काँग्रेसपुढील 'सोनिया गांधी' हेच मोठे आव्हान

विवेक मराठी    13-Aug-2019
Total Views |

सोनिया गांधी सत्तेच्या राजकीय पदावर नसतानादेखील सर्वसत्ताधीश होत्या. त्या केवळ गृहिणी नाहीत, केवळ माता नाहीत, केवळ पक्षाच्या अध्यक्षा नाहीत, त्या अतिशय धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. त्या कॅथलिक आहेत. त्या जेव्हा सर्वसत्ताधीश होत्या तेव्हा त्यांच्या अवतीभोवती त्यांचे जे सल्लागार होते, त्यातील बहुसंख्य ख्रिश्चन होते. त्यांच्या कार्यकाळातच वस्त्या-पाडयात आणि खेडोपाडी चर्चेस उभी राहत गेली. धर्मांतराचे प्रकार मोठया प्रमाणात घडत गेले. याला सोनिया गांधीचा किती वरदहस्त होता, हे सिध्द करणे फार अवघड आहे. पण कॅथलिक सोनिया सत्तेवर आल्यानंतर हे प्रकार खूप वाढले हे सत्यदेखील नाकारता येत नाही.




श्रीमती सोनिया गांधी पुन्हा पक्षाच्या अध्यक्ष झाल्या आहेत. राजकीय पक्षाने अध्यक्ष कुणाला करावे
, हा सर्वस्वी त्यांचा विषय आहे. त्या बाबतीत त्यांना सल्ला देण्याचा कुणाला काही अधिकार नाही. चांगला अध्यक्ष निवडला तर त्याचे चांगले परिणाम पक्षाला मिळतात आणि कर्तृत्वहीन अध्यक्ष निवडला तर त्याचे वाईट परिणाम पक्षालाच भोगावे लागतात. असे प्रत्येक पक्षाच्या बाबतीत आहे, अगदी भाजपादेखील त्याला अपवाद नाही. यामुळे काँग्रेस पक्षाला असे वाटले असेल की पक्षाचे नेतृत्त्व सोनिया गांधी यांनीच करावे, तर त्यात काही गैर आहे असे नाही.

राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होते. पक्षाच्या अध्यक्षाला पक्ष उभा करावा लागतो. राजकीय पक्षाची शक्ती लोकप्रतिनिधी किती निवडून आले, यावरून ठरत असते. लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी लोकमत अनुकूल करून घ्यावे लागते. लोकमत अनुकूल करून घेण्यासाठी लोकांना काय हवे आहे, हे नीट समजावे लागते. जे हवे आहे, ते राजकीय रूपात आपण कसे देणार आहोत, हे सांगावे लागते. त्यासाठी पक्षाध्यक्षाकडे काही गुण असावे लागतात. त्याला लोकांची नाडी नीट समजावी लागते. लोकांच्या मनात जे आहे ते तीन-चार शब्दांच्या घोषणेमध्ये आणावे लागते.

राहुल गांधी या बाबतीत सपशेल 'फेल' झालेले आहेत. लोकमत काय आहे हे त्यांना समजले नाही आणि समजतही नाही. 'चौकीदार चोर आहे' ही त्यांची घोषणा बालिश घोषणा झाली. निवडणुकीत त्यांनी राफेल विमान खरेदीचा विषय केला. सामान्य माणसाच्या जीवनाशी या विषयाचे काहीही घेणेदेणे नाही. महागाई, शेतीची दुरवस्था असे सगळे विषय कुठल्या निवडणुकींच्या काळात नसतात? रोज मरे त्याला कोण रडे, असे हे सर्व विषय आहेत. त्यातून मार्ग काढून नेमका विषय हेरणे, याला राजकीय प्रतिभा लागते. नरेंद्र मोदी यांच्याकडे ती अफाट आहे आणि राहुल गांधी यांच्याकडे ती सपाट आहे. परिणाम, काँग्रेस पक्ष निवडणुकांच्या राजकारणात सपाट झाला.

सोनिया गांधी यांनी 2004 साली काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. विस्कळीत झालेल्या काँग्रेसला त्यांनी संघटित केले. त्या वेळेला भाजपाची घोषणा होती, 'इंडिया शायनिंग'. ही घोषणा मतपेटीत परावर्तित झाली नाही. भाजपाचा पराभव झाला. दलित, मध्यमवर्गीय आणि अल्पसंख्य मतदार यांनी भाजपाला मतदान केले नाही. या असंतुष्ट मतदारांपुढे काँग्रेस पक्षाने संघटित पक्षाची प्रतिमा उभी केली. लोकांना काँग्रेस पर्याय देऊ शकते, असे वाटले आणि लोकांनी काँग्रेसला अन्य पक्षांना घेऊन सत्ता बनविता येईल, एवढया 221 जागा दिल्या. काँग्रेसचे संमिश्र सरकार स्थापन झाले. 2009च्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली. हा सर्व कालखंड सोनिया गांधी यांच्या पक्षीय नेतृत्वाचा आहे.

आज पुन्हा त्या अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या आहेत. हे हंगामी अध्यक्षपद आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. तरीही जेव्हा कधी पूर्णकालीन अध्यक्षाची निवड होईल तेव्हा अध्यक्षपदावर गांधीच असेल. काँग्रेसची ती 'मजबूरी' आहे. गांधी घराण्यातील कुणी तरी सर्वोच्च स्थानी असल्याशिवाय काँग्रेस पक्षात पाच गोष्टी होऊ शकत नाहीत - 1. पक्षबांधणी होऊ शकत नाही. 2. पक्षात शिस्त राहू शकत नाही. 3. पक्षातील परस्परविरोधी गट एकत्र राहू शकत नाहीत. 4. केंद्रीय नेतृत्वाचा वचक निर्माण होऊ शकत नाही. 5. या सर्व गोष्टी झाल्याशिवाय निवडणुकांत यश मिळू शकत नाही.

गांधी घराण्याचे नाव सोडून अन्य कुणाचे नाव घेतल्यास, म्हणजे त्याला अध्यक्ष केल्यास त्याच्या आज्ञेत सर्व राहतील, याची शाश्वती नाही. त्याचा 'सीताराम केसरी' केव्हा होईल, हे कुणी सांगू शकत नाही. यामुळे आज तरी काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय अन्य पर्याय नाही. या बाबतीत काँग्रेसजनांच्या मानसिकतेची इंग्रज राजकीय मानसिकतेशी तुलना करता येईल. इंग्रज राजकीय मानसिकतेला राजा किंवा राणी लागते. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजघराणे लागते. जे सरकार बनते त्याचे नाव असते 'हिज/हर मॅजेस्टीज गव्हर्नमेंट'. सरकार संसदीय पध्दतीचे असते. ते संसदेला जबाबदार असते. इंग्रजांची संसद म्हणजे क्राउन, खासदार आणि मंत्रीमंडळ याने बनते. क्राउन म्हणजे राजघराणे वंशपरंपरागत असते. ते निवडून आलेले नसते. जे काही करायचे ते त्याच्या नावाने, ही इंग्रज राजकीय मानसिकता आहे. काँग्रेसजनांचीदेखील हीच मानसिकता आहे.

देशाची ही मानसिकता नाही. जनतेची मानसिकता नाही. मतदारांची मानसिकता नाही. यामुळे काँग्रेसची मानसिकता आणि जनतेची मानसिकता यामध्ये खूप अंतर पडत चाललेले आहे. एक-एक गट काँग्रेसमधून बाहेर पडतो आहे. ममता बॅनर्जी गेल्या, शरद पवार गेले, आंध्रचे रेड्डी गेले, तामिळनाडू केव्हाच गेला, गुजरातही गेले, असे एक-एक नेते आणि प्रदेश काँग्रेसच्या मानसिकतेतून बाहेर पडत चालले आहेत.

सोनिया गांधीपुढे अध्यक्ष म्हणून फार मोठी आव्हाने आहेत. पहिले आव्हान जनमत अनुकूल करुन घेण्याचे आहे. आता 2004 सालची परिस्थिती नाही किंवा 2009ची परिस्थिती नाही. जनमत वेगाने काँग्रेसला प्रतिकूल झालेले आहे. ते अनुकूल करून घेणे वाटते तितके सोपे काम नाही. दुसरे आव्हान सोनिया गांधी यांचे इटालियन असणे आहे. त्या सफाईदार हिंदी बोलू शकत नाहीत. लोकभाषा नीट बोलता आली तर लोकांशी पटकन जोडून घेता येते. ही गोष्ट त्या करू शकत नाहीत. 2004 2009 साली त्यांच्याभोवती प्रयत्नपूर्वक एक वलय निर्माण करण्यात आले. राजीव गांधीच्या त्या पत्नी आहेत, त्यांच्या पतीची हत्या झाली, म्हणून सहानुभूती. 2004 साली त्यांनी पंतप्रधानपद नाकारले (असे आपल्याला वारंवार सांगितले गेले) आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. त्या त्यागमूर्ती झाल्या. एक महिला, एक विधवा, दोन मुलांची माता, त्यागमूर्ती हे सर्व विषय भारतीय मानसाला भुरळ घालणारे आहेत. ही भुरळ दोन निवडणुका जिंकण्यास कामात आली.

आता तिचा काहीही उपयोग राहिलेला नाही. तिसरे आव्हान भाजपाच्या विरोधात काँग्रेसची प्रतिमा सकारात्मक रितीने उभी करण्याची आहे. काँग्रेसला वाढायला राजकीय पोकळी कुठे अाहे (पॉलिटिकल स्पेस) याचा शोध त्यांना घ्यावा लागेल. मोदी यांच्या केंद्रीय शासनाचा कामाचा जो झपाटा चालू आहे, त्यात अशी स्पेस मिळणे अतिशय कठीण आहे. मोदी आज जे करीत आहेत, त्याच्या विरुध्द टोकाची भूमिका घेतली तर काँग्रेस पक्ष आणखी खोल खड्डयात जाईल. काश्मीर आणि 370 कलम याविरुध्द काहीही बोलण्याची स्थिती आज नाही. काँग्रेसच्या पैशावर पोसलेले भाट जे बोलतात किंवा लिहितात, तशी भाषा काँग्रेसच्या नेत्यांना करता येणार नाही, केली तर लोक लाथा घालतील.

सोनिया गांधींपुढील पुढचे आव्हान येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका, त्यानंतर बंगालची निवडणूक, अशी राज्यांच्या निवडणुकांची आव्हाने आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आज अत्यंत वाईट स्थितीत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात किंवा शिवसेनेत दाखल होत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचा जनाधार आटत चालला आहे. महाराष्ट्रात पाऊस जरी खूप झाला तरी काँग्रेसच्या शेतात मात्र मतांचे तळे आटत चालले आहे. बंगालमध्ये काँग्रेस उभी राहणे अतिशय कठीण आहे. महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेस पक्ष हा पक्ष म्हणून नीट उभा होता, तेव्हा सोनिया गांधींच्या नावाचा उपयोग पक्षाला झाला. आज पक्षच कोलमडलेला आहे. सोनिया गांधी तो उभा करू शकत नाहीत.

सोनिया गांधी सत्तेच्या राजकीय पदावर नसतानादेखील सर्वसत्ताधीश होत्या. संजय बारू यांच्या 'ऍक्सिडेंटल प्राइममिनिस्टर' या पुस्तकात आणि त्यावर निर्माण झालेल्या चित्रपटात आपण त्याची सुंदर झलक पाहू शकतो. त्या केवळ गृहिणी नाहीत, केवळ माता नाहीत, केवळ पक्षाच्या अध्यक्षा नाहीत, त्या अतिशय धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. त्या कॅथलिक आहेत. त्या जेव्हा सर्वसत्ताधीश होत्या तेव्हा त्यांच्या अवतीभोवती त्यांचे जे सल्लागार होते, त्यातील बहुसंख्य ख्रिश्चन होते. त्यांच्या कार्यकाळातच वस्त्या-पाडयात आणि खेडोपाडी चर्चेस उभी राहत गेली. धर्मांतराचे प्रकार मोठया प्रमाणात घडत गेले. मुंबईसारख्या झोपडपट्टी भागातही ख्रिस्तीकरणाचे प्रमाण फार मोठया प्रमाणात वाढले. तरुण भारतमध्ये योगिता साळवी यांनी 'वस्त्यांचे वास्तव' हे सदर वर्षभर लिहिले आणि वस्त्यांत फादर लोक कसे फिरतात, याचे अनेक किस्से दिले. याला सोनिया गांधीचा किती वरदहस्त होता, हे सिध्द करणे फार अवघड आहे. पण कॅथलिक सोनिया सत्तेवर आल्यानंतर हे प्रकार खूप वाढले हे सत्यदेखील नाकारता येत नाही.

म्हणून सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होणे हा जरी काँग्रेसचा अंतर्गत विषय असला, तरी काँग्रेस हा देशातील सगळयात मोठा आणि वयोवृध्द पक्ष आहे. काँग्रेस काहीही म्हणत असला, तरी तो मुख्यतः हिंदुचा पक्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळीदेखील तो हिंदूंचाच पक्ष होता, नंतरही तो हिंदूंचाच पक्ष राहिला आहे, म्हणून हिंदू समाजाने काँग्रेसची चिंता केली पाहिजे. संसदीय राजकारणात दोन पक्ष राहणार, हे दोन्ही पक्ष हिंदू हिताची काळजी करणारेच असले पाहिजेत. हिंदू हिताच्या काळजीतच सर्व धर्मपंथाच्या काळजीचा विषय येतो. हिंदू माणूस संकुचित विचार करू शकत नाही. त्याला सर्व धर्म सारखे असतात. दुर्दैवाने काँग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी झालेली आहे. ती सोनिया गांधींच्या काळातच झाली आहे. ही प्रतिमा आणखीन मलीन करायची की स्वच्छ करायची, हे जबरदस्त आव्हान सोनिया गांधींपुढे अाहे.

रमेश पतंगे

vivekedit@gmail.com