स्वप्नपूर्तीतून आत्मविश्वासाकडे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक10-Aug-2019

 
 
सहा ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने नोंद करण्याचा दिवस ठरला. स्वा. सावरकर हयात असते, तर त्यांनी या दिवसाला गौरवांकित करण्यासाठी सातवे सोनेरी पान लिहिले असते. याच दिवशी लोकसभेत 370 कलम रद्द करून जम्मू-काश्मीर व लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. आदल्याच दिवशी राज्यसभेत घनघोर चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारी 370 35(अ) कलमे रद्द होण्यापुरते या दिवसाचे महत्त्व नाही, तर प्रदीर्घ काळ पाहिलेल्या स्वप्नाची आणि त्यासाठी असंख्य जनांनी केलेल्या बलिदानाची परिपूर्ती करणारा हा दिवस आहे आणि म्हणूनच त्याला विशेष महत्त्व आहे. 1947 साली देशाला खंडित स्वातंत्र्य मिळाले. त्याची सल मनात सलत असतानाच काश्मीर, हैदराबाद, जुनागड यासारख्या संस्थानांनी वेगळी भूमिका घेतली. सरदार पटेलांच्या कणखर भूमिकेमुळे जुनागड, हैदराबाद यांचा प्रश्न मार्गी लागला. पण काश्मीरचा प्रश्न मात्र जटिल झाला. लांगूलचालन, काही विशेष मंडळींचा स्वार्थ व सत्तेचा लोभ यातून 370 कलमाचा जन्म झाला. देशाचाच अविभाज्य भूभाग असणारा हा प्रदेश देशांतर्गत स्वतंत्र प्रदेश झाला आणि त्यातूनच फुटीरतावाद, आतंकवाद यांचे केंद्र म्हणून हा भूप्रदेश ओळखला जाऊ लागला. धरतीवरचा स्वर्ग म्हणून कधीकाळी ज्याचा उल्लेख होत असे, तो जम्मू-काश्मीर दहशतवादी बनवण्याचा कारखाना झाला. असा हा जम्मू-काश्मीर 370 आणि 35(अ) कलमांमुळे भळभळती जखम झाला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळाले. फाळणीनंतर जे निर्वासित काश्मीरमध्ये आले, त्यांना व मूळचे काश्मिरी हिंदू असणाऱ्या हिंदूंना जेव्हा हाकलून लावले गेले, अंगावरच्या वस्त्रानिशी जेव्हा हे हिंदू काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडू लागले, तेव्हा तर ही जखम अधिकच चिघळली होती. काश्मीर प्रश्न तातडीने सुटला पाहिजे आणि एकसंघतेचा, अखंडतेचा अनुभव सर्वच भारतीयांना घेता आला पाहिजे असे स्वप्न स्वातंत्र्यानंतर सर्वच हिंदू समाजाने पाहिले. कारण आपल्याच देशात आपल्याच बांधवांना परागंदा व्हावे लागते या अपराधगंडाने हिंदू समाजाला पछाडले होते. त्यावर एकच उत्तर होते, ते म्हणजे काश्मीर सर्वार्थाने भारतात विलीन होऊन त्याचे विशेषाधिकार समाप्त होणे. आणि हाच विचार म्हणजे आपले जीवितकार्य मानून असंख्य पिढया खपल्या. अखंड भारताचे स्वप्न एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात आले. हे स्वप्न कधी पुरे होईल यांची कसलीसी खातरी नसताना असंख्य कार्यकर्त्यांनी आणि अखंड भारतप्रेमींनी हे स्वप्न मनात आणि व्यवहारात जपले. हे स्वप्न जपणाऱ्या हिंदू समाजाच्या स्वप्नाची पूर्तता सहा ऑगस्ट रोजी झाली. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असणारे आणि त्याला विशेषाधिकार देणारे 370 कलम रद्द झाले म्हणजे सर्व समस्या एका क्षणात संपल्या असे नाही. मात्र दीर्घकाळ पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आले आणि सर्व पातळयांवरच्या समस्यांना निडरपणे तोंड देण्याचा आत्मविश्वास मात्र या स्वप्नाने हिंदू समाजाच्या मनात जागवला. प्रश्न केवळ 370 कलमाचा नव्हता, तर जम्मू-काश्मीरमधील नागरिक आणि अन्य प्रांतांतील नागरिक यांच्यामध्ये एक अदृश्य पडदा होता आणि त्यामुळे एकमेकांविषयी अविश्वास, गैरसमज खूप मोठया प्रमाणात होते. आता तो पडदा दूर झाला आहे आणि कायद्याने सर्व जण एका समान पातळीवर आले आहेत. भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांनाच समान मत आणि समान मूल्य प्राप्त झाले आहे. याच समतेच्या आधाराने आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे.

काश्मीरबाबत हिंदू समाजाने जे स्वप्न पाहिले, ते आता प्रत्यक्षात आले आहे आणि स्वप्नपूर्तीने आत्मविश्वासही दिला आहे. आपण भारतीय म्हणून भारतमातेला विश्वगुरुपदी विराजमान करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची पूर्तता करताना आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मार्ग कठीण आहे. आपल्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा कस या मार्गावर लागणार आहे. पण तग धरून सातत्याने पुढे जात राहिले, आपल्या गंतव्य स्थानाकडे मार्गक्रमण करत राहिले, तर यश नक्की मिळणार हे जम्मू-काश्मीरमध्ये घडवून आणलेल्या बदलावरून सिध्द झाले आहे. आपल्या पूर्वजांनी भव्यदिव्य आणि कालसुसंगत स्वप्न पाहण्याचा आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा वारसा बहाल केला आहे. तोच वारसा जपत, नुकत्याच झालेल्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात आत्मविश्वासाने आता हिंदू समाजाने नव्या आव्हानांना भिडायला हवे. कारण आणखी खूप काही करण्यासारखे बाकी आहे आणि ते आपल्यालाच करायचे आहे.