सर्व तत्त्वांचे आपापल्या परीने अगदी काटेकोरपणे पालन करीत असतात. किंबहुना म्हणूनच तर प्रत्येक भक्तिसंप्रदाय प्रदीर्घ कालावधीनंतरही तेवढयाच उत्साहात कार्यरत असून आपल्या सर्व अनुयायांना आध्यात्मिक प्रेरणा देण्याची मोलाची जबाबदारी पार पाडीत आहे.

वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा एक प्राचीन संप्रदाय म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी म्हणतात. त्यामुळे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, असे ढोबळमानाने म्हणता येईल. वारी हा सर्वार्थाने एक आनंदसोहळा असतो. भगवान विष्णूंचा अवतार असलेला पांडुरंग म्हणजेच श्री विठ्ठल हे या संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. गळयात तुळशीची माळ घालावी, स्नान झाल्यावर कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावावा, नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा, संतांचे ग्रंथ वाचावेत, सगुण स्वरूपातील मूर्तीचे दर्शन घ्यावे, भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूरची नियमित वारी करावी, एकादशीचे व्रत करावे, सात्त्वि आहार तसेच सत्त्वाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावा, जीवनातील बंधनातून तसेच मोहातून हळूहळू अलिप्त होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे आणि नित्य नामस्मरण करावे असा अत्यंत साधा परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितलेला आहे.

खरे तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माउली, तसेच संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक लोकजीवनाचे वैभव ठरला आहे. वारकरी संप्रदायात आषाढ आणि कार्तिक महिन्यांप्रमाणेच चैत्र आणि माघ महिन्यातील वारीचेही महत्त्व मोठे आहे. आषाढी-कार्तिकीला 'पंढरपुरा नेईन गुढी' असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच अगदी कर्नाटकातून आणि गोव्यातूनही दर वर्षी दिंडया येत असतात. तुकोबाराय म्हणतात, त्यानुसार 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।' हेच वारकरी संप्रदायाचे तत्त्व आहे, असे म्हटल्यास ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही.

निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्यनिर्मितीने आणि प्रत्यक्ष  जीवनामधून या वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे.

नाथ संप्रदाय

मध्ययुगीन भारतामध्ये ज्या अनेक संप्रदायांचा उदय झाला, त्यापैकी नाथ संप्रदाय हा एक प्रमुख आणि महत्त्वाचा संप्रदाय होय. या संप्रदायाचा उगम नेमका कसा, कोठे आणि कधी झाला याविषयी अनेक संशोधकांनी विविध मते मांडली आहेत. इसवी सनाच्या प्रारंभापासून नवव्या-दहाव्या शतकापर्यंतच्या सुमारे हजार वर्षांच्या काळात शैव, वैष्णव, बौध्द, जैन असे अनेक संप्रदाय भारतामध्ये होते. पाचव्या शतकानंतर शैवांच्या श्रीकुल आणि कालीकुल या दोन्ही शाखांमध्ये आणि बौध्दांच्या महायान पंथातून पुढे आलेल्या वज्रयान अथवा तंत्रयान परंपरेमध्ये अनेक वाममार्गी साधना पध्दतींचा अंतर्भावही हळूहळू होऊ  लागला, असे आढळून येते. या पंथांमधूनच स्वतंत्र होत-होत सिध्द परंपरेचा जन्म झाला. त्यामध्ये अशा तांत्रिक आणि वामाचारी उपासना पध्दतींना स्थान नव्हते. बाह्याचारावर भर न देता तत्त्वानुभूती, भक्ती, योग इत्यादी साधनांवर भिस्त ठेवून मोक्षमार्गाची वाट चोखाळणारा हा सिध्द संप्रदाय विकसित झाला. सिध्दांच्या या संप्रदायामध्ये जे दीक्षित असत, त्यांना मुख्यत्वेकरून 'नाथ' या विशेषणाने संबोधले जात असल्याचे आढळते. महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र प्रदेश हा प्रांत या संप्रदायाची उदयभूमी मानली जाते. तथापि, नाथ संप्रदायाचे अनुयायी संपूर्ण भारतभरातच नव्हे, तर विद्यमान स्वरूपातील भारताच्या सीमांच्या बाहेर असणाऱ्या प्रदेशातही होते, असे आढळून येते.

'आदिनाथ गुरू सकळ सिध्दांचा...' हा श्लोक सर्वज्ञात आहे. नाथ संप्रदायाचा मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशीदेखील अगदी निकटचा संबंध आहे. नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयांकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टया जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले, तरी दोन्ही संप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. म्हणूनच नाथमत, अवधूतमत, अवधूत संप्रदाय, सिध्दमत इत्यादी नावांनीदेखील हा संप्रदाय ओळखला गेला आहे. पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुध्द, पिप्पलायन, अविहरेत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या नऊ  नारायणांनीच कलियुगामध्ये नवनाथांच्या रूपाने अवतार घेतला, अशी मान्यता आहे. नाथ संप्रदायामध्ये शिवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नाथसंप्रदायामध्ये काश्मीर शैव परंपरेतून आलेल्या सिध्दान्ताशी मिळतीजुळती मांडणी पाहावयास मिळते. योगमार्गाचा अवलंब प्रधान असल्याने योगशास्त्रातील अनेक संकल्पनाही या संप्रदायात रूढ झाल्या आहेत. गुरू गोरक्षनाथ विरचित सिध्दसिध्दांत पध्दती हा नाथांच्या सांप्रदायिक सिध्दान्तांची माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

नाथ संप्रदायामध्ये अनुयायांनी विशिष्ट प्रकारची वेशभूषा करणे अपेक्षित असते. कर्णमुद्रा, शैली, शृंगी, झोळी, कंथा, एकतारी, पुंगी इत्यादी वस्तू गुरू धारण करतात. नियमित स्नान करून अंगास विभूती फासणे आवश्यक असते. 'अलख निरंजन'चा गजर करून भिक्षा मागणे आणि 'आदेश' या शब्दाने इतरांशी संवाद साधणे असे प्रघात यांच्यामध्ये आढळतात. अर्थात असे असले, तरीही केवळ बाह्य वेश महत्त्वाचा नसल्याचे नाथपंथातील ग्रंथांमधून सांगितलेले आढळते. या धारण करावयाच्या वस्तूंमागेसुध्दा काही विशिष्ट तत्त्वज्ञान असून ते समजून त्याचे आचरण करणे हे सर्वात महत्त्वाचे होय. नाथपरंपरेमध्ये एकंदर बारा पंथ विद्यमान असून त्यातील काही आदिनाथांनी, तर काही गोरक्षनाथांनी प्रवर्तित केले अशी मान्यता आहे.

महाराष्ट्रातील नाथपरंपरेत निवृत्तिनाथ आणि ज्ञानेश्वर यांचा उल्लेख आवर्जून करावाच लागतो. मच्छींद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ. त्यांच्याकडून गहिनीनाथांना उपदेश मिळाला. त्यांनी निवृत्तिनाथांना गुरूपदेश केला. पुढे ज्ञानेश्वरांना हाच नाथपरंपरेचा वारसा निवृत्तिनाथांकडून प्राप्त झाला. सहजयोगाचा वारसा पुढे चालू ठेवताना या परंपरेत प्रामुख्याने नामस्मरणावर आणि भक्तिमार्गावर भर दिलेला आढळतो. ज्ञानेश्वरांच्या 'भावार्थदीपिका', 'अमृतानुभव' यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी नाथसंप्रदायाचे गुह्य तत्त्वज्ञान सोप्या भाषेत उकलून दाखविले. एक प्रकारे ज्ञानेश्वरांनी नाथसंप्रदायाला भगवद्भक्तीशी एकरूप केले आणि सहजयोगास उज्ज्वल स्थान प्राप्त करून दिले. पावसचे स्वामी स्वरूपानंद हेदेखील याच परंपरेतील संत होते.

दत्त संप्रदाय

दत्त संप्रदाय हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व असल्याचे मानले जाते. आजवर दत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या असून हे दत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय आहेत. दत्त संप्रदायात श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिध्दिदाता आणि अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वांना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. त्याचप्रमाणे नवनवीन संतांमुळे तो नित्यनूतन आणि प्रवाही राहिला आहे. यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्ती यांचा यथायोग्य मेळ घातला गेला असल्यामुळे हा सर्वांना जवळचा वाटतो.

शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य इत्यादी सर्व पंथांना दत्त संप्रदाय जवळचा ठरतो. वारकरी पंथातही दत्तावताराला मोठा मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास ही बाब लक्षात येऊ शकेल. दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान असून योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. दत्त संप्रदायामध्ये प्रामुख्याने श्रीदत्तात्रेयांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन केले जाते. शुध्द आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते, हे दत्त संप्रदायाचे मत आहे.

प्रस्तुत कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झालेल्या आहेत. कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. या अवतारानंतरच दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्री नृसिंहसरस्वती स्वामी हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. अकोला जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्य त्यांनी पुढे चालविले. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिध्दसरस्वती हे त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी तपश्चर्या केलेली औदुंबर, नृसिंहवाडी आणि गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत.

श्रीदत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. साडेतीनशे वर्षांच्या काळात त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोडया लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले अशी मान्यता आहे.

श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुध्द उपासना पुनःस्थापित करण्याचे श्रेय श्री वासुदेवानंदसरस्वती म्हणजेच टेंब्ये स्वामी यांना दिले जाते. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. आचरणशुध्दता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पीठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनीच प्रकाशात आणली. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. श्रीमद् आद्य शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. श्रीरंगावधूत महाराज, दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज यांच्यासह अनेक शिष्यांनी टेंब्ये स्वामींची परंपरा फार मोठया प्रमाणामध्ये वाढविली आहे.

सकलमत परंपरा

बिदरजवळील हुमणाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हेही दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. या परंपरेला 'सकलमत परंपरा' असे म्हटले जाते. या एकमेव परंपरेत गादी परंपरा असून सर्व धर्मांच्या, जातींच्या, पंथांच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. मुसलमान, जैन आणि लिंगायत समाजातील अनेक व्यक्ती या परंपरेच्या आहेत. श्रीमाणिकप्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटकखत आणि आंध्र प्रदेशामध्ये या संप्रदायाची परंपरा मोठया प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत असून ही एक अतिशय समृध्द अशी दत्त परंपरा आहे.

अवधूत पंथ

श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांनी दत्त संप्रदायाची परंपरा पुढे सुरू ठेवली. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दीक्षा घेतली होती. ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर, श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली, अशी ही परंपरा आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती ही या अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टये आहेत. अवधूतपंथामध्ये कोणतीही बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.

महानुभाव पंथ

महानुभव संप्रदायाच्या परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे ईश्वराचे पाच अवतार आहेत, असे मानले आहे. श्री चक्रधर स्वामींनी या संप्रदायाची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या संप्रदायाची श्रध्दा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या 'लीळाचरित्र' या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा असून त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे समाविष्ट आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ असून त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा अंतर्भूत आहे. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय अंतर्भूत आहेत. 'या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण' असे स्वत: चक्रधरस्वामीनीच म्हटलेले आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे महानुभव पंथाचे पंचकृष्ण असून हा संप्रदायदेखील विविध दत्तपरंपरेतील एक समृध्द परंपरा आहे.

आनंद संप्रदाय

श्री दत्तात्रेयांचे शिष्य असलेल्या सदानंद ॠषींनी आनंद संप्रदायाची स्थापना केली होती. जन्मेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातून त्यांचा जन्म झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर 'श्रीदत्त' असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वांबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे, ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रध्दा आहे.

याखेरीज आळंदी येथे मठ असलेले नृसिंहसरस्वती, विदर्भातील देवनाथ स्वामी आणि श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव यांच्या परंपपरेप्रमाणेच निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इत्यादी अनेक समृध्द आणि भव्य परंपरा, तसेच उपसंप्रदायदेखील दत्तसंप्रदायामध्ये आहेत. हे संप्रदाय आणि परंपरा मूळच्या दत्त संप्रदायाशीच निगडित आहेत.

रामदासी संप्रदाय

श्री समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने प्रभू श्रीरामचंद्रांची उपासना करते. वैशिष्टय म्हणजे समर्थ रामदास आणि दत्त संप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूरगडावर गेले होते, तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थांच्या घराण्यातील हनुमंतस्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समर्थांनी केलेले राष्ट्रकार्य मोलाचे होते. समर्थांनी भक्तीला शक्तीच्या उपासनेची जोड दिली. गावागावांत त्यांनी हनुमान मंदिरे स्थापन करण्याची प्रेरणा देऊन युवकांना आध्यात्मिक आणि शारीरिक बल वाढविण्यासाठी प्रेरित केले.

समर्थ रामदास स्वामींनी अवघड वाटणारा परमार्थ सोप्या पध्दतीने साधकांना समजावून देण्याचे मोलाचे कार्य केले. प्रपंचात राहूनही परमार्थ कसा करावा यासंबंधी समर्थांनी दासबोध, मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक, आत्माराम इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून उपदेश केला आहे. ज्ञानदान, उपासना आणि भिक्षाफेरी ही या संप्रदायाची वैशिष्टये मानली जातात. त्यांच्या पश्चात सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांनीही या संप्रदायाचे कार्य सुरू ठेवून सर्वसामान्य साधकांना मार्गदर्शन केले. सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामींची समाधी आणि कर्नाटक राज्यातील वरदपूर येथील श्रीधर स्वामींची समाधी, तसेच चाफळचे श्रीराम मंदिर आणि समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती ही या संप्रदायातील साधकांची प्रेरणास्थाने आहेत.

गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे समर्थांचाच अवतार मानले जातात. त्यांनीही 'श्रीराम जय राम जय जय राम' या मंत्राचे महत्त्व विशद करून नामसाधनेवर भर दिला. आज त्यांचाही संप्रदाय फारच मोठा आहे. रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अलीकडच्या काळात सुरू केलेला बैठकीचा संप्रदाय हादेखील लाखो साधकांना अध्यात्मासंबंधी बहुमोल असे मार्गदर्शन करीत आहे. विशेष म्हणजे या संप्रदायाने पारमार्थिक साधनेला सामाजिक कार्याचीही अनोखी जोड दिलेली आहे. स्व. नानासाहेबांचे सुपुत्र पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे हेच कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

याखेरीज अन्य काही संप्रदायदेखील कार्यरत आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात वाटचाल करीत असलेल्या पांथस्थांना हे सर्व संप्रदाय एखाद्या दीपस्तंभांप्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत. म्हणूनच या संप्रदायांच्या समस्त प्रवर्तकांना आणि त्यांच्या सर्व अनुयायांना यानिमित्ताने सादर वंदन करणे खचितच उचित ठरेल.