महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित : पंढरीची वारी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Jul-2019

***धनश्री लेले***

संपत्ती सोहळा नावडे मनाला

लागला टकळा पंढरीचा

जावे पंढरीसी आवडे मनासी

कधी एकादशी आषाढी हे

तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी

त्याची चक्रपाणि वाट पाहे


 

तुकाराम महाराजांनी जणू समस्त वारकऱ्यांच्या मनातला भावच या अभंगात व्यक्त केला आहे. 'नाचत पंढरीसी जाऊ रे खेळीया विठ्ठल रखुमाई पाहू रे' असं साऱ्या वारकऱ्यांच्या मनाला पंढरीला जाताना उत्साहाचं उधाण आलेलं असतं. मुखी नाम, हाती टाळ घेऊन आषाढात पंढरीची वाट चालायची ही वर्षानुवर्षांची परंपरा हजारो वर्षांपूर्वीची. ज्ञानेश्वर माउलींच्या वडिलांनी, म्हणजे विठ्ठलपंतांनीही वारी केली. ज्ञानेश्वरांना वारीची दीक्षा दिली ती त्यांचे गुरू निवृत्तीनाथ यांनी.

पंढरीयेयात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान 

श्रीगुरुनिवृत्तीराये मार्ग दाविला सोज्ज्वळ

बाप्रखुमादेविवरु दीनांचा दयाळ .

असा हा पंढरीच्या वारीचा महिमा माउलींनी गायला, तुकारामांनीही आळवला. किंबहुना सर्व संतांनी त्याला दुजोरा दिला नि सर्वसामान्यांनी त्यावर मनापासून विश्वास ठेवला.

मुळात भगवंत भक्तांची वाट बघत उभा राहतो ही कल्पनाच केवढी लोभस! या वारीचं वेगळेपण हे इथूनच सुरू होतं. सामान्यपणे भक्त मनात काही आस धरून देवाच्या दर्शनाला जातो, पण इथे मात्र तो वर्षभर आपली वाट बघतोय या विचाराने केवळ त्याला भेटायला म्हणून वारकरी निघतात. त्याची भेट, त्याला पाहणं एवढाच काय तो मनीचा हेतू, मनात भेटीचा उमाळा. 'छोडदिया वैकुंठ हरी। भावभगत का भूखा॥' त्याची भूक भागवावी, म्हणून हा सारा प्रवास. समोरच्याच्या मनाचा विचार किती संवेदनशीलतेने करावा, याचाच जणू हा वस्तुपाठ!

या वारीची सुरवात नेमकी कधी झाली? असं विचारलं तर नेमकी तारीख सांगणं अवघड आहे.. आठव्या शतकातल्या शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकात ही त्याचा ओझरता उल्लेख येतो. पण त्याही आधीचा, म्हणजे इ.स. 516मधला पंढरपूरवरचा एक लेख पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळाला होता. त्या ताम्रपटात देव आणि भक्त यांच्या या अशा भेटण्याबद्दल लिहिलं आहे. त्याही पूर्वी वारीचे काही उल्लेख आढळतात. त्यामुळे वारी खूप प्राचीन अशी परंपरा आहे इतकंच आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न मनात येतो, ही वारी कोणी सुरू केली? तिचा जनक कोण? या प्रश्नावर सोनोपंत दांडेकरांनी फार सुंदर उत्तर दिलं आहे. वारी वेदांसारखी अपौरुषेय आहे, असं म्हणायला हवं. वारीचा कोणी एक विशिष्ट कर्ता नाही. ती समाजातून आली, लोकमानसातून उत्पन्न झाली. लोकांनी निर्माण केली आणि लोकांनी आपली मानली. म्हणजे खरं तर लोकशाहीच्या व्याखेसारखीच वारीची व्याख्या करायला हवी - लोकांनी लोकांसाठी लोकांची उभी केलेली भक्ती - चळवळ म्हणजे वारी.   

वारीची प्रथा खूप आधीपासून सुरू असली, तरी त्याला खरा आकार दिला तो ज्ञानेश्वर माउलींनी. खरं तर नाथपंथाची पताका माउलींच्या खांद्यावर होती. पण ती शैवपताका घेऊन माउली निघाले ते वैष्णव मार्गाने. या एका कृतीतूनही वारीचं संचित लक्षात येतं. शैव आणि वैष्णव हे दोन एकमेकांना विरोधक मानणारे संप्रदाय. पण या दोन संप्रदायांना हरिहर ऐक्य दाखवणारा राजमार्ग म्हणजे वारी. म्हणूनच वारी हा समाजाचा खरा आरसा होय. शेतकरी, फडकरी, कामकरी, गावकरी, शहरस्थ, गरीब, श्रीमंत, साक्षर, निरक्षर,उच्चविद्याविभूषित नोकरदार, व्यापारी, महिला, पुरुष, तरुण, वृध्द, भारतीय, परदेशी... कोणीही या वारीत सामील व्हावं आणि सगळयांनी एकमेकांना 'कोणाही जिवाचा न घडो मत्सर' या भावनेने सामावून घ्यावं. एकत्र चालावं, चार घास एकत्र खावेत, नामसंकीर्तन करावं, अभंग गाताना तल्लीन होऊन नाचावं.. आपपरभाव नाही, कोण काय म्हणेल यांची चिंता नाही. वैष्णव संप्रदाय या संज्ञेतील वैष्णव शब्दाचा अर्थ या वारीत उकलतो. वसुदेवाचा तो वासुदेव, जमदग्नीचा तो जामदग्नी, पंडूचा तो पांडव, तसंच विष्णूचा तो वैष्णव. मग जर सगळे वैष्णव तर सगळेच विष्णूचे, म्हणजे सगळयांचा जनक तो विष्णू, म्हणजेच इथे कोणी वेगळया जातीचा नाही, धर्माचा नाही, कोणी लहानथोर नाही, कोणीही कोणाचंही काम करायचं. एकाने रांधायचं, दुसऱ्याने वाढायचं, तिसऱ्याने उष्टं काढायचं. खरं तर जेवणखाण ही फक्त नैमित्तिक कामं म्हणून करायची. सगळं लक्ष लागलेलं असतं ते पंढरीनाथाकडे. त्याच्या भेटीसाठी हा सारा पसारा चंद्रभागेच्या तिरावर मांडायचा. खेळ खेळायचा. खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे। एकमेका लोटांगणी जाती विठ्ठलाला नमस्कार तर करायचाच, पण आपल्या साऱ्यात तोच सावळा आहे हे जाणून प्रत्येकाला नमस्कार करायचा आणि हे ठरवून केलं जात नाही. ते आपसूक घडतं.. नकळत.. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म'. सगळयांचं मन या काळात खऱ्या अर्थाने विष्णुमय होऊन जातं. म्हणजे माउलींना पसायदानात अभिप्रेत असलेलं 'विश्वमन' होऊन जातं. मनन-चिंतन एक, ध्यास-आस एक, दोन टाळ एक नाद, दोन ओठ एक साद. सारा समाज असा एकरूप होऊन जाणं हे वारीचं देणं आहे. किंबहुना वर्षानुवर्षं आपल्या ओंजळीत आलेलं हे सांस्कृतिक संचितच म्हणायला हवं.


पण.. हे संचित आपल्याला फक्त वारीच्या काळातच आठवतं, हे आपलं दुर्भाग्य म्हणायला हवं. वारीची ही परंपरा बळकट करताना माउलींच्या मनात, वारीच्या निमित्ताने पडणारी किंवा घडणारी ही साऱ्या समाजाची घट्ट वीण कायमस्वरूपी राहावी अशी स्वप्न होती. पण असं होताना दिसत नाही. वारी झाली, पावलं माघारी वळली की मग पुन्हा जातीपातींची तेढ, पुन्हा तुझंमाझं, पुन्हा समाजाच्या चौकटी..

खरं तर या चौकटी भेदण्याची ताकद वारी देते. वारी ही शक्तिदात्री देवताच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

संसारातले अनेक प्रश्न मनात दाटून आले असतानाही सारं सारं विसरून मनाला कात टाकायची मिळणारी संधी म्हणजे वारी.

कोणीतरी आपला आहे, आपल्याला सांभाळणारा आहे, आपला योगक्षेम चालवणारा आहे हा विश्वास आणि दिलासा निर्माण करणारी मनाची संजीवनी म्हणजे वारी.

वर्षभरात आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात काय काय घडलं, हे त्या विश्वनियंत्याच्या कानावर घालायची सोय म्हणजे वारी.

प्रपंचातलं कार्य प्रामाणिकपणे केलं की नाही, याची त्या सर्वशक्तिमानाला कबुली देण्याची जागा म्हणजे वारी.

 जीवनाचा  रस्ता चुकला असेल तर 'त्या'च्या साक्षीने पुन्हा एकदा योग्य रस्त्याला लागण्याची एक संधी म्हणजे वारी.

गंमत अशी की निर्गुण अशा आत्मतत्त्वाचा अनुभव घेऊनही सगळया संतांनी त्या विटेवरच्याचं दर्शन घेणं आवश्यक मानलं, त्याला भेटायला पायी चालत जाणं त्यांना आनंददायक वाटलं. प्रत्येकात तोच आहे या तत्त्वज्ञानाचं जिवंत उदाहरण त्यांना वारीत अनुभवायला मिळालं. अनुभूती ओसंडून वाहू लागल्यावर त्यांच्या मुखातून अभंगाचं कारंज उसळू लागलं. हे अभंग आजही वारकरी मनापासून गातात. गडी शिक्षित असो वा अशिक्षित,  अभंग पाठ असणं हा जणू त्यांच्या वाणीचा धर्म आहे. भूपाळया, वासुदेव, पांगळा, गवळणी, भारूड, ओव्या, सगळया संतांचे हरिपाठ, पसायदान, आरत्या,. सगळया संतांच्या अभंगवाणीचं एकजीव रसायनच जणू कानाला चाखायला मिळतं. रात्री हरिकथा आणि हरिकीर्तन.. आठशे आठशे वर्षं हे अभंग असे वाचामय होऊन वाहत राहिले, हे सांस्कृतिक संचितच नाही का? विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून येणाऱ्या दिंडीच्या व पालखीच्या वाटचालीत भजनाचा क्रम सारखाच असतो. या भजनं-अभंगांनी या साऱ्या संप्रदायाला एकसंधपणा मिळवून दिला आहे. वास्तविक कोकण, खानदेश, मराठवाडा, घाट, विदर्भ सगळे भाग भौगोलिक आणि भाषिकदृष्टया वेगवेगळया ओळखीचे, पण पंढरीच्या वारीत मात्र या सगळयांच्या मुखी गीत एकच, भजनाचा रंग आणि ढंग एकच. हजारो हजारो टाळांच्या गजरात 'ग्यानबा तुकाराम' हा घोष घुमू लागला की मन भवताल विसरून जातं. स्वतःला हरपून बसतं. रोजच्या जीवनात ही अशी तल्लीनता प्राप्त करून देणारी वारी हे खरं आध्यात्मिक संचित!

इतर देवस्थानात भरते तशी वारी म्हणजे फक्त यात्रा किंवा जत्रा नाही. मनोरंजन म्हणजे अभंग गाणं आणि प्रबोधन म्हणजे प्रवचन ऐकणं. वारीचा अर्थ काय? नरदेहाचं महत्त्व काय? सद्गुरू कोण? जीवनमूल्यं कोणती? संत काय सांगतात? या साऱ्याची चर्चा वारीतल्या प्रवचनात प्रवचनकार हसत खेळत करत असतात. पंढरीच्या प्रसिध्द मठात वारीच्या काळात एकाहून एक सरस प्रवचनं होतात. लाखो भाविक ती ऐकतात, कानावर मनावर त्याचे संस्कार होतात. विठ्ठलभेटीचा डोळयात आनंद आणि कानात संस्कार संचित! वारीला असं विचारांचं अधिष्ठान लाभलं आहे. भक्तीच्या पैठणीला विचारांचं अस्तर आहे.

'हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा' ही केवळ अभंगातली ओळ नाही, तर वारकऱ्यांच्या जगण्याची ओढ झाली आहे. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी याची साक्ष त्यांना वारीतच अनुभवायला मिळते. सगळयांना त्या गर्दीत मंदिरात प्रवेश मिळतही नाही. पण कोणी नाराज होत नाही. इतकं दूर चालत येऊन विठ्ठलाचं साधं मुखही पाहायला मिळत नाही, असा विचारही कोणाच्या मनात येत नाही. रोज काही मैल चालून आल्यावर एकादशीला राउळाच्या कळसाचं दर्शन झालं, तरी वारकऱ्याचे डोळे भरून येतात. एरवी दिवसभर काळया मातीची मशागत करायची, त्या काळया मेघाला योग्य तेवढा बरस अशी विनंती करायची. आणि या आषाढात त्या विटेवरच्या सावळयाला भेटून पुन्हा ते कष्ट करण्यासाठी ऊर्जा घेऊन जायची.  महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांचं जीवन हे असं काळया रंगाभोवती विणलेलं असत. या काळया रंगाच्या पायवाटेवरून पंढरी गाठणारी एखादी निरक्षर मालन या वारीच्या ओव्या किती सहज रचून जाते -

पंढरीची वाट नाही बोचत काडीमाडी। पंढरीची वाट चंद्रकळेची रेसमघडी।

पंढरीची वाट जाई जुई ग फुलली। पंढरीची वाट कस्तुरी दरवळली।

या अशा कितीतरी कवयित्रींना पंढरीच्या वारीने कवितेचं, प्रतिभेचं दान दिलं. एरवी संसाराच्या जात्यात, सासर-माहेरच्या, आई-पत्नीच्या, दोन तळयात पिचली जाणारी स्त्री या वारीत मुक्त होऊन जाते. आपल्या संसारातून काही दिवस बाहेर पडून त्या जगन्नियंत्याचा संसार पाहायला जाते. आपल्या खऱ्या मायबापाला भेटायला कासावीस होऊन जाते. स्त्रीमुक्ती ही संज्ञासुध्दा ज्या काळात माहीत नव्हती, त्या काळातही स्त्रियांच्या मोकळेपणाचा विचार वारीत झालेला दिसून येतो. 'डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी' असं न कचरता सांगणाऱ्या जनीच्या लेकीच त्या सगळया. कोणी त्या विठ्ठलाला बाप म्हणतं, कोणी पती मानतं, तर कोणी जिवाभावाचा सखा. द्रौपदी-कृष्णाचं नातं पुन्हा एकदा अनुभवयाला देणारी ही वारी या अर्थानेही मधुरा भक्तीचं प्रतिबिंब दाखवणारं सांस्कृतिक संचितच म्हणायला हवी.

शासन दरबारापासून ते अगदी साध्या कष्टकऱ्यापर्यंत साऱ्यांना उत्साहाचं टॉनिक देणारी वारी म्हणजे आनंदोत्सवच! साऱ्या महाराष्ट्राला ढवळून काढणारी एक विशाल सांस्कृतिक लाटच!

हे जर आपण आपलं सांस्कृतिक, आध्यात्मिक संचित मानत असू, तर ते तसंच शुध्द आणि पवित्र ठेवून पुढच्या पिढीकडे सुपुर्द करण्याची जबाबदारीही आपलीच. त्या सावळयाला आपल्या स्वार्थी वृत्तीचं, हेवेदाव्यांचं, जातीपातीच्या राजकारणाचं गालबोट लागता कामा नये.